गुरुवार, ९ सप्टेंबर, २०२१

उर्मिलाची ‘ट्रेंडीग साडी’ !



‘कथक’ आणि ‘ओडीशी’ नृत्यात प्राविण्य मिळवलेल्या उर्मिला कानेटकरनं नृत्यातच ‘एमए’ करून १९९२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शुभमंगल सावधान’ या चित्रपटातून सिनेक्षेत्रात पदार्पण केले आणि मग पुढे ‘दुनियादारी’, ‘टाईमपास’, ‘ती सध्या काय करते ?’ या सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमधून उर्मिलाने आपल्या दमदार अभिनयाची छाप संपूर्ण सिनेसृष्टीवर पाडली. उर्मिला काम करत असलेल्या एका चित्रपटाचे आदिनाथ कोठारे दिग्दर्शक म्हणून काम पाहत होते आणि त्याच चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान उर्मिला आणि आदिनाथ एकमेकांच्या प्रेमात पडले आणि २०११ मध्ये उर्मिला, उर्मिला कानेटकर-कोठारे झाली. उर्मिलाला साड्यांची पहिल्यापासूनच आवड होती आणि लग्न झाल्यावर तर उर्मिला आवर्जून प्रसंगानुरूप साड्या नेसत असते आणि ती त्या साड्या अतिशय ग्रेसफुली ‘कॅरी’ करते. तीचे तिच्या आईच्या आणि सासूबाईंच्या साड्यांसोबत एक खास भावनिक नाते आहे. त्यातल्याच एका काळ्या कांजीवरम सिल्क साडीचा गाऊन शिवून, एका ‘ॲवॉर्ड फंक्शन’ला तिने घातला होता. जुन्या साड्यांचा ती नेहमीच कल्पकतेने वापर करत असते. तिच्याकडे अतिशय सुंदर साड्यांचा संग्रह असून ती त्याला तिचा ‘खजिना’ म्हणते.

तिची स्वतःची ‘डान्स ॲकेडेमी’ असून, कथक नृत्याचे ती कार्यक्रम आयोजित करत असते. काही महिन्यांपूर्वीपर्यंत ‘लॉक-डाऊन’मुळे तिचे नृत्याचे आणि सिनेक्षेत्रातील सगळे कार्यक्रम जवळ जवळ दिड वर्ष बंद होते. परंतु एप्रिलमध्ये या वर्षीचा ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा’ होता. त्या सोहळ्याला जाण्यासाठी उर्मिला उत्सुक होती कारण मागचे दिड वर्ष कोणताच कार्यक्रम झालेला नसल्यामुळे कुठेच छान आवरून जाता आले नव्हते ! ‘स्टार प्रवाह’च्या त्या कार्यक्रमासाठी खूप वेगळा पेहेराव करायचा उर्मिलाने ठरवलं पण शेवटी साड्यांच्या अतिशय प्रेमात असल्यामुळे उर्मिलाने तिच्या ड्रेस डिझायनरला म्हणजे समीरा दळवीला (मोरेशा), एखादी छान वेगळीच साडी डिझाईन करायला सांगितली. समीराने सिनेसृष्टीतील अनेक सिने-तारकांसाठी अतिशय सुंदर साड्या डिझाईन केल्या आहेत. मग समीराने उर्मिलाला साड्यांचे काही पर्याय सुचविले, त्यातील ही ‘प्लीटेड साडी’ उर्मिलाला खूपच आवडली. समीराने आसामच्या ‘मेखला-सादोर’ या साडी प्रकाराप्रमाणे ही प्लीटेड साडी दोन ‘पार्टस’ मध्ये बनवली !  सुंदर ‘मेटॅलिक-शॅम्पेन-अँटीक-गोल्ड’ रंगाच्या आणि ‘सिल्क ब्लेंडेड’ फॅब्रिकच्या त्या साडीचा वरचा भाग मोठ्या दुपट्ट्यासारख्या आहे आणि त्या भागावर समीराने बारीक प्लिट्स बनवून घेतल्या. खालचा स्कर्टसारखा भाग मात्र प्लेन ठेवला आहे. वरच्या प्लीटेड दुपट्ट्यासारख्या भागाची एक बाजू कंबरेभोवती गुंडाळून दुसरी बाजू साडीच्या पदरासारखी घ्यायची म्हणजे झाली साडी तयार ! प्लीटेड फॅब्रिक खूप छान ड्रेप होऊ शकते त्यामुळे कंबरेभोवती गुंडाळलेल्या त्या प्लीटेड दुपट्ट्यामुळे खालच्या स्कर्टला आपोआप साडीच्या निऱ्यांसारखा एक छान फ्लो तयार झाला. उर्मिलाला ती साडी प्रचंड आवडली आणि तिने ती साडी ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार’ सोहळ्यासाठी निवडली. सोहळ्याला निघतांना ती साडी नेसून उर्मिला जेव्हा तयार झाली तेव्हा तिचे ते अस्मानी रूप पाहून आदिनाथ परत एकदा तिच्या प्रेमात आकंठ बुडाले ! त्या ॲवॉर्ड फंक्शनमध्येही ग्लॅमरस दिसणाऱ्या उर्मिलाला त्या साडीसाठी खूप कॉम्प्लिमेंट्स मिळाले होते आणि सोशल मिडीयावरही ही साडी खूप ‘फ्लोट’ झाली होती. मुळातच सुंदर असणाऱ्या उर्मिलाचं सौंदर्य मोरेशाच्या त्या प्लीटेड साडीमुळे अधिकच खुललं हे मात्र नक्की. 

‘पंख्याच्या घडीची’ प्लीटेड साडी !

ख्रिस्त पूर्व काळात इजिप्तशियन राजे-महाराजांच्या अंगरख्यांच्या गळ्यांवर किंवा बॉर्डरवर, फॅशनचा एक भाग म्हणून कॉटन किंवा सिल्कच्या प्लीटेड फॅब्रिकची फ्रिल लावली जात असे आणि अशी प्लीटेड फॅब्रिकची फ्रिल अंगरख्यांवर असणं म्हणजे श्रीमंतीचं आणि समृद्धीचं लक्षण मानले जात असे ! अंगरख्याचे कारागीर ते प्लीटेड फॅब्रिक खूप निगुतीने हाताने बनवत असत परंतु अंगरखे धुतल्यावर मात्र ते प्लीटस निघून जात असत. मग परत ते कारागीर ती वरची फ्रील काढून त्याला प्लीटस घालत असत आणि याला खूप वेळ लागत असे ! त्या काळी इजिप्त आणि ब्रिटनमध्ये गळयाभोवतीच्या ‘प्लीटेड फ्रील’ला प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाई !

पुढे दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक बाजारपेठेत कल्पक वस्तूंची आवक वाढली. नायलॉन आणि पॉलीएस्टर या मानवनिर्मित धाग्यांच्या कापडावर ठराविक उष्णतेची प्रक्रिया करून कायमस्वरूपी राहणाऱ्या प्लीटस घातल्या जाऊ लागल्या आणि प्लीटेड फॅब्रिक बनवले जाऊ लागले. जागतिक बाजारपेठेत हे फॅब्रिक पसंतीस उतरल्यानंतर, भारतातही हे फॅब्रिक आलं आणि त्याचे स्कर्टस लोकप्रिय झाले. नंतर अलीकडच्या काळात भारतात, ‘फॅशन जगतात’ या प्लीटेड फॅब्रिकचा उपयोग वेगवेगळ्या कॉस्च्युम्समध्ये मोठ्या कल्पकतेने होऊ लागला, इतका कल्पकतेने की या प्लीटेड फॅब्रिकच्या चक्क साड्या तयार होऊ लागल्या !

अत्यंत 'ग्लॅमरस लुक' असलेल्या या साड्या 'रेड कार्पेट'वर आवर्जून दिसू लागल्या ! हल्ली कॉस्च्युम डिझायनर्स, वेगवेगळ्या ब्लेंडेड फॅब्रिक्सवर प्लीट्सचे वेगवेगळे पॅटर्न करून 'प्लीटेड कस्टमाइज्ड साड्या' बनवत आहेत. ब्लेंडेड सिल्क, सॅटीन-सिल्क, पॉलीएस्टर किंवा नायलॉन मिश्रित कापड, ऑरगॅन्झा, जॉर्जेट आणि टफेटा वगैरे फॅब्रिक्सवर प्लीटस छान बसतात. प्लीटेड साडीसाठी आधी योग्य ते कापड निवडले जाते, मग त्या कापडावर प्लीटस् करून घेतले जातात. पुठ्यांच्या पट्ट्यांचे मोल्ड्स वापरून हाताने किंवा मशिनने कापडाला प्लीटस् घातले जातात. पट्ट्यांचे मोल्ड्स वापरून हाताने प्लीटस् घालतांना दोन सारख्या आकाराचे कार्डपेपर घेतले जातात आणि त्याला आपण लहानपणी घडीचा पंखा बनवायचो तशा घड्या घातल्या जातात ! त्यातील घड्या घातलेला एक कार्ड पेपर टेबलवर पसरवून ठेवून त्याला मोठे चिमटे लावले जातात आणि त्यावर ज्या कापडावर प्लीटस् हव्या आहेत ते कापड ठेवले जाते आणि परत वरून घड्या घातलेला दुसरा कार्ड पेपर ठेवला जातो आणि हे हलू नये म्हणून त्यावर जड वजनं ठेवली जातात. मग ते तीन थर एकत्रितपणे घड्यांवर फोल्ड केले जातात आणि एकत्रितपणे बांधून ते बांधलेलं ‘बंडल’ मोठ्या ओव्हनमध्ये ठराविक तापमानात गरम करून घेतले जाते. मशीनवर घातलेले ‘प्लीटस्’चे ‘बंडल’ सुद्धा असेच ओव्हनमध्ये तापवून घेतले जाते. उष्णतेची प्रक्रिया होऊन त्या कापडातील धाग्यांवर प्रक्रिया होऊन ते धागे कायमस्वरूपी तसेच ‘सेट’ होतात आणि प्लीटेड फॅब्रिक तयार होते ! अशा फॅब्रिकमध्ये वैविध्य आणण्यासाठी कापडावर वेगवेगळ्या पॅटर्नच्या आणि ‘रुंदी’च्या प्लीटस् घातल्या जातात. अशा फॅब्रिकच्या साड्या तयार करतांना बऱ्याचदा या साड्यांच्या निऱ्या प्लेन ब्लेंडेड सिल्कच्या ठेवून, कमरेपासूनचा पुढचा पदर प्लीटेड असतो. प्लीटेड साडीचं वैशिष्ट्य म्हणजे या साड्या जशा ड्रेप करू, त्या आकारात अंगावर तशाच राहतात ! साडीला आधुनिक ‘टच’ देऊन ‘ग्लॅमरस रूप’ देणाऱ्या या ‘प्लीटस्’ला मोठा इतिहास नसला तरी भविष्यकाळ नक्कीच आहे !   

©रश्मी सातव 

rashmisatav@gmail.com 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा