गुरुवार, ९ डिसेंबर, २०२१

हेमांगीच्या कौतुकाचा धागा !

 

मूळची चित्रकार असलेली हेमांगी कवी, मुंबईत ‘जे जे स्कूल ऑफ आर्ट्स’मध्ये शिकतांना मित्र-मंडळींमध्ये कॉलेजच्या प्रोफेसर मंडळींची, गंमत म्हणून मिमिक्री करत असे ! कॉलेजच्या सरांना हे कळल्यावर त्यांनी तिला मुंबई युनिव्हर्सिटीच्या ‘युथ फेस्टिवल’मध्ये भाग घेण्यासाठी विचारलं, तेव्हा ती म्हणाली, “नको सर, मला स्टेजवर खूप भीती वाटते !” पण नंतर सगळ्यांच्या आग्रहाखातर शेवटी तिनं स्टेजवर होणाऱ्या विविध गुणदर्शनाच्या सादरीकरणात ‘फाईन आर्टिस्ट’ म्हणून भाग घेतला ! हेमांगी म्हणाली, “ती माझी पहिली स्टेजची ओळख ! मी चित्र काढतांना कॅनव्हासवर जशी व्यक्त होते, तसचं ‘स्टेज’ हे सुद्धा मला एक कॅनव्हास वाटतो .... व्यक्त होण्यासाठी ! ” ती तेव्हा स्टेजच्या कॅनव्हासवर इतकी मनमोकळेपणाने व्यक्त झाली की तिला पुरुषोत्तम स्पर्धेसाठी कॉलेजतर्फे नाटकात मुख्य भूमिकेत घेतलं आणि त्या नाटकाला त्या वर्षीचं दुसरं पारितोषिक देखील मिळालं ! तेव्हापासून मनोरंजन क्षेत्रातली विविध माध्यमं तिच्यासाठी, तिची अभिनयकला रेखाटणारी सुंदर माध्यमं ठरत गेली ! हेमांगी कायमच कोणताही आडपडदा न ठेवता थेट व्यक्त होत आली आहे ! तिच्या या व्यक्त होण्याला आणि तिच्या अभिनयाला दाद देण्यासाठी म्हणून, तिची पुण्यातली एक चाहती तिच्यापर्यंत पोहोचली आणि तिनं हेमांगीपर्यंत आपल्या भावना एका वस्तूच्या माध्यमातून पोहोचवल्या, आणि ती वस्तू होती एक सुंदर ‘कुपडम साडी’ !  

काही दिवसांपूर्वी हेमांगी, एका शुटींगच्या निमित्ताने पुण्याला निघाली होती, प्रवासात असतांना तिनं सोशल मिडीयावर गंमत म्हणून पुण्याला निघाल्याचं आणि ती उतरणार होती त्या हॉटेलचं लोकेशन अपडेट केलं. हे अपडेट नेमकं तिच्या पुण्यातल्या त्या चाहतीनं पाहिलं आणि ती चाहती थेट त्या हॉटेलवर गेली आणि हॉटेलच्या रिसेपशनवर तिनं हेमांगीसाठी एक छानसं पाकिट ठेवलं आणि तिच्या रूमवर पोहोचवायला सांगितलं ! हेमांगीनं ते पाकिट कुतूहलानं उघडून पाहिलं तर आत एक छोटीशी चिठ्ठी आणि एक सुंदर पिवळ्या रंगाची साडी होती ! चिठ्ठीत हेमांगीच्या व्यक्त होण्याचं आणि तिच्या अभिनयाचं मनापासून कौतुक केलेलं होतं आणि त्यानिमित्तानं तिला एक कुपडम साडी भेट म्हणून दिली होती होती ! या सगळ्या प्रकारानं हेमांगी खूप भारावून गेली ! हेमांगीला ती साडी खूपच आवडली आणि तिच्याकडे कुपडप हा साडी प्रकार नव्हताच. हेमांगीच्या कामाची दाद म्हणून मिळालेली ती साडी हेमांगीसाठी खूप खास आहे.

गंमत म्हणजे हेमांगीचं ‘साडी कनेक्शन’ खूप लहानपणापासून आहे ! केवळ चार-पाच वर्षांची असल्यापासून तिला साडी या पेहेरावाचं खूप आकर्षण होतं. इतक्या लहानपणी, ती तिच्या आईच्या साड्या नेसायचा प्रयत्न करून वेड्यावाकड्या गुंडाळत असे. हळूहळू आई कशी साडी नेसते ते बघून-बघून ती स्वतःची स्वतः साडी नेसू लागली आणि तिला ती जमूही लागली ! दहा बारा वर्षांची होईपर्यत तर, हेमांगीला उत्तम साडी नेसता येऊ लागली. बारा वर्षांची असतांना ती इतकी उत्तम साडी नेसत असे की, ती तिच्या बिल्डींगमध्ये त्यासाठी प्रसिद्ध झाली ! इतकी प्रसिद्ध की बिल्डंगमधल्या तरुण मुली सणावारांना आणि अगदी त्यांच्या कांदेपोह्यांच्या कार्यक्रमांना देखील, साडी नेसून द्यायला हेमांगीला बोलावत असत ! हेमांगी त्यांना छान चापून-चोपून साडी नेसवून, अगदी स्टूलवर उभं राहून पदर देखील पिनअप करून देत असे ! इतकच नाही तर हेमांगी अजून थोडी मोठी झाल्यावर साडी नेसून डोंगर देखील चढत असे ! तिच्या सगळ्या बहिणींच्या लग्नांत करवली म्हणून हेमांगी साडी तर आवर्जून नेसत असेच शिवाय त्या लग्नांनंतर त्या नव्या नवऱ्यांसोबत करवली म्हणून डोंगरावरच्या त्यांच्या नेहमीच्या देव दर्शनाला जातांना सुद्धा हेमांगी साडी नेसून भराभरा डोंगर चढत असे ! शुटींगच्या सेटवर सुद्धा साडीत, क्रेनवरून इकडून तिकडे जाणं आणि साडीतला तिचा सहज वावर बघून सेटवरचे सगळे तिच्याकडे कौतुकानं बघतच राहतात !

हेमांगी म्हणाली “मी माझ्या आईच्या तीस-पस्तीस वर्षांपूर्वीच्या काही साड्या अजूनही आवडीनं नेसते, त्या साड्या अजूनही खूप छान राहिल्या आहेत. माझ्या आजीची नऊवार साडी सुद्धा मी माझ्या नाटकांच्या प्रयोगांना नेसत असते. जीन्स आणि ड्रेसेस पेक्षाही, साडी मला जास्त कम्फर्टेबल वाटते ! माझ्या मते साडी इतका ग्रेसफुल पेहेराव नाही ! ”

नेहमी प्रमाणेच छान व्यक्त होणारी हेमांगी, या लेखाच्या निमित्तानं साडीवर बोलतांनाही भरभरून व्यक्त झाली !      











काठात विणलेलं सौंदर्य – ‘कुपडम साडी’ !

आंध्रप्रदेशात विणली जाणारी अजून एक सुंदर साडी म्हणजे – ‘कुपडम साडी’. आंध्रप्रदेशात चिराळा समाजातील विणकरांकडून हातमागावर ही साडी विणली जाते. ही साडी त्या प्रांतातील धार्मिक कार्यांमध्ये आवर्जून नेसली जाते.

‘कुपडम’ -  ही एक साडी विणकामाची विशिष्ट पद्धत असून या पद्धतीत ही साडी विणली जाते म्हणून या साडीला ‘कुपडम साडी’ असं म्हणतात. कुपडम पद्धतीत हातमागावर साडीच्या दोन्ही काठांसाठी आणि साडीच्या मधल्या भागासाठी ‘बान्या’चे धागे वेगवेगळे वापरले जातात, एकच एकसंध आडवा धागा विणला जात नाही. त्यामुळे ‘ब्राईट कॉन्ट्रास्ट’ काठ तयार होतात ! ‘इंटरलॉकिंग’ पद्धतीने हे काठ मुख्य साडीला जोडले जातात. याला ‘कोरवाई टेक्निक’ असही म्हणतात, शिवाय या काठांमधील आणि पदरामधील उभे-आडवे दोन्ही धागे सिल्कचे असतात आणि त्यात जरीचे धागे टाकून सुंदर नक्षी विणली जाते. आंध्रप्रदेशात तयार होणाऱ्या कुपडम साड्यांसाठी लागणारी ‘जर’ मात्र सुरतवरून मागवली जाते. या साडीच्या काठांमध्ये कधी ‘टेम्पल बॉर्डर’ किंवा ‘ईकत विणकाम’ तर कधी सुंदर पारंपरिक नक्षी विणलेली असते. कुपडमचे काठ अतिशय आकर्षक असून तीच या साडीची ओळख आहे.

कुपडमचे काठ आणि पदर सिल्कचा असून मुख्य साडी ‘गर्भरेशमी’ असते. साडीच्या मधल्या भागासाठी ६० ते ७० टक्के मलबेरी सिल्कचे धागे आणि ३० ते ४० टक्के कॉटनचे धागे वापरले जातात. त्यामुळे या साडीत सिल्क आणि कॉटन, या दोन्ही धाग्यांच्या गुणधर्मांची गुंफण झालेली असते. त्यामुळे या साडीचे काठ आणि पदर जरी, भरजरी असला तरी मुख्य साडीतल्या कॉटनच्या धाग्यांमुळे ही साडी वजनाला हलकी असते.

मुळच्या प्लेन असणाऱ्या या साड्या त्यात वैविध्य आणण्यासाठी आता भरलेल्या ब्रोकेड, चेक्स किंवा बुट्ट्यांमध्येही विणल्या जात आहेत. या साडीच्या विणकामात नवनवीत प्रयोग होत असून मुख्य साडीत जरीचे तलम धागे संपूर्ण साडीत विणून ‘टिश्यू कुपडम’ साडी सुद्धा विणली जात आहे. हातमागावर केलं जाणारं हे काम अत्यंत कौशल्याचं असून अशा ‘टिश्यू कुपडम’ साड्यांच्या किंमती सुद्धा जास्त असतात.  

अतिशय आकर्षक रंगात विणल्या जाणाऱ्या या साड्यांना खूप मोठी ऐतिहासिक परंपरा नसली तरी ‘कुपडम साडी’ला, ‘कुपडम टेक्निक’मुळे स्वतःची अशी खास ओळख आहे !



©रश्मी सातव  

rashmisatav@gmail.com 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा