‘असे हे कन्यादान’ या २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘झी मराठी’वरील मालिकेमुळे लोकप्रिय झालेल्या मधुरा देशपांडेनं ‘भरतनाट्यम’मध्ये विशारदची देखिल पदवी घेतली आहे. कोणत्याही कलेवर मनापासून प्रेम करणारी मधुरा, पुण्यात गरवारे कॉलेजमध्ये शिकत असतांना हौस म्हणून ‘फिरोदिया’, ‘पुरुषोत्तम’सारख्या अनेक एकांकिका स्पर्धांमधून भाग घेत असे. शिवाय पुण्याच्या ‘सुदर्शन रंगमंचा’च्या ‘ग्रिप्स’च्या नाटकांमधूनही ती भाग घेत होती. एकदा ‘सुदर्शन रंगमंचा’त तिच्या एका नाटकाची तालीम चालू असतांना तिथेच ‘स्टार प्रवाह’च्या एका मालिकेसाठी ऑडिशन चालू होतं, तेव्हा नाटकातील सगळी मुलं-मुली ऑडिशन देत होते, म्हणून मधुरानं सुद्धा सहजच ती ऑडिशन दिली आणि त्यात तिची थेट ‘झुंज’ या मालिकेसाठी निवड झाली ! या क्षेत्रात जायचं असं बिलकुल ठरवलेलं नसतांना अचानक ती या क्षेत्रात आली आणि तिच्या अभिनयामुळे तिला पुढे खूप कामं मिळत गेली.
खरंतर मधुराला साड्यांची लहानपणापासूनच खूप आवड होती. ती लहान असतांना तिच्या आजीच्या मऊसूत साड्या अगदी सहजच घरात कायम नेसून बसत असे, आणि नुसतं बसत नसे तर दिवसभर नेसलेल्या साडीत पकडापकडी, लपाछपी असे खेळही खेळत असे ! इतक्या लहानपणी साडी नेसून मधुराला खेळतांना बघून आजूबाजूच्या बायकाही तिच्याकडे कौतुकानं बघत रहात ! दिवसभर साडीत खेळणाऱ्या मधुराची साडी सूटतही नसे आणि तिला ती सोडवतही नसे !
‘स्किन-फ्रेंडली’
मशरू !
१६ व्या शतकात बादशहा अकबरच्या अधिपत्याखाली
असणाऱ्या मुघल साम्राज्याच्या कारभाराचा इत्यंभूत तपशील, ‘आईन – ए - अकबरी’ या
दस्तऐवजात लिहून ठेवला आहे. या ‘आईन – ए - अकबरी’चे खंड आजही, मुर्शिदाबाद येथील
‘बारा कोठी’ नावाच्या महालात जतन करून ठेवले आहेत. या ‘आईन – ए - अकबरी’मध्ये
‘मशरू’ नावाच्या वस्त्राचा उल्लेख आढळतो ! यावरून या वस्त्राच्या निर्मितीच्या
कालखंडाचा अंदाज येतो ! मुघल साम्राज्यात काही घराण्यांमध्ये सिल्कच्या कापडाचा त्त्वचेला
होणारा थेट स्पर्श वर्ज मानला जात असे ! त्यामुळे सिल्क आणि कॉटनचे धागे एका
विशिष्ट पद्धतीने गुंफुन एक खास वस्त्र विणलं जात असे आणि त्या वस्त्राचं नाव होतं
– ‘मशरू’ !
‘मशरू’ हा अरेबिक शब्द असून, मशरू म्हणजे ‘कायद्याने
परवानगी दिलेलं’, मुघल साम्राज्यात गुजरातच्या काही प्रांतांमध्ये मशरूचं विणकाम
होत असे, नंतर महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशातील काही भागात आणि आंध्रप्रदेश, तंजावर
आणि मद्रास प्रांतांत सुद्धा मशरूचं विणकाम होऊ लागलं, परंतु काळाच्या ओघात
हातमागावरची ही वीण नामशेष होऊ लागली होती. पुढे गुजरातमधील सोळंकी
घराण्यातील ‘सिद्धराज जयसिंग’ या राजाने या विणीला राजाश्रय दिला ! आजही तिथे हातमागावर
पाटण आणि कच्छमध्ये काही विणकर मशरुचं विणकाम पारंपरिक पद्धतीने करत आहेत ! पारंपरिक
मशरू विणणारे विणकर आता फारसे शिलक्क नाहीत, परंतु देशात इतर ठिकाणी व्यावसायिक
दृष्ट्या पॉवरलूमवर मशरूचं फॅब्रिक आणि मशरूच्या साड्या मात्र मागणीनुसार विणल्या
जात आहेत.
मशरुची साडी विणतांना हातमागावर उच्चप्रतीचे रेशमाचे
धागे उभे लावून घेतले जातात आणि उच्चप्रतीचे कॉटनचे धागे आडवे टाकून ही साडी एका
विशिष्ट पद्धतीने विणली जाते, की साडीच्या दर्शनी बाजूवर सगळे रेशमाचे धागे येतात
आणि कॉटनचे धागे खाली जातात ! हातमागावर
लावण्यापूर्वी रेशमाचे धागे स्टार्चच्या पाण्यात हलके बुडवून घेतले
जातात आणि मग हातमागावर उभे लावले जातात. ते धागे स्टार्च केल्यामुळे ‘मशरू’चं
विणकाम अचूकपणे करता येतं. हातमागावर हे धागे मोजून लावले जातात आणि त्यासाठी खूप
कसब लागतं आणि हे काम करणाऱ्या कुशल कारागिरांना ‘तानीवाला’ म्हणतात. उभ्या रेशमी
धाग्यांमध्ये कॉटनचे धागे ज्या पद्धतीने गुंफले जातात त्या विणीच्या प्रकाराला ‘सॅटिन-वीण’
असं संबोधलं जातं. या ‘सॅटिन-वीण’त ही साडी विणली जाते. यात थोडे वैविध्य आणण्यासाठी
संपूर्ण साडीवर 'जकार्ड' पद्धतीने (ही पद्धत
मागच्या एका लेखात सविस्तर लिहिली आहे ) एक 'पॅटर्न' विणला जातो. तयार झालेली
मशरू साडी वरून सिल्कची असते आणि आतून सुती असते ! ओरिजिनल रेशमी धाग्याच्या रंगात
तयार झालेली ही मशरुची सुंदर साडी नंतर ‘डाय’ केली जाते. साडीला साजेशा रंगाची
पावडर घेऊन त्याची पाण्यात पेस्ट करून - गाळून ती पेस्ट ५० ते ५५ सेल्सिअस तापमान
असलेल्या पाण्यात मोठ्या भांड्यात टाकली जाते आणि त्या उकळत्या पाण्यात मशरूची साडी
२० मिनिटे उकळली जाते, १५ ते २० मिनिटे उकळल्यानंतर एक विशिष्ट रंग त्या साडीवर
चढतो आणि ती साडी बाहेर काढल्यावर हवेशी संपर्क येऊन ‘ऑक्सिडायझेशन’
होते आणि ज्या रंगाची
पेस्ट केलेली असते तो रंग साडीवर चढतो ! साडीत एकापेक्षा जास्त रंग असतील तर
साडीचे धागे आधी ‘डाय’ करून घेतले जातात आणि मग हातमागावर साडी विणली जाते.
तयार झालेल्या मशरूच्या साड्या वरच्या
सिल्कमुळे दियायला खूप ‘रॉयल’ असतात आणि आतून कॉटन असल्यामुळे ‘स्किन-फ्रेंडली’
असतात !
©रश्मी सातव
rashmisatav@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा