गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०२१

चांदणे शिंपित जाणारी….. ‘चंद्रकळा’ !

 

चांदणे शिंपित जाणारी….. ‘चंद्रकळा !

चंद्रकळा साडी म्हणजे नक्की कोणती साडी ? याबद्दल अनेक समज-गैरसमज आहेत. काळी पैठणी किंवा काळी इरकल म्हणजे चंद्रकळा का ? तर नाही ! ‘चंद्रकळा’, हे एक डिझाईन आहे. काळ्या किंवा काळ्याच्या जवळ जाणाऱ्या गडद निळ्या रंगाच्या साडीवर ‘चंद्रकळा’ हे डिझाईन असलेली साडी म्हणजे चंद्रकळा साडी ! या डिझाईनच्या बुट्ट्यामध्ये चंद्राची बारीक कोर आणि  चांदण्यां किंवा सुंदर छोटी फुलं विणलेली असते. म्हणजे चंद्राच्या कला आणि टिपूर चांदण्यांचं डिझाईन असलेली काळी साडी म्हणजे चंद्रकळा साडी !

पूर्वी महाराष्ट्रात नववधूला तिच्या पहिल्या संक्रांतीच्या सणाला चंद्रकळा साडी भेट देण्याची प्रथा होती. ती तिच्या पहिल्या संक्रांतीचे हळदीकुंकू, ही चंद्रकळा साडी नेसून करत असे. संक्रांतीच्या दिवशी, नेसल्या जाणाऱ्या पूर्वीच्या चंद्रकळांवर काटेरी हलव्यासारखी दिसणारी फुले पण कधीकधी विणलेली दिसत. पूर्वी या चंद्रकळा इरकल साड्यांमध्ये बनायच्या, नंतर चंदेरी, बनारसी आणि पैठण्यांमध्येही चंद्रकळा बनू लागल्या आणि मग असा समज झाला की काळी पैठणी म्हणजेच चंद्रकळा ! मग चांदण्यांसारख्या बुट्ट्या असलेल्या काळ्या  पैठण्या चंद्रकळा झाल्या !

खूप पूर्वी, विणलेल्या चंद्रकळेबरोबरच काही कमी किंमतीच्या, सोनेरी किंवा चंदेरी ‘खडी-काम’ केलेल्या चंद्रकळा पण बनत असत. पण काही वर्षांनी ती खडी जात असे. त्यामुळे अशा साड्यांची मागणी कमी झाली आणि त्या साड्या बनणे  बंद झाले, पण विणलेल्या चंद्रकळा पिढ्यांपिढ्या टिकत असत. पुण्यात केळकर वस्तूसंग्रहालयात, जवळ जवळ २०० वर्षांपूर्वीच्या दोन इरकल चंद्रकळा साड्या आणि चंद्रकळा डिझाईन असलेला एक पैठणी शेला उपलब्ध आहे. यातील अहिल्याबाई किर्लोस्करांनी म्युझियमला भेट दिलेल्या इरकल चंद्रकळेच्या पदरावर कर्नाटकी कशिद्याने सुंदर गोपुरं आणि चांदण्या विणलेल्या आहेत. शिवाय या पदरावर कृष्ण जीवनावर आधारित देवनागरीत अनेक काव्यपंक्ती विणलेल्या आहेत. त्या काळात बोरू शाईत बुडवून दोन शब्दात अंतर न ठेवता अखंड लिहित जायचे, त्याच पद्धतीने साडीवर अखंड विणलेल्या काव्यपंक्तीतील या काही ओळी,

‘सुंदर मुरली अधरी, नंदन अंगणी, गळ्यात वनमाला,

श्रीकृष्ण रूप, पाहुनी मोहुनी, गोपी बळेची पडती गळा |

गोविंदा गोपाळा, कृष्ण, विष्णू मुकुंदा,

घननीळा धृत कौस्तुभ वनमाळा, पितांबरधारी, देवकी बाळा |’

 

शिवाय, या संपूर्ण साडीवर पांढऱ्या, पिवळ्या रंगाच्या रेशमाने बारीक चांदण्या आणि छोट्या आरश्यांच्या भोवती विणकाम केलेली फुलं आहेत. या साडीला चंद्रकळेचा, अतिशय अप्रतिम आणि दुर्मिळ नमुना म्हणावा लागेल. आणि दुसऱ्या चंद्रकळेवर पण छोटी गोपुरं आणि नक्षीदार चौक कशिद्यात भरलेली असून संपूर्ण साडीवर छोट्या चांदण्यांसारखी फुलं भरलेली आहेत. ज्या स्त्रियांनी या चंद्रकळा तेव्हा नेसल्या असतील, किती अभिमानाने मिरवल्या असतील !

अशी ही, सुंदर काळ्या रंगाची नजाकत असलेली साडी, जी नेसल्यावर रात्रीचे टिपूर चांदण्यांचे आकाश अंगावर पांघरल्याचा भास होतो, अशी एक तरी चंद्रकळा आपल्याकडे हवी अशी स्वप्नं आता चोखंदळ स्त्रियांना पडू लागतील हे नक्की !    


चंद्रकळेविषयी आणखी काही महत्त्वाचे :

  • ·        मराठी साहित्यातील १६ व्या शतकातील ओवी, गवळणी आणि भारुडांमध्ये आलेल्या चंद्रकळेच्या उल्लेखावरून, चंद्रकळा तेव्हा १६ व्या शतकात अस्तित्त्वात होती याचे दाखले मिळतात. 
  • ·       पेशवेकालीन संस्कृतीत, सासूचा वापरात असलेला चंद्रकळा डिझाईनचा शेला, योग्य वेळ आल्यावर सासू, आपल्या सुनेला भेट म्हणून देत असे. घराच्या सगळ्या जबाबदाऱ्या आता सुनेवर सुपूर्त करण्याचे ते प्रतिक असे.
  •      पुण्यात केळकर वस्तूसंग्रहालयातील अहिल्याबाई किर्लोस्करांनी भेट दिलेल्या चंद्रकळा साडीवरील काव्यपक्ती खूप वर्षांपासून नक्की काय लिहिल्या आहेत ते वाचता येत नव्हत्या. साडी खूप जुनी असल्यामुळे त्यातील काही अक्षरे विरली होती. पण यासाठी मी, कर्वेनगरमधील, संस्कृतमध्ये एम.ए. केलेल्या पूजा लेले हिची मदत घेतली. तिचा संस्कृतचा गाढा अभ्यास असून तिने आणि तिच्या सासूबाईंनी-विद्याताई लेले यांनी मिळून या काव्यपंक्तींचा अभ्यास केला. तिच्या सासूबाई म्हणाल्या त्या काळात मराठी लिहितांना बऱ्याचदा दोन शब्दात अंतर ठेवत नसत आणि त्याच पद्धतीने त्या काव्यपंक्ती साडीच्या पदरावर विणल्या होत्या. त्यां दोघींनी अभ्यास करून त्या काव्यपंक्ती एका कागदावर लिहून दिल्या. या काव्यपंक्ती कोणत्याही धर्मग्रंथातल्या नसून साडीवर भरतकाम करणाऱ्या व्यक्तीने किंवा ती साडी विणून घेणाऱ्या व्यक्तीने त्या स्वतः तयार केलेल्या असाव्यात. त्या शुद्ध मराठीत असून त्यात कृष्णाचे वर्णन केले आहे.

 



आभार :

धन्यवाद, मृणाल देव-कुलकर्णी, प्रसिद्ध अभिनेत्री.

धन्यवाद सुधन्वा रानडे, संस्थापक केळकर म्युझियम पुणे.      

धन्यवाद, शितल पवार, ग्रंथालय व्यवस्थापक, केळकर म्युझियम पुणे.

धन्यवाद, पूजा लेले, संस्कृत भाषेची अभ्यासिका आणि

धन्यवाद विद्याताई लेले.      


रश्मी विनोद सातव

 rashmisatav@gmail.com              

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा