‘सायली संजीव चांदसरकर’ आपल्याला ‘सायली संजीव’ म्हणून माहित आहे. ‘काहे दिया परदेस’ या मालिकेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या सायलीचा पहिला चित्रपट म्हणजे ‘आटपाडी नाईट्स’ आणि या तिच्या पहिल्याच चित्रपटाला तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी तिला ‘झी गौरव’ पुरस्कार मिळाला ! परंतु ‘पॉलिटिकल सायन्स’चं शिक्षण घेणाऱ्या सायलीनं या क्षेत्रात येण्याचा कधी विचारही केला नव्हता !
सायली लहानपणापासून खूप सुंदर रांगोळ्या आणि
चित्रं काढत असे. कॉलेजमध्ये असतांना तर ती, पाच-सहा फुट लांब रांगोळी काढत असे. एकदा
तिच्या गावी म्हणजे नाशिकला, ‘दीपक मंडळ’ या संस्थेच्या एका कार्यक्रमासाठी तिनं
स्टेजवर सगळ्यांसमोर ‘लाइव्ह’ रांगोळी काढली होती. सगळ्यांसमोर धिटाईनं लिलया रांगोळी
काढतांना बघून त्या संस्थेच्या चालकांनी तिला एका स्पर्धेसाठी एका एकांकिकेतील
मुख्य भूमिकेच्या अभिनयासाठी विचारले. गंमत
म्हणून सायलीनं त्यात भाग घेतला आणि तिच्या पहिल्याच एकांकिकेसाठी तिला ‘सर्वोत्कृष्ट
अभिनेत्री’ आणि ‘सर्वोत्कृष्ट वाचिक अभिनया’ची पारितोषिकं मिळाली होती ! त्या
स्पर्धेच्या परीक्षकांनी तिचं खूप कौतुक केलं आणि म्हणाले, “तू स्क्रीनवर खूप छान
दिसशील, आणि मोठ्या पडद्यावरचा अभिनय सुद्धा तुला उत्तम जमेल, तू ऑडीशन्स द्यायला
लाग !” मग सायलीनं खरच ऑडीशन दिली आणि तिला पहिला चित्रपट मिळाला आणि पुढे तिला
खूप ऑफर्स येतच राहिल्या !
आता सायली सोशल मिडीयावर, ट्रेंडिंग असलेल्या टॉपच्या
काही अभिनेत्र्यांपैकी एक आहे ! सध्या सोशल मिडीयावरचा तिचा फॅन फॉलोअर अचानक खूप
वाढला आहे आणि त्याला कारण आहे तिच्या साड्या नेसलेल्या सुंदर पोस्ट्स ! साड्यांमधले
अप्रतिम फोटो पोस्ट करणारी सायली म्हणाली, “मला आधी, साडी हा प्रकार बिलकुल आवडत
नव्हता, शाळा कॉलेजमध्ये असतांना मी ‘टीचर्स डे’ला आणि ‘साडी डे’ला, ‘साडी’ नेसावी
लागू नये म्हणून, ठरवून सुट्टी घेऊन घरी थांबत असे ! पण १२ वी नंतर मात्र एका फोटो
शूटसाठी मला साडी नेसावी लागली ! ती ‘मल कॉटन’ची साडी होती, साडी आणि ‘मल कॉटन’ वगैरे
प्रकारही मला त्यावेळी नवीन होता ! पण फोटो शूट मस्त झालं, आणि मलाच माझे साडीतले
फोटो खूप आवडले आणि मी साडीच्या प्रेमात पडले ! ‘मल कॉटन’च्या साड्या मला आजही खूप
आवडतात ! नंतरही मी वेगवेगळ्या भूमिकांसाठी साड्या नेसू लागले. आता तर मला साडी हा
प्रकार इतका आवडतो की शुटींगच्या सेटवर जातांना अगदी सहज म्हणून मी साडी नेसून जात
असते !” तिचं हे ‘साडी-प्रेम’ आता तिच्या काही ‘साडी-प्रेमी’ चाहत्यांनाही माहित
झालं आहे, त्यामुळे त्या तिला, तिच्या
एखाद्या उत्तम अभिनयाची ‘पोच-पावती’ म्हणून साड्या भेट देत असतात ! अशाच तिच्या एका
चाह्तीनं म्हणजे साक्षीनं तिला एक सुंदर लाल रंगाची, बुट्ट्यांसारख्या टिकल्या
लावलेली साडी भेट दिली आणि ती साडी होती सायलीच्या खास आवडीची ‘मल कॉटन’ची !
सायलीचं साडी प्रेम वाढलं ते अजून एका व्यक्तीमुळे
! झी मराठीवरील ‘काहे दिया परदेस’ या मालिकेच्या चित्रीकरणाच्या दरम्यान सायलीची
आणि या मालिकेत तिच्या आईची भूमिका करणाऱ्या शुभांगीताई गोखले यांची छान गट्टी
जमली आणि शुभांगीताई म्हणजे ‘साड्यांचा एनसायक्लोपीडिया’ आहेत ! शुभांगीताईंच्या
साड्या आणि त्यांना असलेली साड्यांची माहिती ऐकून सायली भारावून जात असे आणि
त्यामुळे सायलीची, शुभांगीताईं बरोबरच साड्यांसोबतही
छान गट्टी जमली !
अंगठीतून आरपार जाणारी ‘मसलिन’ साडी !
पश्चिम बंगालची अजून एक उल्लेखनीय साडी
म्हणजे ‘मसलिन साडी’ ! या साडीला ‘मल कॉटन साडी’ असंही म्हणतात. पण ‘मसलिन’ म्हणजे
काय ? १७ व्या शतकात बंगालमधील ‘ढाका’ प्रांतात, मेघना नदीच्या किनारी, ‘फुटी
कपास’ नावाची कापसाची झाडं होती. त्या झाडांच्या कापसापासून अत्यंत तलम सूत हाताने
कातले जाई, आणि त्या सूतापासून हातमागावर विणलेलं कापड म्हणजे ‘मसलिन’ !
‘फुटी कपास’ हा अत्यंत मऊ कापूस असून
त्यापासून अतिशय कौशल्यानं सूत काढले जात असे. काही ‘शे’ वर्षांपूर्वी इथे तयार
होणारं तलम मसलिन जगभर ‘ढाका मसलिन’ म्हणून प्रसिद्ध होतं. देशोदेशीचे व्यापारी
बंगालमध्ये ‘मसलिन’ खरेदी करण्यासाठी येत असत, आणि सोनं, चांदी किंवा हस्तीदंत
देऊन हे ‘मसलिन’ खरेदी करत असतं ! असं हे मौल्यवान ‘मसलिन’ तयार करायला मोठं
कौशल्य लागत असे. मोठ्या कौशल्यानं नाजूकपणे स्थानिक महिला हे ‘मसलिन’चे धागे बनवत
असत. मेघना नदीच्या सुपीक खोऱ्यात ‘फुटी कपास’ची शेती होत असे, या झाडांच्या
बियांवरही, पेरण्यापूर्वी मोठे संस्कार होत असत ! या शेतीसाठी निवडलेल्या चांगल्या बिया कडकडीत उन्हात वाळवून,
मग आतून शुद्ध तूप लावलेल्या एका मातीच्या मडक्यात ठेऊन, ते मडकं चुलीच्या वर ऊबदार
जागेत काही दिवस बांधून ठेवले जात असे ! असे संस्कार झालेल्या त्या बियापासून आलेला
कापूस अत्यंत दर्जेदार असे !
या कापसापासून ‘मसलिन’चे धागे काढण्याचे काम फक्त
पहाटे किवा संध्याकाळी केले जाई कारण त्या प्रहरी हवेत हे धागे बनवण्यासाठी
लागणारे बाष्प योग्य त्या प्रमाणात असते ! कधीकधी हे धागे बनवितांना त्या ठिकाणी
पाण्याची मोठी भाडी ठेवली जात असत त्यामुळे भांड्यातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन,
हवेत बाष्पाची योग्य मात्रा टिकून राहत असे, किंवा हवेतील बाष्पासाठी बऱ्याचदा हे
धागे काढण्याचे काम, मेघना नदीच्या किनाऱ्यावर केले जात असे !
झाडावरून अलगद कापूस काढल्यानंतर त्यातील
बिया काढून तो कापूस
हाताने किंवा ‘धनुकली’ नावाच्या छोट्याशा धनुष्याच्या आकाराच्या वस्तूने पिंजला जात
असे. हे पिंजण करतांना हे तंतू हवेत उडत असतं आणि उडालेले हे हलके तंतू वेचून
त्यांना हाताने पीळ देऊन अत्यंत तलम, नाजूक आणि पातळ ‘मसलिन’चे धागे बावविले जात असत ! मग हे लांब धागे
मेघना नदीच्या पाण्यात बुडवून वाळवले जात असत, त्यामुळे हे थोडे आकसत असत. ‘मसलिन’चे धागे तलम-पातळ असले तरी आकसल्यामुळे अत्यंत
टिकाऊ होत असत ! हे टिकाऊ धागे मग हातमागावर विणून तलम पारदर्शी ‘मसलिन’च कापड विणले जात असे. ‘मसलिन’चे हे पातळ धागे आणि ‘मसलिन’चे तलम कापड फक्त हातानेचे तयार होऊ शकते !
पुढे इंग्रजांच्या काळात विलायती कापड विकले
जावे म्हणून इंग्रजांनी हातमागावर चालणारा हा वस्त्रोद्योग बंद पाडला ! या काळात ‘फुटी
कपास’ ही कापसाची जात नामशेष झाली ! पण नंतर ‘देवकापूस’सारख्या उच्च दर्जाच्या इतर
काही कापसाच्या जातीच्या कापसापासून सुध्दा मल कॉटन बनविण्याचे प्रयोग होऊ लागले.
पूर्वी ५०० ते ७०० ‘काऊंट’चे ‘मसलिन’चे धागे बनविले जात असत, आता २५० ते ३०० ‘काऊंट’चे, ‘मसलिन’चे धागे
हाताने बनविण्यात यश आले आहे ! धाग्याचा हा ‘काऊंट’ जेवढा जास्त तेवढा तो
धागा पातळ ! उदाहरणार्थ ७०० ‘काऊंट’ ‘मसलिन’चा धागा म्हणजे –
एक किलो ‘मसलिन’च्या धाग्याची लांबी तब्बल ७०० किलोमीटर इतकी असे .... इतका तो
धागा पातळ असे ! त्याकाळी १ यार्ड ‘मसलिन’च्या कापडाचे वजन फक्त १० ग्रॅम असे ! पूर्वी ५०० ‘काऊंट’ ‘मसलिन’च्या एका मोठ्या
धोतराची घडी इतकी छोटी होत असे की ती काडेपेटीत मावत असे म्हणे ! आताची ३०० ‘काऊंट’ प्युअर
‘मसलिन’ची तलम साडी
एखाद्या अंगठीतून पूर्णपणे आरपार जाते इतकी ती तलम असते ! जामदानी वर्क केलेली अशी
‘मसलिन’ची साडी आजही पश्चिम बंगालमध्ये काही विणकर बनवत आहेत ! पश्मिम बंगालचे विणकर
रवीन्द्रनाथ सहा म्हणाले, “दिवसभर ३ शिफ्टमध्ये तीन विणकरांनी विणकाम केल्यास
साडेपाच मीटरची एक प्लेन साडी विणायला २ महिने लागतात आणि जर त्या साडीवर जामदानी
काम असेत तर त्यावर नक्षीनुसार अजून जास्त कालावधी लागतो !” त्यामुळे प्युअर ‘मसलिन’
धागा वापरून हाताने विणलेल्या तलम साड्यांच्या किमती पण जास्त असतात आणि ते योग्यच
आहे ! तांत्रिक दृष्ट्या १०० ‘काऊंट’च्या पुढच्या साड्यांना ‘मसलिन’
साड्या म्हणणे योग्य ठरेल आणि ८० ते १०० ‘काऊंट’च्या सुती साड्यांना ‘मल कॉटन’च्या
साड्या म्हणणे योग्य ठरेल. परंतु हा फरक फारसा कोणाला माहित नसल्यामुळे सध्या ‘मसलिन’लाच,
‘मल कॉटन’ म्हणलं जातं !
अशी एखादी प्युअर ‘मसलिन’ची साडी विकत घेणं म्हणजे त्या विणकरांना प्रोत्साहन देण्यासारखं आहे आणि हाताने काम करणाऱ्या त्या विणकरांना प्रोत्साहन मिळाले तर ही कला पुढे टिकून राहील !
©रश्मी सातव
rashmisatav@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा