गुरुवार, ४ मार्च, २०२१

पर्णच्या आज्ज्यांचा ‘चंदेरी ठेवा’ !

 


पर्णच्या आज्ज्यांचा ‘चंदेरी ठेवा’ !

चित्रपट आणि नाटक करणाऱ्या कसदार अभिनेत्री पर्णचं जसं अभिनयावर नितांत प्रेम आहे तसंच साड्यांवर पण आहे. तिला कॅाटन आणि सिल्कच्या माहेश्वरी, कलमकारी, इंडीगो साड्या खूप आवडतात. तिच्या सोशल मिडियावरच्या आद्याच्या फोटोंची कायम चर्चा असते. चांदीचे दागिने आणि वेगवेगळ्या साड्या, पर्ण खूप प्रभावीपणे कॅरीकरते. 

पर्णचे आईवडील तिच्या लहानपणी फिरतीवर असत त्यामुळे पर्णच्या आयुष्याची संस्कारमूल्य रुजली गेली ती तिच्या दोन आज्ज्यांच्या तालमीत ! पुस्तकं एकत्र वाचणं, मराठी लिखाणाचा सराव करणं, मनापासून काढलेल्या ( कधी कधी भिंतींवरच्याही ) चित्रांचं भरभरून कौतुक करणं, नृत्याच्या कार्यक्रमांना प्रोत्साहन देणं, कविता करणं आणि म्हणणं, कायम पहिलं महत्त्व कामाला आणि शिक्षणाला देणं, समानतेची मुल्य रुजवणं, निगुतीने स्वयंपाक करणं, घरी आलेल्या प्रत्येक माणसाला जेवू घालणं, कष्ट करणं, इत्यादी गोष्टी तिला दोन्ही आज्ज्यांकडून मिळाल्या. दोन आज्ज्या म्हणजे पर्णची आईची आई आणि वडिलांची आई.

पर्णवर शिक्षणाचा आणि कलेचा प्रभावी संस्कार करणाऱ्या या दोन कणखर आज्ज्या आणि पर्ण यांच्या नात्यांची रेशमी - वीण घट्ट होती. पण काळाच्या ओघात त्या विणीचा एकेक धागा सुटत गेला. पर्ण शाळेत असतांना तिची एक आज्जी आणि पर्ण कॉलेजमध्ये असतांना दुसरी आज्जी, तिला सोडून देवाघरी गेल्या आणि पर्णच्या आयुष्यात खूप मोठी पोकळी निर्माण झाली. मग तिनं तिच्या आज्ज्यांच्या स्मरणार्थ, फर्ग्युसन कॉलेजकडून फिरोदीया करंडकासाठी ‘काशीयात्रे’ नावाचं नाटक बसवलं. सुधा मुर्तींच्या how I taught my grandmother to read नावाच्या गोष्टीवरची ही एकांकीका बरीच गाजली. 

पुढे पर्णची आणि आलोकच्या आईच्या आईची घट्ट मैत्री जमली आणि पर्णच्या सुटलेल्या विणीत नवीन नात्याचा एक धागा जोडला गेला, तो सुलभाआज्जीमुळे ! पर्णच्या नाट्यकलेला मनापासून प्रोत्साहन देणारी ही आज्जी कायम, “मला तुझ्या नाटकाला यायला खूप आवडतं....” असं म्हणायची. सोज्वळ नटायची आवड असणारी सुलभा आज्जी, पर्णला कधी बांगड्या, गजरे तर कधी फुलं आणायला सांगायची. कधीही, “माझे आता वय झालयं, मला हे नको, ते नको”, असं न म्हणता, ती भरभरून जगायची. या आज्जीचा आवडता रंग – निळा, म्हणून पर्णने सुलभाआज्जीसाठी एकदा छान निळीशार, तलम गर्भरेशमी चंदेरी साडी आणली. सुलभा आज्जीला ती चंदेरी साडी इतकी आवडली की, ती कितीतरी वेळ त्या साडीवर आणि पर्णच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत राहिली आणि खूप वेळा प्रेमाने ती साडी नेसली देखील.  

पर्ण आणि आलोक बाहेर निघाले की, टेबलापाशी नेहमीच्या जागी बसून सुलभा आज्जी नेहमी म्हणायची, “लवकर परत या रे .....मी वाट बघत राहीन तुमची...... ” कायम पर्णची वाट बघत बसणाऱ्या सुलभा आज्जीनं पाच महिन्यांपूर्वी जगाचा कायमचा निरोप घेतला.... आणि पर्णनं तिला दिलेली निळीशार चंदेरी साडी आज्जीचा ठेवा म्हणून पर्णकडे आली. शिवाय तिच्या दोन्ही आज्ज्यांच्या साड्या आणि गोधड्याही तिने जपल्या आहेत. पर्णने तिच्या आदर्श असलेल्या कलाकार- सुमित्रा भावे आणि ज्योती सुभाष यांनी दिलेल्या साड्याही खूप निगुतीनं ठेवल्या आहेत. कधीही खचायला झालं तर या विद्वान बायकांच्या साड्यां तिला आशा आणि ताकद देतात. पर्णच्या आयुष्यात आलेल्या सगळ्या आज्ज्यांच्या संस्कारांच्या ठेव्याने पर्णला खूप काही दिलं आहे.

सुलभाआज्जीची आठवण झाल्यावर, पर्ण ती निळीशार चंदेरी साडी आवर्जून नेसते आणि तिला त्या साडीच्या प्रत्येक धाग्यात आज्जीचा मऊ मुलायम स्पर्श मोहरून टाकतो आणि नकळतपणे पर्णच्या ओठांवर शांता शेळकेंची, ‘पैठणी’ ही कविता तरळून जाते......पण कवितेत असणाऱ्या ‘पैठणी’च्या जागी, पर्णला चंदेरी साडी दिसत असावी.......

“कधीतरी ही पैठणी, मी धरते ऊरी कवळून,

मऊ मुलायम स्पर्शामध्ये आज्जी भेटते मला जवळून |

मधली वर्षे गळून पडतात, कालपटाचा जुळतो धागा,

पैठणीच्या चौकाड्यांनो, आज्जीला माझ्या कुशल सांगा..... ” 

     


 






रश्मी सातव 

rashmisatav@gmail.com

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा