शुक्रवार, २९ जानेवारी, २०२१

खणाच्या साडीची माहिती

 खणाचा खणखणाट !

खण म्हणजे पारंपरिक वस्त्रांमधील एक खणखणीत नाणं ! जवळजवळ ३०० वर्षांपूर्वीपासून उत्तर कर्नाटक आणि महाराष्ट्रातील विदर्भ-मराठवाड्यात हॅन्डलूमवर हे वस्त्र विणले जात आहे. पूर्वी खणापासून फक्त चोळ्या आणि लहान मुलींना परकर-पोलके शिवले जात असे.

पूर्वी कॉटन खणाचे कापड फक्त हॅन्डलूमवर बनत असे. त्याची प्रक्रियाही बरीच क्लिष्ट आहे. धाग्यांच्या मोठ्यामोठ्या लडी ‘अल्कलाईन सोल्युशन’ मध्ये एक दिवस बुडवून ठेवणे, मग हवी ती शेड बनवण्यासाठी वेगवेगळ्या डाय पावडर पाण्यात मिक्स करून हवा तो रंग तयार करून ठेवत ठेवणे, त्यानंतर  दोन स्टीलच्या रॉडवर धागे लटकवून, बनवलेल्या रंगाच्या मिश्रणात बुडवून ४० ते ५० डिग्री सेल्सियस वर जवळ-जवळ तासभर उकळवणे, मग पिळून, विंचरून त्याच्या बॉबीन भरून हातमागावर लावणे आणि मग विणकामाला सुरुवात करणे- तेही हाताने, त्यामुळे पूर्वी १५ दिवसात फक्त २० मीटर कापड विणून होत असे !

पुढे जेव्हा पॉवरलूम आल्या तेव्हा मात्र सगळं चित्रच पालटलं ! खणाचे कापड काही प्रमाणात हॅन्डलूम वर आणि मोठ्या प्रमाणात पॉवरलूम वर बनू लागलं. खण फक्त चोळ्या आणि परकर-पोलक्यांपुरते मर्यादित न राहता बॅग्स, ड्रेसेस आणि अतिशय सुंदर अशा डिझायनर साड्या खणात बनू लागल्या.

खणाची टिपिकल मराठमोळी साडी, त्यावर शक्यतो कॉन्ट्रास्ट प्लेन ब्लाऊज, नाकात नथ आणि चांदी किंवा ऑक्सिडाईझचे दागिने हा पेहराव एकदम ट्रेंडिंग झाला. इतका ट्रेंडीग की सोशल मिडीयावर साडीचा व्यवसाय करणाऱ्या असंख्य ब्रॅण्ड्समध्ये खणाची साडी येऊन विराजमान झाली आणि अगदी गृहिणींपासून ते थेट मोठ-मोठ्या सिनेतारका या खणसाडीच्या प्रेमात पडल्या.   

खण हा प्रकार जरी पारंपरिक असला तरी सध्या खणाच्या साड्यांना एक डिझायनर टच सुद्धा मिळाला आहे. पूर्वी काही ठराविक रंगातच मिळणारं खणाचे कापड आता अनेक सुंदर रंगात मिळू लागले आहे. त्यामुळे तुम्हाला जर रंगसंगतीची चांगली जाण असेल तर तुम्ही वेगवेगळ्या रंगाचे खणाचे कापड जोडून अतिशय सुंदर अशी साडी टेलर कडून बनवून घेऊ शकाल. शिवाय रेशमाचे काम केलेल्या खणाच्या ‘हॅन्ड-क्राफ़्टेड’ साड्या हा पण एक छान पर्याय आहे. त्यामुळे खणाची साडी जरी ट्रेंडीग असली तरी प्रत्येकीची खणाची साडी अगदी युनिक असू शकते ! त्यामुळे तुमचही खणाचं नाणं खणखणीत वाजेल हे नक्की  !

थोडक्यात पण महत्त्वाचे : 

·       खणाची साडी विकत घेतांना या गोष्टी माहित हव्यात :

·       खणाचे मुख्य दोन प्रकार असतात - हॅन्डलूम वर बनणारे खण आणि पॉवरलूम बनणारे खण.

·       पॉवरलूम वर बनणाऱ्या चांगल्या प्रतीच्या खणात ७० ते ८० टक्के कॉटन असते आणि त्या खणाच्या कापडाला चकाकी येण्यासाठी २० ते ३० टक्के रेयॉन आणि आर्ट सिल्क असते.

·       हॅन्डलूम वर बनवलेले खण रेशमाचे असून काठात काही प्रमाणात कॉटन असते. हे खण थोडे महाग असतात.

·       काही ठिकाणी पॉवरलूम वर बनवलेले खण पूर्णपणे पॉलिस्टरचे असून त्याचे लवकरच धागे निघू लागतात. आणि महत्त्वाचे म्हणजे पॉलिस्टरचे स्वस्त खण हॅन्डलूमचे खण म्हणून आपण हॅन्डलूमच्या किमतीत आपण विकत तर नाही घेत आहोत ना याची चाचपणी पण करता यायला हवी.


रश्मी विनोद सातव

rashmisatav@gmail.com

#VirasatIndia

     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा