शुक्रवार, २९ जानेवारी, २०२१

कांजीवरम साडीची रंजक माहिती

कांजीवरम साडी

अभिनयाच्या क्षेत्रात आपल्या अदाकारांनी आजही भुरळ घालणारी लावण्यवती अभिनेत्री म्हणजे रेखा. अलीकडच्या काळात कोणत्याही अवॉर्ड शो मध्ये जेव्हा जेव्हा रेखा दिसली आहे तेव्हा नाजूकपणे मोकळे केस सावरत वावरणाऱ्या रेखाच्या साडीकडे आपलं लक्ष गेलं नसेल तर नवलच. हीच ती कांजीवरम साडी. रेखाकडे कांजीवरम साड्यांचा हटके असा संग्रह आहे.

तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक राज्यात नववधूची लग्नातील साडी म्हणजे कांजीवरम. अलीकडे महाराष्ट्रातही नववधूच्या साड्यांमध्ये कांजीवरम साड्यांचा ट्रेंड दिसतो.

या साडीत प्रामुख्याने मलबेरी सिल्कचा धागा वापरतात. साडीत वापरण्यापूर्वी हा धागा तांदळाच्या पाण्यात बुडवून वाळविला जातो, जेणे करून तो चिवट आणि मजबूत होतो. मलबेरी सिल्क सोबत एक खास 'जर' वापरतात. कांचीपुरम साडीचा मधला भाग, काठ, आणि पदर वेगवेगळे विणले जातात. नंतर ते काठ आणि पदर मुख्य साडीला इतक्या सफाईदारपणे जोडले जातात की संपूर्ण साडी अखंडच विणल्याप्रमाणे वाटते. साडीच्या या वैशिष्ट्यामुळे काही सिनेतारकांचे ड्रेस डिझायनर खूप हटके अशा रंगसंगतीत काठ, पदर आणि मधली साडी कारागिरांना ऑर्डर देऊन बनवून घेतात. म्हणजेच कांचीपुरम ही एक पारंपरिक साडी असली तरी आपण तिला आपण एक डिझायनर टच देऊ शकतो.

कांजीवरमची खासियत म्हणजे रुंद आणि कॉन्ट्रास्ट काठ जे साडीच्या मधल्या रंगाला अजूनच खुलवतात. कांजीवरम साडीवरच्या नक्षीकामात दक्षिणात्य मंदिरांमधील कोरीवकामाचा आणि पौराणिक संदर्भांचा प्रभाव दिसतो. या साडीला बऱ्याचदा टेम्पल बॉर्डरही असते. कधी कधी चौकटी किंवा पट्टे किंवा बुट्टेही विणलेले असतात. अशी हि खास कांजीवरम साडी आपल्याही साड्यांच्या खजिन्यात असावीच. नाही का?


कांचीपुरम कि कांजीवरम?

कांजीवरम साडीचा इतिहास असा की, १६ व्या शतकात कृष्णदेवराय राजाच्या कालखंडात तमिळनाडूमध्ये देवंगासआणि सालीगरनावाच्या विणकर जमाती येऊन स्थायिक झाल्या. हे रेशमी साड्या विणणारे कुशल कारागिर होते. त्यांनी कांचीपुरम येथे मलबेरी झाडाच्या पानांवर पोषण झालेल्या रेशमांच्या किड्यांनी बनवलेलं खास मलबेरी सिल्कआणि गुजराथची दर्जेदार जर’, या दोन गोष्टींचा सुंदर मिलाफ करून अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशा साड्या विणायला सुरुवात केली. त्यांनी विणलेल्या या साडीलाच, त्या ठिकाणच्या नावावरून कांचीपुरम साडी असं नाव रूढ झालं. हीच साडी आता कांजीवरम साडी या नावाने देखील प्रसिद्ध आहे. या साडीमुळेच, कांचीपुरम शहराला रेशमाची राजधानीअशी ओळख प्राप्त झाली आहे. २००५ मध्ये सरकारकडून या साडीला भौगोलिक स्थानदर्शकहे प्रमाणपत्रही प्रदान करण्यात आले आहे.
------------------------------


रश्मी विनोद सातव

rashmisatav@gmail.com

#VirasatIndia

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा