गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०२१

मृणाल आणि चंद्रकळा - एक ऐतिहासिक नाते.

 


मृणाल आणि चंद्रकळेचे घट्ट गहिरे नाते !

मृणाल देव-कुलकर्णी हे नाव नुसते ऐकले तरी, १९८८ मध्ये लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या ‘स्वामी’ मालिकेतील भावूक डोळ्यांची, लाघवी रमाबाई पेशवे आपल्या डोळ्यासमोर स्पष्ट उभी राहते ! या मालिकेतल्या तिच्या कसदार अभिनयाबरोबरच तिचा पेशवाई पेहेराव पण आपल्या लक्षात राहिला – तिने घातलेले दागिने, तिने नेसलेल्या नऊवार साड्या आणि बरंच काही ! तिच्या त्या साड्यांमधली एक साडी मृणालसाठी खूप खास होती – सरदार घराण्यातली नऊवार पैठणी-चंद्रकळा !  

जेव्हा स्वामी या मालिकेत, रमाबाईंच्या भूमिकेसाठी मृणालची निवड झाली तेव्हा तिच्या दोन्ही आजोबांना प्रचंड आनंद झाला ! दोन्ही आजोबा म्हणजे - एक तिचे आईचे वडील, साहित्यिक गों.नि. दांडेकर आणि दुसरे आजोबा म्हणजे तिच्या आजोबांचे खास मित्र – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ! बाबासाहेबांना जेव्हा हे कळाले की मृणाल, रमाबाईंची भूमिका करणार आहे तेव्हा त्यांनी खास तिच्या त्या भूमिकेसाठी सरदार नातू घराण्यातील अनमोल ठेवा असलेली चंद्रकळा आणि खऱ्या सोन्याचे पेशवाई दागिने मृणालसाठी पाठवून दिले ! मृणालसाठी ते सगळं खूप अदभूत होतं ! ती म्हणाली, “तेव्हा मी फक्त सतरा वर्षांची होते, रमाबाईंसारख्या ऐतिहासिक जबाबदार भूमिकेसाठी, ऐतिहासिक ठेवा असलेली ती नऊवार चंद्रकळा नेसल्यानंतर मनावर आलेलं गोड ओझं, कोणत्याच अर्थाने मला पेलवण्यासारखं नव्हतं ! .... पण मी प्रयत्नपूर्वक ते पेललं ! ” शुटींगसाठी ती चंद्रकळा नेसल्यावर, शुटींग संपले तरी मृणाल कितीतरी वेळ ती साडी अंगावर मिरवत रहायची ! आजही मृणालच्या, मौल्यवान आठवणीच्या कप्प्यात त्या साडीला एक अढळ स्थान आहे.


पुढे २००८ मध्ये मृणालच्या आयुष्यात अजून एक चंद्रकळा आली ! नितीन देसाईंच्या, ‘राजा शिव छत्रपती’ या मालिकेत जिजाबाई साहेबांच्या भूमिकेतील मृणालसाठी, कॉस्च्युम डिझायनर पौर्णिमा ओक हिने चंद्रकळा बनवायचीच असं ठरवलं. मग मृणालचा रमाबाईंच्या गेटअप मधला जुना फोटो बघून जिजाबाई साहेबांच्या भूमिकेला शोभेल अशी चांदणी-फुलांच्या बुट्ट्याची सुंदर अशी पैठणी-चंद्रकळा बनवून घेतली आणि मृणालने परत एकदा नऊवार चंद्रकळा ल्यायली ! तेव्हा परत एकदा मृणालचे आणि चंद्रकळेचे रेशमीधागे जुळले ते पुढे कायम राहिले कारण मग मृणालने स्वतःची अशी खास चंद्रकळा पैठणी बनवून घेतली !


मृणालकडे पैठण्यांचा खूप मोठा संग्रह आहे, तिचे यजमान ॲड. रुचिर कुलकर्णी, तिच्या या संग्रहाला ‘पैठणी म्युझियम’च म्हणतात ! अनेक रगां-ढंगाच्या पैठण्यांबरोबर खेळ जिंकून आदेश भावजींकडून मिळालेली पैठणी पण तिच्या या संग्रहांत आहे, पण पैठणीच्या तिच्या या म्युझियम मध्ये, मृणालच्या करीयरमधील दोन्ही महत्त्वाच्या भूमिकेची साक्षीदार असलेल्या चंद्रकळेचे स्थान मात्र कायमच अबाधित राहील ! 


  रश्मी विनोद सातव

 rashmisatav@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा