शुक्रवार, २९ जानेवारी, २०२१

इरकल साडीची माहिती

 इरकल की इलकल ?

महाराष्ट्रात इरकल म्हणून प्रचलित असलेली साडी मुळची कर्नाटकची असून कर्नाटकात या साडीला इलकल साडी म्हणतात. कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात इलकल आणि त्याच्या आजूबाजूच्या गावात आठव्या शतकापासून देवांग, पद्मनाभ, पद्मशाली, वाल्मिकी इत्यादी जमातीचे विणकर, ही पारंपरिक इलकल साडी हातमागावर विणत असत.

हातमागावर विणल्या जाणाऱ्या या साड्यांची खासियत म्हणजे; मुख्य साडी आणि साडीचा पदर वेगवेगळा विणला जातो आणि ‘कोंडी’ नावाचे एक खास टेक्निक वापरून त्याचा पदर मुख्य साडीला जोडला जातो. या साडीचा पदर एका विशिष्ट पद्धतीचा असतो. लाल-पांढऱ्या किंवा मरून-पांढऱ्या रंगाचे पट्टे या पदरावर असतात. या पदराला टोप-पदर म्हणतात. हल्ली मात्र दुसरेही रंग इरकलच्या पदरावर झळकतांना दिसतात. ठराविक डिझाईन असलेले हे पदर आणखी खुलून दिसतात, ते सुंदर अशा पारंपरिक गोंड्यांमुळे, त्यांना टॅसल्स असेही म्हणतात. 

पारंपरिक इरकल साड्यांचे काठ नेहमी कॉन्ट्रास्ट असून ४ ते ६ इंच रुंदीचे असतात. काठाच्या डिझाईन मध्ये पण काही सुंदर पारंपरिक प्रकार आहेत जसे की ‘चिक्की-पारस’, ‘गुमी’, ‘जरी’, ‘गायत्री’ वगैरे, यातील ‘चिक्की-पारस’ काठ खूपच लोकप्रिय प्रकार आहे. हे सुंदर काठ उठून यावे म्हणून मधली साडी प्लेन किंवा चेक्सची (चौकडीची) असते. या चेक्समध्येही छान छान प्रकार आहेत, जसे की बारीक चेक्स म्हणजे ‘कोंडी-चिक्की’, थोडे मोठे चेक्स म्हणजे ‘रागावली’, जवळ जवळ असणाऱ्या उभ्या रेषांचे चेक्स म्हणजे ‘पुथडी’ किंवा दोन वेगवेगळे रंग वापरून बनवलेले चेक्स म्हणजे ‘शेरटिंग’ !       

बागलकोट जिल्ह्यात पूर्वीपासून या विणकरांच्या घरातच हातमाग आहेत आणि घरातील सगळी मंडळी या कामात वाकबगार असतात. अतिशय कष्टाळू असणारी हि विणकर जमात साधारणपणे २ ते ७ दिवसात एक साडी विणतात. पुढे पॉवरलूम आल्यावर हीच साडी आता ३ ते ४ तासात बनते. पण अजूनही हे विणकर मनोभावे हातमागावर मोठ्या प्रमाणावर या साड्या बनवतात. फक्त त्यांच्या कष्टाचा म्हणावा तसा मोबदला मात्र त्यांना मिळत नाही ही शोकांतिका आहे. त्यामुळे चोखंदळ ग्राहकांनी खास हातमागावर बनवलेल्या या इरकल साड्या विकत घेतल्यास त्यातून या विणकरांना प्रोत्साहन मिळेल आणि ही कला पण जिवंत राहण्यास मदत होईल.    

 

चौकटीत :

·       इरकल गावाला या साडीने ओळख प्राप्त करून दिली आहे म्हणून या साडीला भौगोलिक स्थानदर्शकप्रमाणपत्र (‘जीआय टॅग), मिळाला आहे.

 ·       ओरिजिनल इरकल ओळखण्याची खुबी म्हणजे, पदर साडीला जिथे जोडला जातो तो भाग साडीच्या उलट्या बाजूने बघावा. ‘इंटर-लॉकिंग-लूप’ पद्धतीने साडीचे उभे धागे (साडीचा ताना) आणि पदराचे उभे धागे (पदराचा ताना ) एकमेकांना जोडले दिसतात. ज्याला ‘कोंडी-टेक्निक’ असे म्हणतात. पण हि गोष्ट सरावानेचे कळते कारण हे अतिशय बेमालूमपणे जोडलेले असते.

 ·       बागलकोट जिल्ह्यात ही साडी ६ वार, ८ वार आणि ९ वार या मापात उपलब्ध आहेत.

 ·       कर्नाटकात प्लेन इरकल साडीवर ‘कसुटी’ नामक भरतकाम पण हाताने केले जाते. कसुटी म्हणजेच कर्नाटकी कशिदा. कापडाच्या दोन्ही बाजूने तंतोतंत सारखा दिसणाऱ्या या कर्नाटकी कशिद्यालाही ‘जीआय टॅग’ मिळाला आहे.   

·       कर्नाटकातल्या नववधू स्वतःच्या लग्नात खास कुंकुवाच्या रंगाची इरकल नेसतात.

·       अशी हि सुंदर पारंपरिक साडी कॉटन किंवा सिल्क दोन्ही मध्ये बनते.   

पारंपरिक प्लेन कॉटन इरकल साडी आणि त्यावर कॉन्ट्रास्ट खणाचं ब्लाउज सध्या खूप ट्रेंडीग मध्ये आहे.


रश्मी विनोद सातव

rashmisatav@gmail.com

#VirasatIndia


 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा