नृत्याचा ताल मुळातच अंगात भिनलेल्या ऋजुताने आपल्या अभिजात नृत्याचे प्रशिक्षण
स्वर्गीय पंडिता डॉक्टर रोहिणीताई भाटे आणि तालयोगी पद्मश्री पंडित सुरेशजी तळवलकर
यांच्याकडे घेतले आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून कथ्थकमध्ये पदव्युत्तर
पदवी संपादन केली. ‘ऋजुता सोमण कला अकादमीची’ संस्थापिका असलेली ऋजुता
आंतरराष्ट्रीय पातळीवरची नृत्य-कलाकार आहे. नृत्यकलेवर अफाट प्रेम करणारी ऋजुता
सध्या जयपूर घराण्यातील कथ्थकचे बारकावे पंडित राजेंद्रजी गंगाणी यांच्याकडून शिकत
आहे.
‘नृत्य अलंकार’, ‘सिंगार मणी’, ‘श्री नंदिनी अवार्ड’ सारख्या अत्यंत
प्रतिष्ठित पुरस्कारांनी तिच्या नृत्यकलेचा सन्मान करण्यात आला आहे. शिवाय भारत
सरकारच्या ‘इंडियन कौन्सिल
फॉर कल्चरल रिलेशन्स, मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स’च्या
समितीवर प्रतिष्ठित कलाकार श्रेणी मध्ये समावेश असलेल्या ऋजुतानं मोठमोठ्या
कलाकारांबरोबर आपल्या नृत्यकलेतून भारतीय संस्कृतीचं सादरीकरण अनेक देशांमध्ये केलं
आहे. या आंतरराष्ट्रीय सादरीकरणाबरोबरच भारतातही ‘गानसरस्वती महोत्सव’, ‘खजुराहो
महोत्सव’, ‘स्वरतीर्थ महोत्सव’ सारख्या अनेक प्रतिष्ठित महोत्सवातून आपली अद्भूत
कला सादर केली आहे. तसच सॅक्सोफोन, सतार, तबला, बासरी, राजस्थानी संगीत, कर्नाटकी व्होकल, सुफी या निरनिराळ्या
कलांच्या क्षेत्रातील प्रतिष्ठित कलाकारांबरोबर आपल्या केलेचं फ्युजन करून त्याचे
अप्रतिम सादरीकरण करण्यात ऋजुताचा हातखंडा आहे. ऋजुताचं आपल्या कलेवर जसं मनापासून
प्रेम आहे तसचं अजून एका गोष्टीवर ती मनापासून प्रेम करते !
ऋजुता, नृत्याची रचना बसवतांना आणि सादर करतांना जेवढी चोखंदळ आहे
तेवढीच चोखंदळ ती साड्या खरेदी करतांना आणि साड्यांचा संग्रह करतांना आहे. ऋजुताला
कॉलेजमध्ये असल्यापासून साड्या नेसायला भारी आवडायचं. पण तेव्हा तिच्या स्वतःकडे
एकही साडी नव्हती. तेव्हा आईच्याच ती साड्या नेसत असे.
ऋजुताच्या सख्या भावाचे लग्न ठरल्यावर आईनं खास तिला तिची स्वतःची
साडी घ्यायचे ठरवले. मला माझी खास स्वतःची अशी साडी मिळणार या कल्पनेनेचे ती हरखून
गेली. दोघी उत्साहात खरेदीला गेल्या. अनेक दुकाने पालथी घातली परंतु त्यांना
कोणतीच साडी पसंत पडेना. शेवटचे दुकान बघून घरी परतू असा विचार करून त्या दोघी
शेवटच्या दुकानात शिरल्या. खरतर साड्या बघायचा उत्साहच नव्हता. उत्साही दुकानदाराने
गठ्ठा आणला आणि पहिली साडी उघडली. ऋजुता आणि तिची आई त्या पहिल्याच साडीच्या बघता क्षणीच
प्रेमात पडल्या ! ऋजुताचा आवडता रॉयल ब्लू रंग, मऊ मुलायम पोत, काठावर आणि पदरावर
केलेलं हटके रेशीम काम, उच्च प्रतीच्या सिल्कच्या धाग्याची चकाकी – सगळ्याच गोष्टी
एकदम मनासारख्या जुळून आल्या होत्या. कधीच अशी डिझायनर सॉफ्ट सिल्कची साडी त्यांनी पाहिलीच नव्हती. पुढची एकही साडी न
बघता त्या साडीची सन्मानपूर्वक खरेदी झाली. त्या रात्री ऋजुताच्या स्वप्नात सारखी
तीच साडी येत होती म्हणे !
भावाच्या लग्नात खूप मनापासून ऋजुताने ती साडी मिरवली आणि त्या साडीला
‘वाहवा’ पण खूप मिळाली. शिवाय ऋजुताचं पहिलं-वहिलं फोटो शूट या तिच्या
पहिल्या-वहिल्या साडीत झालं आणि तिथूनच तिच्या दैदीप्यमान करियरला सुरुवात झाली.
त्यामुळे ऋजुतासाठी ही साडी खूप खूप खास आहे. पुढे ऋजुताच्या साड्यांच्या संग्रहात
खूप वेगवेगळ्या साड्यांची भर पडली पण ऋजुताच्या या पहिल्या साडीचा मान आज ३० वर्षे
झाली तरी तोच आहे.
आज ३० वर्षे झाली तरी अजूनही ती साडी आहे तशीच आहे, तोच तजेलदार रंग, तीच चकाकी, तोच मऊ मुलायम धागा, साडीवरच तेच प्रेम आणि बरच काही ! ऋजुताच्या बाकीच्या बऱ्याच महाग महाग साड्यांचे, डान्सचे ‘कॉसच्युम्स’ शिवून झाले पण ऋजुता या साडीला कात्रीच काय कोणाला हातही लावू देत नाही ! ऋजुता त्या साडीबद्दल इतकी ‘पझेसिव्ह’ आहे ना, की ती साडी ऋजुता कुण्णा-कुण्णालाही देत नाही ! ऋजुताच्या मनाच्या आणि कपाटाच्या खास ठेवणीतल्या कप्प्यातली ती साडी अशीच तिला उत्तरोत्तर लाभू दे आणि इथे ऋजुताच्या खास साडीची कथा इति संपूर्णम् !
रश्मी विनोद सातव
rashmisatav@gmail.com
#VirasatIndia


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा