पारंपरिक नऊवारीचा लहेजा.
भारतात साडीला वेगवेगळ्या प्रांतात निरनिराळी नावं आहेत. प्रदेशानुसार
साडीची नावं जशी बदलत गेली तशी नेसण्याचे प्रकार देखील बदलत गेले. महाराष्ट्राचे
पारंपरिक वस्त्र असलेल्या नऊवारी साडीला लुगडं, धडूतं, धडोत, काष्टा साडी किंवा
सकच्छ साडी (कासोटा) असंही म्हणतात. या पारंपरिक नऊवारीचा इतिहास पण खूप जुना आहे.
५००० वर्षांपूर्वीपासून साडी-सदृश्य, लांबलचक कापड
शरीराला वेगवेगळ्या प्रकारे गुंडाळले जायचे ! हडप्पा संस्कृतीतील सापडलेल्या
शिल्पांच्या अंगावर स्त्री आणि पुरुषांनी धोतरासारखा दिसणारा पेहेराव केलेला
दिसतो. तसच ‘सांची’ येथील शिल्पांवरून त्या काळातील स्त्रिया कासोट्यासह लुगडी
नेसत असतं आणि त्या साडीचाच पदर कंबरेभोवती गुंडाळीत असत असे दिसते.
९ वार म्हणजे अंदाजे ८.२ मीटर असलेली हि साडी काष्टा किंवा कासोटा
पद्धतीने नेसल्यामुळे, हे लुगडं नेसणारी स्त्री लीलया कुठेही संचार करू शकते. घरात,
शेतात आणि अगदी रणांगणावर सुद्धा ! राजमाता
जिजाऊ साहेब किंवा झाशीची राणी लक्ष्मीबाईंपासून ते थेट नऊवारी नेसून
स्कायडायव्हिंग करणाऱ्या शीतल राणे-महाजन किंवा नऊवारी नेसणाऱ्या बायकर्णींपर्यंतच्या स्त्रियांनी नऊवारीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे.
सौंदर्य खुलवणारी ही नऊवार साडी वेगवेगळ्या प्रकारे नेसली जाते. शेतात काम करणाऱ्या स्त्रिया काम करायला सोपे जावे म्हणून घोट्याच्या वर ही साडी नेसतात. ही साडी नेसतांना त्या साडीच्या काठाचा ठसठशीत काष्टा केला जातो. शिवाय निऱ्या कमरेला न खोचता त्याचे केळे केले जाते आणि त्या केळ्यात त्या स्त्रिया पैसे किंवा सुपारीच्या डबी सारख्या काही वस्तूही ठेवतात. लग्नकार्य आणि सणवारांना नेसली जाणारी नऊवारी घोळदार घोट्यापर्यंत असते. त्या स्त्रिया निऱ्यांचा काही भाग खालून उचलून त्याचा घोळदार ओचा करून कमरेत खोचतात. त्या ओच्यात त्या स्त्रिया पूर्वी ओटी घेत असत. पेशवाई नऊवारी साडी पण घोट्यापर्यंत नेसली जाते पण कधी कधी ओच्याच्या ऐवजी तो भाग ‘झिगझॅग पॅटर्न’ मध्ये खोचला जातो. पूर्वी पेशवाई नऊवारी साडीला ‘गजकी’ असेही म्हणले जायचे. शिवाय लावणीतील नर्तिका चापून-चोपून नऊवार नेसतात आणि घुंगरू बांधण्यासाठी पायाकडचा घोळ कमी ठेवतात. त्या स्त्रिया मोठ्या काठाचा सुंदर काष्टा काढून, पदर मोठा घेतात. समुदकिनारी राहणाऱ्या कोळीणी तर खूप वैशिष्ट्यपूर्ण नऊवारी नेसतात. पाण्यात साडी भिजू नये म्हणून गुढघ्यापर्यंत घट्ट नऊवारी नेसतात आणि पदर कमरेला खोचतात आणि पदर म्हणून चोळीवर ओढणी घेतात.
अशी मोठी परंपरा आणि इतिहास असलेल्या या लुगड्याचा उल्लेख
ज्ञानदेवांच्या ‘अनुभवामृत’मधील एका ओवीत देखील झालेला वाचून महाराष्ट्राच्या या पारंपरिक
साडीचा अभिमान अजूनच उंचावतो !
नऊवारीच्या गंमत गोष्टी :
· एकोणिसाव्या शतकातील एक अख्यायिका अशी आहे की,
प्रतिभावंत चित्रकार राजा रवी वर्मा हिंदू देवतांचे चित्र रेखाटण्यासाठी
स्त्रियांचे कोणते वस्त्र शोभून दिसेल याचा अभ्यास करत होते, त्यांच्या असे लक्षात
आले की नऊवारी साडीच देवतांना शोभून दिसेल. त्यामुळे राजा रवी वर्मांच्या
चित्रांमधल्या सगळ्या देवतांनी नऊवारी साड्याच नेसल्या आहेत.
सिनेसृष्टीत आणि मालिका क्षेत्रात पण नऊवार साडीने आपला खास असा ठसा उमटवला आहे. ‘जय मल्हार’ मालिकेमुळे लोकप्रिय झालेली म्हाळसा नऊवारी, स्वामी मालिकेतून प्रचलित झालेली पेशवाई नऊवारी, बाहुबली चित्रपटात राजमाता शिवगामिनीदेवीने नेसलेली हातावर घेतलेल्या लांब पदराची नऊवारी, ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटात प्रियांका आणि दिपिकाने नेसलेल्या नऊवाऱ्या आणि ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ या मालिकेतील सुखदा खांडकेकरची ‘द्वारकाबाई नऊवारी’ पाहिल्या, तर नऊवारीचा एक मोठा ट्रेंडच आलेला जाणवतो.
रश्मी विनोद सातव
rashmisatav@gmail.com
#VirasatIndia
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा