‘आनंदाचा ठेवा’......
विभावरीची आई तीन वर्षांपूर्वी अचानक देवाघरी निघून गेली. तिची आई
म्हणजे डॉ. मनीषा दिक्षित – ‘मराठी काव्यसमिक्षा’, हा त्यांचा पीएचडीचा विषय होता.
प्रतिभावंत लेखिका आणि थिएटर क्रिटीक असलेल्या मनीषाताई, सांस्कृतिक क्षेत्रातील
एक व्यासंगी व्यक्तिमत्त्व होत्या. उच्चशिक्षित आणि बुद्धीजीवी मनीषाताईंच्या
आवडी-निवडी पण सोज्वळ, सौम्य आणि अभिजात अशा होत्या. भाषेचा अलंकार बाळगणाऱ्या
मनीषाताई दागिने आणि कपडे यात मात्र फार रमणाऱ्या नव्हत्या पण त्यांना कॉटनच्या
आणि विशेष करून साऊथ
कॉटन साड्या प्रचंड आवडत असत. त्यांच्याकडे
सुंदर साऊथ कॉटन
साड्यांचा मोठा खजिना होता. त्यांच्या त्या कॉटनच्या साड्यांना त्या गंमतीने ‘कॉटनचे
शालू’ म्हणत......केवढी ही प्रगल्भता !
बंगलोरला,
विभाचे बरेच नातेवाईक राहतात, त्यामुळे विभावरीच्या आईचे बऱ्याचदा बंगलोरला
जाणे-येणे होत असे. त्या, त्यांच्या सगळ्या कॉटनच्या साड्यांची खरेदी खास बंगलोरला
जाऊन, ‘नल्लीज’ मध्ये करत असत. इतकच काय तर, विभावरीच्या साखरपुड्याच्या आणि
लग्नातल्या साड्या सुद्धा, चक्क विभावरी बेंगलोरला नसतांना त्यांनी एकट्यांनी
‘चिकपेठ’मध्ये जाऊन आणल्या. ‘चिकपेठ’ म्हणजे सिल्क आणि कॉटन साड्यांची मोठी
बाजारपेठ. विभावरीची आणि तिच्या आईची साड्यांची आवड एकाच धाटणीची आहे त्यामुळे विभावरी
तिच्या आईला म्हणाली होती, “तुला आवडतील त्या साड्या घेऊन ये, मला नक्कीच आवडतील.”....
आणि तसचं झालं त्यांनी आणलेली प्रत्येक साडी विभावरीला प्रचंड आवडली होती आणि त्या
साड्यांचं, विभावरीच्या कार्यक्रमांमध्ये भरभरून कौतुकही झालं होतं ! गंमत म्हणजे विभावरीच्या
आईच्या साड्या, विभावरीच्या मैत्रिणींमध्ये सुद्धा एक जिव्हाळ्याचा विषय होता !
आईच्या
अचानक जाण्याचा आघात, पुढे कितीतरी दिवस विभावरी पचवूच शकली नाही....आईच्या खोलीत
जाऊन, तिच्या वस्तू आवरणं किंवा त्या वस्तूंकडे नुसतं बघणही विभावरीसाठी खूपच अवघड
होतं.... पुढे असचं दीड वर्ष उलटल्यानंतर, एक दिवस, ठरवून विभावरी त्या खोलीत गेली
आणि तिने आईचं कपाट उघडलं......आणि तिला आईचे शब्द आठवले.... “मी गेल्यावर माझ्या
सगळ्या साड्या तू घे....माझा ठेवा समज !” आई गेल्याच्या दुःखात असलेल्या विभावरीला,
आईचा स्पर्श झालेल्या त्या साड्या, ‘आनंदाचा ठेवा’ घेऊन आल्या ! त्या साड्यांमधून विभावरीला
परत तिची आई भेटली....!
त्या ठेव्यातली, एक सुंदर गाजरी रंगाची, कॉन्ट्रास्ट टेम्पल बॉर्डर असलेली आणि साडीभर विखुरलेले ‘हजारी बुट्टे’ असलेली साऊथ कॉटन साडी, विभावरीने त्या नंतर येणाऱ्या गणेश चतुर्थीला नेसली
आणि त्या साडीत तिला तिच्या आईचा मऊसूत स्पर्श जाणवला आणि त्यामुळे आई ठेवून
गेलेल्या ‘आनंदाच्या ठेव्या’नेच तिला आईच्या दुःखातून बाहेर यायला मदत केली !
विभावरीने हा ‘आनंदाचा ठेवा’ खूप जतन करून ठेवला आहे आणि विभावरी, त्यातीलच काही साड्या आईच्या जवळच्या मैत्रिणींना आणि विभावरीच्या काही खास मैत्रिणींना – ज्यांना तिच्या आईच्या साड्या आवडायच्या, ‘आईची आठवण’ म्हणून देणार आहे ज्यामुळे हा आनंदाचा ठेवा असाच पुढेही वाटला जाईल ...!
डौलदार दाक्षिणात्य सुती साडी !
दक्षिण भारतात खूप मोठी ‘टेक्सटाईल इंडस्ट्री’ आहे. दक्षिण भारतातलं सिल्क
आणि कॉटन जगभर प्रसिद्ध आहे. सिल्कचा धागा कसा बनतो हे आपण पूर्वी पाहिले आहे. आज
आपण कॉटनचा धागा कसा बनतो ते पाहूयात. झाडावरच्या कापसाच्या बोंडांमधून कापूस
वेचल्यानंतर त्यातील ओलावा जाण्यासाठी उन्हात वाळवून त्यातील सरकी म्हणजे बिया
काढल्या जातात. बिया काढण्याच्या प्रक्रियेला ‘जिनिंग’ म्हणतात. मग त्या कापसाचे
पिंजण म्हणजे ‘कार्डिंग’ केले जाते. त्या पिंजलेल्या कापसाचे पातळ शीट्स तयार केले
जातात. मग ते शीट्स गुडाळून लांबट नळ्या तयार केल्या जातात, त्यांना ‘पेळू’ किंवा
हिंदीत ‘पुनी’ असे म्हणतात. मग त्यातील एक धागा पकडून त्याला टकळी किंवा
चरख्याच्या सहाय्याने पिळ देत ओढला जातो.
त्यातून एक लांबलचक धागा तयार होतो, याला सूत-कताई असे म्हणतात. याच सुतापासून
पुढे हातमागावर खादीचे कापड बनते आणि हिच सगळी प्रक्रिया जर मशीनवर केली तर जे
कापड बनते त्याला सुती कापड म्हटले जाते.
हाताने कातलेल्या सुतापासून, हातमागावर साड्या
बनवितांना हे सुत, हातमागावर थेट लागले जाते. पण मशिनवर काढलेले सूत खूप पातळ असते
म्हणून दोन ते तीन सूतांना पीळ देऊन, दोन ते तीन प्लायचा धागा बनविला जातो आणि मग
हे धागे हातमागावर उभे-आडवे लावले जाऊन, ‘हँडलूम सुती साड्या’ खूप निगुतीने विणल्या
जातात. हँडलूम साड्या बनवितांना लागणारे कसब, वेळ आणि मेहनत बघता हँडलूम साड्या, पॉवरलूम
वर विणलेल्या साड्यांपेक्षा का महाग असतात, याचे उत्तर मिळते.
दक्षिण भारतातल्या कर्नाटक, केरळ, आंध्रपदेश,
तेलंगणा आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये, अनेक गावांमधून कॉटनच्या साड्या विणल्या
जातात. या राज्यातल्या त्या त्या ठिकाणच्या स्थानिक विणकरांनी या साड्यांमध्ये
वैविध्य आणले आहे, आणि त्यानुसार चेट्टीनाड, कोवाई, कसावू, धारवाड, मंगलगिरी,
वेंकटगिरी, गुंटूर, सनगुडी अशी असंख्य नावं त्या साड्यांना मिळाली आहेत. गावांच्या
नावावरून किंवा डिझाईनच्या प्रकारावरून दक्षिणात्य सुती साड्यांना अशी वेगवेगळी
नावे जरी पडली असली तरी एकत्रितपणे या साड्यांना साऊथ कॉटन साड्या असेही म्हटले
जाते.
या हातमागावर विणलेल्या साऊथ कॉटन साड्या नेसायला हलक्या-फुलक्या जरी असल्या तरी, टिकायला खूप दणकट असतात. कोणत्याही ऋतूत नेसता येणाऱ्या या साड्या पिढ्यांपिढ्या टिकतात, त्यामुळे या मऊसूत साड्यांच्या ऊबदार गोधड्या पण अतिशय सुंदर दिसतात. विशेष म्हणजे या साड्यांच्या डिझाईनवर दाक्षिणात्य मंदिरांचा आणि तिथल्या निसर्गाचा खूप प्रभाव पडलेला दिसतो. या साड्यांच्या कॉन्ट्रास्ट बॉर्डर्स पण अप्रतिम असतात. या साड्यांवरच्या डिझाईनमध्ये बऱ्याचदा गोपुरं, कोयऱ्या, रुद्राक्ष, रुई फुलं, वेलबुट्टी आणि पानं वगैरे असतात. ज्या भागात साडी विणली जाते त्या भागातील संस्कृती आणि नैसर्गिक संसाधनांचे, ती साडी प्रतिनिधित्व करत असते. त्यामुळे या साड्यांमधून दाक्षिणात्य सौंदर्याचं दर्शन घडतं.
Rashmi Satav
rashmisatav@gmail.com



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा