नमस्कार,
२०२१ च्या, १ जानेवारीपासून, ‘सौंदर्यखणी’
या सकाळ वृत्तपत्रातील साप्ताहिक सदरात, दर शुक्रवारी आपण भेटत आलो आहोत, या
लेखमालेतील आजचा हा शेवटचा लेख ! या लेखमालेतून भारतातील निरनिराळ्या प्रांतातील
अनेक साड्यांची आपण ओळख करून घेतली, शिवाय दर आठवड्याला
एकेका साडीबरोबर एकेक सेलिब्रेटी सुद्धा तिची खास साडी घेऊन आपल्याला भेटत होती ! या
लेखमालेला संपूर्ण महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद मिळाला ! ‘पुढच्या शुक्रवारी
कोणती साडी ?’..... ही वाचकांची उत्सुकता, वेगवेगळ्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचत
होती !
काही वर्षांपूर्वी माझ्याकडे माझ्या पणजीची
१२५ वर्षांपूर्वीची पैठणी आली ! मुळातच मला साड्यांची आवड असल्यानं मी त्या साडीचा
खोलवर अभ्यास सुरु केला. पत्रकारितेच्या शिक्षणाबरोबरच, आवड म्हणून मी टेक्स्टाईलचा
देखील एक कोर्स केला होता, शिवाय त्या
दरम्यान म्युझियममधील जुन्या साड्यांचाही माझा अभ्यास चालू होता. या पैठणी बरोबरच अजून
काही ७० - ७५ वर्षांपूर्वीच्या साड्याही माझ्याकडे आल्या ! मग माझं त्या साड्यांवरही
संशोधन सुरु झालं ! त्या पैठणीचा अभ्यास करून कळलं, की त्या काळातील ती पारंपरिक
आसावली पैठणी आहे ! ती अँटिक पैठणी दहा वार असून, त्या पैठणीच्या पारंपरिक नारळी
काठांवर आणि पानाफुलांची वेलबुट्टी असलेल्या पदरावर प्युअर ‘जर’ आहे ! साड्यांच्या
संशोधनाचा तो सिलसिला आजही चालू आहे ! माझ्या या अभ्यासात मीही शिकत गेले आणि
समृद्ध होत गेले आणि अजूनही शिकते आहे !
मला कायम असं वाटतं की, साडी हे नुसतं एक
वस्त्र नसून,... ते आपल्या भावना व्यक्त करण्याचं एक प्रभावी माध्यम आहे ! पिढ्यांपिढ्या
संक्रमित होणारं हे
साडीचं नातं त्यातील सुंदर विणीतून पुढच्या-मागच्या पिढ्यांना एकत्र गुंफून ठेवतं
! आई-आजीची मायेची साडी जतन करून ठेवणारी मुलगी असो किंवा सासूबाईंच्या साडीतून
वारसा जपणारी सून असो किंवा अगदी आजीच्या मऊसूत साड्यांची गोधडी पांघरणारा मुलगा
असो..... यातली साडी जरी जुनी झाली, तरी त्यातलं नातं मात्र
अधिकच ‘गहिरं’ होत गेलं !
अगदी प्राचीन काळी, जेव्हा शिलाईचं तंत्र
अवगत नव्हतं, परंतु हातमागावर वस्त्र विणण्याची कला मात्र अवगत झाली होती त्या
काळापासून स्त्रियांच्या शरीराला गुंडाळता येणारे वस्त्र म्हणून, साडी हा प्रकार
अस्तित्त्वात आला असावा ! साडीचा, जुन्या संस्कृत साहित्यामध्ये ‘शाटिका’ असा उल्लेख आढळतो. ‘शाटिका’वरून
पुढे मराठीत ‘साडी’ हा शब्द रूढ झाला. ‘साहित्य हा तत्कालिक समाजाचा आरसा असतो .....’
या उक्तीप्रमाणे काही ‘लोक-साहित्या’तून, काही ‘संत-साहित्या’तून त्या काळातील
वस्त्र परंपरेचे आणि त्या काळी प्रचलित असलेल्या साड्यांचे उल्लेख आढळले !
त्यातूनच साडी हा विषय अजूनच व्यापक होत गेला !
या लेखमालेतून, भारतात हातमागावर विणल्या
जाणाऱ्या वेगवेगळ्या विणींच्या साड्यांवर मी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला, त्यात
काही पॉवरलूमवर विणल्या जाणाऱ्या साड्या सुद्धा होत्या.... अशा एकूण ५१ निरनिराळ्या
साड्यांचा आढावा या लेखमालेत मी वर्षभर घेतला ! या लेखमालेत आपण एकेक करून....
‘कांचीपुरम’, ‘गदवाल’, ‘पैठणी’, ‘इलकल’, ‘बनारसी’, ‘पोचमपल्ली’, ‘बोमकाई’,
‘चंदेरी’, ‘महेश्वरी’, ‘कसावू’, ‘खणसाडी’, ‘अजरख’, ‘जामदानी’, ‘बांधणी’, ‘पाटण-पटोला’,
‘हिमरू’, ‘मशरू’, ‘चिकनकारी’, ‘कलमकारी’, ‘फुलकारी’, ‘मधुबनी’, ‘नारायणपेठ’,
‘रास्ता साडी’, ‘लिनन’, ‘रॉ सिल्क’, ‘टसर’, ‘कांथा’,
‘मेखला-सादोर’, ‘मटका’, ‘खादी’, ‘बगरू’, ‘मंगलगिरी’, ‘टिश्यू’, ‘काश्मिरी’,
‘म्हैसूर सिल्क’, ‘मल कॉटन’, ‘कुपडम’, ‘शिबोरी’ आणि इतर अजून काही साड्या उलगडल्या
!
या निरनिराळ्या विणींवर लिहितांना त्या खास
विणीची साडी कोणत्या सेलिब्रेटीकडे आहे का आणि त्या सेलिब्रेटीकडे त्या साडीची
काही आठवण किंवा काही किस्सा आहे का... याचाही माझा शोध गेलं वर्षभर चालू होता ! त्यातून
५१ सेलिब्रेटींच्या साड्यांचे आठवणीतले किस्सेही लिहिता आले. काही सेलिब्रेटी अशाही होत्या की
त्यांच्याकडे आठवणीतल्या साड्यांचे काही खास किस्से होते परंतु तो साडी-प्रकार या
लेखमालेत आधीच्या कोणत्यातरी शुक्रवारी झालेला असल्यामुळे नाईलाजाने ते किस्से
लिहिता आले नाहीत, पण कधी योग आला तर नक्की लिहीन ! इथे आवर्जून एक गोष्ट सांगाविशी
वाटते की या लेखमालेसाठी मी जेवढ्या सेलिब्रेटींशी बोलले त्या सगळ्या सेलिब्रेटीं कमालीच्या ‘साडी-प्रेमी’
होत्या ! त्यांच्या मनातल्या कप्प्यात ठेवलेल्या खास साडीविषयी, त्या सेलिब्रेटी त्यांच्या
अत्यंत व्यस्त शेड्युलमधून देखील खूप भरभरून बोलत होत्या ! शिवाय
काही जणींनी तर खास या लेखासाठी, त्यांची खास असणारी साडी नेसून, देशाच्या
कानाकोपऱ्यातून किंवा अगदी देशाबाहेर राहत असूनही फोटो काढून पाठवले ! साडीच्या
समृद्ध परंपरेविषयी त्या सर्व सेलेब्रिटी अत्यंत आदराने बोलत होत्या, त्यातून साडी
या पारंपारिक वस्त्राला आजही असलेलं ग्लॅमर जाणवलं !
हातमागावर विणल्या जाणाऱ्या साड्यांना
स्वतःची अशी एक खास ओळख आहे. त्या साड्यांची वीण, शैली, रंगसंगती, धागे, नक्षीतले
घटक प्रांताप्रांतानूसार बदलत जातात. दुर्दैवाने भारतातील काही विणी नामशेष झाल्या
आहेत, परंतु काही आधुनिक विणकार त्यांना पुनरुजीवित करत आहेत ! ही लेखमाला
संपल्यामुळे लिहिल्या न गेलेल्या अशा कितीतरी विणी आजही भारतात अस्तित्त्वात आहेत,
जसे की संपूर्ण साडीवर भरतकाम केलेली ‘पारशी गारा’ साडी, ‘आसामची सोनेरी मुगा’, ‘इरी’
आणि ‘काझीरंगा साडी’, पश्चिम बंगालची ‘बिष्णूपुरी’, पौराणिक आणि ऐतिहासिक प्रसंग
विणलेली ‘बालुचरी’ आणि सोन्या-चांदीच्या धाग्यांनी विणलेली ‘सुवर्णचारी’ साडी, महाराष्ट्रातील
‘करवती’, ‘नागपुरी’, तर कर्नाटकची ‘पट्टेदा-अन्चू’, ‘जिजामाता’, ‘धारवाडी’, ‘शहापुरी’,
‘मोलकालमुरु’, ‘उडुपी’, ओडीशाची ‘कोटपाड’, ‘संबलपुरी’, ‘कटकी’, ‘हबसपुरी’ आणि
‘बरहमपूर पट्टा’, तर तमिळनाडूची ‘चेट्टीनाड’, ‘कोरनाड’, ‘संगुडी’, ‘आरनी’,
राजस्थानची ‘कोटा दोरिया’, गुजरातची ‘तंघालिया’ आणि ‘नवरतन’, मध्यप्रदेशची ‘इंदुरी’,
बिहारची ‘भागलपूरी’, आंध्रप्रदेशची ‘धर्मावरम’, ‘वेंकटगिरी’, ‘मढी’, ‘मधुपर्कम’,
‘उपाडा’, बनारसची ‘कढुआ क्रेप सिल्क’, केरळची ‘मुंडू’ ‘नेरीयाथू’, आणि ‘बलरामपूरम’,
मणीपुरची ‘मोईरांग फी’, तेलंगणची ‘दुबक्का’ व ‘तेलिया रुमाल साडी’ शिवाय ‘ज्यूट’, ‘वेल्व्हेट’, ‘ॲप्लिके वर्क
साडी’, ‘बाटिक साडी’, ‘लम्हाणी
वर्क साडी’, ‘ऑरगॅन्झा’ आणि अशा इतर अनेक सुंदर नावं असलेल्या सुंदर साड्या
म्हणजे भारतीय वस्त्र परंपरेची शान आहे ! ‘साडी प्रेमी’ महिला जेव्हा खास निरनिराळ्या
प्रांतातल्या साड्या आवर्जून नेसतात तेव्हा संपूर्ण भारतातील निरनिराळी राज्यं एकमेकांत
साड्यांच्या धाग्यांनी गुफल्यासारखी वाटतात !
भारतात साडी विणण्याचे जितके प्रकार आहेत
तितकेच साडी नेसण्याचे ! पूर्वी पाच वारापासून ते अगदी अकरा वारापर्यंत साड्या
विणल्या जायच्या ! पूर्वी लग्न झालेल्या अल्पवयीन मुली खांद्यावर पदर न घेता
कमरेला खोचत असत, ती साडी लांबीला लहान असे आणि त्या साडीला ‘परवंटा’ म्हणत, परंतु
आता हा प्रकार कालबाह्य झाला असून आता फक्त पाच-सहा
आणि नऊवारी साड्या प्रचलित आहेत. शिवाय हल्ली नऊवारी नेसण्याऱ्या स्त्रियांचं प्रमाण
जरी कमी झालं असलं, तरी पारंपरिक लग्न- मुंजींमध्ये काही हौशी स्त्रिया
आवर्जून नऊवारी नेसू लागल्या आहेत ! या नऊवारी साडीला पूर्वी काष्ट्याची साडी असही
म्हणत असत, शिवाय याच साडीला ‘सकच्छ’ असही म्हणत असतं, ‘सकच्छ’ म्हणजे ‘काष्टा’
किंवा ‘कसोट्या’सह असलेली ती ‘सकच्छ’ आणि काष्टा नसलेली साडी ती ‘विकच्छ’ म्हणजे
पाच किंवा सहावारी साडी ! शिवाय पूर्वीच्या काळी लग्न झालेल्या लहान मुली पाच-सहावारी
साडी नऊवारी पद्धतीने नेसत असतं, त्या साड्यांना ‘चिरडी’ म्हणत. पूर्वी
पेशवेकालीन पैठण्या, सोळा हात लांब आणि चार हात रुंद असत आणि त्या एकेक पैठणीचे
वजन तीन ते साडेतीन किलो असायचे ! या कालखंडातील पैठण्यांची लांबी चक्क दोन ते तीन
मजले देखील असायची. भारतात प्रांतानुसार साडी नेसायचे असंख्य प्रकार आहेत ! शिवाय आता आपल्या
मापानुसार नऊवारी आणि सहावारी साडी शिवून देखील मिळते, नाडी किंवा हुक लावलं की
झाली साडी नेसून ! थोडक्यात काय, तर काळ आणि फॅशन बदलली तरी भारतीय स्त्रीच्या
आयुष्यातील साडीचं महत्त्व कधीच कमी झालं नाही !
अत्यंत कौशल्यानं, हातमागावर वैशिष्ट्यपूर्ण अशा
साड्या विणणारे विणकर किंवा कलमकारी सारख्या साड्यांवर हाताने पेंट करणारे आणि फुलकारी,
चिकनकारी किंवा कांथाच्या साड्यांवर भरतकाम करणारे आर्टिझन्स म्हणजे अप्रतिम कलाकृती
निर्माण करणारे मोठे कलाकार असतात आणि जेव्हा एखादा चोखंदळ ग्राहक अशी एखादी
कलाकृती योग्य त्या किंमतीत विकत घेता आणि जेव्हा ते पैसे थेट त्या साडी आर्टिझनपर्यंत पोहोचतात तेव्हा
त्यांना खूप मोठं प्रोत्साहन मिळतं आणि ती कला टिकून रहायला मोठी मदत होते !
एका लेखमालेत न मावणाऱ्या.... साडीचे
विविधांगी पदर उलगडत.... संपूर्ण वर्षभर चाललेल्या या ‘साडी-सोहळ्या’ची आज सांगता
होत आहे.... ! सकाळ वृत्तपत्राच्या ज्या टीम बरोबर मी गेलं वर्षभर काम करत होते
त्या टीमचे मनःपूर्वक आभार. रसिक वाचकांचा ठरवून निरोप घेतांना मला एक समाधान आहे
की विविधतेने नटलेल्या भारताची एक समृद्ध ‘साडी-परंपरा’ माझ्या लेखणीतून मला अधोरेखित
करता आली !
अशी ही साड्यांची कहाणी....
म्हणजे माझं ‘साडी-पुराण’..... सुफळ संपूर्णम !
रश्मी विनोद सातव
rashmisatav@gmail.com