मराठी चित्रपट आणि मालिकांमधून दिसणारी एक उदयोन्मुख अभिनेत्री –
अश्विनी महांगडे, ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ आणि ‘आई कुठे काय करते ?’ या मालिकांमुळे
खूप लोकप्रिय झाली. शेतकरी कुटुंबात जन्माला आलेली अश्विनी, पसरणीच्या एका
छोट्याशा शाळेत शिकत होती. अभिनय कलेचं आणि समाजसेवेचं बाळकडू तिला तिच्या
वडीलांकडून – प्रदीपकुमार महांगडे यांच्याकडून लहानपणीच मिळालं होतं. तिचे वडील
हौस म्हणून वाईमधील ‘युवा कला केंद्रा’मधून ‘राज्य नाट्य स्पर्धे’साठी आणि गावच्या
यात्रेसाठी नाटकं बसवत असतं. त्या नाटकांमधून ते अभिनय आणि दिग्दर्शनाचे काम करत
असत आणि हेच संस्कार अश्विनीवर लहानपणीच झाले आणि तिच्यातली अभिनयाची आवड जोपासली
गेली. अश्विनी कॉलेजमध्ये असतांना सुद्धा तिने नृत्य आणि नाटकांमधून भाग घ्यावा
म्हणून तिचे वडील – नाना तिला नेहमी प्रोत्साहन देत असत. शिक्षण आणि कलेची जोपासना
करतांना नाना तिच्यावर समाजसेवेचेही संस्कार करत असत. ते स्वतः एक समाजसेवक होते
आणि आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो हा विचार त्यांनी तिच्यात लहानपणीच रुजवला
होता !
‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिका करतांना अश्विनीला आतून उमगलं की आपली
अभिनयकला समाजातील प्रेक्षकांमुळेच जोपासली जात आहे आणि त्यामुळे समाजासाठी आपण
काहीतरी केलं पाहिजे असं तिला मनापासून जाणवलं ! मग तिने आणि निलेश जगदाळे यांनी २०१९
मध्ये नानांच्या मार्गदर्शनानुसार ‘रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य’
ही सामाजिक संस्था स्थापन केली. या संस्थेमार्फत ती अनेक उल्लेखनीय सामाजिक कार्य आजही
करत आहे. परंतु मे महिन्यात, ‘कोविड’मुळे वयाच्या अवघ्या ५६ व्या वर्षी तिचे नाना
तिला कायमचे सोडून गेले. तिच्यासाठी हा खूप मोठा आघात होता पण त्यातून सावरून ती,
नानांनी तिला दाखवून दिलेल्या ‘समाजसेवेच्या मार्गावरून’ चालत आहे !
लहानवयात करत असलेल्या अश्विनीच्या सामाजिककार्याने प्रभावित होऊन
अनेक जण तिला प्रोत्साहन देत आहेत. तिच्या या कामाची दाखल घेऊन बारामतीत राहणारे
तिच्या मित्राचे दाजी आणि त्यांचे कुटुंबीय तिचे कायम कौतुक करत असतात. दोन
वर्षांपूर्वी तिच्या या कामाचा सन्मान म्हणून उलगडे, शिंदे आणि जैन यांनी त्यांच्या
स्वतःच्या साडीच्या दुकानातून ‘प्रिया साडीज’च्या कलेक्शनमधून एक छानशी खादीची
साडी तिला भेट दिली. समाजसेवेचं कौतुक ‘खादी’नं केल्यामुळे अश्विनीला तो एक ‘कल्पक
सन्मान’ वाटला. अश्विनी म्हणाली, “समाजसेवेचा संस्कार एका पिढीकडून दुसऱ्या
पिढीकडे संक्रमित होतो. आई-वडिलांनी केलेल्या संस्कारांमुळे माझ्यात समाजसेवेचं बीज
रुजलं गेलं आहे आणि त्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी भेट म्हणून खादीची साडी देणं
याला मी माझा सन्मान मानते. छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा त्यांच्या दरबारात
येणाऱ्या महिलेचा, आऊसाहेबांकरवी साडी-चोळी देऊन मान करत असत. त्यामुळे हा सन्मान
माझ्यासाठी खूप मोलाचा आहे.” समाजसेवेच्या संस्कारात मोठ्या झालेल्या अश्विनीच्या
घरातले पारंपरिक संस्कारही खूप उल्लेखनीय आहेत. अश्विनीच्या घरी पहिल्यादा आलेल्या
प्रत्येक स्त्रीची साडीने ओटी भरली जाते ! शिवाय तिच्या सगळ्या वहिन्या त्यांना
नवीन घेतलेल्या साड्यांच्या घड्या, त्या स्वतः न मोडता अश्विनीला नेसायला देतात !
स्वतःच्या साडीची घडी दुसऱ्याला मोडायला देणं... दुसऱ्यानं ती साडी पहिल्यांना
नेसून मग आपण नेसणं, हा विचारच किती सुंदर आहे ! परंतु दोन वर्षांपूर्वी अश्विनीला
मिळालेल्या खादीच्या साडीची, खास प्रसंगी नेसायची म्हणून ठेवलेली घडी मोडायचा योग
काही येत नव्हता ! पण मागच्या महिन्यात १५ ऑगस्टला एका सामाजिककार्यात अश्विनीने
ती खादीची साडी आवर्जून नेसली आणि तेव्हा तिला तिच्या नानांची प्रकर्षाने आठवण
झाली.....तिला, त्या साडीतले खादीचे धागे म्हणजे....तिचे नाना आणि तिचे समाजकार्य
यांना जोडणारा एक प्रभावी दुवा वाटतो !
स्वदेशी चळवळीतील ‘खादीची
साडी’ !
खादी हे नुसते एक वस्त्र नसून तो एक ‘प्रभावी
विचार’ आहे आणि या विचारधारेने स्वातंत्र्यप्राप्तीच्या लढ्यात खूप मोलाचा वाटा
उचलला होता. भारतात इंग्रजांचे राज्य येण्यापूर्वी इथे पुरेसे कापड तयार होत होते, पण इंग्रजांचे
राज्य सुरु झाल्यावर पुढे युरोपमध्ये औद्योगिक क्रांती झाली आणि इंग्लंडमध्ये मोठ्या
प्रमाणात कापडनिर्मिती होऊ लागली तेव्हा भारतासारखी मोठी बाजारपेठ त्यांच्या हातात
होती. भारतावरचे त्यांचे वर्चस्व कायम राहण्यासाठी इथल्या कापड उद्योगासकट इतर
ग्रामोद्योगही इंग्रजांनी बंद पाडले ! पुढे स्वातंत्र्यलढ्यात विलायती वस्तूंवर
आणि कापडावर बहिष्कार टाकून स्वदेशी वस्तूंचा वापर वाढवा म्हणून ७ ऑगस्ट १९०५ रोजी
‘स्वदेशी चळवळीची’ घोषणा करण्यात आली. मग १९२० च्या सुमारास एकूण आयातीतील तयार
परदेशी कापडाचे प्रमाण सर्वाधिक होते. अशा परिस्थितीत वस्त्रोद्योगाचे पुनरुज्जीवन
हा प्रभावी उपाय महात्मा गांधीजींनी आमलात आणला. त्यामुळे देश स्वावलंबी
होण्यासाठी आपला हातभार लागावा अशा विचारसरणीच्या लोकांच्या घरोघरी चरख्याच्या व टकळीच्या
सहाय्याने सूतकताई व खादीचे विणकाम सुरु झाले. महात्माजींमुळे या चळवळीला
राष्ट्रव्यापी स्वरूप आले, त्यातून खादीची वस्त्र-निर्मिती आणि खादीचा वापर वाढला.
ही चळवळ पुढे स्वातंत्र्यप्राप्तीच्या लढ्यासाठी इतकी प्रभावी ठरली की १५ ऑगस्ट
१९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि त्या दिवशी पंडित जवाहरलाल नेहरूंनी ज्या
झेंड्याचे ध्वजारोहण केले तो तिरंगा खादीचा होता. ‘स्वदेशी चळवळीच्या’ सन्मानार्थ
पुढे जुलै २०१५ मध्ये, भारत सरकारकडून ‘७
ऑगस्ट’ हा दिवस, ‘राष्ट्रीय हातमाग दिवस’ म्हणून जाहीर करण्यात आला !
स्वातंत्र्यलढ्यात सुरु झालेली चरख्यावरची खादी-वस्त्राची
निर्मिती पुढे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर कमी झाली, तरी आजही काही ठिकाणी चरख्यावर
खादी-वस्त्रनिर्मिती होत आहे ! अलीकडच्या
काळातही भारत सरकारकडून खादी ग्रामोद्योगाला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळत आहे.
आजही वर्ध्यात ‘ग्राम सेवा मंडळात व साबरमती आश्रमात आणि देशातील खादी निर्मिती
करणाऱ्या ग्रामोद्योगात चरख्यावर खादीचे वस्त्र विणले जात आहे ! सोयीच्या दृष्टीने
पुढे चरख्यात मात्र अनेक प्रकार बनवले जाऊ लागले. ‘पेटी चरखा’, ‘प्रवासी चरखा’, ‘पुस्तक
चरखा’, ‘किसान चरखा’ आणि ‘अंबर चरखा’ इत्यादी, यातील ‘पेटी’, ‘प्रवासी’ आणि ‘पुस्तक
चरखा’ घडी घालून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येण्यासारखे आहेत. खादी
विचारांनी प्रभावित असलेली काही कुटुंब आजही स्वतः सूतकताई करून विणलेली खादीची
वस्त्रं वापरत आहेत. पुण्यातील माधव सहस्त्रबुद्धे आणि त्यांचे कुटुंब,
त्यांच्याकडे घरी असलेल्या ‘पेटी चरख्यावर’ रोज एक तास सूतकताई करून त्या
सूतापासून दरवर्षी वर्षभर पुरेल इतके वर्ध्याहून हातमागावर कापड विणून घेऊन फक्त
तेच कापड ते वर्षभर वापरतात, असे ते अनेक वर्षे करत आहेत ! सहस्त्रबुद्धे म्हणाले,
“सूतकताई ही मला सन्मानपूर्वक मिळालेली संधी आहे. रोज एक तास सूतकताई केली तर
प्रत्येक जण आपल्या कुटुंबाला गरजेइतके कापड बनवण्यासाठी पुरेल इतके सूत सहज कातू
शकतो ! ”
चरख्यावर सूतकताई करून विणल्या साड्या परिधान
करणं म्हणजे खादी वस्त्रोद्योगाला आणि स्वावलंबी विचारधारेला प्रोत्साहन
देण्यासारखं आहे. कापसापासून सूत कातून त्याची साडी विणण्यापर्यंत अनेक टप्प्यातून
जाणारी ही साडी म्हणजे निसर्गस्नेही जीवनाच्या सर्व अंगांना जोडणारा एक मुलभूत
धागा वाटतो. झाडावरच्या कापसाच्या बोंडांमधून कापूस वेचल्यानंतर तो स्वच्छ करून
त्यातील ओलावा जाण्यासाठी उन्हात वाळवून त्यातील सरकी म्हणजे बिया काढल्या जातात.
बिया काढण्याच्या प्रक्रियेला ‘जिनिंग’ म्हणतात. मग त्या कापसाचे पिंजण म्हणजे ‘कार्डिंग’
केले जाते. हा कापूस हाताने किंवा ‘धनुकली’ नावाच्या छोट्याशा धनुष्याच्या
आकाराच्या यंत्राचा वापर करून हाताने कापूस पिंजला जातो. त्या पिंजलेल्या कापसाचे
पातळ शीट्स तयार केले जातात. मग ते शीट्स बारीक काठ्यांवर लपेटून लांबट नळ्या तयार
केल्या जातात, त्यांना ‘पेळू’ किंवा हिंदीत ‘पुनी’ असे म्हणतात. मग त्यातील एक
धागा पकडून त्याला टकळी किंवा चरख्याच्या सहाय्याने पिळ देत ओढला जातो. त्यातून एक
लांबलचक धागा तयार होतो, याला सूत-कताई असे म्हणतात. या सुताची ५०० मीटरची एक अशा
अनेक गुंड्या (लड्या) तयार केल्या जातात. रंगीत साडी हवी असेल तर नैसर्गिकपणे ‘ऑफ
व्हाईट’ रंगाच्या असलेल्या या गुंड्या आधी नैसर्गिक रंगात ‘डाय’ करून घेतल्या
जातात. मग हातमागावर हे सुती धागे तान्या-बान्यात लावून खादीच्या साड्या विणल्या
जातात. लांब तंतू असलेला देवकापूसापासून तलम कापड तयार होते म्हणून खादीची साडी
विणण्यासाठी हा कापूस वापरला जातो. खादीची साडी म्हणजे हाताने कातलेले सूत वापरून
हातमागावर विणलेली साडी. या संपूर्ण प्रक्रियेत फक्त मानवी श्रमांचा वापर होतो.
बाह्य ऊर्जा वापरली जात नाही. परंतु अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात खादीची
निर्मिती करून विक्रीसाठी आणतांना, बाह्य उर्जेचा वापर करून ‘अंबर चरख्यातून’
सूतकताई केली जाते, असे सुती धागे मिलमध्ये विणले जाऊन खादीचे तागे किंवा साड्या
विणल्या जात आहेत. संपूर्ण प्रक्रिया हाताने करून विणलेली खादीची साडी आणि
मिलमध्ये विणलेली खादीची साडी यातील फरक सहज ओळखता येतो. हाताने विणलेल्या खादीची
वीण जराशी सैल असते, शिवाय हाताने बनवलेल्या धाग्यातून बारीक तंतू बाहेर आलेले
असतात त्यामुळे हे कापड त्वचेला चिकटून न बसता त्यातून हवा खेळती राहते. तसेच खादीतील
सुताचा पीळ साधारणपणे मिलच्या सुतापेक्षा कमी असतो, त्यामुळे खादीमध्ये घाम किंवा
पाणी चांगले शोषले जाते. त्यामुळे खादीच्या साड्या कोणत्याही ऋतूत सहज वापरता
येतात. वापरलेल्या मऊसूत खादीच्या साड्यांच्या गोधड्या वापरणं म्हणजे तर स्वर्गीय
सुख असतं !
मी जेव्हा सहस्त्रबुद्धे यांच्याकडील पेटी
चरख्यावर ‘सूतकताई’ केली तेव्हा ती सूतकताई करतांना माझं मन इतकं एकाग्र आणि
अंतर्मुख झालं आणि मनात विचार आला की ‘कोरोनाकाळाने’ शिकवलेली, उपलब्ध
साधनसामुग्रीतून ‘मिनिमलिस्टीक लिव्हिग’ची संकल्पना अगदीच शक्य आहे ! नवीन पिढीनं,
त्यांना उपलब्ध होत असलेल्या अनंत वस्तूंच्या भडिमारात ‘मिनिमलिस्टीक लिव्हिग’ची
संकल्पना समजून घेण्यासाठी एकदा तरी ‘सूतकताई’ नक्कीच करून बघायला हवी !
©रश्मी सातव
rashmisatav@gmail.com



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा