मराठी इतकचं अस्खलित कोकणी बोलणारी गोव्याची एक ‘स्मार्ट’ मुलगी, ३५ वर्षांपूर्वी मराठी सिनेसृष्टीत आली आणि मराठी सिनेसृष्टीला एक अतिशय ग्लॅमरस अभिनेत्री मिळाली. आपण अभिनेत्रीच व्हायचं असं तिनं लहानपणीच ठरवलं होतं आणि तीनं ते खरं करून दाखवलं. तिचा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला आणि पुढची अनेक वर्ष तिने मराठी सिने सृष्टीवर अधिराज्य गाजवलं, आजही तिला मालिकांमधून काम करतांना पाहतांना आपण विचार करतो हिचं नक्की वय किती असेल ? आपल्या सौंदर्यानं आणि अभिनयानं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारं एक एव्हरग्रीन नाव म्हणजे....... वर्षा उसगांवकर !
वर्षा लहान असतांनाच तिला सिनेसृष्टीचं जाम आकर्षण होतं. लहानपणी ती आरशासमोर उभं राहून शोले चित्रपटातील ‘बसंती’चे
संवाद अभिनयासकट कित्येकदा म्हणत असे ! तिला अभिनयाची प्रचंड आवड होती पण या क्षेत्रात नक्की
जायचं कसं हे काही तिला माहित नव्हतं, गोव्यात तशी सोयही नव्हती. तिच्या अभिनयाची
आवड बघून तिची आई तिला दर्जेदार नाटकं बघायला घेऊन जायची, शिवाय ‘कलाशुकलेंदू’ या
नाट्य संस्थेत तिच्या आईनं तिचं नाव दाखल केलं होतं. या संस्थेमार्फत वर्षानं नाट्य
स्पर्धेत भाग घेऊन अभिनयाची प्रथम पारितोषिकं देखील मिळवली. एकदा ‘संगीत
मस्त्यगंधा’ या नाटकातील सत्यवतीच्या
प्रमुख भूमिकेतील वर्षाचा अभिनय बघून प्रेक्षकांमधून एक सत्तर वर्षांचे आजोबा आले
आणि वर्षाच्या पाया पडले ! तेव्हा केवळ १४ वर्षांची असलेली वर्षा कमालीची संकोचली
होती, पण ते आजोबा तिला म्हणाले “तू खूप मोठी कलाकार होशील बाळा, माझे आशीर्वाद
आहेत तुला ... ” ते आजोबा परत भेटले नाहीत पण त्यांचं भाष्य मात्र खरं ठरलं !
पुढे कॉलेजमध्ये असतांना वर्षाचा अभिनय बघून
दामू केंकरेंनी तिला ‘कार्टी प्रेमात पडली’ या नाटकात प्रमुख भूमिकेसाठी घेतलं आणि
ते नाटक सुपर हिट ठरलं, त्यातून तिला ‘ब्रह्मचारी’ हे नाटक आणि ‘गंम्मत जम्मत’ हा
चित्रपट मिळाला.... ! तिच्या सगळ्याच
कलाकृती सुपरहिट ठरत गेल्या !
मग सिनेसृष्टीतील करियरसाठी ती गोव्याहून मुंबईत आली, पण गोव्यातल्या तिच्या लहानपणीच्या आठवणी म्हणजे तिचा मौल्यवान खजिना आहे ! वर्षा गोव्याला शाळेत असतांना तिचे वडील - अच्युतराव उसगावकर मोठे कॅबिनेट मिनिस्टर होते. आता गोव्याच्या मुख्यमंत्र्यांसाठी जो बंगला राखीव आहे, तेव्हा तो बंगला कॅबिनेट मंत्र्यांसाठी राखीव होता, त्यामुळे वर्षाचं लहानपण त्या बंगल्यातच गेलं ! पोर्तुगीजांनी बांधलेला तो वीस खोल्यांचा बंगला म्हणजे जणू एक सुंदर राजवाडाच होता. तेव्हा त्या बंगल्यात वर्षा आणि तिचं कुटुंब कोणतेही सण-समारंभ, मोठ्या प्रमाणात साजरे करत असत. तेव्हा वर्षाची आई - माणिकताई त्या समारंभांना खूप सुंदर साड्या नेसत असत. त्यांच्याकडे बनारसी शालूंचाही उंची संग्रह होता. वर्षाला तिच्या आईच्या साड्या, विशेष करून ते शालू खूप आवडत असत. वर्षा म्हणाली, “आई झोपली किंवा बाहेर गेली की मी आईचे ते सुंदर शालू नेसून स्वतःला आरशात न्याहळत राही. आईच्या भरजरी साड्या आणि शालू मी गुजराती पद्धतीने नेसत असे, कारण साडीचा पदर उजव्या खांद्यावरून पुढे घेऊन गुजराती पद्धतीने नेसल्यामुळे भरजरी पदराचं खरं सौंदर्य दिसून येतं. त्या शाळूतील एक गुलबक्षी रंगाचा शालू मला खूप आवडत असे. त्या संपूर्ण शालूवर अँटिक जरीनं कोयऱ्या विणलेल्या होत्या. तंनचुई प्रकारातला तो शालू मी बऱ्याचदा नेसत असे.”
दरवर्षी त्यांच्याकडे संक्रांतीच्या हळदीकुंकूवाचा मोठा समारंभ असे. एका हळदीकुंकूवाला तिची आई तिला म्हणाली, “वर्षा तुला हा शालू खूप आवडतो ना, मग हळदीकुंकूवाच्या कार्यक्रमाला तू हाच नेस, तुला खूप सुंदर दिसतो तो.” वर्षानी खरच तो शालू हळदीकुंकूवाच्या कार्यक्रमाला नेसला, त्यावर आईचे दागिने घालून छान नट्टापट्टा केला. तेव्हा वर्षा फक्त १३ वर्षांची होती. कार्यक्रमाला सगळ्या मंत्र्यांच्या बायका आणि इतरही अनेक बायका आल्या होत्या. आलेली प्रत्येक पाहुणी वर्षाच्या सौंदर्याकडे पाहून हरखून जात होती ! त्या बायका म्हणाल्या, “अग माणिक, ही तर नवरीच वाटते आहे. कालपर्यंत फ्रॉकमध्ये पाहिलेली ही एवढीशी पोर एवढी मोठी कधी झाली ?” हे कौतुक ऐकून वर्षा कमालीची सुखावून गेली. वर्षा म्हणाली, “त्या बायकांची ती ऊठबस, आईच्या हाताखाली केलेलं ते काम, वाटलेलं ते सौभाग्याचं ‘वाण’, त्या बरोबर दिलेली ती मातीची बुडकुली.. आणि तेव्हा नेसलेला तो शालू.... सारं आत्ताच तो सीन शूट केल्यासारखा दिसतो आहे ! लहानपणी मला त्या ‘वाणा’च्या वस्तू वाटायला खूप मजा यायची, कारण उरलेल्या वस्तू, मी आणि माझ्या दोन बहिणी वाटून घेत असू !”
वर्षाचं ते ‘शालू प्रेम’
पुढेही कायम राहिलं...... ‘गंम्मत जम्मत’ या चित्रपटातील एका सीनमध्ये वर्षानी निर्मात्यांचं
न ऐकता प्रॉडक्शनची साडी न नेसता, आईचा एक जांभळ्या रंगाचा
सिल्व्हर जरीचा बुट्टेदार शालू नेसला होता ! लहानपणी सतत साडी नेसणाऱ्या वर्षाला सिनेमातील तेव्हाच्या डॅशिंग भूमिकांमध्ये
फारशी साडी नेसायला मिळाली नव्हती पण ‘स्टार प्रवाह’ वरील ‘सुखं म्हणजे नक्की काय
असतं ?’ या मालिकेमुळे मात्र तिला आता फक्त साडीच नेसावी लागते !
२००० साली लग्न झाल्यावर तिच्याकडे खूप साड्या आल्या पण तीस-पस्तीस वर्षांपूर्वीचे आईचे शालू मात्र तीनं आणि तिच्या बहिणींनी अजूनही जतन करून ठेवले आहेत. त्यातील काही साड्या वर्षानं सिनेमांच्या काही कार्यक्रमांनाही नेसल्या आहेत. शिवाय आजही ती आईकडे गोव्याला गेल्यावर आईसोबत आईच्या साड्यांचा खजिना काढून बसते पण त्यातील तो गुलबक्षी रंगाचा शालू तीच्यासाठी खूप खास आहे, कारण त्या शालूत तिचं गोव्यातलं मौल्यवान बालपण सांभाळून ठेवलं आहे !
खानदानी बनारसी शालू !
उत्तरप्रदेशातील, धार्मिक अधिष्ठान लाभलेल्या बनारसला,
वाराणशी किंवा काशी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. गंगेच्या सुंदर किनाऱ्यावर वसलेल्या
बनारसमध्ये अनेक सुंदर प्राचीन मंदिरं आहेत. त्या मंदिरातून उच्चारल्या जाणाऱ्या
मंत्रोपचाराच्या जयघोषात अजून एक लयबद्ध आवाज ऐकू येतो, तो
म्हणजे घरोघरी हातमागावर विणल्या जाणाऱ्या विणकामाचा !
१४
व्या शतकात बनारसमध्ये मुघल साम्राज्यातील विणकर, सोन्या-चांदीची ‘जर’ रेशमी
धाग्यांबरोबर विणून उंची वस्त्र विणत असत. या काळात वाराणशीत, देशोदेशीचे व्यापारी
मोठ्या प्रमाणात येत असत, त्यातल्याच काही व्यापाऱ्यांमुळे, बारीक नक्षीकामाचा
प्रकार पर्शियातून आल्याचं मानलं जातं. तेव्हा मुघल सम्राट जहांगीरची बेगम नूरजहाँ
हिने कतान सिल्कवर जरीच्या विणकामात निरनिराळे प्रयोग करून या विणीला राजाश्रय दिला
होता. त्या विणकामाची परंपरा आजतागायत चालू आहे. त्या वस्त्रांमध्ये गंगेच्या
खोऱ्यातील निसर्गसौंदर्याचा मोठा प्रभाव पडलेला दिसून येतो ! दोन भिन्न
संस्कृतींची गुंफण घालणाऱ्या या अप्रतिम कलाकुसरीनं जगभरात आपली ओळख निर्माण केली
आहे. मुघलांच्याही आधी, काशी नावाच्या या राज्यात मोठा व्यापार-उदीम चालत असे आणि
तेव्हा बनारसमध्ये सुती वस्त्रं मोठ्या प्रमाणात विणली जात असत आणि त्या
वस्त्रांचा मोठा व्यापार होत असे.
बनारस
आणि आजूबाजूच्या गावांमधून विणल्या जाणाऱ्या बनारसी साड्या, त्यात वापरलेल्या
धाग्यांवरून निरनिराळ्या नावाने ओळखल्या जातात. निरनिराळ्या ‘विणी-प्रकार’च्या
अगणित साड्या बनारसमध्ये विणल्या जातात म्हणून बनारसला साड्यांचं माहेरघर म्हणता
येईल !
कतान
सिल्कची बनारसी साडी म्हणजे जणू बनारसी साड्यांची महाराणी ! दक्षिण भारतातले उच्चप्रतीचे
मलबेरी सिल्कचे मऊ धागे हातमागावर उभे-आडवे लावून, साडी विणता-विणताच टेस्टेड
‘जरी’चे धागे ‘शटल’चा वापर करून हाताने आडवे टाकून ‘जरी’चं अप्रतिम नक्षीकाम
साडीवर उतरवलं जातं. याला ‘कढुआ काम’ असं म्हणतात. हातमागावर ‘कढुआ काम’ करून
विणलेल्या बनारसी साड्या बनारसी शालू म्हणून प्रचलित आहेत.
बनारसी
साडीचा अजून एक प्रकार म्हणजे – ‘सॅटिन-सिल्क बनारसी साडी.’ यात सिल्कचे धागे ‘सॅटिन
या विणीच्या प्रकारात विणल्यामुळे या साड्यांना वरच्या बाजूने ‘कतान’पेक्षा जास्त
चमक असते शिवाय या साड्या ‘कतान’पेक्षा जास्त सुळसुळीत असतात. अत्यंत लोकप्रिय
असलेले ‘बनारसी शालू’ सॅटिन विणीत विणले जात असत. परंतु सॅटिन-सिल्कमध्ये विणलेले
शालू तुलनेने जड असल्यामुळे आता हे विणकाम कमी होऊन भरजरी शालू सुद्धा
‘कतान-सिल्क’मध्ये विणले जाऊ लागले आहेत. उच्चप्रतीचे सिल्क वापरून हे शालू विणतांना,
तान्यात दोन प्लाय आणि बान्यात चार प्लायचे घागे वापरले जातात, त्यामुळे कतान आणि
‘सॅटिन-सिल्क’चे शालू वर्षानुवर्षे टिकतात म्हणून आपल्या आई-आजीचे शालू आपण
त्यातील आठवणींसकट जतन करून ठेवतो !
काही
वर्षांपूर्वीपर्यंत बनारसला या बनारसी शालूंचे मोठ्या प्रमाणात लिलाव होत असत. बाजारात
असंख्य रंगांचे आणि निरनिराळ्या बुट्ट्यांचे बनारसी शालूंचे ढीग लावून ठेवलेले असत
आणि देशभरातले व्यापारी आणि दुकानदार बोली लावून एकेक ढीग उचलत असत, त्यात ज्या
रंगाच्या आणि ज्या बुट्ट्यांच्या साड्या येतील त्या घ्यायच्या ! परंतु हातमागावर
कतान-सिल्कवर ‘कढुआ काम’ करून विणलेले मौल्यवान शालू मात्र त्यात नसत.
बनारसी
साड्यांच्या पदरावर, बॉर्डरवर आणि बुट्ट्यांमध्ये गोल्ड, सिल्व्हर किंवा कॉपर
जरीचे अतिशय बारीक नक्षीकाम केलेले असते. या साड्यांच्या नक्षीवर पर्शियन
संस्कृतीचा प्रभाव दिसून येतो. या साड्यांवरचे नक्षीकाम काढणारे आर्टिस्ट आधी ग्राफ
पेपरवर नक्षी काढून घेतात. त्या नक्षीनुसार जाड पुठ्ठ्याचे कार्ड्स पंच करून ‘जकार्ड’
पद्धतीने साडीवर ‘जरी’चे विणकाम होते. ‘जकार्ड’ पद्धत अस्तित्त्वात येण्याच्याही
आधी एका छोट्या लाकडी फ्रेमवर उभे-आडवे धागे लावून हाताने विणकाम करून एकेका
डिझाईनचे मास्टरपीस करून घेतले जात असत, त्यांना ‘नक्षेबंदी’ म्हणत असत. मग या नक्षेबंदीनुसार
हातमागावर उभे-आडवे धागे मोजून नक्षी विणली जात असे. निरनिराळ्या ‘नक्षेबंदी’
म्हणजे कलाकृतीचा एकेक अप्रतिम नमुना होत्या. ‘नक्षेबंदी’ करणाऱ्या कारागिरांची
पिढी मात्र आता संपली !
बनारसी
साड्यांच्या नक्षीकामावरून सुद्धा बनारसी साड्यांचे प्रकार पडतात ‘ब्रोकेड’, ‘जंगला’,
‘शिकारघा’, ‘तंनचोई’, ‘वासकट’, ‘कटवर्क (फेकुआ)’, ‘बुट्टीदार’, ‘जामदानी’, ‘मीनावर्क’
अशा वेगवेगळ्या नावांनी त्या ओळखल्या जातात. ‘जंगला’ किंवा ‘जाला’ प्रकारात
संपूर्ण साडीवर रंगीत रेशीमी धाग्यांनी पानाफुलांची वेलबुट्टी विणली जाते. शिवाय बनारसी
साड्यांवर जेव्हा जंगलातले प्राणी-पक्षी कलात्मकतेने विणले जातात तेव्हा त्या
साडीला ‘शिकारघा साडी’ म्हणतात. ‘ब्रोकेड’ बनारसीवर, बान्यात तलम जरीचे धागे टाकून
संपूर्ण साडीवर नक्षीकाम केले जाते. तर तंनचोई बनारसीवर ‘जरी’च्या ऐवजी रेशमाच्या
धाग्यांनी संपूर्ण साडीवर विणकाम केले जाते. तंनचोईवर बऱ्याचदा कोयऱ्यांचे सुंदर
प्रकार विणलेले दिसतात. या साडीत ‘जर’ वापरली नसल्याने त्या तुलनेने हलक्या आणि मऊ
असतात. ‘वासकट’ प्रकारात अर्ध्या साडीवर ‘जाला’ काम असते तर अर्ध्या साडीवर ‘बुट्ट्या’
असतात. संपूर्ण साडीवर बुट्टे असलेल्या ‘बुट्टीदार बनारसी’लाच बुट्ट्यांचा शालू
देखील म्हणले जाते. यातील पारंपरिक बुट्ट्यांना, ‘अशरफी बुट्टा’, ‘डॉलर बुट्टा’, ‘लिची
बुट्टा’, ‘लतीफ बुट्टा’’, ‘कैरी बुट्टा’, अशी स्वतःची खास नाव आहेत !
अलीकडच्या काळात पॉवरलूमवर सुद्धा बनारसी साड्या बनू लागल्या आहेत पण हातमागावर विणलेल्या बनारसी साडीला, त्यासाठी लागणाऱ्या अप्रतिम कौशल्यामुळे ‘भौगोलिक स्थानदर्शक प्रमाण पत्रक’ मिळाले आहे. गंगेच्या किनाऱ्यावर वसलेलं बनारस म्हणजे कला आणि संस्कृतीचं भांडार आहे. या भांडारातील बनारसी शालूंचा खजिना म्हणजे कलेचा एक अप्रतिम नमुना आहे. ‘पारंपरिक लहेजा’ आवडणाऱ्या प्रत्येक भारतीय नववधूवर बनारसी शालूनं वर्षानुवर्षे भुरळ घातली आहे !
बनारसी शालू व्यतिरिक्त ‘खड्डी-जॉर्जेट’ (खड्डी म्हणजे हातमाग), ‘शिफॉन-जॉर्जेट’, ‘कोरा सिल्क (ऑरगॅन्झा), ‘टिश्यू बनारसी’, ‘टसर- जॉर्जेट’, ‘बनारसी कॉटन’ इत्यादी प्रकार सुद्धा बनारसमध्ये विणले जात आहेत. या सगळ्या प्रकारांसाठी दुसऱ्या एखाद्या लेखात भेटूयात.
rashmisatav@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा