शुक्रवार, ५ फेब्रुवारी, २०२१

भारतातील पहिली महिला डॉक्टर - डॉ आनंदीबाई गोपाळ जोशी

विरासत म्हणजे वारसा. भारतासारख्या समृद्ध देशाला संस्कारांचा, शिक्षणाचा, कलेचा, रूढी-परंपरांचा वारसा लाभला आहे. या अनेक धाग्यांच्या वारस्यातील हा अजून एक धागा........


प्रेरणादायी आनंदी

३१ मार्च १८६५ साली पुण्यात एका चिमुकलीने जन्म घेतला. नाव यमुना. पुढे घरच्या गरिबीमुळे, कर्मठ सामाजिक रचनेतून खेळण्या-बागडण्याच्या वयात, वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी – तिच्यापेक्षा वयाने तब्बल २० वर्षांनी मोठे असलेल्या गोपाळरावांशी तिचे लग्न लावून देण्यात आले. ही तडजोड होती की सोय होती याची उत्तरं मात्र काळाच्याच पोटात मिळतील. पण अत्यंत कडक आणि पुरोगामी स्वभावाच्या गोपाळरावांशी तिने छान जमवून घेतले. यमुनेची, आनंदी गोपाळ जोशी झाली. लग्न म्हणजे नक्की काय हेही नीट माहित नसलेल्या कणखर बाण्याची आनंदी, त्या नात्यातही आनंद शोधू लागली. गोपाळरावांच्या आग्रहाखातर ती घरच्या घरी शिकू लागली. लहान वयात पडलेल्या लग्नाच्या जबाबदारीतून सावरत असतांनाच तिच्यावर अजून एक मोठी जबाबदार पडली. वयाच्या १४ च्या वर्षी तिने एका मुलाला जन्म दिला. पण ती रहात असलेल्या ठिकाणी पुरेशी वैद्यकीय सेवा उपलब्ध नसल्यामुळे तिचं ते बाळ अवघं १० दिवसच जगलं ! ती कोवळी आई कोसळली, अंतर्मुख झाली. तिच्यातल्या १० दिवसांच्या आईनं तिला १० हत्तीचं बळ दिलं ! आपण खूप शिकून डॉक्टर होऊन आयुष्यभर रुग्णांची सेवा करण्याचा, त्यांना जीवदान देण्याचा निर्धार तिनं केला. त्या काळातील प्रतिगामी समाजात मुलींनी हातात पाटी धरणं म्हणजे सुद्धा पाप होतं तेव्हा आनंदीनं डॉक्टर बनण्याचं ‘शिवधनुष्य’ उचललं !

धर्मांतराची अट मान्य न करता आनंदीनं आणि गोपाळरावांनी अथक प्रयत्नांनी अमेरिकेतील पेन्स्लव्हिनिया येथे ‘विमेन्स मेडिकल कॉलेज’  मध्ये प्रवेश मिळवला. होतं नव्हतं ते सगळं विकून समाजाचा प्रचंड विरोध पत्करून गोपाळरावांनी तिला अमेरिकेला धाडलं. माजघरातील भारतीय स्त्री तेव्हा दिवाणखान्यात देखील येऊ शकत नसे, तेव्हा ही धाडसी आनंदी सातासमुद्रापार गेली, तेही एकटी ! पण हजारो मैल दूर असून सुद्धा, ती गोपाळरावांची शिस्त आणि आपल्या संस्कृतीच्या परिघात रहात होती. प्रचंड थंडीच्या अत्यंत प्रतिकूल वातावरणात तिथला ‘ओव्हरकोट’ घालणे गोपाळरावांच्या शिस्तीत बसत नव्हते ! ती आजारी पडली, पण आपल्या गेलेल्या बाळाची सल आणि शिक्षणाची ओढ तिला स्वस्थ बसू देत नव्हती. अत्यंत जिद्दीनं तिने ‘एमडी’ ची पदवी मिळवली. ‘एम.डी.’ साठी तिने जो प्रबंध सादर केला त्याचा विषय होता, ‘हिंदू  आर्य लोकांमधील प्रसूतिशास्त्र’. एम.डी. झाल्यावर व्हिक्टोरिया राणीकडून सुद्धा तिचे अभिनंदन करण्यात आले. तिच्या पदवीदान समारंभाला गोपाळराव स्वतः उपस्थित राहिले. भारतातील पहिली स्त्री डॉक्टरहा मान आनंदीला मिळाला. तिचे स्वप्न पुरे झाले. आनंदी भारतात परतली. पण एव्हाना तिला क्षयाची बाधा झाली होती. तिचा आजार बळावत गेला आणि रुग्णसेवा करायच्या आधीच वयाच्या २२ व्या वर्षी, २६ फेब्रुवारी १८८७ रोजी तिने जगाचा दुर्दैवी निरोप घेतला. लहान वयात तिचं जाणं चटका लावणारं होतं.

ती अमेरिकेत असतांना 'कार्पेन्टर' नावाच्या एका कुटुंबाचा तिला आधार होता. ती गेल्यावर या 'कार्पेन्टर' कुटुंबाने तिचे एक लहानसे थडगे बांधून त्यावर आनंदी गोपाळ जोशी, परदेशात शिक्षण घेऊन डॉक्टर पदवी मिळवणारी पहिली भारतीय स्त्रीअशी अक्षरे कोरून तिचे स्मारक केले. तिच्या अल्पशा आयुष्यात अनेक घटना घडत गेल्या. परंतू तिची ही प्रेरणादायी यशोगाथा काळाच्या ओघात पुसट होत गेली. आजही भारतात, कित्येक स्त्रियांचं, ‘चूल आणि मुल’ इतकच कार्यक्षेत्र मानणारा एक समाज अस्तित्त्वात आहे. आजही कित्येक माजघरातील हुंदके, माजघरातच विरून जात आहेत. या सर्व माजघरांपर्यंत किंबहुना समाजातील सर्व स्तरांवर आनंदीबाई जोशींची प्रेरणादायी स्फुरणगाथा पोहोचली पाहिजे, या हेतूने केलेला हा लेखन प्रपंच !

 

रश्मी विनोद सातव

      rashmisatav@gmail.com

      #VirasatIndia 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा