‘झी मराठी’वरील, ‘माझा होशील ना ?’ या मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात
आलेली गौतमी देशपांडे, इंजिनिअरिंगचं
शिक्षण घेत असतांना, आवड आणि हौस म्हणून थिएटर करत होती. इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर
ती एका ‘आयटी’ कंपनीत नोकरी सुद्धा करत होती. अभिनयकलेसोबतच गौतमी अतिशय उत्तम
गाते सुद्धा. मुळात या कलांची आवड असलेली गौतमी नोकरीत काही रमेना. मग तिनं सुद्धा
तिच्या ताईसारखं म्हणजे मृण्मयी प्रमाणेच या क्षेत्रात यायचं ठरवलं आणि गौतमी तिच्या
अंगभूत कलांमुळे २०१९ साली ‘सारे तुझ्यासाठी’ या मालिकेतून या क्षेत्रात आली !
गौतमीच्या आई-वडिलांना ट्रिप्सला जायला खूप आवडतं. काश्मीर हे त्यांचं
आवडतं ठिकाण. ते नेहमी काश्मीरला फिरायला जात असत, गौतमी आणि मृण्मयीला सुद्धा घेऊन
ते दोनदा काश्मीरला जाऊन आले. काश्मीरला गेल्यावर गौतमी लहान असतांनाच तिथल्या
निसर्गाच्या आणि तिथल्या वस्तूंच्या प्रचंड प्रेमात पडली. तिथल्या कलाकुसर केलेल्या
वस्तू, काश्मिरी कानी विणीतल्या आणि ‘आरी-वर्क’च्या शाली आणि साड्यांची खरेदी
म्हणजे तर गौतमीसाठी एक आनंद-सोहळा असायचा ! काश्मिरी साड्या नेसलेल्या तिथे
फिरायला आलेल्या सुंदर मुली पाहून तर गौतमी कायमच हरखून जात असे. त्यामुळे काश्मिरीवर्कच्या
नाजूक नक्षीकामानं भरलेल्या साड्यांची आवर्जून खरेदी होत असे. गौतमीचे बाबा,
गौतमीच्या आईसाठी कायमच सुंदर काश्मिरी साड्या घेत असत. त्या साड्यांच्या सुंदर
कलाकृतीवर गौतमी भारावून जावून हात फिरवत राही !
गौतमी, शाळेत असतांना ‘जलतरंग’ सारखा दुर्मिळ वाद्यप्रकार खुबीनं वाजवीत
असे. शाळेत एका स्नेहसंमेलनात संगीत वाद्यवृंदाच्या कार्यक्रमात गौतमीने भाग घेतला
होता. तिच्या जलतरंगेच्या कलेचं ती पहिल्यांदाच स्टेजवर सादरीकरण करणार होती. सादरीकरणाच्या
दोन दिवस आधी, वाद्यवृंदातल्या सगळ्या मुलींना शिक्षकांनी साडी नेसायला सांगितलं !
गौतमीला प्रचंड आनंद झाला. शाळेतून घरी येतांनाच तीनं आईची ब्लॅक कलरची काश्मिरी साडी नेसायची, असं मनोमन ठरवून
सुद्धा टाकलं. कार्यक्रमाच्या आदल्या रात्री आईच्या ब्लाऊजला टक्स मारायचा कार्यक्रम झाला आणि दुसऱ्या दिवशी
आईनं तिला ती सुंदर काळ्या रंगाची काश्मिरी साडी नेसवली. गौतमी आयुष्यात पहिल्यादा
साडी नेसली होती आणि ती सुद्धा आपल्या आवडीची म्हणून जाम खुश होती. तिथे तिच्या
जलतरणाच्या सुंदर सादरीकरणाचं आणि तिच्या साडीचं भरभरून कौतुक झालं.
आपल्या कलेत रमणारी आणि दुसऱ्या कलाप्रकारांची उत्तम जाण असणाऱ्या गौतमीसाठी
ती काश्मिरी कलाकुसरीची साडी खूप खास आहे कारण ही साडी तिची आयुष्यात पहिल्यांदा नेसलेली
साडी आहे.
नंदनवनातील सौंदर्याचा साज - काश्मिरी साडी !
काश्मीरच्या निसर्गाइतकचं, काश्मीरमध्ये उगम पावलेल्या कलांमध्ये
सुद्धा अस्मानी सौंदर्य डोकावतांना दिसतं
! आपल्याला ढोबळमानाने फक्त काश्मिरी शाली माहिती असतात परंतु काश्मीरच्या साड्या सुद्धा
सुंदर कलाकृतींचा अप्रतिम नमुना असतात. काश्मीरच्या स्थानिक स्त्रियांचा ‘साडी’ हा
पारंपरिक पेहेराव नसला, तरी काश्मिरी-वर्कचा वापर करून टूरिस्टसाठी मोठ्या
प्रमाणात काश्मीरी साड्या बनवल्या जातात !
काश्मीरच्या पश्मीना साडीच्या पश्मीना फॅब्रिकला ‘भौगोलिक स्थानदर्शक प्रमाणपत्र’ मिळाले आहे. पश्मीना
हा शब्द ‘पश्मीन’ या मुळच्या पर्शियन शब्दापासून तयार झाला असून, ‘पश्मीन’ म्हणजे
लोकर. काश्मीरच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये आढळणाऱ्या ‘चांगपा’ नावाच्या शेळ्यांच्या केसांपासून
चरख्यावर हाताने ‘कताई’ करून अतिशय तलम, मऊ आणि ऊबदार असे पश्मिनचे धागे बनविले
जातात. दुर्मिळ आणि अत्यंत महाग असणाऱ्या ओरिजिनल पश्मीन धाग्यांना ‘सॉफ्ट गोल्ड’ देखील म्हणलं जातं ! या धाग्यांपासून पश्मीना
शाली आणि पश्मीना साड्या विणल्या जातात. अत्यंत दुर्मिळ असणाऱ्या या पश्मीन
धाग्यांपासून विणलेल्या ओरिजिनल पश्मीना साड्या लाखो रुपयांच्या असतात !
त्यामुळे, चिनॉन,
सिल्क, जॉर्जेट किंवा क्रेपवर सुद्धा ‘काश्मिरी-वर्क’ करून काश्मीरमध्ये
निरनिराळ्या साड्या तयार होतात. काश्मिरी साड्यांची खासियत म्हणजे त्यावर हाताने केलं
जाणारं काश्मिरी-भरतकाम. काश्मिरी साडीवर केला जाणारा ‘आरी-वर्क’ हा कलाप्रकार अंदाजे
१२ व्या शतकातील आहे. ‘आरी-वर्क’ करण्यासाठी साडीवर आधी डिझाईन छापून घेतलं जातं. बारीक
‘चेन-स्टीच’ सारखे दिसणारे टाके एकामागोमाग चिकटून घालते जातात आणि साडीवरचं संपूर्ण
डिझाईन ‘आरी-वर्क’नं भरलं जातं. यासाठी क्रोशावर्कच्या सुईसारखी पण अत्यंत बारीक
अशी लांब सुई वापरली जाते. या सुईला धरण्यासाठी हॅन्डल असतं आणि स्थानिक भाषेत या
सुईला ‘तंबोर’ किंवा ‘आर’ म्हणतात. ‘आरी-वर्क’
करतांना रेशमाचे
रंगीत धागे साडीच्या खाली धरले जातात आणि वरून ती सुई पेनसारखी पकडून साडीच्या
आरपार टाकून सुईच्या टोकावर असलेल्या बारीक ‘हुक’ने खालचा धागा उचलून घेऊन ‘चेन-स्टीच’
टाकली जाते. शिवाय या ‘आरी-वर्क’मध्ये दोन उप-प्रकार आहेत – ‘रासकार आरी’ आणि ‘पोसकार
आरी’. ‘रासकार आरी’मध्ये फक्त तीन रंगांचे धागे वापरले जातात आणि त्या नक्षीत काश्मीरमधील
निरनिराळ्या फुलांच्या कळ्यां भरलेल्या असतात आणि ‘पोसकार आरी’मध्ये तीन पेक्षा
जास्त रंगांचे धागे वापरलेले जातात आणि त्या नक्षीत काश्मीरमधील निरनिराळी फुललेली
फुलं भरलेली असतात. कारागीर लोक दिवसभर बसून अखंडपणे ती सुई अत्यंत निगुतीनं साडीच्या
आरपार घालून खालचा धागा वर आणतांना पाहिल्यावर अचंबित व्हायला होतं ! साडीवरच्या
काही डिझाईन्समध्ये या ‘आरी-वर्क’ बरोबर, ‘तीला-वर्क’ सुद्धा केलं जातं. ‘तीला-वर्क’ला
‘तीलादोझी’ असं देखील म्हटलं जातं. ‘तीलादोझी’साठी नेहमीची सुई
आणि दोन धागे वापरले जातात. यातील सुट्टा धागा नक्षीप्रमाणे लावून घेतला जातो आणि
सुईतल्या दुसऱ्या धाग्याने तो टाचून घेतला जातो. साडीवर प्रामुख्याने ‘जरी’चा धागा
लावून घेण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जात असे. फोटोतल्या गौतमीच्या साडीवर ‘आरी-वर्क’
आणि ‘तीला-वर्क’
केलेलं आहे. ‘आरी’ आणि ‘तीला - वर्क’ मध्ये प्रामुख्याने काश्मीरमधील पाना-फुलांचा
मोठा प्रभाव पडलेला दिसून येतो.
काश्मिरी-भरतकाम केलेल्या साड्यांच्या व्यतिरिक्त काश्मीरची अजून एक
सुंदर वीण म्हणजे ‘कानी-वीण’. १५ व्या शतकात या विणीत बारीक नक्षीकामाचे गालिचे
विणले जात असत. अतिशय सुंदर दिसणाऱ्या त्या गालीच्यांवरून शाली विणण्याची कल्पना
पुढे आली आणि पश्मीन धागे वापरून कानी-विनीत पश्मीना शाली विणल्या जाऊ लागल्या. हाताने
विणलेल्या ओरिजिनल पश्मीना-कानी शाली दोन ते पाच लाख रुपये किंमतीच्या असतात ! पुढे
रॉयल फॅमिलींसाठी ऑर्डरनुसार
पश्मिना-कानी साड्या विणल्या जाऊ लागल्या. या ओरिजिनल पश्मिना-कानी साड्यांची
किंमत पंधरा ते वीस लाख रुपयांची असते ! ‘पश्मीना-कानी’ला जगातलं सर्वात महाग फॅब्रिक
मानलं जातं ! सर्वसामान्यपणे इतक्या ‘उंची साड्या’ सगळ्यांच्या आवाक्यातल्या
नसल्यामुळे इतर फॅब्रिकवर पण कानी-विणीत साड्या विणल्या जातात. या कानी-विणीच्या
नक्षीत निसर्गातील सुंदर पानं-फुलं आणि कोयऱ्या प्रामुख्याने दिसून येतात. दोन्ही
बाजूंना टोक असलेल्या छोट्या लाकडी काड्यांवर नक्षीतील रंगीत धागे गुंडाळले जातात.
या कड्यांना स्थानिक काश्मिरी भाषेत ‘कानी’ म्हणतात. हातमागावर नक्षीनुसार रंगीत
धागे टाकण्यासाठी या काड्यांचा वापर केला जातो. साडीवर जितकी बारीक नक्षी आणि
जितके रंग तितक्या अनेक काड्या त्यासाठी वापरल्या जातात. विणकर तान्यातले उभे धागे
मोजून आडव्या धाग्यांसाठी एकेक कानी टाकत जातात आणि अशी प्रत्येक ओळ विणली जाते. अशाप्रकारे
ओरिजिनल कानी साडी विणायला एक-दीड वर्ष देखील लागू शकते, त्यामुळे अतिशय सुंदर
रंगसंगतीत विणलेल्या या कानी साड्यांची किंमत जास्त असते. या साड्या माफक दरात
उपलब्ध होण्यासाठी पॉवरलूमवर सुद्धा या साड्या विणण्याचे प्रयोग होत आहेत पण पॉवरलूमवर
विणलेल्या कानी साड्यांच्या उलट्याबाजूने विणकामाचे आडवे धागे ‘फ्लोटिंग’ राहतात,
त्यामुळे त्यात दागिने वगैरे गोष्टी अडकू शकतात. कानी-साड्यांविषयी अजून बऱ्याच रंजक
गोष्टी जाणून घेण्यासाठी दुसऱ्या एखाद्या लेखात भेटूयात.
कानी साड्या किंवा आरी-वर्कच्या काश्मिरी साड्या पाहिल्यावर आपण काश्मीरच्या अजूनच प्रेमात पडतो आणि त्या साड्यांवरची ती कारागिरी बघून त्या कारागीरांविषयी आपल्याला फार फार आदर वाटू लागतो.
चौकटीत :
१६ व्या शतकात भारताच्या
उत्तरेकडील भागात, मुघल साम्राज्यामध्ये बादशहा अकबरकडून उत्तम कामगिरी केलेल्या
सरदारांना दरबारात बोलावून त्यांचा ‘खिलत’ देऊन सन्मान केला जात असे. ‘खिलत’
म्हणजे उंची वस्त्रं तबकात ठेऊन भेट दिली जात असत. या ‘खिलत’मध्ये पश्मीनाचे
अंगरखे आणि शाली असल्याचा उल्लेख आढळतो. यावरून पश्मीना वीण खूप जुनी असल्याचा
दाखला मिळतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा