सध्या मोठा ‘टीआरपी’ घेणारी स्टारप्रवाह वरील ‘आई कुठे काय करते ?’ या
मालिकेतली लोकप्रिय आणि टॅलेंटेड अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर म्हणाली, “मला साडी नेसायला जाम आवडते आणि
गंमत म्हणजे अरु मुळे सध्या मी दिवसभर साडीतच असते !”
‘आई कुठे काय करते ?’ या मालेकेच्या चित्रीकरणात अतिशय व्यस्त असून
सुद्धा, तिच्या आवडत्या साडीबद्दल बोलायला सांगितल्या वर मात्र ती जाम खुश झाली !
अरुंधतीच्या भुमिकेमुळे गेले कित्येक दिवस मधुराणी दिवस-दिवस साडीतच असते आणि
विशेष म्हणजे तिचा तो आवडीचा पेहराव असल्यामुळे तो पेहराव ती अगदी सहजतेने दिवसभर
वागवते. निरनिराळ्या पॅटर्नच्या
साड्या आणि त्यावर अतिशय हटके ब्लाऊज यांचा संग्रह म्हणजे तिचा खजिना आहे.
तिच्या या खजिन्यातली तिची एक खास साडी म्हणजे –
चेन्नईच्या ‘नल्लीज’मधील अप्रतिम अशी हि कांचीपुरम साडी ! साड्यांची उच्च अभिरुची
असणाऱ्या मधुराणीचं, खूप वर्षांपासून एक स्वप्न तिच्या ‘बकेट लिस्ट’ मध्ये होतं –
प्रतक्ष चेन्नईला वगैरे जाऊन खास नल्लीज मधून मस्त दाक्षिणात्य ढंगाची एक तरी
पारंपरिक साडी घ्यायचीच ! खर तर गोष्टीतल्या ‘गुलबकाऊली’च्या फुला इतकी काही हि गोष्ट
असाध्य नव्हती ! पण गेले कित्येक वर्ष अभिनय, लेखन आणि कविता-वाचन यात पूर्णपणे
बुडालेल्या मधुराणीला ते ‘नल्लीज’ वगैरे काही जमत नव्हतं ! गंमत म्हणजे चक्क
चेन्नईला शुटींगसाठी तिचं बऱ्याचदा जाणंही झालं होतं, तरीही नल्लीची दिल्ली दूरच
राहत होती !
पण अखेर दोन वर्षांपूर्वी चेन्नईतल्या शुटींग
मध्ये तिला चक्क एक दिवस मोकळा मिळाला आणि मग तिने धूम ठोकली ‘नल्लीज’ मध्ये !
तिथे एक साडी जणू तिची वाटच बघत होती, पाहता क्षणीच मधुराणी या साडीच्या प्रेमात
पडली ! दाक्षिणात्य घट्ट सिल्कची गुलबक्षी रंगाची प्युअर कांजीवरम. तेव्हा
माधुराणीला स्वप्नपूर्तीचा स्वर्गीय आनंद वगैरे झाला !
सुंदर साडी, त्यावर सुंदर प्युअर सिल्कच
कॉन्ट्रास्ट डिझायनर ब्लाऊज शिवून तयार झालं आणि मग लगेचच साडी नेसण्याचं
प्रयोजनही आलं. मधुराणीच्या मामेभावाचे लग्न. दुग्धशर्करा योग जुळून आला ! त्या
लग्नात म्हणे नवरीच्या साडी ऐवजी मधुराणीच्या या साडीचीच चर्चा होती म्हणे !
तर अशी हि बहुचर्चित साडी मधुराणीच्या वॉर्डरोबमध्ये मानाने विराजमान झाली आणि मग मधुराणीच्या ‘बकेट लिस्ट’ वर अजून एक टिकमार्क झाला !
रश्मी विनोद सातव
rashmisatav@gmail.com
#VirasatIndia


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा