गुरुवार, ४ नोव्हेंबर, २०२१

लिंबू कलरच्या साडीचा ‘नॉस्ट्रॅलजिया’ !

 










१९८८ मध्ये प्रदर्शित झालेल्या अशीही बनवाबनवीया सुपरहिट चित्रपटात अश्विनी भावेने नेसलेल्या लिंबू कलरच्या साडीमुळे, त्याकाळी लिंबू कलरला मोठं ग्लॅमर आलं होतं ! अश्विनीचा करिष्माच तसा होता ! तिची प्रत्येक स्टाईल सिग्नेचरठरत होती ! अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांमधून पाहिलेला तिचा टॅलेंटेड अभिनय, आपल्याला हिंदी आणि कानडी चित्रपटांमधुनही दिसत होता.

आपल्या करियर इतकच आपल्या कुटुंबाला महत्त्व देणारी अश्विनी, २० वर्षांपूर्वी अमेरिकेत स्थायिक झाली आणि मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतलं एक महत्त्वाचं स्थान रिकामं राहिलं ! पण अमेरिकेच्या वास्तव्यात सुद्धा अश्विनीजी तिथे अनेक सृजनशील कामं करत असतात. शिवाय त्यांनी त्यांची भारताशी, भारतीय संस्कृतीशी जोडली गेलेली नाळ तुटू दिली नाही. भारतीय पेहेराव, भारतीय फॅब्रिक्स, त्यांचे रंग आणि पोत हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय ! भारताच्या पारंपरिक विणींवर त्यांचं जीवापाड प्रेम आहे !

अश्विनी, लहान असतांना ती तिच्या आजोबांसोबत 'लूम्स' बघायला जात असे. तिच्या आजोबांचे 'लूम्स' होते आणि ते त्यांनी भाडेतत्त्वावर विणकरांना विणायला दिले होते. विणकामाच्या लयबद्ध आवाजात गुफले जाणारे ते उभे-आडवे धागे, अश्विनीमंत्रमुग्ध होऊन तासंतास बघत उभी राही ! तिथेच तिचं भारतीय वस्त्रांविषयीचं आकर्षण आणि आदर निर्माण झाला असावा ! शिवाय लहानपणी शाळेत जातांना ती, घरून पायी जात असे आणि जातांना तिच्या नेहमीच्या रस्त्यावर एके ठिकाणी आवर्जून थांबत असे, तिथे मोठमोठ्या फ्रेम्स ठेऊन स्क्रिन पेंटिंगनं साड्यांवर चालणारं प्रिंटिंग, ती मोठ्या कुतूहलानं बघत उभी राही आणि खास ते बघण्यासाठी शाळेत जाण्यासाठी घरून मुद्दाम लवकर निघत असे  ! 

साड्यांवर भरभरून बोलतांना अश्विनीजी पुढे म्हणाल्या, " माझ्या सिने-करियरची ती नुकतीच सुरुवात होतीआणि तेव्हा माझ्या आईकडे मोजक्याच साड्या होत्या, कधी कोणत्या कार्यक्रमांना साडी नेसायची वेळ आली की मी सरळ स्मिताताई तळवलकर किंवा वंदनाताई गुप्ते यांच्याकडे हक्काने जाऊन मला हवी ती साडी घेत असे ! त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कपाटातून कोणतीही साडी घेण्याची मला मुभा होती ! तेव्हापासून मला छान साड्या नेसायचा छंद जडला तो कायमचा !"

तिकडे अमेरिकेत सुद्धा सणावारांना आणि कार्यक्रमांना त्या आवर्जून भारतीय पारंपरिक पेहेराव करतात. त्यांना वेगवेगळ्या साड्या नेसायला आणि भेट द्यायला खूप आवडतात. त्या वरचेवर भारतात येत असतात आणि भारतात अगदी सहज आवडल्या म्हणून स्वतःसाठी, आईसाठी आणि सतत कुणालातरी भेट देण्यासाठी साड्यांची खरेदी करत असतात ! 'साडी खरेदी हा त्यांचा आवडता छंद असून, 'साडी खरेदीच्या वेळेस, त्यांना वेगवेगळ्या विणींच्या ढिगभर साड्या बघायला खूप आवडतात. अनेक विणी - पोतांच्या रंगीत दुनियेत त्या कायमच हरवून आणि हरखून जातात. गंमत म्हणजे, एखाद्या सेल्समननं तत्परतेनं निरनिराळ्या साड्या दाखवल्या नाही तर अश्विनीजी सरळ त्या दुकानाच्या 'स्टॉक-रुम'मध्ये जाऊन स्वतःच साड्या बघू लागतात ! अश्विनीजी अत्यंत चिकित्सा करुन साड्या खरेदी करत असतात, त्यामुळे अनेक वर्षांपूर्वी घेतलेली साडी पुढेही खूप वर्षांनी त्यांना तितकीच आवडत राहते ! विशेष म्हणजे खूप वर्षांपूर्वी घेतलेल्या कोणत्याही साडीचा इत्यंभूत तपशीलही त्यांना आठवत असतो !

त्यांना जसं दुसऱ्यांना साड्या भेट द्यायला आवडतं तसचं, त्यांना सुद्धा कुणी साडी भेट दिली तर जाम आवडतं. दोन वर्षांपूर्वी त्या भारतात आल्या होत्या, त्यांच्या एका पाटील नावाच्या स्नेही-कुटुंबाने अश्विनीजींना घरी बोलावले होते. तिथे पाटील वहिनींनी त्यांची ओटीभरली होती. ओटीत एक सुंदर प्युअर म्हैसूर सिल्कची गोल्डन जरीच्या कोयऱ्यांचीबुट्टे असलेली साडी होती..... आणि साडीचा रंग होता लिंबू कलर’ ! त्या लिंबू कलरला, प्युअर सिल्कमुळे सुंदर आली चमक होती, शिवाय कॉन्ट्रास्ट पिंक काठांमुळे साडी खूपच खुलून दिसत होती. अश्विनी म्हणाल्या, “लिंबू कलरची ती रॉयल साडी बघून मी नॉस्ट्रॅलजिकझाले होते.....अमेरिकेला परत जातांना ती साडी मी आवर्जून माझ्या बरोबर नेली.  पण नंतर कोरोनाकाळामुळे ती साडी नेसायचा त्यांचा योग काही आला नाही. परंतु  यंदाच्या दिवाळीत त्यांनी त्या साडीची घडी मोडली आणि खास या लेखासाठी फोटो काढून पाठवले ! अश्विनीजी म्हणाल्या, “मला म्हैसूर प्युअर सिल्कच्या साड्या खूप आवडतात, त्या साड्या वजनाला जरा हलक्या असतात आणि अतिशय सुंदर रंगात विणल्या जातात,  शिवाय त्या साड्या दिसतातही खूप कलात्मक, माझ्या खास 'फेस्टीव्ह साड्यां'पैकी ती एक साडी आहे !

भारतात आल्यावर अश्विनीजींचा होणारा साडी-खरेदीसोहळा, त्या कधी कधी अमेरिकेतही साजरा करतात ! एकदा काय झालं.... २०१५ मध्ये त्या नुकत्याच भारताची धावती भेट देऊन अमेरिकेत परतल्या होत्या, अमेरिकेत पोहोचल्यावर जेट लॅगजाईपर्यंत त्यांना एक फोन आला.... भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदींची अमेरिकेला सदिच्छा भेट आयोजित केली होती. अश्विनीजी राहत असलेल्या कॅलिफोर्निया येथे एका मोठ्या स्टेडीयममध्ये मोदींच्या स्वागतासाठी मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. अठरा ते वीस हजार प्रेक्षकांसमोर होणाऱ्या त्या लाइव्ह कार्यक्रमाचे अश्विनीजींनी निवेदन करण्याची, विनंती करण्यासाठी तो फोन होता ! कार्यक्रमाला जेमतेम एक महिना बाकी होता. फोनवर भारावून जाऊन अश्विनी निवेदन करण्यासाठी हो म्हणल्या.... पण फोन ठेवल्यावर त्यांना पहिला प्रश्न पडला..... एवढ्या मोठ्या लाइव्ह कार्यक्रमाला मी पेहेराव कोणता करू ? त्या म्हणाल्या खूप विचार केल्यावर मला असं जाणवलं की भारताच्या पंतप्रधानांच्या स्वागताच्या इतक्या भव्य कार्यक्रमाला साडी शिवाय दुसरा कोणता ग्रेसफुलपेहेराव असूच शकत नाही ! मग माझं ठरलं .... साडीच नेसायची ! खास त्या कार्यक्रमासाठी मग मी साडी खरेदी केली.... तेही अमेरिकेत !त्यासाठीकॅलिफोर्नियाजवळ असलेल्या बर्कली येथील भारतीय साड्यांचं दुकान त्यांनी शोधून काढलं ! एक भारतीय मुलगी ते दुकान चालवत होती. अश्विनीजींना तिथली एक साडी त्या कार्यक्रमासाठी खूप आवडली. त्यांनी त्या दुकानातून कार्यक्रमासाठी रेडीश-पिंक कलरची स्टोन-वर्ककेलेली एक साडी आणि इतर काही साड्या खरेदी केल्या. हातात वेळ कमी होता आणि निवेदनासाठी बरीच तयारी करायची होती.... शिवाय त्या साडीवरचं ब्लाऊज देखील शिवून घ्यायचं होतं, त्यांनी त्या साडीवरचं ब्लाऊज कुरियरनं चक्क भारतात शिवायला पाठवलं ! खरच हौसेला मोल नसतं अस् म्हणतात ते खरय बहुदा ! ब्लाऊज विमानवारी करून वेळेत अमेरिकेला पोहोचलं देखील ! कार्यक्रमाचा दिवस उजाडला, त्यांची निवेदनाची तयारी तर उत्तम झाली होती, ती सुंदर साडी नेसलेल्या अश्विनीजी हजारो प्रेक्षकांच्या समोर धडधडत्या हृदयानं स्टेजवर चढल्या. फोटोंचा 'क्लिकक्लीकाट' झाला ! भारताच्या पंतप्रधानांसाठी अमेरिकेत आयोजित केलेला तो भव्य सोहळा बघून अश्विनीजी भारावून गेल्या आणि त्यांनी केलेल्या पारंपरिक वेशभूषेमुळे त्यांचा अभिमान आणि आत्मविश्वास दुणावला ! त्यांचं निवेदन कमालीचं सुंदर झालं. अश्विनीजी म्हणाल्या, “It was my honour ! तिथे सगळचं अविस्मरणीय होतं.... तो कार्यक्रम, ते निवेदन, ती साडी आणि बरच काही !

भारतीय फॅब्रिक्सवर प्रचंड प्रेम असणाऱ्या अश्विनीजींनी त्यांच्या काही खास साड्या जतन करून ठेवल्या आहेत.... त्यात या दोन्ही साड्या सुद्धा आहेत... एक मोदींच्या कार्यक्रमाला नेसलेली आणि दुसरी ओटीत मिळालेली... ती लिंबू कलरची साडी !



कर्नाटकची पारंपरिक मैसूरू साडी !

देशभरात तयार होणाऱ्या उच्चप्रतीच्या एकूण मलबेरी सिल्कपैकी ४५ टक्के सिल्क, कर्नाटक राज्यातील एकट्या म्हैसूर जिल्ह्यात तयार होते. मलबेरी सिल्कचा धागा वापरून म्हैसूरमध्ये तयार होणाऱ्या या साड्यांना शंभर पेक्षा जास्त वर्षांची परंपरा आहे. म्हैसूर संस्थानावर राज्य करणाऱ्या वडियार साम्राज्यातील महाराज–‘चौथे क्रिष्णनराजा वडियार’ यांना, ब्रिटनची राणी व्हिक्टोरियाच्या कार्यक्रमाचे आमंत्रण होते म्हणून ते लंडनला गेले होते. तिथे आमंत्रित पाहुण्यांचा पॉवरलूमवर तयार केलेले सिल्कचे कापड देऊन सन्मान करण्यात आला होता. महाराज वडियार यांना ते सिल्कचे कापड इतके आवडले की त्यांनी भारतात येऊन म्हैसूरमध्ये, सिल्क कापडाची मिल उभारण्याचे योजले. भारतात आल्यावर त्यांनी स्वझर्लंडहून सिल्कचे कापड तयार करण्यासाठी ३२ पॉवरलूम्स मागवले आणि १९१२ मध्ये भारतातली सिल्क फॅब्रिक तयार करणारी पॉवरलूमवर चालणारी मोठी मिल उभी केली. ती मिल आता कर्नाटक शासनाच्या अखत्यारीत असून ‘कर्नाटका सिल्क इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन -(KSIC)’ मार्फत चालवली जाते. या मिलमध्ये मोठ्या प्रमाणत ओरिजिनल म्हैसूर सिल्क साड्या तयार होतात.

या म्हैसूर सिल्क साड्यांची खासियत म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये या साड्या प्लेन असत, परंतु आता त्यात वैविध्य आणण्यासाठी काही साड्यांवर बुट्ट्याही विणल्या जात आहेत, पण म्हैसूर सिल्क साडीची खास ओळख म्हणजे मध्ये प्लेन असणाऱ्या साड्यांना कॉन्ट्रास्ट पदर असून नाजूक जरीचे काठ असतात. या काठांवर बऱ्याचदा कोयऱ्या किंवा सुंदर फुलं विणलेली असतात. ओरिजिनल म्हैसूर सिल्क साडीमध्ये ‘इलेक्ट्रोप्लेटिंगने’ सोन्याचे पॉलिश केलेली चांदीची जर वापरली जाते. साडीच्या उभ्या धाग्यांसाठी ट्विस्ट न केलेले मलबेरी सिल्कचे धागे वापरले जातात तर आडव्या धाग्यांसाठी दोन प्लायचे मलबेरी सिल्कचे धागे वापरले जातात, त्यामुळे या साड्या वजनाला हलक्या असतात. साडी विणून तयार झाल्यावर ती ‘डिगमिंग’साठी पाठवली जाते. ‘डिगमिंग’ म्हणजे मलबेरी सिल्कच्या धाग्यांवर असलेला ‘सेरीसीन’ नावाचा चिकट पदार्थ धुवून टाकणे. त्यासाठी ९० डिग्री सेल्सिअसच्या पाण्यात सोडा श टाकून त्यात २ तास या साड्या भिजवून ठेवल्या जातात. ‘डिगमिंग’मुळे या साड्या खूप सॉफ्टहोतात. अनेक आकर्षक रंगात उपलब्ध असणाऱ्या या साड्या आता ‘क्रेप सिल्क’ आणि ‘जॉर्जेट’च्या फॅब्रिकमध्ये सुद्धा तयार होत आहेत.म्हैसूर साडीतील सिल्कच्या धाग्यांच्या घनतेनुसार या साड्यांची किंमत ठरते. स्थानिक लोक या साड्यांना ‘मैसूरू साड्या’ असही म्हणतात. अत्यंत उच्च दर्जाच्या मलबेरी सिल्कच्या धाग्याने विणलेल्याया साड्या पिढ्यानपिढ्या टिकतात, त्यामुळे आपल्या आई-आजीची एखादी ‘मैसूरू साडी’ तुम्ही अजूनही नक्कीच वापरत असाल !

 

आणखी काही महत्त्वाचे :

प्युअर सिल्कच्या मैसूरू सिल्कच्या साड्या महाग असून अशा साड्या विकत घेतांना ग्राहकांनी योग्य ती काळजी घ्यावी. ग्राहकांना ओरिजिनल साड्या मिळण्यासाठी, या साड्यांवर ‘कर्नाटका सिल्क इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन -(KSIC)’ या संस्थेमार्फत ‘ट्रेडमार्कचा होलोग्राम’ लावलेला असतो. शिवाय या साडीच्या एका कोपऱ्यात विव्हीगमध्ये एक कोड विणलेला असतो, त्या कोडमध्ये उत्पादनाचा तपशील असतो, तसचं ओरिजिनल मैसूरू साडी विकत घेतांना सर्टिफाईड सिल्कचं कार्ड देखील सोबत मिळतं. त्यामुळे ओरिजिनल मैसूरू सिल्क साड्या विकत घेण्यापूर्वी हा होलोग्राम आणि हा कोड आवर्जून बघावा. ‘कर्नाटका सिल्क इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन -(KSIC)’ या संस्थेमार्फत तयार होणाऱ्या मैसूरू सिल्क साड्यांना ‘भौगोलिक स्थानदर्शक प्रमाणपत्रक देखील मिळालं आहे. 

©रश्मी सातव  

rashmisatav@gmail.com 



 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा