गुरुवार, १ एप्रिल, २०२१

मंजिरीचा साडी सिलसिला !

 


मंजिरीचा साडी सिलसिला !

‘बालगंधर्व’ चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर, मराठी सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या सुबोध भावे याचं ‘बालगंधर्व कनेक्शन’ तसं खूप जुनं आहे ! वयाच्या १७ व्या वर्षी ‘Sugar is sugar, Salt is salt, If I love you, what is my fault ? असं पत्रात लिहून मंजिरीला प्रपोज करणाऱ्या सुबोधला, मंजिरीने तेव्हा रिप्लाय दिला होता, “मी जर बालगंधर्व पुलावर आले तर माझा होकार समज ......” आणि सुबोध धडधडत्या छातीने, मंजिरीची वाट बघत पुण्यात बालगंधर्व पुलावर उभा होता, आणि अखेर मंजिरी आली.... आणि त्यांच्या गोड नात्याची सुरुवात बालगंधर्व पुलावर झाली....!  

बालगंधर्व पुलावर सुरु झालेलं हे नातं पुढे अनेक वळणं घेत, १२ जुलै २००१ रोजी लग्नाच्या गोड बंधनात बांधलं गेलं. सुबोध, यशाची शिखरं पादाक्रांत करत असतांना, मंजिरीनं त्याला कधी प्रापंचिक विवंचनेत अडकू दिलं नाही. ती संसाराच्या जबाबदाऱ्या, खंबीरपणे आजतागायत सांभाळते आहे. वास्तविक, सुबोध आणि मंजिरीची ओळख एका नाट्य शिबिरातली, मंजिरीला सुद्धा अभिनयाची खूप आवड होती पण पुढे तिने कॅनडाला जाऊन इंजिनियरिंग केलं आणि परत आल्यावर सुबोध बरोबर लग्न झाल्यावर तिच्या ‘प्रायॉरिटीज’ बदलून गेल्या आणि ती सुबोधच्या मागे खंबीरपणे उभी राहिली. अहोरात्र कामात व्यस्त असलेल्या सुबोधने सुद्धा त्यांच्या ‘गहिऱ्या प्रेमाचे’ रंग कधी फिक्के पडू दिले नाहीत !

एका फिल्म फेस्टिवलसाठी मराठी सिनेसृष्टीचा प्रतिनिधी म्हणून सुबोध डिसेंबर २०१७ मध्ये हैद्राबादला निघाला होता. निघतांना मंजिरी त्याला सहज म्हणाली होती, “हैद्राबादला चालला आहेस, तिथे पोचमपल्ली वैगरे साड्या खूप छान मिळतात म्हणे, वेळ मिळाला तर बघून ठेवशील का ?” मंजिरीला खात्री होती की त्याला बिलकूल वेळ मिळणार नाही, कारण तो एका दिवसासाठीच गेला होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो हैद्राबादहून परत निघाला सुद्धा. पण आश्चर्य म्हणजे तो घरी आला, ते चक्क सहा साड्या घेऊन ! मंजिरीसाठी तो सुखद धक्का होता. हैद्राबादमध्ये एक तासभर वेळात-वेळ काढून, माहितगार लोकांना साडीचे चांगले दुकान विचारून, सुबोध एकटाच गेला आणि मंजिरीसाठी, त्याच्या आईसाठी आणि मंजिरीच्या आईसाठी वगैरे सहा साड्या घेऊन आला. सगळ्या साड्या एकसे एक सुंदर होत्या. त्यातील मंजिरीसाठी आणलेली एक पोचमपल्ली साडी बघून, मंजिरी तर हरखूनच गेली. सुंदर निळ्या रंगाच्या साडीला, जरीचा गुलबक्षी पदर आणि गुलबक्षी आणि पोपटी रंगाचे दुरंगी काठ, काठावर आणि साडीवर ठिकठिकाणी ‘इकत’ पद्धतीने विणलेले पोपट आणि गजमुद्रा. मंजिरीला हे सगळं अनपेक्षित होतं ! मंजिरी म्हणाली, “सुबोध वेळ काढून साड्या आणण्यासाठी जाईल....फोनवर माझा सल्लाही न घेता इतक्या सुंदर साड्या खरेदी करेल....हे सगळं माझ्यासाठी खूप मोठं आणि गोड सरप्राईझ होतं !”

पुढे थोड्याच दिवसात त्यांच्या धाकट्या मुलाची – मल्हारची मुंज होती, मंजिरीनं तीच निळीशार पोचमपल्ली साडी आणि हैद्राबादहून आणलेल्या साड्यांमधली अजून एक साडी – अशा दोन साड्या मुंजीला नेसल्या आणि अभिमानाने खूप मिरवल्या देखील. या दोन्ही साड्यांचं खूप कौतुक झालं आणि सुबोधने एकट्याने जाऊन घेतल्या हे समजल्यावर तर अजूनच कौतुक झालं ! हिच पोचमपल्ली साडी मग मंजिरीनं ‘आणि काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटाच्या प्रिमियर ‘शो’ला पण आवर्जून नेसली !

या पोचमपल्ली साडीपासून सुरु झालेला या सिलसिला असाच अजूनही चालू आहे....! सुबोध जेव्हा जेव्हा, शुटींग निमित्त जिथे कुठे जातो, तिथल्या स्पेशल साड्या मंजिरीसाठी आवर्जून आणत असतो. मराठी अभिनेत्र्यांचा मिळून मंजिरीचा एक ‘भिशी ग्रुप’ आहे. त्या ग्रुपमधल्या तिच्या मैत्रिणी सुबोधच्या या ‘जेस्चर’ वर ‘इम्प्रेस’ होऊन आपापल्या नवऱ्यांना म्हणत असतात, “शिका जरा सुबोध कडून..... नाहीतर तुम्ही !” मात्र आता हा लेख वाचल्यावर, फक्त मंजिरीच्या मैत्रिणीच नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्या बायका आपापल्या नवऱ्यांना नक्कीच कोपरखळ्या मारतील, “शिका जरा सुबोध कडून, तो एवढा व्यस्त असून सुद्धा आपल्या बायकोला साडी आणतो ...... नाहीतर तुम्ही !” 


‘इकत’ डिझाईनची पोचमपल्ली साडी !

तेलंगण राज्यातील भुवनगिरी नामक जिल्ह्यातील, ‘भूदान पोचमपल्ली’ या गावाला ओळख प्राप्त करून दिली ते पोचमपल्ली साडीने. २००५ मध्ये पोचमपल्ली साडीच्या विणकरांनी शासनाकडून पोचमपल्ली साडीसाठी ‘भौगोलिक स्थानदर्शक’ प्रमाणपत्रक घेतले आहे.

पण हि साडी पाहिली की प्रश्न पडतो की ही साडी ‘पोचमपल्ली’ की ‘इकत’ ? काहीजण या साडीला ‘इकत’ साडी असेही म्हणतात. पण ‘इकत’ म्हणजे नक्की काय ? इंडोनेशियन भाषेत ‘इकत’ याचा अर्थ आहे ‘बांधणे’ ! ‘इकत’ हि मुळची इंडोनेशियातील ‘टाय अँड डाय’ पद्धत आहे. गुजराथ मधील ‘बांधणी’ प्रकारात कापड विशिष्ट पद्धतीने बांधून रंगात बुडविले जाते पण ‘इकत’ प्रकारात कापड विणायच्या आधीच, धागे विशिष्ट पद्धतीने बांधून नैसर्गिक रंगात बुडविले जातात आणि मग कापड विणले जाते. भारताबरोबरच, इंडोनेशिया, कंबोडिया, म्यानमार, फिलिपिन्स, थायलंड, इराण, लॅटिन अमेरिका आणि जपानमध्येही असे कापड विणायची हि कला अवगत आहे.    

आता ‘इकत’ म्हणजे काय ते सविस्तर पाहूयात. ‘इकत’ म्हणजे साडीवरील नक्षीकाम विणण्याची एक खास पद्धत. ‘इकत’ हा प्रकार पटोला साडीत, ओरिसाच्या साडीत आणि पोचमपल्ली सिल्क साडीत पण असतो. म्हणून त्या साड्यांना पटोला इकत, ओरिसा इकत किंवा पोचमपल्ली इकत असेही म्हणतात. आता ‘इकत’ डिझाईन म्हणजे काय ते पाहूयात.... पोचमपल्ली साडी विणता-विणता, ‘इकत’ डिझाईन’ साडीवर उतरवणं म्हणजे एक अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. साडीचे सिल्कचे उभे-आडवे धागे हातमागावर लावण्यापूर्वी एका स्टॅन्डवर आडवे लावून घेतले जातात. सगळ्या आडव्या धाग्यांवर साडीच्या ठरवलेल्या डिझाईनप्रमाणे खुणा करून घेतल्या जातात. धागे रंगात बुडवण्यापूर्वी, डिझाईनप्रमाणे जिथे रंग नको असेल तिथे ‘रेझिस्ट’ पद्धतीने दुसरे दोरे घट्ट बांधून घेतले जातात आणि मग ते सगळे धागे रंगात बुडवले जातात. याला ‘रेझिस्ट डाईंग’ असं म्हणतात. सगळे धागे वाळले की मग पहिले बांधलेले दोरे सोडून, डिझाईनप्रमाणे परत खुणा करून दुसरीकडे, जिथे दुसरा रंग नको असेल तिथे पुन्हा दुसरे दोरे बांधून दुसऱ्या रंगात धागे बुडविले जातात. हिच क्रिया साडीच्या डिझाईनमध्ये जितके रंग आहेत, तितक्या वेळा केली जाते. म्हणजे साडीवरचे संपूर्ण डिझाईन, विणकाम सुरु करण्यापूर्वीच धाग्यांवर उतरवून घेतले जाते आणि मग विणकामाला सुरुवात होते. मग ते उभे-आडवे धागे हातमागावर मोजमाप करून अशा पद्धतीने लावून घेतले जातात की धाग्यांवरचे ते ठरलेले डिझाईन साडीवर विणले जाते. या सगळ्या प्रकारात प्रत्येक टप्प्यावर गणिती आकडेमोड करून खूप काटेकोरपणे मोजमाप करून काम करावे लागते. या प्रक्रियेला खूप कुशल विणकर लागतात. एखाद्या टप्प्यावर मोजमापात एक जरी चूक झाली तरी साडीवरचे सगळे डिझाईन चुकू शकते ! अशा पद्धतीने हातमागावर फक्त धागे लावायलाच ८ ते १० दिवस लागतात आणि मग त्याच्यापुढे पोचमपल्ली साडी विणायला घेतली जाते. साडीवर बारीक नक्षीकाम असेल तर ‘डबल इकत’ केले जाते. ‘डबल इकत’ म्हणजे उभे आणि आडवे दोन्ही धागे ‘रेझिस्ट’ पद्धतीने ‘डाय’ करून घेतले जातात. ‘डबल इकत’चे काम खूप अचूकपणे करावे लागते आणि जेव्हा फक्त उभे धागे ‘रेझिस्ट’ पद्धतीने ‘डाय’ केले जातात तेव्हा त्या ‘इकत’ला ‘ताना-इकत’ म्हटले जाते, ‘ताना इकत’ला तुलनेने वेळ कमी लागतो आणि जेव्हा फक्त आडवे धागे ‘रेझिस्ट’ पद्धतीने ‘डाय’ केले जातात तेव्हा त्या ‘इकत’ला ‘बाना-इकत’ म्हटले जाते. ‘बाना-इकत’ला पण खूप कसब लागते कारण आडवे धागे घालतांना प्रत्येक वेळेस डिझाईनप्रमाणे, मोजमाप करून उभ्या धाग्यात गुंफावे लागतात. ही अवघड कला अवगत असलेल्या विणकरांची कमाल वाटते. विशेष म्हणजे या कलेचा सन्मान करत जागतिक स्तरावर पण ‘युनेस्को’ने ‘इकत’ विणकामाची ‘अभिजात कला’ म्हणून दखल घेतली आहे.

 

अजून काही महत्त्वाचे  :

  • ·       पोचमपल्ली साडी इकत पद्धतीने विणली जात असल्यामुळे त्या साडीवरील नक्षीकामात भौमितिक आकार जास्त प्रमाणात दिसतात. या नक्षीत हत्ती, पोपट, नृत्य करणाऱ्या मुली, पानं-फुलं पण विणली जातात पण या सगळ्यांना भौमितीय आकार दिलेला असतो. ‘इकत’ ओळखण्याची खुण म्हणजे डिझाईनच्या कडा कधीच गोलाकार नसतात.  
  • ·       जर्मन चित्रकार हर्मन लिन्ड याने १८९५ मध्ये भारतात आल्यावर ‘इकत’ पद्धतीने विणलेली साडी नेसलेल्या मुलीचे चित्र काढले होते, त्यावरून हि कला किती जुनी आहे याची खात्री पटते.
  • ·       पूर्वी इराणमधील श्रीमंत घराण्यातील नवऱ्या मुलींना, सासरी जातांना दिल्या जाणाऱ्या उंची वस्तूंमध्ये इकत पद्धतीने विणलेले शाही कापड दिले जात असे.  
  • ·       ‘इकत’ डिझाईन विणायच्या आधीच धागे ‘डाय’ केलेले असल्यामुळे, पोचमपल्ली साडीवरची कोणतीही डिझाईन सुलट आणि उलट बाजूने सारखीच दिसते. 

Rashmi Satav
rashmisatav@gmail.com


1 टिप्पणी: