गुरुवार, १७ जून, २०२१

रुपालीची लकी ब्लॅक साडी !

 


स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते ?’ या मालिकेत ‘संजना’ साकारणाऱ्या रेखीव चेहऱ्याच्या रुपाली भोसलेचा, २००९ मध्ये ‘मन उधाण वाऱ्याचे’ या मालिकेने सुरु झालेला प्रवास, मराठी-हिंदी मालिका, रिॲलिटी शोज, चित्रपट, वेब-सिरीज करत खूप पुढेपर्यंत आला आहे.

कोणताही ‘आऊटफिट’ रुपाली अतिशय सुंदर ‘कॅरी’ करते, अशी तिची ख्याती आहे. शिवाय रुपाली, साडी खूप सुंदर ‘ड्रेप’ करते आणि सोशल मिडीयावर तिचे सुंदर साड्यांमधील फोटो खूप ‘ट्रेन्डींग’ आहेत. सिनेअभिनेत्री रेखाजींच्या साड्यांच्या प्रेमांत असलेल्या रुपालीकडे स्वतःच्या संग्रहातही खूप सुंदर साड्या आहेत. तिच्या पहिल्या पगारातून तिने तिच्या आईसाठी गर्द हिरव्या रंगाची एक सुंदर मऊसूत कॉटनची साडी घेतली होती. रुपाली दौऱ्यावर जातांना आजही ती साडी ऊबदार पांघरूण म्हणून घेऊन जात असते.

रुपालीला काळा रंग खूप आवडतो. ती म्हणते, “काळ्या कपड्यांमध्ये आपलं व्यक्तिमत्त्व अधिक खुलून दिसतं आणि ते व्यक्तिमत्त्व कणखरही वाटू लागतं !” दोन वर्षांपूर्वी संक्रांतीच्या आधी रूपालीला साक्षात्कार झाला की आपल्याकडे संक्रांतीच्या दिवशी नेसण्यासाठी काळी साडीच नाहीये, म्हणून ती आणि तिची आई दुकानात काळ्या साड्या आणण्यासाठी गेल्या. आईने सिल्कची एक काळी साडी घेतली आणि रुपाली एका झुळझुळीत काळ्या सिफॉन साडीच्या प्रेमात पडली. त्या साडीवर कॉन्ट्रास्ट लाल रंगाच्या धाग्याने चिकनकारी वर्क केलेलं होतं. रुपालीने ताबडतोब ती साडी घेतली आणि संक्रांतीच्या दिवशी नेसली आणि त्या साडीवर घराच्या गच्चीवर जाऊन चक्क पतंग उडवला ! त्या संक्रांतीला, तिळगुळ देण्याच्या कार्यक्रमातही तिने ती साडी खूप मिरवली आणि त्याच दिवशी तिला ‘बडी दूर से आये है’ या मालिकेच्या ऑडीशनसाठी फोन आला !

गमंत म्हणजे, तिने काही दिवसांपूर्वीच बुक केलेल्या कारच्या डिलिव्हरीची तारीख आणि ऑडीशनची तारीख एकच होती ! मग रुपाली त्या दिवशी परत तीच ‘ब्लॅक साडी’ नेसून कारची डिलिव्हरी घ्यायला आई-बाबा आणि भावासोबत गेली आणि तिथूनच स्वतः कार चालवत ‘बडी दूर से आये है’ या मालिकेच्या ऑडीशनसाठी गेली. ऑडीशन मस्त झाली  आणि तिचं त्या मालिकेसाठी सिलेक्शन पण झालं ! रुपालीसाठी ती ब्लॅक साडी खूप ‘लकी’ ठरली ! त्यानंतर महत्त्वाच्या कामांना रुपाली तीच ब्लॅक साडी नेसत असते. शिवाय मालिकांमध्ये एका तरी एपिसोडमध्ये ती साडी नेसण्याचा ती आग्रह धरते !

अतिशय ‘पॉवरफुल ड्रेसिंग’ करणाऱ्या रुपलीसाठी ही ‘ब्लॅक साडी’ खूप खास आहे कारण ती तिच्यासाठी लकी आहे ! रूपालीचे दर्जेदार काम बघता, ही साडी पुढेही तिच्यासाठी कायमच ‘लक’ घेऊन येईल हे नक्की !

‘चिकनकारी’ची अदाकारी !

‘चिकनकारी’ हे मुळचे पर्शियन भरतकाम असून, पर्शियन भाषेत या ठराविक भरतकामाला ‘चिकीन’ असं म्हणतात. ‘चिकीनकारी’ म्हणजे सुई घाग्याने पातळ कापडावर भरतकाम करून सुंदर नक्षीकाम साकारणे. भारतात ‘चिकीनकारी’ या शब्दाचा अपभ्रंश होऊन ‘चिकनकारी’ असे नाव रुळले. इसवीसन पूर्व ३ ऱ्या शतकात ग्रीक इतिहास अभ्यासक ‘मेगॅसथेन्स’ याने भारतावर लिहिलेल्या ‘इंडिका’ या पुस्तकात, भारतात मसलिन कापडावर असे भरतकाम केले जात असल्याचा उल्लेख सापडतो. त्याच्याही आधी व्यापाराच्या निमित्ताने इराण मधून आलेल्या पर्शियन लोकांकडून ही कला भारतात रुजली असे मानले जाते. त्याकाळात फक्त पांढऱ्या शुभ्र मसलिन कापडावर पांढऱ्याच रंगाच्या रेशमी धाग्याने हे चिकनकाम केले जात असे. नंतरच्या काळात १७ व्या शतकात मुघल साम्राज्यातील सम्राट जहांगीरची बेगम ‘नूर जहाँ’ हीने या कलेला राजाश्रय दिला. मुघलकाळात भरभराटीला आलेल्या ‘चिकनकारी’ कलेवर मुघल साम्राज्यातील आर्किटेक्चरमधील कलाकुसरीचा मोठा प्रभाव पडलेला दिसतो ! पण स्वतः भरतकामात माहीर असलेल्या ‘नूर जहाँ’ने राजस्थान आणि काश्मिरी भरतकामाची गुंफण घालून ‘चिकनकारी’कलेत काही नवीन ‘टाके’ विकसित केले आणि त्यातून दोन संस्कृतींचा मिलाफ घडवून आणला. सम्राट जहांगीरच्या अधिपत्याखाली असलेल्या ‘लखनऊ’मध्ये या कलेच्या कारागिरांना तिने वसविले आणि या कलेला प्रोत्साहन दिले. त्या काळात मुघल साम्राज्यातील राजघराण्यातील स्त्रिया लखनवी चिकनचे दुपट्टे मोठ्या हौशीने बनवून घेत असत. पण ‘नूर जहाँ’च्या मृत्युनंतर डबघाईला आलेल्या या कलेला १८३० मध्ये अवधच्या हैदर राजाने परत उर्जितावस्था दिली. आजही लखनऊ’मध्ये चिकनकारी कापडाची मोठी बाजारपेठ आहे.  

नंतरच्या काळात मसलिन व्यतिरिक्त सिल्क, सिफॉन, जॉर्जेट, नेट, क्रेप आणि ऑर्गेंझा सारख्या पातळ कापडांवर पण चिकनकारी केली जाऊ लागली. शिवाय पांढऱ्या रंगाबरोबरच इतर रंगात विशेषतः पेस्टल शेड्स वर पांढऱ्या रंगात केलेली चिकनकारी खूप लोकप्रिय होऊ लागली. साडीवर चिकनवर्क सुरु करण्यापूर्वी कागदावर आर्टिस्टकडून डिझाईन काढून घेतले जाते मग ते डिझाईन साडीवर, ‘धुतल्या जाणाऱ्या इंडिगो शाईत’ छापले जाते. शक्यतो ज्या रंगाचे कापड असते त्याच रंगाच्या किंचित डार्क शेडच्या जाड धाग्याने किंवा पांढऱ्या रेशमी जाड धाग्याने चिकनवर्क केले जाते. त्यात काही वेळा बारीक सोनेरी किंवा चंदेरी बुंद (मुकेश), मणी किंवा छोटे आरसे गुंफून सुंदर कलाकृती निर्माण केल्या जातात. चिकन वर्कच्या साड्यांसाठी जरासे पातळ कापडच वापरले जाते, त्यामुळे या केलेतील ‘शॅडो-वर्क’ हा प्रकार कापडाच्या उलट्या बाजूने केला जातो आणि कापडाच्या सुलट्या बाजूने भरलेल्या नक्षीबरोबर हे ‘शॅडो-वर्क’ अप्रतिम दिसते. या भरतकामात बॅकस्टिच, शॅडो-वर्क, चेन स्टिच, जाळी, जंजिरा, बुलबुल, ताज-महल इत्यादी एकूण ३२ स्टीचचे प्रकार वापरून  ही कलाकुसर केली जाते. या सगळ्या ‘स्टीच’ सगळ्या साड्यांमध्ये न वापरता साडीवरच्या डिझाईननुसार ‘स्टीच’ची निवड केली जाते. चिकनकारीचे ठराविक कारागीर ठराविक स्टीच मध्ये वाकबगार असतात. संपूर्ण साडीवरची एक स्टीच पूर्ण झाल्यानंतर ती साडी दुसऱ्या स्टीचसाठी दुसऱ्या कारागिरांकडे सोपवली जाते. लखनऊमध्ये हे काम करणाऱ्या कारागीरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात महिलांचा समावेश असून हे संपूर्ण काम अत्यंत कौशल्य वापरून हाताने होत असल्यामुळे चिकनवर्क केलेली एकेक साडी म्हणजे कलेचा एकेक अद्भुत नमुना ठरते. 

अजून काही विशेष  :

१९८६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अंजुमन’ या बॉलीवूडच्या चित्रपटात चिकनकारी-कारागीरांच्या कष्टांना अधोरेखित केले होते. मुझफ्फर अली यांनी दिग्दर्शित या चित्रपटात शबाना आझमी आणि फारुख शेख यांनी काम केले होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान फारुख शेख चिकनकारी कलेने इतके प्रभावी झाले की आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी चिकनवर्कचे कुर्ते आवर्जून वापरले. एकंदरीतच अत्यंत ‘एलिगंट’ दिसणाऱ्या चिकनवर्कच्या कुर्त्यांचा आणि साड्यांचा मराठी आणि हिंदी सिनेकलाकारांकडून खूप मोठ्या प्रमाणात कायमच वापर होतांना दिसतो.     

©रश्मी विनोद सातव

rashmisatav@gmail.com

 

     

  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा