गुरुवार, १८ मार्च, २०२१

भार्गवीचे ‘बंगाली’ कनेक्शन आणि जामदानी साडी ....... शुंदोर शुंदोर !

 


भार्गवीचे
बंगाली’ कनेक्शन !

भार्गवीचे आजोळ म्हणजे शिवाजीपार्क. भार्गवी लहानपणी आपल्या आज्जीकडे नेहमी जायची. भार्गवीची आज्जी ज्या बिल्डींगमध्ये राहत असे त्याच बिल्डींगमध्ये बॅनर्जी नावाची एक फॅमिली राहत होती. त्या फॅमिलीतल्या मिसेस बॅनर्जींना सगळे काकी म्हणत असत. या काकींकडे अनेक सुंदर बंगाली साड्या होत्या. त्या काकी, त्या सुंदर साड्या नेसत असत, विशेषतः पारंपरिक लाल-पांढरी साडी, त्यावर भांगात भरलेले लालचुटूक कुंकू आणि हातात घातलेल्या पारंपरिक लाल-पांढऱ्या शाखा-पोला बांगड्या घातलेल्या काकी पाहिल्या की त्या मूर्तिमंत माँ दुर्गादेवी वाटत. भार्गवी आणि तिची आई, त्या मोहक रूपाने मोहरून जात असत, त्यामुळे त्या दोघी बंगाली साड्यांच्या प्रेमात पडल्या ते कायमच्या. भार्गवीच्या आईकडे पण बंगाली साड्यांचे खूप सुंदर कलेक्शन आहे. आईला बंगाली साड्या आवडतात म्हणून, भार्गवीने एका प्रदर्शनातून एक अप्रतिम जामदानी साडी आईसाठी विकत घेतली आणि आईला भेट दिली. आईच्या बंगाली कलेक्शनमधील, मुलीने दिलेली हे जामदानी साडी म्हणजे एक अमुल्य ठेवा आहे.

      भार्गवी शिवाजीपार्कला नेहमी जात असे. एकदा नवरात्रात अष्टमीच्या दिवशी शिवाजीपार्कवर दुर्गापूजेनिमित्त ‘सिंदूर खेला’च्या कार्यक्रमाला भार्गवी आवर्जून गेली होती. तिथे बऱ्याचजणी पारंपरिक लाल-पार साडी, म्हणजेच लाल-पल्ला साडी नेसून आल्या होत्या. पारंपरिक वेशभूषेतल्या सगळ्याचजणी शक्तिशाली दुर्गामातेचं अद्भुत रूप दिसत होत्या. भार्गवीच्या मनावर ती ‘लाल-पार’ साडी परत एकदा दस्तक देऊन गेली !

      पुढे भार्गवी एकदा औरंगाबादला मामाकडे गेली होती. तिथे सगळेजण, त्या संपूर्ण कुटुंबाची मैत्रीण असलेल्या रोशिता काकींबरोबर गप्पा मारत बसले होते. गप्पांमध्ये लाल-पार साडीचा विषय निघाला. लाल-पार साडीच्या प्रेमात पडलेली भार्गवी तिच्या स्वप्नातल्या साडीवर कितीतरी वेळ बोलत राहिली......

नंतर भार्गवीचा, पोलिसांवर आधारित ‘लालबत्ती’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. तेव्हा रोशिता काकींचे यजमान वाशीचे ‘सीपी’ होते आणि वाशीमध्ये या चित्रपटाचा प्रिमियर शो पोलिसांसाठी आयोजित केला होता, त्या ‘शो’ला रोशिता काकी आणि त्यांच्या यजमानांना निमंत्रित केले होते. त्या ‘शो’ला ते दोघे आले होते पण भार्गवी मात्र, दुसरीकडे प्रमोशनला गेलेली असल्यामुळे वाशीच्या त्या ‘शो’ला जाऊ शकली नव्हती. मग शो संपल्यानंतर रोशिता काकींनी, भार्गवीला फोन केला आणि तिच्या अभिनयाचे भरभरून कौतुक केले आणि वेळ मिळाला की वाशीला भेटायला बोलावले. एकदा वेळ मिळाल्यावर भार्गवी मुंबईहून पुण्याला येतांना रोशिता काकींना भेटायला वाशीला गेली. दोघी कडकडून भेटल्या आणि रोशिता काकींनी भार्गवीच्या हातात एक सुंदर ‘लाल-पार’ साडी ठेवली !  भार्गवीला हे सगळं अनपेक्षित होतं. तिची स्वप्नातली साडी तिच्या हातात होती !

      भार्गवीला साड्या प्रचंड आवडतात आणि तिच्याकडे साड्यांचं आणि त्याच्यावरच्या डिझायनर ब्लाऊजचं खूप मोठे कलेक्शन आहे. रोशिता काकींनी दिलेल्या साडीच्या लाल ब्लाऊजच्या पाठीवर भार्गवीने सुंदर दुर्गामाता रेखाटून घेतली आहे. तिच्यावर प्रेम करणाऱ्या तिच्या बहिणी रेखाताई व चैत्राली आणि श्वेता शिंदे व तेजा देवकर या तिच्या मैत्रिणी प्रेमाने तिला नेहमी सुंदर साड्या भेट देत असतात. या तिच्या प्रेमळ साड्याच्या संग्रहालयात, आता अजून एक साडी विराजमान झाली आहे – रोशिता काकींनी दिलेली लाल-पार साडी !     

जामदानी साडी ....... शुंदोर शुंदोर  !

बंगाल म्हटलं की आठवते, मिठाई, मासे आणि लाल-पांढरी साडी ! खरतर बंगाली साड्यांचे प्रकारही खूप आहेत, जसे की जामदानी, बलुचरी, शांतीपुरी, टसर, तांट, कोरियाल वगैरे, पण आपल्याला फक्त लाल-पांढरी साडी माहिती असते, जिला बंगालमध्ये ‘लाल-पार’ साडी म्हणतात. ‘लाल-पार’ म्हणजे लाल काठ-पदर असलेली पांढरी साडी. साडीच्या काठाला बंगालीमध्ये ‘पार’ म्हणतात. ‘लाल-पार’ साडी खास लग्नात किंवा दुर्गा पूजेला किंवा कोणत्याही धार्मिक कार्यक्रमांमध्ये आवर्जून नेसली जाते. बंगालमध्ये या रंगाच्या साडीला सौभाग्याचं आणि पावित्र्याचं प्रतिक मानले जातं. बंगालमध्ये तयार होणाऱ्या सगळ्या प्रकारच्या साड्यांमध्ये इतर रंगसंगतींबरोबर, लाल-पांढऱ्या साड्या आवर्जून बनवल्या जातात, म्हणजे जामदानी लाल-पार, कोरियल लाल-पार वगैरे, आता जामदानी साडीविषयी सविस्तर जाणून घेऊयात.   

हातमागावर, कॉटन किंवा सिल्क किंवा एक धागा कॉटन आणि एक धागा सिल्कचा वापरून साडी विणत असतांनाच, त्यात जामदानी प्रकारची नक्षी विणली जाते, आणि त्यामुळे जामदानी नक्षीकाम असलेल्या साडीला जामदानी साडी म्हणतात. याच साडीला ‘ढाकाई जामदानी’ किंवा नुसते ‘ढाकाई’ असेही म्हणतात. पाचशे वर्षांपूर्वीपासून, तेव्हाच्या पूर्व बंगालमध्ये ‘ढाका’ जवळील सोनारगावात या साड्या विणल्या जायच्या. मुगल साम्राज्यात या साडीला, पर्शियन भाषेतील ‘जामदानी’ हे नाव मिळाले. ‘जाम’ म्हणजे फुले आणि ‘दानी’ म्हणजे ‘फ्लॉवरपॉट’. जामदानी प्रकारच्या नक्षीत सुंदर मुघल नक्षीकामाचा प्रभाव असलेली पाने, फुले आणि भौमितिक आकार जास्त असतात. पुढे १९७१ मध्ये बांगलादेश स्वतंत्र झाला आणि बांगलादेशातून जामदानी काम करणारे काही विणकर बंगालमध्ये येऊन नादिया जिल्ह्यात फुलिया गावी स्थायिक झाले आणि त्यांनी बंगालमध्ये जामदानी साडी विणायला सुरुवात केली. जामदानी साडी थोडी पारदर्शक असते पण त्या साडीवरची, ‘जामदानी नक्षी’ मात्र पारदर्शक नसते, त्यासाठी जाड धागा वापरला जातो, त्यामुळे ती जामदानी नक्षी खूपच उठून दिसते. साडी विणण्यासाठी लागणारे धागे आधीच तांदळाच्या पाण्यात स्टार्च केलेले असतात पण नक्षीकामासाठीचे धागे मात्र स्टार्च केलेले नसतात. जामदानी नक्षीकाम करणं हे क्लिष्ट काम असून, ‘ग्राफ पेपर’वर आधी डिझाईन काढून घेतली जाते आणि तो कागद उभ्या धाग्यांच्या खाली ठेवला जातो आणि मग त्या डिझाईनप्रमाणे आडवे धागे ओवले जातात. हातमागावर एक जामदानी साडी विणायला नक्षीकामानुसार एक आठवडा ते एक वर्ष देखील लागू शकते. त्यामुळे हातमागावर विणलेल्या ओरिजिनल जामदानी साड्या जरा महाग असतात पण या साड्या पिढ्यानपिढ्या टिकतात आणि खास प्रसंगांना नेसलेल्या या साड्या काही आठवणी घेऊन पुढच्या पिढीकडे जातात.    

तलम कहाणी :  

·      ·       ढाकातल्या प्रसिद्ध मलमल साड्या सुद्धा जामदानी नक्षीकामात विणल्या जातात, त्यांना मलमल जामदानी म्हणतात. मलमलचा धागा खूप तलम आणि सिल्कसारखा चमक असणारा असतो, त्यामुळे त्या साड्या खूपच मऊसूत असतात. मलमलचा धागा उष्ण तापमानात विणता येत नाही त्यामुळे मलमल जामदानी साड्या फक्त पहाटे विणल्या जातात.

 ·       अस्सल जामदानी साडी ओळखण्याची एक युक्ती आहे. या साड्यांवरची जामदानी नक्षी साडीच्या उलट्या बाजूने बघितल्यास, ती सुलट बाजूच्या नक्षीसारखीच दिसते. नक्षीसाठी वापरलेला धागा एका दिशेने जाऊन परत वळून येतो आणि परत जातो. अशाप्रकारे प्रत्येक नक्षीसाठी एकेक एकसंध धागा साडीच्या उभ्या-आडव्या धाग्यांमध्ये विणलेला असतो, धागे कुठेही कापलेले नसतात.  


 Rashmi Vinod Satav

rashmisatav@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा