गुरुवार, ४ फेब्रुवारी, २०२१

सुखदा खांडकेकरच्या 'द्वारकाबाई साडी'चा किस्सा

 


सुखदाची द्वारकाबाई साडी !

क्लिनिकल सायकॉलॉजीचं शिक्षण घेतलेली सुखदा खांडकेकर कथक विशारद झाली आणि कथक, सालसा आणि लॅटिन बॉलरूम या नृत्य प्रकारांचे ती गेली २८ वर्षे विलक्षण सुंदर सादरीकरण करते आहे. नृत्याबरोबरच दर्जेदार अभिनय करणारी सुखदा हिंदी आणि मराठीतली नाटकं, चित्रपट, मालिका आणि जाहिरातीतून आपल्याला नेहमीच भेटते. अभिनेता अभिजित खांडकेकर आणि सुखदा यांच्या लग्नाला आठ वर्षे झाली आणि त्यांच्यातले सहजीवन म्हणजे उभ्या-आडव्या धाग्यांची सुंदर अशी एक घट्ट वीण आहे !

सध्या सुखद ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ या ऐतिहासिक मालिकेत द्वारकाबाई म्हणजे मल्हारराव होळकरांच्या दुसऱ्या पत्नीची भूमिका करत आहे. या द्वारकाबाई अतिशय सुंदर, हुशार आणि महत्त्वाकांक्षी होत्या. त्यांच्या आवडीनिवडी खूप चोखंदळ होत्या. हे करारी पात्र उभं करणं सुखदाला एक आव्हान आहे पण तिला ते काम जबरदस्त आवडतं आहे आणि त्यालाही एक खास कारण आहे !

    सुखदाला अगदी लहानपणापासूनच साडी हा प्रकार जाम आवडायचा. आईची ओढणी  साडीच्या पदरासारखी टाकून तो फलकारा घेऊन ती घरभर फिरत रहायची ! त्यामुळे द्वारकाबाईंच्या भूमिकेत सतत साडी नेसायला मिळणार याच खास कारणासाठी पण सुखदा, एकदम सुखावून गेली ! विशेष म्हणजे ही द्वारकाबाईंची साडी काही साधी-सुधी साडी नाहीये, तर चक्क डिझायनर नऊवार आहे. हल्ली ६ वारांमध्ये डिझायनर साड्या सर्रास मिळतात पण खास द्वारकाबाईंच्या भूमिकेसाठी बनवलेली डिझायनर नऊवार म्हणजे एक अफलातून साडी आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई या मालिकेच्या रिसर्च टीम नुसार द्वारकाबाई आपल्या पेहेरावाबद्दल प्रचंड चोखंदळ होत्या. त्यामुळे द्वारकाबाईंच्या भूमिकेसाठी डिझायनर नऊवारी साड्या बनवायच्या असे कॉस्च्युम डिझायनर रोहिणी साळेकर हिने ठरवले. त्यासाठी एक अत्यंत जुना जीर्ण झालेला फोटो हाती लागला. तो द्वारकाबाईंचा फोटो नव्हता परंतु समकालीन एका स्त्रीचा होता. त्या फोटोतल्या स्त्रीने जी नऊवारी नेसली होती त्यावरून प्रेरित होऊन द्वारकाबाईंच्या भूमिकेसाठी सुखदासाठी नऊवारी साड्या तयार झाल्या !

सुखदा तर त्या नऊवार साड्यांच्या प्रचंड प्रेमात पडली, विशेष करून लाल रंगाच्या विविध छटा वापरून बनवलेली हि नऊवार साडी सुखदाला प्रचंड आवडली आणि ज्या दिवशी या साडीतले सीन टेलिकास्ट झाले त्या दिवशी तर अशी साडी कुठे मिळेल ? याची सोशल मिडीयावरून मोठ्या प्रमाणात विचारणा झाली. पण खरतर अशी साडी कुठेच मिळणार नाही, कारण ती साडी कॉस्च्युम डिझायनर रोहिणी साळेकर हिने खास द्वारकाबाईंच्या भूमिकेसाठी सुखदासाठी बनवली आहे. साडीचा निऱ्यांचा भाग बारीक चौकडींचा टिश्यूचा असून पदर प्लेन सिल्क आहे आणि या साडीला खास पैठणीचे काठ बनवून घेतले आहेत. त्यामुळे खास बनवलेल्या अशा प्रकारच्या या डिझायनर नऊवार साडीला ‘द्वारकाबाई साडी’ अस नाव लवकरच प्रचलित होईल !

या सुंदर साडीवर, घेतलेल्या सुंदर शेल्यामुळे आणि पारंपरिक दागिन्यांमुळे सुखदा खरच १८ व्या शतकातील द्वारकाबाई होळकरच वाटते आहे. सुखदाच्या सुरेख अभिनयाला मिळालेल्या या साडीच्या ऐतिहासिक कोंदणामुळे सुखदाने द्वारकाबाईना पुन्हा जिवंत केले आहे हे नक्की, त्यामुळे सुखदासाठी ही साडी खरच खूप खूप खास आहे ! 











रश्मी विनोद सातव

      rashmisatav@gmail.com

      #VirasatIndia



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा