गुरुवार, ११ फेब्रुवारी, २०२१

अजरखची अदाकारी !

 

अजरखची अदाकारी !

सुमारे ४०० वर्षांपूर्वी गुजराथच्या कच्छ प्रांतातील कच्छच्या राजाने, सिंध प्रांतातून खत्री समाजातील काही कारागिरांना बोलावून कच्छमध्ये स्थायिक होऊन त्यांच्याकडील पारंपरिक कला फोफावण्यासाठी मदत केली होती. त्याच खत्री समाजातील आज १० वी पिढी गुजराथ आणि राजस्थानातल्या काही भागांमध्ये मोठ्या इमाने-इतबारे हे काम करत आहे. कोणती आहे ती कला ? नक्षीदार लाकडी ब्लॉक, नैसर्गिक रंगात बुडवून हाताने कापडावर छापण्याची अतिशय सुंदर कला म्हणजे ‘अजरख ब्लॉक प्रिंटींग’ची कला.

पण अजरख म्हणजे काय ? तर अरेबिक आणि पर्शियन भाषेत अजरखचा अर्थ आहे निळा रंग. या प्रिंटींगमध्ये ‘इंडिगो ब्लू’ हा रंग मुख्य असतो. बाकी डिझाईनमध्ये मरून, पिवळा, हिरवा, केशरी यातील काही रंग दिसतात तर त्या नक्षीची आऊटलाईन काळ्या किंवा पांढऱ्या रंगाची असते.    

या संपूर्ण प्रक्रियेत पांढऱ्या कापडाचं सुंदर नक्षीदार रंगीत कापडात झालेले रुपांतर पाहून या कारागिरांना मनापासून ‘सॅल्यूट’ करावासा वाटतो ! एकूण सोळा ते सतरा टप्प्यांमध्ये पूर्ण होणाऱ्या या अजरख छपाईपासून कुर्त्याचे कापड, पगड्या, आणि अतिशय सुंदर साड्या बनतात. अजरख प्रिंटींगची एकेक साडी म्हणजे एकेक सुंदर कलाकृतीच असते ! या प्रिंटींगचे वैशिष्ट्य म्हणजे अजरख प्रिंटींगसाठी लागणारा प्रत्येक घटक हा नैसर्गिक असून फक्त कॉटन, सिल्क किंवा लिनन या नैसर्गिक धाग्यांवरच हे प्रिंटींग होते. त्यामुळे अजरख साड्या या पर्यावरणपूरक साड्या आहेत असे अभिमानाने सांगता येईल.

पानं, फुलं, माती, शेण, गुळ, हळद आणि नैसर्गिक खनिनांपासून अजरख प्रिंटींगचे रंग बनवले जातात. विशेष म्हणजे नैसर्गिक धाग्याने पकडलेले हे रंग, कापड कितीही वेळा धुतले तरी जात नाहीत.

अजरख प्रिंटींग नक्की कसे केले जाते हे समजल्यावर तर, या पारंपरिक कलेविषयी एक वेगळाच आदर निर्माण होईल. कोरे नैसर्गिक धाग्याचे पांढरे कापड घेऊन ते निलगिरी तेल किंवा शेंगदाणा तेल, सोडा आणि उंटाचे शेण एकत्रित करून त्यात रात्रभर भिजवत ठेऊन दुसऱ्या दिवशी पाण्याने धुवून ही प्रक्रिया स्टार्च जाईपर्यंत दोन ते तीन वेळा परत-परत केली जाते, मग पाण्यात ते कापड उकळून घेतले जाते त्यामुळे ते कापड एकदम मऊ होते आणि त्यावर कोणतेही रंग एकसारखे आणि कायमचे बसतात. मग दिवसभर हिरड्याच्या पाण्यात ते कापड भिजवून ठेवले जाते त्यामुळे त्या कापडाला एक छान पिवळसर रंग चढतो. उन्हात वाळवल्या नंतर आता हे कापड ब्लॉक प्रिंटींगसाठी तयार झालेले असते. ब्लॉक प्रिंटींग पण अनेक टप्प्यात होते. सर्वात आधी चुना आणि अरेबिक गम विशिष्ट प्रमाणात एकत्र करून याची पेस्ट केली जाते, या पेस्टमध्ये लाकडी नक्षीदार ब्लॉक बुडवून एकेक करून शेजारी-शेजारी छापून घेतले जातात. ही पेस्ट वाळली की लगेच हीच क्रिया कापड उलटे करून बरोबर तंतोतंत त्याच डिझाईनच्या मागच्या बाजूने पण या पेस्टमध्ये ब्लॉक बुडवून छापले जातात. याला ‘रेझिस्ट प्रिंटींग’ असे म्हणतात, म्हणजे नंतर ज्या रंगात ते कापड बुडविले जाते तो रंग, या रेझिस्ट प्रिंटींगची डिझाईन सोडून इतर ठिकाणी लागतो आणि रेझिस्ट प्रिंटींगच्या जागी पांढरा रंग राहतो. प्रिंटींगच्या पुढच्या टप्प्यात काळ्या रंगाचे प्रिंटींग होते. आता अजरख प्रिंटींगसाठी काळा रंग कसा बनतो ते पाहूयात. स्क्रॅपमधील गंजलेलं लोखंड, हळद आणि गुळ एकत्र करून तीन ते चार आठवडे पाण्यात भिजवत ठेवतात आणि मग त्या पाण्यात चिंचोक्याची पावडर मिसळून ते उकळून त्याच्यापासून घट्ट असा नैसर्गिक काळा रंग बनवतात ! रेझिस्ट प्रिंटींग नंतर काळ्या रंगाच्या प्रिंटींगच्या डिझाईनचे ब्लॉक वापरून पुढच्या टप्प्याचे प्रिंटींग केले जाते, यात रेझिस्ट प्रिंटींग सोडून उरलेल्या मोकळ्या जागेत हे डिझाईन छापले जाते. त्याच्या पुढच्या टप्प्यात तुरटी, माती किंवा अलिझरी नावाचा घटक वापरून पिवळ्या किंवा लाल रंगाचे ब्लॉक प्रिंटींग केले जाते. सर्वात शेवटी ते कापड इंडिगो रंगात दोनदा बुडवून वाळवले जाते. इथे खरी गंमत बघायला मिळते. जिथे आधीच्या तीन टप्प्यात प्रिंटींग झालेले असते म्हणजे रेझिस्ट प्रिंटींग, काळ्या रंगाचे प्रिंटींग आणि तुरटी किंवा अलिझरीचे प्रिंटींग या टप्प्यांमध्ये केलेले वेगवेगळे नक्षीकाम सोडून बाकीचे कापड इंडिगो ब्लू रंगाचे होते. सर्वात शेवटी परत पाण्यात उकळले जाते, त्यामुळे अरेबिक गम सारखे नको असलेले घटक पाण्यात उतरतात आणि अतिशय सुंदर असे प्रिंटेड कापड तयार होते. अजरख प्रिंटींग ही अतिशय क्लिष्ट आणि कष्टाची प्रक्रिया असून प्रत्येक टप्प्याला एकेक दिवस जातो म्हणून एक साडी बनायला अठरा ते वीस दिवस लागतात ! अशा प्रक्रियेमुळे या साड्या जरा महाग असल्या तरी त्यांच्या ‘हटके लुक’ मुळे चोखंदळ ग्राहकांकडून आवर्जून विकत घेतल्या जातात.       

 अजरखच्या रंजक गोष्टी :

·       सिंधू नदीच्या खोऱ्यात झालेल्या उत्खननात हडप्पा, मोहनजोदरो संस्कृतीतील सापडलेल्या शिल्पांच्या अंगावर अजरख प्रिंटींगच्याच पद्धतीने केलेले प्रिंटींग असलेले कापड गुंडाळलेले दिसते. यावरून ही कला किती जुनी आहे, याचे संदर्भ मिळतात. अशाच प्रकारचे प्रिंटींग इजिप्तमधील कैरो भागात झालेल्या उत्खननात देखील सापडले आहे.  

 

·       अजरख प्रिंटींगच्या प्रक्रियेमुळे त्या कापडाला एक विशिष्ट गुणधर्म प्राप्त होतो ! उन्हाळ्यात त्या कापडाची सूक्ष्म छिद्र उघडली जातात त्यामुळे त्यातून हवा खेळती राहते म्हणून गरम होत नाही आणि हिवाळ्यात ती सूक्ष्म छिद्र बंद होतात त्यामुळे ते कापड आपल्याला ऊब देत राहतं ! त्यामुळे अजरखच्या साड्या वर्षभर कधीही, कुठेही, केव्हाही नेसता येतात. 

 

·       खूप पूर्वीपासून कच्छच्या रणात आणि राजस्थानच्या लांबच लाब पसरलेल्या वाळवंटात राहणाऱ्या स्त्रिया चुकून वाळवंटात दिशा जरी चुकल्या तरी त्या वापरत असलेल्या अजरखच्या रंगीबेरंगी कपड्यांमुळे, त्यांच्या घरच्यांना दुरूनही त्यांना शोधायला सोपे जात असे ! 

 


 

रश्मी विनोद सातव

rashmisatav@gmail.com

#VirasatIndia

 


 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा