गुरुवार, २८ ऑक्टोबर, २०२१

निवेदिताची 'शॉलीड' साडी !


















वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी अभिनय क्षेत्रात आलेली निवेदिता, हिंदी-मराठी चित्रपट करत १९८५ साली ‘धुमधडाका’ या सुपरहिट चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आली आणि पुढे ‘दे दणादण’, ‘अशी हि बनवाबनवी’, ‘मामला पोरींचा’, ‘थरथराट’, ‘तुझी माझी जमली जोडी’, ‘लपवाछपवी’, ‘माझा छकुला’, ‘देऊळ बंद’ अशा अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांमधून तिनं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. सुरुवातीच्या चित्रपटांमध्ये ‘डॅशिंग’ भूमिका करणाऱ्या निवेदितानं बऱ्याच मराठी, हिंदी चित्रपटांमधून, नाटकांमधून आणि मालिकांमधून आपल्या सहज सुंदर अभिनयाची मोठी छाप पाडली आहे. शिवाय ‘झी मराठी’ या चॅनेलवरील ‘अग्गबाई सासूबाई,’ आणि ‘अग्गबाई सूनबाई’ या मालिकांमधून तर तिचा वेगळ्याच धाटणीचा सुंदर अभिनय आपण रोज पाहतो. ‘मामला पोरींचा’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान निवेदिता आणि अशोक सराफ यांचं प्रेम जुळलं आणि १९९० साली निवेदिता जोशी, निवेदिता जोशी-सराफ झाल्या.

लग्नाच्या आधी आणि चित्रपटांमधील डॅशिंग भूमिकांमुळे त्याकाळी, साडी नेसायचा त्यांचा फारसा योग आला नव्हता. लग्नानंतर मात्र साडी नेसायचे खूप प्रसंग येऊ लागले आणि त्यातून निवेदिताजींना साडी हा प्रकार खूप आवडू लागला. रंगसंगती, फॅब्रिकचा पोत आणि साड्यांची त्यांना असलेली जाण बघता त्यांनी नेसलेल्या साड्या त्यांच्या मैत्रिणींना खूप आवडू लागल्या. हौस म्हणून काही साड्या त्या, त्यांच्या मैत्रिणींना डिझाईन करून देऊ लागल्या आणि त्यांनी डिझाईन करून दिलेल्या साड्या त्यांच्या मैत्रिणींना खूपच आवडत असत. मग निवेदिता, त्यांची मैत्रीण मधु भंडारे हिच्यासोबत साड्या डिझाईन करू लागल्या आणि त्या दोघी, अनेक ठिकाणी साड्यांच्या प्रदर्शनात भाग घेऊ लागल्या. शिवाय गोव्यात सुद्धा निवेदिता - त्यांच्या जाऊबाई सौ नूतन खवटे यांच्या बरोबर साड्यांच्या प्रदर्शनांमध्ये भाग घेत असत.

निवेदिता म्हणाल्या, “मधु माझी ‘साडी – गुरु’ आहे. पुढे, मधूच्या तालमीत शिकल्यामुळे माझा स्वतःचा साडी व्यवसाय सुरु झाला. माझ्या मोठ्या बहिणीने आणि माझ्या नणंदेने सुद्धा मला या व्यवसायासाठी खूप प्रोत्साहीत केलं. आज वीस वर्षं झाली मी हा व्यवसाय करते आहे. माझ्या साड्यांना – ‘हंसगामिनी’ हे नाव पण माझे यजमान अशोक यांनी दिलं, ते देखील माझ्या कल्पकतेला नेहमी प्रोत्साहन देत असतात.”

या ‘हंसगामिनी’ साड्यांमधली, निवेदिता यांनी स्वतः डिझाईन केलेली एक 'हॅन्ड ब्लॉक प्रिंटची कलमकारी साडी’ त्यांना खूप आवडते. साड्यांसाठी त्या स्वतः कापडाची निवड करून तागे आणतात, त्यावर निवेदिता त्यांचे डिझाईन, लाकडी ब्लॉक वापरून 'हॅन्ड ब्लॉक प्रिंट’ करून घेतात. त्यांना कोयऱ्यांची डिझाईन्स खूप आवडत असल्यामुळे त्यांनी निरनिराळ्या कोयऱ्यांच्या डिझाईनचे ब्लॉक्स करून घेतले आहेत. पण त्यांनी डिझाईन केलेल्या साड्या, पूर्ण एकच डिझाईन आणि एकाच कापडाच्या नसतात. त्यांनी फोटोतली ही साडी बनवण्यासाठी ‘मल कॉटन’वर ‘कलमकारी हॅन्ड ब्लॉक प्रिंट’ करून घेतलेल्या ताग्यातले कापड घेऊन या साडीची बॉडी बनवली आहे, त्यावर हाताने कांथा स्टीच केलेली वेगळी बॉर्डर लावली. त्या, त्यांच्या साड्यांच्या बॉर्डरसाठी नेहमी जाड कापड वापरतात, त्यामुळे त्यांच्या साड्यांना आतून ‘फॉल’ नाही लावला तरी चालतो. या साडीच्या पदराला सुद्धा ऑरेंज आणि ब्लॅक फॅब्रिकचे पॅचेस लावून त्यावर हाताने थ्रेडवर्क केले आहे. एकाच साडीमध्ये, वेगवेगळ्या फॅब्रिकचे फ्युजन करतांना, निवेदिता नेहमी त्या साडीपेक्षा वेगळ्या फॅब्रिकचे ब्लाऊज त्या साडीबरोबर ‘पेअर’ करतात. ‘मल कॉटन’च्या या साडीवर शिफॉनचं ब्लाऊज शिवून त्यावर त्यांनी काठ भरून घेतले आहेत. त्यांच्या कल्पनेतून तयार झालेली ही 'हॅन्ड ब्लॉक प्रिंटची कलमकारी साडी’ पाहून अशोकजी त्यांना म्हणाले, “मस्त झाली आहे हं साडी,.... एकदम शॉलिड ! निवेदिता म्हणाल्या, “माझे यजमान जेव्हा एखाद्या गोष्टीला छान म्हणतात तेव्हा खरच ती गोष्ट out of the world  असते.... ! त्यांच्या कौतुकानं मला नेहमीच प्रोत्साहन मिळतं, आणि मग मी अजून नवीन कलाकृती निर्माण करते, आणि मग ती प्रत्येक कलाकृती युनिक ठरते !”

टीव्ही मालिकांच्या चित्रीकरणाच्या अत्यंत व्यस्त शेड्युलमधून सुद्धा वेळ काढून त्या अतिशय कल्पक साड्या तयार करत असतात. एकदा ‘स्टार प्लस’च्या ‘सपनोंसे भरे नैना’ या हिंदी मालिकेत काम करत असतांना, स्टार परिवाराच्या एका कार्यक्रमात त्यांना साडी नेसून नृत्य करायचे होते, त्या नृत्यासाठी त्यांनी एक अतिशय सुंदर साडी तयार केली. साडी नेसून सहज-सुंदर डान्स करता यावा म्हणून त्यांनी नृत्याला योग्य अशी एक साडी घेऊन ती ‘रॅपअराउंड स्कर्ट’ सारखी शिवून घेतली, त्यात निऱ्या आणि पदर सुद्धा ड्रेप करून शिवला होता. ‘रॅप अराउंड स्कर्ट’सारखी ती साडी कंबरेला लपेटून हुक लावायचे की झाली साडी नेसून ! विशेष म्हणजे ती साडी शिवलेली आहे हे कळून सुद्धा येत नाही ! अंदाजे ३० सेकंदात नेसता येणारी अशी शिवलेली साडी त्या त्यांच्या मैत्रिणींना नेहमी बनवून देत असतात.

निवेदिता म्हणाल्या, “साडी हा प्रकार मला प्रचंड आवडतो, हा पेहेराव मला खूप ग्रेसफुल वाटतो, त्यामुळे मी सतत साड्याच नेसत असते ! 'हॅन्ड ब्लॉक प्रिंट कलमकारीचं वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याची डिझाईनला ते पूरक ठरतं, या कलमकारीवर माझं खास प्रेम आहे त्यामुळे माझ्या साड्यांमध्ये या कलमकारीचा मी आवर्जून वापर करत असते !

     

‘मछलीपटम्’ शैलीतली कलमकारी !

मागील एका लेखामध्ये आपण ‘श्रीकलाहस्ती कलमकारी’ विषयी जाणून घेतलं होतं, आज आपण या लेखात कलमकारीचा दुसरा प्रकार – ‘हॅन्ड ब्लॉक प्रिंट कलमकारी’विषयी जाणून घेणार आहोत.

हजारो वर्षांपूर्वी, गोष्टी सांगून प्रबोधन आणि मनोरंजन करण्यासाठी या कलेचा तेव्हा उपयोग केला जात असे. ‘चित्रकथी’ समाजातील कलाकार गावोगावी फिरून ऐतिहासिक आणि पौराणिक गोष्टीतील प्रसंगांची चित्रं कापडावर काढून लोकांना गोष्टी सांगून आपली उपजीविका करत असत. मग त्यांनी रंगवलेली चित्रं देवळांच्या अंतर्गत सुभोभिकरणासाठी लावली जात. पुढे हे कलाकार ही शैली वापरून वस्त्रांवर सुद्धा चित्रं काढू लागले. त्याकाळी या कलेला ‘व्रतपानी’ हे संस्कृत नाव होतं. पुढे मुघल साम्राज्यात या ‘व्रतपानी’ कलेला ‘कलमकारी’ नावाने संबोधले जाऊ लागलं. ब्रिटीशांच्या काळात या दोन्ही शैली डबघाईला आल्या होत्या. मग स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सरोजिनी नायडू यांच्या वहिनी श्रीमती कमलादेवी चटोपाध्याय यांनी या कलेला पुनरुज्जीवीत केलं.

भारतात कलमकारी शैलीचे दोन उप-प्रकार बघायला मिळतात. आंध्रप्रदेशमध्ये ‘चित्तूर’ जिल्ह्यातील ‘श्रीकलाहस्ती’ या गावी उदयाला आलेली ‘श्रीकलाहस्ती शैलीतील कलमकारी’ आणि आंध्रप्रदेशमधील ‘कृष्णा’ जिल्ह्यात पूर्वेकडील समुद्रकिनाऱ्यावर वसलेलं ‘मछलीपटनम’ या गावी उदयाला आलेली मछलीपटम् शैलीतील, हॅन्ड ब्लॉक प्रिंट कलमकारी’ अशा दोन ढंगात कलमकारी केली जाते. ‘श्रीकलाहस्ती शैलीत’ हाताने ‘फ्री-हॅन्ड’ चित्रं काढली जातात म्हणून त्याला ‘पेन कलमकारी’ असेही म्हणतात, तर ‘मछलीपटनम शैलीत’ हाताने ब्लॉक प्रिंटींग केले जाते. ‘मछलीपटनम’च्या जवळ ‘पेदना’ या गावी सुद्धा हॅन्ड ब्लॉक प्रिंट कलमकारी’च्या सुंदर साड्या बनविल्या जातात. या कलेला त्यातील वैशिष्ट्यांमुळे ‘भौगोलिक स्थानदर्शक प्रमाणपत्र’ मिळाले असून त्या शैलीला ‘पेदना कलमकारी’ असही म्हटलं जातं.

आज आपण हॅन्ड ब्लॉक प्रिंट कलमकारी’ची साडी कशी बनते ते पाहणार आहोत. या शैलीत पानं-फुलं, झाडं-वेली, मोर, पक्षी, कोयऱ्या, कमळं किंवा इतर नैसर्गिक घटकांची नक्षी साडीवर लाकडी ब्लॉक्सने हाताने छापली जाते. अशा ओरिजिनल कलमकारी साड्यांसाठी नैसर्गिक रंग वापरले जातात. लोखंडाचे तुकडे, तुरटी आणि गुळ पंधरा दिवस पाण्यात बुडवून ठेवतात आणि या सगळ्या घटकांची एकत्रित प्रक्रिया होऊन डार्क काळ्या रंगाचा द्रव तयार होतो. हाच द्रव कारागीर साडीवरील डिझाईनची आऊटलाईन करण्यासाठी काळी शाई म्हणून वापरतात. शिवाय डाळींबाच्या बिया आणि साल, आंब्याची साल, इंडिगो घटक, निरनिराळी फुलं, झाडांची मुळं इत्यादी नैसर्गिक घटकांपासून बनविलेले वेगवेगळे नैसर्गिक रंग या प्रिंटींगसाठी वापरले जातात. हॅन्ड ब्लॉक प्रिंट कलमकारी’साठी लागणारे ब्लॉक्स उच्चप्रतीच्या सागवानी लाकडाचे बनविले जातात. खास ब्लॉक्स बनविणारे कारागीर पिढ्यानपिढ्या हे काम करत आले आहेत. या ब्लॉक्ससाठी सागवानी लाकडी ठोकळा घासून सपाट करून घेतला जातो आणि त्यावर पातळ पांढरा रंग दिला जातो, पांढऱ्या रंगामुळे त्यावर पेन्सिलने काढलेली नक्षी उठून दिसते. काही वेळेस ट्रेसिंग पेपरवर ‘फ्री हॅन्ड डिझाईन’ काढून घेतलं जातं आणि मग त्या लाकडी ब्लॉक वर ट्रेस केलं जातं. चित्र काढून झाल्यावर त्यावरच्या नक्षीनुसार छोटी हत्यारं वापरून बारीक ‘कार्व्हिग’ केलं जातं. शिवाय नक्षीच्या फक्त आऊटलाईनचे ब्लॉक्स देखील वेगळे कोरून घेतले जातात !

 हॅन्ड ब्लॉक प्रिंट कलमकारी’ साडी बनवण्यासाठी आधी सिल्क किंवा कॉटन अशा नैसर्गिक धाग्याचं पांढरं कापड निवडलं जातं. त्यातला स्टार्च जाण्यासाठी ती साडी मग धुवून घेतली जाते. त्यानंतर पाण्यात गाईचं शेण विरघळवून त्यात ती साडी एक दिवस बुडवून ठेवली जाते. दुसऱ्या दिवशी ऑफव्हाईट झालेली ती साडी पिळून उन्हात वळवून घेतली जाते. मग हिरड्याची पावडर रात्रभर पाण्यात भिजवून त्याची वस्त्रगाळ पेस्ट करून त्या पेस्टमध्ये ही साडी एक दिवस भिजवत ठेऊन दुसऱ्या दिवशी परत वाहत्या पाण्यात धुवून वाळवून हॅन्ड ब्लॉक प्रिंटग’साठी तयार केली जाते. या प्रक्रियेमुळे ब्लॉक प्रिंटिंगचे रंग साडीवर व्यवस्थित बसतात. नंतर लांबलचक टेबलावर साडी व्यवस्थित पसरून ठेवली जाते. सुरुवातीला काठावर आणि मग मधल्या डिझाईनचे आऊटलाईनचे ब्लॉक्स एकेक करून नैसर्गिक रंगात बुडवून साडीवर बारकाईने योग्य त्या जागी ठेवून – दाबून – ठोकून - छापून घेतले जातात. संपूर्ण साडीवरच्या डिझाईनची आऊटलाईन छापून झाल्यावर साडी वाळवून, वाहत्या पाण्यात धुवून मोठ्या पातेल्यात उकळून घेतली जाते. उकळल्यामुळे साडीवरचे छापलेले रंग अधिक गडद होतात. आऊटलाईनच्या आतील नक्षीसाठी दुसरे ब्लॉक वापरले जातात आणि परत धुवून, वाळवून, उकळण्याची संपूर्ण प्रक्रिया साडीत जितके रंग असतात तितक्या वेळा केली जाते !

अनेक टप्प्यातून शेवटी पूर्ण तयार झालेल्या या सुंदर साडीच्या मागच्या कष्टांना योग्य तो मोबदला मिळाल्यास हे कारागीर तग धरू शकतील आणि या कलेत अनेक नवनवीन प्रयोग करून जगाच्या पाठीवर ही कला अजून अधोरेखित करतील !




 ©रश्मी सातव  

rashmisatav@gmail.com 

       


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा