कर्मण्ये वाधिका रस्ते मा फ़लेशु कदाचन |
मा कर्म फ़ल् हेतुर्भू: माते संगोस्तव कर्मणि ||
अर्थात
फक्त कर्म करण्याचा तुला अधिकार आहे. कर्माच्या फळावर तुझा ताबा नाही. त्याची अपेक्षा ठेऊ नकोस. खरंतर त्या त्या वयातील आपलं कर्तव्य करत राहणं हाच खरा मनुष्य धर्म आहे. भगवत गीतेतील या श्लोकात संपूर्ण आयुष्याचं सार आहे आणि हे सार लोकमान्य टिळकांनी मराठीतून खूपच सोप्या पद्धतीनं 'गीतारहस्यातून' लोकांना शिकवलं.
खरं म्हणजे कोणतीही गोष्ट सोपी करून शिकवणं ह्यात टिळकांचा हातखंडा होता. कोणत्याही विषयाचा आधी ते सखोल अभ्यास करीत आणि मग तो विषय शिकवीत.
स्वराज्य प्राप्तीसाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं होतं आणि या स्वराज्य प्राप्तीसाठीच्या सामाजिक कार्याची सुरुवात त्यांनी एक शिक्षक म्हणून केली होती. ते हाडाचे शिक्षक होते. स्वराज्य प्राप्तीसाठी लोकमान्यांनी स्वराज्य, बहिष्कार, स्वदेशी, आणि राष्ट्रीय शिक्षण या चतुःसूत्रीचा अंगीकार केला होता. या चतुःसूत्रीतील राष्ट्रीय शिक्षण हा खूपच महत्त्वपूर्ण पैलू होता. कोणत्याही राष्ट्राची शिक्षणाशिवाय प्रगती होऊच शकत नाही हे लोकमान्यांनी अचूक ताडलं होतं.
त्या काळात इंग्रजांनी सुरु केलेल्या शाळांमधून कारकून तयार
केले जात असतं ! इंग्रजांचा हा धूर्त विचार टिळकांना खटकत होता ! हेच शिक्षण घेऊन
तरुण बाहेर पडत राहिले तर आपला संपूर्ण देश गुलामांचा देश म्हणून ओळखला जाईल आणि
याच गुलामगिरीत आपला देश असाच खितपत पडेल ! हे कटू सत्य त्यांच्यातील शिक्षकाला
स्वस्थ बसू देत नव्हतं ! टिळक नेहमी म्हणत, “आपली स्वतःची शाळा – कॉलेज काढून
देशकार्यासाठी झटणारी पुढची पिढी तयार करता येईल”.
देशहितासाठी शिक्षण किती महत्त्वाचं आहे हे ओळखून टिळकांनी,
आगरकर आणि चिपळूणकर यांना बरोबर घेऊन १ जानेवारी १८८० रोजी पुण्यात ‘न्यू इंग्लिश
स्कूल’ ची स्थापना केली. या शाळेत लोकमान्य आणि त्यांचे सहकारी स्वतः शिकवीत.
टिळकांचा भूमिती, बीजगणित, वेदिक गणित, संस्कृत, कायदा, खगोलशास्त्र यांचा गाढा
अभ्यास होता. हे विषय ते मुलांना प्रत्यक्ष कृतीतून शिकवीत असत. अत्यंत अवघड असे गणित ते खूप सोप्या पद्धतीनं शिकवीत. त्याचं संस्कृत वरील प्रभुत्त्व वाखाणण्याजोगं. ते संस्कृत मधून कविताही करीत असत. त्यांची शिकविण्याची पद्धत व्यवसायभिमुख होती. ते
कारकून नाही तर स्वतंत्र भारतासाठीचे सक्षम नागरिक तयार करत होते.
राष्ट्रीय शिक्षण रुजवण्यासाठी नुसती शाळा काढून टिळक थांबले नाहीत तर पुढे त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून या संस्थेतर्फे पुण्यात फर्ग्युसन कॉलेज सुरु केले. या कॉलेजला सव्वाशे वर्षं होऊन गेली तरी आजही या कॉलेजचा दर्जा अबाधित आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान न देता, शारीरिक शिक्षणाचं महत्त्व, व्यवसायाभिमुख शिक्षणाचं महत्त्व, देशाचा प्राचीन इतिहास, परंपरा, स्वावलंबन, देशप्रेम, वेद, उपनिषद, कृषी शिक्षण, पाश्चात्य विद्या, गीतेतील रहस्य असं खूप काही दिलं ! गीतेतील रहस्य फक्त लिहून ते थांबले नव्हते तर त्यांनी गीता पूर्णार्थाने अंगिकारली होती ! आयुष्यभर ज्ञानदानाचे कर्म ते करत राहिले, कोणत्याही फळाची अपेक्षा न करता ! निष्काम कर्मयोगी शिक्षक होते ते !
हजारो वर्षांपूर्वी कृष्णानं अर्जुनाला हेही सांगितलं होतं ......
अभ्युत्थानमधर्मस्य
तदात्मानं सृजाम्यहम !
परित्राणाय
साधूनां विनाशायच दुष्कृताम !
धर्मसंस्थापनार्थाय
संभवामि युगे युगे !
अर्थात : जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अराजकता माजेल तेव्हा तेव्हा मानवाला योग्य दिशा दाखवण्यासाठी मी पुन्हा पुन्हा जन्म घेत राहील !
म्हणजे ब्रिटीशांच्या काळात जेव्हा अराजकता माजली होती तेव्हा कृष्णाने लोकमान्यांच्या रुपात परत जन्म घेतला असेल .....! कृष्ण हा त्याच्या काळातला एक आदर्श शिक्षक होता आणि लोकमान्य २० व्या शतकातले आदर्श शिक्षक ठरले होते. त्या आदर्श शिक्षकाला शतशः प्रणाम !
rashmisatav@gmail.com
#VirasatIndia
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा