प्राजक्ताच्या फुलांच्या सड्याप्रमाणे,
प्राजक्ता माळीचं लक्षात राहणारं ‘टपोरं हास्य’ म्हणजे पारिजातकाच्या झाडाखाली
भरलेली ‘हास्यजत्रा’ वाटते ! सोनी टीव्हीवरील ‘हास्यजत्रेतील’ प्राजक्ताच्या अँकरिंगला, नृत्याला आणि अगदी
तिच्या ‘दाद देण्यालाही’ दाद द्यावीशी वाटते ! नृत्य आणि अभिनयकलेचं अंग तिला
लहानपणापासूनच होतं, शिवाय पुढे तिनं ‘भरतनाट्यम’मध्ये ‘एमए’ केलं. २०११
मध्ये ‘स्टारप्रवाह’वरील ‘सुवासिनी’ या मालिकेतून सुरु झालेला तिचा प्रवास, झी
मराठीवरील ‘जुळून येती रेशीम गाठी’ या मालिकेमुळे अधोरेखित झाला आणि मग अनेक
चित्रपट, मालिका करत सोनी टीव्हीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शो मधून तिनं लोकप्रियतेची
एक उंची गाठली. या शो मधला तिचा सहज-सुंदर वावर तर खुपच कमाल आहे !
कॅमेरासमोर ती जेवढी सहज वावरते तेव्हढीच सहज
ती खऱ्या आयुष्यात पण वावरत असते. पंढरपूरमध्ये जन्म झालेल्या प्राजक्ताच्या
आवडी-निवडी सुद्धा साध्या राहणीमानाला साजेशा अशाच आहेत. प्राजक्ता म्हणाली, “या
क्षेत्रात मला नेहमी ग्लॅमरस रहावे लागते, पण इतर वेळेस मला मोकळे ढाकळे – ढिले कपडे वापरायला
जास्त आवडतात. घरात, प्रवासात आणि शुटींग नसतांना इतर वेळेस मी फक्त कॉटनच वापरते.
शिवाय माझा सर्वात आवडता पेहेराव विचारला तर मला साड्या नेसायला खूप आवडतात. स्त्रीचं
सौदर्य साडीत अजूनच खुलतं. त्यात ती कॉटनची साडी असेल तर सोन्याहून पिवळं ! माझ्याकडे
कॉटनच्या साड्यांचं मस्त कलेक्शन आहे. शिवाय आपण विषुववृत्तीय प्रदेशात राहतो, अशा
ठिकाणी राहणाऱ्या लोकांनी तर खास कॉटनच वापरावं !”
तर अशा या कॉटन-प्रेमी प्राजक्ताला तिच्या एका ‘ड्रेस डिझायनर’नं एक सुंदर पिवळ्या रंगाची बगरू प्रिंटची साडी आणि त्यासोबत सुंदर ईकतचं काळ्या रंगाचं ब्लाऊज भेट दिलं. त्या डिझायनरची इच्छा होती की प्राजक्तानं ती साडी ‘हास्यजत्रेच्या’ एका एपिसोडला नेसावी आणि प्राजक्ताने खरचं ‘हास्यजत्रेच्या’ एका एपिसोडला ती साडी नेसली. सुंदर ड्रेप होणाऱ्या त्या सोनसळी पिवळ्या साडीवर ‘ईकत’चं ते काळं ब्लाऊज फार सुरेख दिसत होतं. त्या ‘डिसेंट’ साडीमध्ये प्राजक्ता खूप ग्लॅमरस दिसत होती, सेटवर सगळे तिला ‘हॉट अँड स्वीट’ म्हणत होते. प्राजक्ता, साडी हा प्रकार खूप ‘ग्रेसफुली’ कॅरी करते. हास्यजत्रेच्या सेटवर तिने त्यादिवशी पहिल्यांदाच कॉटनची साडी नेसली होती, म्हणून सेटवर सगळे तिला ‘शिक्षिका’ म्हणत होते ! पिवळ्या-काळ्या कॉम्बिनेशनमुळे समीर चौगुले तर तिला गंमतीने ‘मुंबईची टॅक्सीवाली’ म्हणत होता ! त्या दिवशी प्राजक्ताला ती साडी इतकी आवडली होती की तिने त्या सेटवर ती साडी खूप मिरवली आणि खास फोटो शूटही करून घेतलं ! प्राजक्ताचे ते कॉटन-प्रेम बघून, पुढे ‘हास्यजत्रेचे’ अजून दोन एपिसोड्स तिच्या वेगवेगळ्या कॉटन साड्यांमध्ये शूट झाले.
प्राजक्ताचं हे ‘कॉटन प्रेम’ कदाचित लहानपणापासून असावं..... तिच्या आजीच्या वापरलेल्या मऊसुत नऊवार साड्यांच्या - तिच्या आजीनेच शिवलेल्या गोधड्यांशिवाय तिला लहानपणी झोप येत नसे !
बगरूची ओळख - ‘बगरू साडी’ !
राजस्थानमध्ये
नैसर्गिक स्त्रोतांची कमतरता असून देखील वर्षानुवर्षे नैसर्गिक घटकांचा मोठ्या
कल्पकतेने वापर होत आला आहे. उपलब्ध साधनसामुग्रीतून राजस्थानमध्ये अनेक कला
जन्माला आल्या आणि जोपासल्या गेल्या, त्यातीलच या आकर्षक रंगातल्या ‘बगरू प्रिंट
साड्या’ ! राजस्थानची राजधानी
जयपूरच्या जवळ ३२ किलोमीटरवर असलेलं एक छोटेसं गाव म्हणजे – बगरू. या गावात साधारण
४०० ते ५०० वर्षांपूर्वीपासून ‘छिपा’ समाजाचे लोक हाताने कापडावर ‘ब्लॉक-प्रिंटींग’ करत आले आहेत. हाताने
छापणारे म्हणून या समाजाला ‘छिपा’ हे नाव पडले. या गावातील बहुतांश लोकांचे आडनाव
‘छिपा’ आहे. या गावात छापल्या जाणाऱ्या प्रिंटला स्वतःची ओळख आहे आणि म्हणून या
प्रिंटला ‘बगरू प्रिंट’ असे म्हणतात.
बगरू प्रिंटींग करण्यासाठी लाकडाचे छाप वापरले
जातात. शिसवी लाकडाचे हे छाप करणारे कारागीरही या गावात अनेक वर्षांपासून
लाकडाच्या सपाट ठोकळ्यांवर कोरीवकाम करून अतिशय सुंदर छाप बनवत आहेत. या छापांमध्ये
निसर्गातील घटकांचा आणि भौमितिक आकारांचा अतिशय कलात्मक वापर केलेला दिसतो. छिपा
कुटुंबातील काही शिसवी छाप तर पुढच्या पिढ्याही वापरत आहेत. हे छाप नैसर्गिक रंगात
बुडवून साड्यांवर दाब देऊन छापले जातात. वेगवेगळ्या नैसर्गिक फॅब्रिकवर हे बगरू
प्रिंट केले जाते. कॉटनच्या बगरू साड्या तयार करण्यासाठी उच्च प्रतीचं मलमल-कॉटनचं
पांढरं कापड वापरलं जातं. त्यात असणारे स्टार्च घालवण्यासाठी आधी ते कापड धुवून घेतले
जाते. मग हिरड्याची पावडर करून, पाण्यात त्याची पेस्ट करून घेतली जाते, त्या
पेस्टमध्ये हे कापड व्यवस्थित बुडवून उन्हात वाळवून घेतले जाते. त्यामुळे हे कापड ‘ऑफ-व्हाईट’
होते आणि हिरड्यामुळे पुढचे रंगही या साडीवर व्यवस्थित बसतात. मग ही साडी लांबलचक
टेबलवर पसरवली जाते आणि मग सुरु होतं ब्लॉक-प्रिंटींग. हे ब्लॉग-प्रिंटींग अनेक
टप्प्यात होते. यासाठी तीन प्रकारचे छाप वापरले जातात. एक असतो ‘रेख-छाप’ – याने
डिझाईनची फक्त आऊटलाईन छापली जाते. ही आऊटलाईन काळ्या किंवा लाल नैसर्गिक रंगात
छापली जाते. हे कारागीर काळ्या रंगाला ‘शाई’ आणि लाल रंगाला ‘बेगर’ म्हणतात. हे
रंगही निसर्गातील घटकांपासून तयार केले जातात. काळी शाई तयार करण्यासाठी पाण्यात
गंजलेलं लोखंड आणि गुळ एकत्र करून मोठ्या ड्रममध्ये त्यावर तारीख टाकून महिनाभर
ठेवतात, मग पाण्यात गुळ आणि लोखंडाची प्रक्रिया होऊन गडद काळ्या रंगाची दाट शाई
तयार होते ! लाल रंगासाठी झाडावर मिळणारा डिंक, तुरटी आणि गेरू एकत्र करून त्याची
दाटसर पेस्ट केली जाते. ‘रेख-छापा’ने आऊटलाईन काढून झाल्यानंतर गरजेनुसार ‘गद-छाप’
वापरले जातात. या छापांचा वापर करून डिझाईनची बॅकग्राउंड भरून घेतली जाते आणि मग हे
सगळे रंग पूर्ण वाळवून, साडी साध्या पाण्यात धुवून परत वाळवून घेतली जाते. मग
पुढच्या प्रक्रियेत लाकडाची मोठी चूल पेटवली जाते, या चुलीवर तांबं धातूच्या
मोठ्या हंड्यात उकळत्या पाण्यात चिंचेची फुलं (स्थानिक लोक त्याला ‘धवाईची फुलं’
म्हणतात) आणि थोड्या प्रमाणात ‘अलझरीन’ नावाचा पदार्थ टाकला जातो. पूर्वी
‘अलझरीन’च्या ऐवजी ‘आल’ नावाच्या राजस्थानमधील झाडाच्या मुळ्या टाकल्या जात असत,
परंतु आता ती झाडे फार उपलब्ध नसल्याने ‘अलझरीन’ वापरले जाते. ‘अलझरीन’मुळे
तांब्याच्या भाड्यात साडीवरील काळ्या किंवा लाल शाईवर प्रक्रिया होऊन ते रंग खूप
पक्के आणि गडद होतात आणि चिंचेच्या फुलांमुळे नक्षीच्या आजूबाजूला जास्तीचा लागलेला
रंग निघून जायला खोडरबराप्रमाणे मदत होते. हंड्याच्या आकारानुसार एकावेळेस
एकापेक्षा जास्तही साड्या उकळल्या जातात आणि मधून मधून लाकडाच्या बांबूने त्या साड्या
व्यवस्थित ढवळून घेतल्या जातात. अंदाजे अडीच तास या साड्या उकळल्यानंतर बाहेर
काढून निथळून पूर्ण वळवल्या जातात. आता पुढच्या टप्प्यात या साड्यांवर दुसर रंग
हवे असल्यास ‘दाबू प्रिंटींग’ केले जाते. इथे तिसऱ्या प्रकारचे छाप वापरले जातात,
त्याला ‘दाबू-दट्टा छाप’ म्हणतात. हे प्रिंटींग करण्यासाठी आधी ‘दाबू पेस्ट’ करून
घेतली जाते. पाण्यात काळी माती, चुना, झाडावरचा डिंक आणि खराब झालेल्या गव्हाची
पावडर किंवा कोंडा एकत्र करून दाटसर वस्त्रगाळ पेस्ट करून घेतली जाते. या
पेस्टमध्ये ‘दाबू-दट्टा छाप’ बुडवून छापले जातात. नक्षीच्या ज्या जागी पुढचा रंग
नको असतो, त्या जागी छापानुसार ही पेस्ट लागली जाते. याला ‘रेझिस्ट प्रिंटींग’ असे
म्हणतात, ज्या जागी ही पेस्ट असते त्या जागी पुढच्या रंगाला शिरकाव नसतो ! मग ही
पेस्ट एकमेकांना चिकटू नये म्हणून त्यावर लाकडाचा बारीक भुस्सा टाकला जातो. नंतर ती
पेस्ट सेट होण्यासाठी ती साडी दोन दिवस तशीच ठेऊन दिली जाते. मग ‘इंडिगो’ किंवा ‘कशिश’
सारख्या नैसर्गिक रंगात किंवा इतर मानवनिर्मित रंगात बुडवून ही संपूर्ण साडी डाय
करून घेतली जाते. ‘डाय’ करतांना जिथे ‘दाबू पेस्ट’ असते तिथे रंग शिरत नाही !
त्यानंतर पुन्हा साध्या पाण्यात ही साडी धुतली जाते, धुण्यात दाबू पेस्ट निघून
जाते आणि आतील सुंदर नक्षी दिसू लागते ! साडीत जितके रंग असतात तितक्या वेळा ही
प्रक्रिया करावी लागते ! हे कारागीर एकदा वापरलेले पाणी रि-सायकल करून परत
वापरतात. राजस्थानमध्ये अत्यंत कष्टाचं असणारं हे काम ‘छिपा’ कुटुंबांमधून
पिढ्यानपिढ्या चालू आले. अशाच एका कुटुंबातील सहाव्या पिढीतील दिनेश छिपा हे स्वतः
फॅशन डिझायनर आणि आर्टिस्ट असून कौशल्याचं आणि कष्टाचं असणारं हे काम, ते त्यांच्या
‘नॅशनल ॲवॉर्ड’ मिळालेले त्यांचे आजोबा सीताराम छिपा आणि वडील शामबाबू छिपा यांच्या
सोबत आजही अत्यंत कल्पकतेने करत आहेत. दिनेशजी म्हणाले, “इतके कष्टाचे काम करणारे
लोक आता कमी झाल्यामुळे काही जण आता ब्लॉक-प्रिंटींग न करता ‘स्क्रीन प्रिंटींग’
करून या साड्या तयार करत आहेत. आम्ही मात्र पारंपरिक पद्धतीने बगरुची ओळख असलेल्या
‘हँड ब्लॉक प्रिंटींग’च्याच साड्या बनवत आहोत.”
rashmisatav@gmail.com



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा