‘आता वाजले की बारा....’, या नटरंग
चित्रपटातल्या लावणीवर, अमृता खानविलकरनं केलेलं नृत्य बघून कोणालाही खरं वाटणार
नाही की अमृतानं कोणत्याही नृत्यातलं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलं नसून,
‘नृत्यकला’ तिला लहानपणापासूनच उपजत आहे ! तिची नृत्यकला तिनं स्वतः विकसित केली
असून तिच्या लयबद्ध नृत्याबरोबरच तिचा कसदार अभिनयही आपण अनेक मराठी - हिंदी चित्रपटांमधून पाहिला
आहे. अभिनयाबरोबरच अतिशय ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळख
असलेल्या अमृताचं सतत शुटींग, नृत्याची रिहर्सल्स, सादरीकरण, रियॅलिटी शोज आणि फोटो शूट, असं
बरच काही चालू असतं ! कामानिमित्त, नेहमी होणाऱ्या फोटो-शूट मधलं, एक ‘फोटो-शूट’ मात्र तिच्या
खास लक्षात राहिलं !
यंदाच्या दिवाळीत अमृतानं अत्यंत व्यस्त
शेड्युल मधून कुटुंबासाठी खास वेळ राखून ठेवला होता, दिवाळीत ‘सोशल-मिडिया’साठी
फोटो-शूट सुद्धा करायचं नाही असं तिनं पक्क ठरवलं होतं ! दिवाळीत फक्त कुटुंब,
मित्रपरिवार आणि आवडीच्या गोष्टींसाठी तिनं वेळ ठेवला होता. तिची अत्यंत आवडीची
गोष्ट म्हणजे साडी खरेदी ! अमृता सतत तिच्या स्वतःसाठी, तिच्या आईसाठी, तिच्या
बहिणीसाठी साडी खरेदी करत असते. पैठणी आणि बनारसी हा साडी प्रकार तिला मनापासून
आवडतो. तिच्याकडे आणि तिने तिच्या आईला भेट म्हणून दिलेल्या पैठण्यांचा आणि बनारसी
साड्यांचा खूप मोठा संग्रह आहे. तिची ही, साडी भेट देण्याची परंपरा वर्षानुवर्षे
चालू आहे ! या दिवाळीत तर अमृतानं चक्क तिच्या छोट्याशा भाचीला – नूरवीला एक
छोटीशी नऊवार साडी शिवून घेतली आणि तिला भेट दिली ! केवळ एक वर्षाच्या नूरवीला साडी
भेट देतांना अमृताला तिच्या लहानपणची आठवण झाली, अमृता लहानपणी सतत तिच्या आईच्या
साड्या नेसून बसत असे ! लहानपणी तिला वाटे आपल्याकडेही स्वतःची हक्काची एखादी तरी साडी
असावी, म्हणूनच कदाचित तिनं नूरवीला इतक्या लहानपणी तिची स्वतःची अशी एक साडी भेट
दिली !
साडी खरेदीचा सोहळा हे तिचं आवडीचं काम. यंदाच्या
दिवाळीत अमृता ‘सोशल मिडीया’वर ऑनलाईन साडी खरेदीसाठी एखाद्या चांगल्या
साडीच्या शोधात होती. तिला ‘ऑरा बनारस’ यांचं बनारसी
साड्यांचं कलेक्शन प्रचंड आवडलं. तिनं त्यातील, एक सुंदर निळ्या रंगाची खड्डी जॉर्जेट
बनारसी साडी निवडून
ठेवली आणि वेळ मिळाल्यावर ऑर्डर करण्याचं असं ठरवलं, पण चार-पाच दिवसात थेट तिच्या
घरी ती साडी तिला दिवाळी-भेट म्हणून आली देखिल ! ‘ऑरा बनारस’चे अर्पिता आणि हर्षवर्धन
अगरवाल हे तिच्या कलेचे फॅन असून त्यांनी ती साडी तिला बनारसहून भेट म्हणून पाठवली !
अमृताला ती साडी इतकी आवडली की दिवाळीत अजिबात फोटो शूट न करण्याचा निर्धार
केलेल्या अमृतानं ताबडतोब त्या साडीत फोटो-शूट करायचं ठरवलं ! ‘फोटो-शूट’चं ठिकाण
ठरलं – अमृताच्या घराची गच्ची आणि वेळ ठरली टळटळीत उन्हात दुपारी बारा
वाजता !
तेव्हा श्रुती बागवे या अत्यंत अनुभवी फोटोग्राफरनं
इतके कमाल फोटो काढले की फोटो बघून शेवटपर्यंत कुणालाच कळालं नाही की ते फोटो
गच्चीत काढले होते ! अत्यंत खुबीनं काढलेल्या त्या फोटोंतल्या त्या पांढऱ्या-शुभ्र पार्श्वभूमीवर
ती निळीशार बनारसी जॉर्जेट साडी फारच सुरेख दिसत
होती. अमृतानं त्या साडीवर घरातलचं तिच्याकडचं सोनसळी पिवळ्या रंगाचं ब्लाऊज ‘पेअर’
केलं होतं आणि त्या निळ्याशार साडीवर ते फार सुंदर दिसत होतं ! दिवाळीचं फोटो-शूट
असून सुद्धा, पणत्या ठेवतांना आणि रांगोळ्या काढतांनांचे फोटो न काढता अमृताच्या हातात
हेलकावे घेणारा लालबुंद आकाश कंदील फार सुरेख दिसत होता !
साडी हा स्त्रियांचा जिव्हाळ्याचा आणि
हक्काचा विषय आणि अमृताच्या त्या खास साडीच्या त्या हटके ‘फोटो-शूट’वर अधिराज्य
गाजवलं तेही सगळ्या महिलांनीच ! अभिनय आणि नृत्यात पारंगत असलेली अमृता स्वतः मेकअप
सुद्धा अतिशय उत्तम करते ! या फोटो शुटसाठी मेकअप तिने स्वतः केला असून, जयश्री
शहा या गुणी हेअर आर्टिस्टनं साडीला साजेशी
अशी सुंदर हेअरस्टाईल केली. शिवाय अमृताच्या अतिशय लाडक्या मैत्रीणींनी –
मंजिरी आणि सायली या दोघींनी अमृताला खास या ‘फोटो-शूट’साठी चांदीचे दागिने दिले ! मंजिरी
ओकनं दिलेला वेगळ्याच धाटणीचा चोकर चांदीचा असूनही साडीवरच्या सोनेरी बुट्ट्यांवर उठून दिसत होता ! शिवाय
पुण्याच्या सायली मराठेनं खास चांदीची सुंदर नथ या ‘फोटो-शूट’साठी अमृताला पाठवली ! अमृता, साड्यांबरोबरच दागिन्यांच्या
बाबतीत सुद्धा खूप चोखंदळ
आहे ! तिला नखशिखांत दागिने घालायला बिलकुल आवडत नाही ! अमृता म्हणाली, “ मी
साडीवर कमीतकमी दागिने घालते आणि तेही सुंदर असे ‘स्टेटमेंट
पिसेस’ ! त्यामुळे साडी जास्त खुलून दिसते ! माझा साड्यांचा संग्रह म्हणजे माझा
खजिना आहे आणि या खजिन्यातली एकेक मौल्यवान साडी मी मलमलच्या कापडात गुंडाळून ठेऊन
जतन करते. खास या साडीचं फोटो-शूट करतांना आणि ती साडी मिरवतांना मला जाम मजा आली
होती !”
असं हे फार तामझाम न करता, आपापल्या
क्षेत्रात पारंगत असलेल्या स्त्रियांनी मिळून केलेलं ‘फोटो-शूट’ खूपच भारी झालं आणि
तेव्हा त्या सुंदर रॉयल ब्लू बनारसी जॉर्जेट साडीतली अमृता कमालीची
सुंदर दिसत होती !
गंगेच्या
किनाऱ्यावर वसलेल्या सुंदर बनारसची अजून एक सुरेख साडी म्हणजे – ‘खड्डी जॉर्जेट’ !
‘खड्डी’ म्हणजे हातमाग, बनारसी शैलीत ‘जरी’काम करून हातमागावर विणलेली जॉर्जेटची
साडी म्हणजे ‘बनारसी खड्डी जॉर्जेट साडी’ !
‘बनारसी
खड्डी जॉर्जेट साडी’ कशी तयार होते हे जाणून घेण्याआधी जॉर्जेटच्या फॅब्रिक विषयी थोडेसे समजून घेऊ, जॉर्जेट आणि शिफॉनचं
कापड थोडंफार सारखं दिसत असलं तरी बारकाईनं
पाहिल्यास त्यांच्यात फरक जाणवतो. जॉर्जेट आणि शिफॉन
हे दोन्ही फॅब्रिक्स ‘प्लेन विव्ह’मध्येच विणली जात असली तरी त्या दोन्ही
कापडाच्या धाग्यांमध्ये फरक असतो आणि त्यामुळे या दोन्ही फॅब्रिक्समध्ये तो फरक दिसून येतो. सिल्क, कॉटन, नायलॉन, पॉलिस्टर
किंवा व्हिस्कॉसचे तंतू इंग्रजी ‘एस’ आकारात, मशीनवर ‘अँटी
क्लॉक वाईज’ पिळ देऊन जे धागे
(यार्न) तयार होतात, ते धागे ‘तान्या-बाण्यात लावून ‘प्लेन-विव्ह’मध्ये विणले तर जॉर्जेट
फॅब्रिक
तरी होतं आणि तेच तंतू इंग्रजी ‘झेड’ आकारात ‘क्लॉक
वाईज’ पिळ देऊन तयार केलेल्या यार्नपासून
फॅब्रिक
विणलं तर शिफॉनचं फॅब्रिक तयार होतं. शिफॉन, जॉर्जेटपेक्षा जास्त पातळ, नाजूक आणि पारदर्शक असतं. जॉर्जेटच्या
कापडाला त्यासाठी वापरलेल्या यार्न मुळे एक खास ‘टेक्श्चर’ आलेलं असतं. जॉर्जेटच्या कापडात बारीक ग्रेन्स जाणवतात
आणि तीच ओरिजिनल जॉर्जेटची ओळख आहे. शिवाय जॉर्जेटचं कापड जास्त टिकाऊ असून रंग व्यवस्थित शोषून घेतात. जॉर्जेटच्या अनेक गुणधर्मांमुळे
बनारसमध्ये मोठ्या प्रमाणात बनारसी खड्डी जॉर्जेट साड्या विणल्या जातात.
बनारसी
जॉर्जेटच्या साड्या विणण्यासाठी खास त्यासाठी वापरले जाणारे सिल्कचे ‘एस ट्विस्ट’चे पांढरे धागे हातमागावर ‘तान्या-बाण्यात’ लावून घेतले
जातात. त्या बारीक धाग्यांपासून साडी विणतांना, विणकाम अचूक व्हावं म्हणून त्या
धाग्यांना आधीपासूनच किंचित स्टार्च केलेलं असतं. साडी विणता-विणताच त्यात जरीचे
आडवे धागे टाकून बनारसी शैलीत काठापदरावरची भरजरी नक्षी आणि साडीच्या मधले बुट्टे
विणले जातात. यासाठी उच्च प्रतीची ‘गोल्ड प्लेटेड’ किंवा ‘सिल्व्हर प्लेटेड’
टेस्टेड जर वापरली जाते. साडीवरचं हे जरीचं नक्षीकाम ‘कढुआ’ किंवा ‘फेकुआ’
पद्धतीने केलं जातं. ‘फेकुआ’ पद्धतीत ‘शटल’ने आडवे टाकलेले धागे साडीच्या आतल्या
बाजूनं ‘फ्लोटिंग’मध्ये राहतात आणि साडी पूर्ण विणून झाल्यावर जास्तीचे असणारे ते ‘फ्लोटिंग’चे
धागे अत्यंत बारकाईने कापले जातात. अशा पद्धतीने विणलेल्या साड्यांना बनारसी
कटवर्कच्या साड्या असही म्हटलं जातं. ‘कढुआ’ पद्धतीत नक्षीनुसार ‘जरी’चे धागे आडवे
टाकल्यानंतर वळवून घेतले जातात, त्यामुळे साडीच्या आतल्या बाजूने ‘फ्लोटिंग’चे धागे
नसतात. ‘कढुआ’ काम जास्त कौशल्याचं असून त्याला ‘फेकुआ’पेक्षा दुप्पट वेळ लागतो,
त्यामुळे ‘कढुआ’च्या साड्या जास्त महाग असतात. साडीवरील नक्षीनुसार जॉर्जेट बनारसी
साडीचे उपप्रकार देखिल पडतात, जसे की ‘जालावर्क’ किंवा ‘बुट्टेदार’ इत्यादी. त्यातील
बुट्टेदार जॉर्जेट बनारसी जास्त लोकप्रिय आहे. बनारसच्या विणकरांनी या बुट्ट्यांमध्ये बारीक नक्षीकामातून खूप वैविध्य आणलं आहे. गोल्डन किंवा सिल्व्हर ‘जर’ वापरून विणून तयार झालेली ही साडी पूर्ण पांढरी असते.
अशी तयार झालेली साडी पुढे ‘खराई’काम करणाऱ्या ‘खरारी’ कलाकारांकडे पाठवली जाते. ‘खराई’मध्ये
साडीच्या धाग्यांमध्ये असलेला स्टार्च काढून टाकला जातो. त्यासाठी ठराविक साबणाचं
लिक्विड, ठराविक प्रमाणात पाण्यात टाकून त्या मिश्रणात काही वेळ साडी बुडवून ठेवली
जाते आणि हलक्या हाताने साडीतला स्टार्च काढून टाकला जातो आणि मग साडी वाळवून पुढच्या
प्रक्रियेसाठी पाठवली जाते. स्टार्च काढून टाकल्यामुळे साडी एकदम मऊ-सुळसुळीत आणि
हलकी होते. ‘खराई’नंतर साडी ‘रंगाई’ला जाते. साडी डाय करणारे कुशल कलाकार ती साडी
विशिष्ट प्रकारे डाय करतात. उकळत्या पाण्यात साडीचा ठरलेला रंग आणि मीठ ठराविक प्रमाणात
टाकून ‘डाय’च मिश्रण तयार करून घेतलं जातं. साडी ‘डाय’मध्ये टाकण्यापूर्वी साध्या
पाण्यात बुडवून निथळून मग ‘डाय’मध्ये टाकली जाते आणि त्यात ती साडी थोडा वेळ उकळून
घेतली जाते. साडीमध्ये जर एकापेक्षा जास्त रंग असतील तर ‘रंगाई’चे टप्पे वाढतात. कॉन्ट्रास्ट
काठ-पदर असेल तर ती साडी गुंडाळून काठा-पदराच्या
तेवढ्या भागाला पॉलिथिनचं शीट दोऱ्यांनी घट्ट बांधलं जातं आणि साडी, तिचा मधला भाग ‘डाय’ करण्यासाठी ‘डाय’मध्ये
टाकली जाते जेणेकरून पॉलिथिन लावलेल्या भागात रंग शिरत नाही आणि मधला भाग ‘डाय’ झाल्यावर ती साडी निथळून ‘डाय झालेल्या
मधल्या भागाला आता पॉलिथिन घट्ट बांधलं जातं आणि काठापदराचं बांधलेलं पॉलिथिन सोडून तो भाग ‘डाय’ करून घेतला जातो. अशा प्रकारे
संपूर्ण साडी ‘डाय’ झाल्यावर निथळून ‘ड्रायर’मध्ये टाकून, साडी बऱ्यापैकी वाळल्यानंतर
ते दोरे सोडले जातात आणि साडी उलगडली जाते. ती उलगडलेली साडी पूर्ण वाळवून पुढे
फिनिशिंगला पाठवली जाते. ‘फिनिशिंग’च्या टप्प्यावर संपूर्ण साडीवर पाण्याचा बारीक फवारा
उडवून एका लाकडी मोठ्या आणि जाड रुळावर ती साडी ताणून गुंडाळली जाते आणि वाळवण्यासाठी
काही तास तशीच ठेवली जाते. जास्त थंडीच्या दिवसात अशा साड्या वाळवण्यासाठी या
साड्यांच्या जवळ निखारे ठेऊन वातावरण ऊबदार केलं जातं. त्यानंतर ती साडी पूर्ण
वाळल्यानंतर उलगडली की जणू इस्त्री केल्यासारखी वाटते. तयार झालेल्या या साडीचं
पुढे छानसं पॅकिंग होतं !
बनारसच्या
वेगवेगळ्या साड्यांमध्ये या साडीला स्वतःची खास ओळख आहे, कारण सुंदर भरजरी दिसणारी
ही साडी नेसायला मात्र जॉर्जेटच्या फॅब्रिकमुळे हलकी-फुलकी असते त्यामुळे या झुळझुळीत साडीचं भरजरी सौंदर्य हीच या साडीची
खासियत आहे !
©रश्मी सातव rashmisatav@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा