साडीच्या घडीत
ट्रीपच्या आठवणी !
अभिनेता-लेखक-दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडेंच्या अतुलनीय यशामागे
खंबीरपणे उभी असणारी त्यांची अर्धांगिनी,
अभिनेत्री स्नेहल प्रवीण तरडे - हिच्यासाठी केरळची ही कसावू साडी खूप खूप खास आहे.
स्नेहल लहान असतांना, तिच्या आईचं एक छोटंस स्वप्न होतं, स्नेहलच्या बाबांबरोबर देवभूमी केरळला
फिरायला जाण्याचं. पण दुर्दैवाने स्नेहलचे बाबा पुढे लवकरच देवभूमीला न जाता
अचानकपणे देवाघरी निघून गेले. स्नेहल आणि तिच्या आईच्या आयुष्यात निर्माण झालेल्या
पोकळीत स्नेहलच्या आईचे स्वप्नंही विरून गेलं !
पण स्नेहलनं तेव्हाच ठरवून ठेवलं होतं आपण मोठे झाल्यावर, कधीच
कोणतीही मागणी न करणाऱ्या आपल्या आईचं हे स्वप्न पूर्ण करायचच ! स्नेहलचा मुलगा –
परार्ध, पाच वर्षांचा असतांना स्नेहलने खूप धडपड करून केरळच्या ट्रिपचा योग अखेर
घडवून आणला. स्नेहल, स्नेहलची आई आणि परार्ध – असे तिघेच केरळच्या ट्रीपला गेले. ती
ट्रीप तिघांसाठी खूप स्पेशल होती. केरळच्या वास्तव्यात एक दिवस त्यांना निवांत
मिळाला आणि स्नेहलनं केरळचं ‘सुव्हीनियर’ विकत घ्यायचे ठरवलं. खास केरळची पारंपरिक
कसावू साडी तिला ‘सुव्हीनियर’ म्हणून घ्यायची होती. ड्रायव्हर काकांना तिने सांगितल्यावर,
ते त्या तिघांना थेट हातमागावर साड्या विणतात त्या कारखान्यातच घेऊन गेले.
तिथे अनेक हातमाग होते, त्यावर अनेक सुंदर
सुंदर साड्या विणल्या जात होत्या. तो लयबद्ध आवाज, ते निगुतीने विणले जाणारे धागे...सगळं
विलक्षण अत्भूत होतं ! तिथे स्नेहलच्या
आईने स्नेहलला एक सुंदर ‘कसावू’ साडी घेतली – हातमागावरची सुती - क्रीम कलरची,
सोनेरी बॉर्डर असलेली, त्या बॉर्डरवर लोभस कृष्णाची चित्रे होती, पदरावर ऐसपैस
सुंदर-रेखीव-निळा कृष्ण होता, त्या पदराला छानसे गोंडे होते .... साडी एकदम हटके
होती. पाहता क्षणीच स्नेहल त्या साडीच्या प्रेमात पडली.
येतांना मात्र ती साडीची घडी खूप
जड झाली होती ! त्या साडीच्या घडीत
बरचं काहीबाही होतं – आईचा आनंद, स्नेहलचं समाधान, परार्धच्या गंमती-जमती,
ट्रीपच्या आठवणी आणि बरचं काही ! आजही
त्या मऊसूत घडीत त्या सगळ्या गोष्टी तशाच जपून ठेवल्या आहेत स्नेहलनं !
रश्मी विनोद सातव
rashmisatav@gmail.com
` #VirasatIndia


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा