गुरुवार, १८ फेब्रुवारी, २०२१

महावस्त्र पैठणी !

 महावस्त्र पैठणी !

सातवाहन काळात तेव्हाच्या प्रतिष्ठान आणि आत्ताच्या पैठणमध्ये हातमागावर पैठणीची निर्मिती होत असल्याचे संदर्भ सापडले आहेत. पण खऱ्या अर्थाने १७ व्या शतकात पेशव्यांनी या उद्योगाला उर्जितावस्था दिली. संपूर्ण पेशवे घराण्याला या पैठण्यांचे खूप आकर्षण होते, पेशव्यांच्या घरातील स्त्रियांसाठी पैठणहून पैठण्या मागवल्या जात असत. शिवाय स्वतः पेशवे सुद्धा पैठणच्या कारागिरांकडून, पैठणीचे नक्षीकाम असलेली उपरणी बनवून घेत असत. श्रीमंत थोरल्या बाजीराव पेशव्यांनी, त्यांना हव्या असलेल्या, पैठणी-नक्षीचा नमुना पैठणला पाठवून, पैठणच्या कारागिरांकडून सुंदर रेशमी धोतर बनवून घेतल्याचा उल्लेख, संदर्भ ग्रंथांमध्ये आढळतो. पुढे पेशव्यांनी पैठणच्या, पैठणी विणणाऱ्या काही कारागिरांना नाशिक जवळ येवल्यात आणून स्थायिक केले आणि त्यांच्या कलेला, व्यावसायिक दृष्ट्या प्रोत्साहन दिले.

पूर्वी पेशवेकालीन पैठण्या, सोळा हात लांब आणि चार हात रुंद असत आणि त्या एकेक पैठणीचे वजन तीन ते साडेतीन किलो असायचे ! या कालखंडातील पैठण्यांची लांबी चक्क दोन ते तीन मजले असायची. तेव्हा पैठण्यांमध्ये शुद्ध सोन्याच्या जरीचे धागे वापरले जात असत. पूर्वी या पैठण्यांमध्ये बावीस तोळे चांदी आणि वेगवेगळ्या वजनाचे सोने वापरले जात असे. साडेअकरा ग्रॅम सोनं वापरलेल्या पैठणीला ‘बारामासी पैठणी’, साडेसतरा ग्रॅम सोनं वापरलेल्या पैठणीला ‘अठरामासी’ आणि सादेचौतीस ग्रॅम सोनं असलेल्या पैठणीला ‘छत्तीसमासी’ म्हणत. या ‘छत्तीसमासी’ पैठण्या खूप जड असत. आता मात्र, चांदीच्या किंवा तांब्याच्या धाग्यांवर सोन्याचे पाणी लावून ‘जर’ तयार केली जाते. सेमी पैठण्यांमध्ये तर सिंथेटिक जर वापरली जाते. 

   खूप पूर्वी रेशमी पैठण्यांबरोबर, गर्भरेशमी पैठण्या पण मोठ्या प्रमाणात बनत असत. गर्भरेशमी म्हणजे यात एक धागा तलम कॉटनचा आणि एक धागा रेशमाचा असतो. नंतर कॉटन धागा वापरणं पूर्ण बंद होऊन फक्त रेशमी पैठण्या बनू लागल्या, पण आता परत, चोखंदळ ग्राहकांसाठी डिझायनर गर्भरेशमी पैठण्या पण विणल्या जात आहेत.

तीन ते पाच प्लाय रेशमाचे धागे खूप जवळ जवळ म्हणजे एका इंचात १६० उभे धागे आणि १७० आडवे धागे वापरून पैठणी बनत असल्यामुळे पैठणीची वीण घट्ट आणि जाड असते, त्यामुळे ओरिजिनल पैठण्या पिढ्यानपिढ्या टिकतात. पुण्यातील केळकर म्युझियममध्ये जवळ जवळ दोनशे वर्षांपूर्वीच्या पैठण्या बघायला मिळाल्या. त्यातील पोपटी पैठणीचे केशरी-पिवळ्या रंगाचे पारंपरिक नारळी काठ आणि खऱ्या जरीच्या पदरावर विणलेल्या सुंदर कोयऱ्या आणि दुसऱ्या आमसुली रंगाच्या पैठणीचे केशरी रंगाचे पारंपरिक नारळी काठ आणि खऱ्या जरीच्या पदरावर रेशमाने विणलेली अतिशय सुंदर वेलबुट्टी म्हणजे दोनशे वर्षांपूर्वीच्या कलाकृतींनी, पैठण्या किती मनोभावे विणल्या जात असतील याची ग्वाही दिली.

     पूर्वी नैसर्गिक रंगात पैठण्या बनत असत त्यामुळे पैठण्या काही ठराविक रंगातच येत असत. लाल बॉर्डरची काळी पैठणी म्हणजे ‘चंद्रकळा’, पोपटी रंगाची ‘राघू पैठणी’, ‘क्षीरोदक’ नावाची पांढरी पैठणी, निळ्या रंगाची ‘निलीगुंजी’, पिवळ्या रंगाची ‘सोनकळी’, गुलाबी रंगाची ‘राणी’, लाल-हिरव्या रंगाची ‘पसिला’, काळ्या-पांढऱ्या रंगाची ‘गुजरी’, तर कांद्याच्या रंगाची  ‘अबोली’ पैठणी ! या रंगांच्या व्यतिरिक्त अंजिरी, दुधी, सोनकुसुंबी वगैरे रंगाच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पण पैठण्या असत. पूर्वी काही नैसर्गिक रंग करडीच्या मुळांपासून तयार करत असत आणि या रंगांचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला एक प्रकारचा सुगंध येत असे. आता मात्र अनेक रंगांच्या छटांमध्ये पैठण्या विणल्या जातात. यात आडवा धागा वेगळ्या रंगाचा आणि उभा धागा वेगळ्या रंगाचा वापरून फिरत्या रंगांच्या पैठण्या जास्त प्रमाणात असतात.

पैठणीवरच्या सुंदर नक्षीवरून, पैठणीला नावंही तशी ठेवली गेली आहेत. पैठणीवरील नक्षीकामाचा सर्वात जुना प्रकार म्हणजे ‘आसावली’. यात पदरावर आणि काठावर पाना-फुलांची सुंदर वेलबुट्टी असते. पदरावर आणि काठावर गोलाकार मोर असलेली ‘मोरबांगडी’ पैठणी आणि पोपट असतील तर ‘मुनिया’ पैठणी, डार्क कॉन्ट्रास्ट बॉर्डर असेल तर ‘कडीयाल’ पैठणी. शिवाय चौकोनी फुलांच्या नक्षीला ‘अक्रोटी’ म्हणले जायचे. पैठणीचा पदर म्हणजे तर सुंदर कलाकृतीचा एक उत्कृष्ट नमुना. सातवाहन काळातील पैठण्यांच्या पदरावर बगळे आणि राजहंस, तर यादवकालीन पैठण्यांवर कमळं जास्त असत, तसच मुघलकाळात पानं, फुलं, पक्षी विणले जात असत, तर आता मोर, पोपट, वाद्ये, नथ, कोयऱ्या, रुईफूल, कमळ, कळस, राधाकृष्ण वगैरे विणलेले दिसून येतात. शिवाय पैठणीच्या नक्षीत, अजंठा लेण्यातील कलाकुसरीचा मोठा प्रभाव दिसून येतो. पदर आणि काठावरची नक्षी आलेख पेपरवर काढून घेतली जाते आणि पैठणी विणतांना पैठणीच्या उभ्या धाग्यांच्या मागे तो आलेखाचा कागद ठेवला जातो आणि मग त्या डिझाईन प्रमाणे उभे धागे मोजून त्यात नक्षीला लागणारे रंगीत आडवे रेशमी धागे घालून आलेख पेपरवरची नक्षी साडीवर उतरवली जाते. काठ-पदरावरच्या कलाकुसरीवरून आणि पदराच्या लांबीवरून ती साडी बनायला लागणारे दिवस आणि किंमत ठरत असते. हातमागावर एक पैठणी विणायला कलाकुसरीप्रमाणे अंदाजे एक महिना ते एक वर्ष देखील लागू शकते. 

खरतर टप्याटप्याने पैठणी कशी बनत जाते आणि त्यातल्या बुट्ट्यांचे प्रकार, त्यांची नावं, पदराचे प्रकार या सगळ्या तांत्रिक गोष्टी कधीतरी वेगळ्या लेखात लिहाव्या लागतील इतका तो विषय मोठा आहे.

     पूर्वी फक्त राजघराण्यांमध्ये पैठण्या वापरल्या जात असत म्हणून पैठणीला महावस्त्र म्हटले जाई. आता प्रत्येक चोखंदळ स्त्रीकडे एक तरी पैठणी असतेच असते आणि त्या प्रत्येकीचं आपापल्या पैठणी सोबत एक घट्ट रेशमी नातं विणलं गेलं आहे, पैठणीच्या विणी सारखं !

पैठणीची भुरळ वर्षानुवर्षे जशी स्त्रियांना पडत आहे तशीच भुरळ मराठी साहित्याला देखील पडत आहे. कवियित्री शांत शेळके यांच्या ‘पैठणी’ या कवितेत पण, पैठणी हळुवार डोकावतांना दिसते....

“धूर, कपूर, उद्बत्यातून,

जळत गेले किती श्रावण,

पैठणीने जपले एक तन, एक मन .... ”

 

हातामागावरची प्युअर पैठणी ओळखायची कशी ?

·       पदरावरचे आणि काठावरचे डिझाईन आणि बुट्टी पुढून आणि मागून सारखीच दिसते आणि त्या प्रत्येक डिझाईनला मागून हाताने मारलेली एक खूप बारीक गाठ असते.

·       पॉवरलूम वरच्या पैठणीचे धागे मागच्या बाजूने सुट्टे असतात. ते कशात अडकूही शकतात. मात्र हातमागावरच्या पैठणीत एकही धागा सुट्टा नसतो.

 

·       पैठण आणि येवल्याच्या पैठण्यांना बौद्धिक मालमत्ता हक्काच्या अंतर्गत, केंद्र सरकारचे ‘जिओग्राफिक इंडीकेशन’ प्राप्त झाले आहे.

 

·       हातमागावरील पैठणीचे रेशीम जाड आणि घट्ट विणीचे असते. मधून मधून त्या रेशमाच्या बारीक गाठी दिसतात आणि त्या गाठींवरूनच ते प्युअर सिल्क असल्याची खात्री पटते.

 

  रश्मी विनोद सातव

  rashmisatav@gmail.com

  #VirasatIndia 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा