गुरुवार, १८ फेब्रुवारी, २०२१

‘साडी-वेडी’ समृद्धी ! - समृद्धी केळकरचे साडी प्रेम.........







 




‘साडी-वेडी’ समृद्धी !

समृद्धी केळकर - स्टार प्रवाहवरील, ‘फुलाला सुंगध मातीचा’ या ट्रेंडिंग मालिकेतील एक गुणी अभिनेत्री. लहानपणापासून अभिनयाबरोबरच शास्त्रीय नृत्याचीही अभिजात जाण असलेल्या समृद्धीने, कथक नृत्यात अलंकार पदवी संपादन केली आणि आता ती, तिची ही कला तिच्या अनेक विद्यार्थिनींना सुद्धा शिकवत आहे.

समृद्धीला साड्या नेसायला खूप आवडतात. साडी नेसायची कोणतीही संधी ती सोडत नाही. ‘साडी’ वर प्रचंड प्रेम करणाऱ्या समृद्धीने आपल्या बहिणीच्या लग्नात खास पैठणीच घ्यायची, असं ठरवूनच टाकलं होतं. त्यासाठी ती खास येवल्याला गेली होती. तिथल्या सगळ्या साड्यांमध्ये  तिच्या आवडीच्या निळ्या रंगाच्या, खास तिच्या आवडत्या शेडची पैठणी मात्र मिळत नव्हती. मग तिने कारागिरांना तिच्या मनातल्या निळ्या रंगाची पैठणी विणायला सांगितली. महिन्याभराने, ऑरेंज काठापदराची निळीशार पैठणी जेव्हा बनून आली तेव्हा तर समृद्धी कितीतरी वेळ त्या साडीवर हात फिरवीत राहिली आणि पदरावरच्या मोरांशी खूप वेळ हितगुज करत राहिली म्हणे !

आपल्या पेहेरावाच्या बाबतीत अत्यंत चोखंदळ असणाऱ्या समृद्धीकडे अनेक सुंदर साड्यांचा संग्रह आहे. तिच्या स्वर्गवासी आईच्या साड्या सुद्धा, आईची आठवण म्हणून समृद्धीने, खूप जीवापाड सांभाळून ठेवल्या आहेत. कार्यक्रमांमध्ये आपली आई, आपल्या बरोबर राहावी या भावनेने त्यातील काही साड्यांचे, समृद्धीने स्वतः डिझाईन करून वेगवेगळे ड्रेस शिवून घेतले आहेत. आईच्या पैठणीचा तर, स्वतः डिझाईन केलेल्या अतिशय हटके पॅटर्नचा, अतिशय सुंदर पायघोळ ड्रेस तिने शिवून घेतला आहे. आईच्या पारंपरिक पैठणीला आधुनिक ‘टच’ देणाऱ्या समृद्धीकडे अभिनय आणि नृत्याबरोबरच, फॅशनची सुद्धा एक जबरदस्त जाण आहे, असं म्हणायला हरकत नाही.

सध्या तरी, ‘फुलाला सुगंध मातीचा’, या मालिकेमुळे दिवसभर साडीत असल्यामुळे ‘साडी-वेडी’ समृद्धी खूपच खूश असते !    

     

        रश्मी विनोद सातव

    rashmisatav@gmail.com

    #VirasatIndia  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा