प्रियाचं ‘अजरख’ प्रेम !
प्रिया बापट, एक जबरदस्त टॅलेंटेड अभिनेत्री. आज मात्र आपण तिच्या अभिनयाबद्दल न बोलता तिच्या
आवडीच्या साडी बद्दल बोलणार आहोत. अभिनया बरोबरच प्रियाने अजून एक ‘पॅशन’ जोपासली
आहे.
प्रिया कॉलेजमध्ये मासकॉम शिकत असतांना तिची
बहिण श्वेता टेक्सटाईल आणि फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेत होती. तेव्हा प्रिया, श्वेताला घरात ब्लॉक प्रिंटिंग आणि
बाटिक प्रिंटींग वगैरे करतांना पाहत असे. ते पाहून प्रिया, ‘ब्लॉक प्रिंटिंग’ या
प्रकाराच्या प्रचंड प्रेमात पडली. निरनिराळे फॅब्रिक्स, त्यांची नावं, त्यांचा पोत,
त्यांचे रंग, हातामागावरचे विणकाम, अजरख ब्लॉक प्रिंटींग म्हणजे काय ?...... या
सगळ्या विश्वात ती श्वेताचा हात धरून शिरली आणि हरखून गेली !
पुढे श्वेताने हातमागावर काम करणाऱ्या, तिच्या
ठरलेल्या कुशल विणकरांसोबत अनेक प्रोजेक्ट्स केले. पण लॉकडाऊनच्या काळात हातावर
पोट असणाऱ्या आणि व्यवसाय पूर्ण ठप्प झालेल्या त्या विणकरांचा श्वेताला मदतीसाठी फोन
आला. श्वेता आणि प्रियाने त्या पारंपरिक कलेला जिवंत ठेवण्यासाठी त्यांच्याकडच्या
साड्या सोशल मिडीयाद्वारे ग्राहकांपर्यंत पोहोचवल्या. त्या सुंदर साड्यांना पसंती
आणि विणकरांना उत्पन्न मिळू लागले.
प्रिया म्हणाली, “हातमागावर हवीतशी एखादी साडी
विणणं आणि अजरख ब्लॉक प्रिंटिंग वगैरे करणं म्हणजे इतकं कष्टाचं आणि क्लिष्ट काम
आहे की माझ्या मनात त्या विणकरांसाठी एक कमालीचा आदर निर्माण झाला आहे. त्यांच्या या
कष्टाला आणि कलेला, प्रोत्साहन आणि योग्य ती किंमत मिळायलाच पाहिजे असं मी आणि
श्वेतानं ठरवून टाकलं.” मग पुढे प्रिया आणि श्वेता यांच्या ‘पॅशन’मुळे त्या दोघीजणी
मिळून अतिशय सुंदर अशा कॉटन आणि सिल्कच्या साड्या कारागिरांकडून बनवून घेऊ लागल्या
! त्या साड्या इतक्या सुंदर बनल्या की त्या सगळ्या उपक्रमाचं पुढे व्यवसायात
रुपांतर झालं ! अतिशय हटके कलेक्शन असलेल्या त्यांच्या या ब्रँडला त्यांनी
‘सावेंची’ असं अतिशय हटके नाव दिलं ! परंतु त्यांच्या व्यवसायाचं क्षितीज त्यांनी
स्वतः आखून घेतलं. त्या फक्त हॅन्डलूमवर विणलेल्या आणि नैसर्गिक रंग वापरून
केलेल्या ब्लॉक प्रिंटिंगच्या साड्याच विणकरांकडून हव्या तशा बनवून घेतात.
त्यामुळे पारंपरिक कला-संस्कृती जपणं या ध्येयानं झपाटलेल्या या दोघींनी या
क्षेत्रात खूप नवनवीन प्रयोग केले. आता तर, श्वेताच्या स्वतःच्या डिझाईनचे
ब्लॉक्सही बनू लागले आहेत. त्यांच्या प्रयोगातूनच त्यांचे अजरख ब्लॉक
प्रिंटींगच्या साड्यांचे आणि त्यांनी डिझाईन केलेल्या इतर साड्यांचे आणि शिवाय
विणकरांकडून बनवून घेतलेल्या पारंपरिक साड्यांचे एक नवे कलेक्शन उभे राहत आहे.
विणकरांकडून घेतलेल्या कलेक्शनची ही पहिली अजरख ब्लॉक प्रिंटींगची साडी प्रियासाठी
खूप खास आहे ! मोडाल सिल्कवर अजरख प्रिंट केलेल्या या सुंदर तलम साडीच्या पदरावर
नक्षीदार ब्लॉकनी अजरख प्रिंटींग केले आहे आणि साडीच्या मधल्या भागात अजरखच्या
मोठ्या ब्लॉकवर ब्रशने सुंदर स्ट्रोक दिले आहे. प्रियाला ही साडी इतकी आवडली की
तिने या साडीवर खास फोटो शूट देखील करून घेतले.
प्रिया जेव्हा जेव्हा ही साडी नेसते तेव्हा
तेव्हा, अतिशय आत्मीयतेने ही साडी विणणाऱ्या विणकरांना आणि अजरख ब्लॉक प्रिंटींग
करणाऱ्या कलाकारांना ती मनातून एक जबरदस्त ‘सॅल्यूट’ करत असावी !
रश्मी विनोद सातव
rashmisatav@gmail.com
#VirasatIndia


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा