शुक्रवार, २९ जानेवारी, २०२१

सॉफ्ट सिल्कची साडी

सॉफ्ट सिल्कचे रेशीमबंध !

५००० वर्षांपूर्वी चीन देशात नकळतपणे रेशमाच्या धाग्यांचा शोध लागला, असं म्हणतात. चीनमध्ये एक ‘लेएचू’ नावाची सम्राज्ञी होती, एके दिवशी ती तिच्या बागेत संध्याकाळचा चहा घेत बसली होती. तिच्या जवळच मलबेरीचं झाड होतं, त्या झाडावरून एक लांबट ‘कोष-सदृश्य’ वस्तू तिच्या गरम चहात येऊन पडली. ती वस्तू काय आहे आणि ती कुठून पडली याचा ती शोध घेत होती. तोपर्यत तो ‘कोष’ त्या गरम चहातच राहिला. थोड्या वेळाने तो कोष बाहेर काढतांना तिच्या असे लक्षात आले की त्या कोषातून मुऊसूत चकाकणारा अखंड धागा निघतो आहे. हाच तो सुंदर रेशमाचा धागा. पुढची कितीतरी वर्ष, रेशमाचा धागा कसा बनतो याचं गुपित फक्त चीनपुरतच मर्यादित होतं. पुढे देशातर्गत दळणवळण आणि व्यापार सुरु झाला, मग सिल्कचं कापड कसं असतं आणि ते कसं बनवले जाते हे गुपित हळूहळू इतर जगाला देखील कळाले. पुढे आशिया खंडात, सिंधू नदीच्या खोऱ्यात झालेल्या उत्खननात देखील सिल्कच्या कापडाचे अवशेष सापडले आहेत.

आता जगभरात सिल्कचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होतो आहे. भारतात सिल्कची खूप मोठी बाजारपेठ असून भारतातील सिल्कच्या साड्या जगभर प्रसिद्ध आहेत. शिवाय या सिल्कच्या साड्यांचे अगणित प्रकार आहेत. या प्रकारांमधली एखादी सिल्कची साडी विकत घ्यायला गेल्यावर अगदी डोळे झाकून घ्यावा असा प्रकार म्हणजे ‘सॉफ्ट सिल्क साडी !’

कोणत्याही वयाला, कोणत्याही कार्यक्रमाला शोभून दिसणारी अशी हि साडी वापरायला अतिशय हलकी-फुलकी आणि आरामदायक असते. आरामदायक म्हणजे – नैसर्गिक धागा वापरलेला असल्यामुळे उन्हाळ्यात कितीही गर्मी असली तरी या साडीत गरम होत नाही. या साडीचा पोत खूपच मऊ असतो त्यामुळे ही साडी वापरणं म्हणजे एक मस्त अनुभव असतो.

या साडीचा काठ, पदर, प्रिंट या गोष्टी पारंपरिक साड्यांसारखे काही ठराविक नसतात. मॉडर्न आणि हटके डिझाइन्स, ही या साडीची खासियत म्हणता येईल. या साड्यांमध्ये खूप वेगवेगळे पॅटर्न्स बघायला मिळतात. सॉफ्ट सिल्कच्या, डिझायनर साड्यांमध्ये तर वेगवेगळ्या शैलीच्या डिझायनचं सुंदर फ्युजन असतं ! या डिझायनर साड्यांमध्ये कधी कधी सॉफ्ट सिल्कच्या एका धाग्याबरोबर एक ज्यूटचा धागा वापरून एक वेगळाच सुंदर पोत तयार केला जातो. या साड्यांमध्ये मऊपणाला महत्त्व असल्यामुळे शक्यतो जरीचा वापर केलेला नसतो तर बऱ्याचदा रेशीम काम केलेले असते. शिवाय अतिशय सुंदर रंगात बनणारी प्युअर सॉफ्ट सिल्कच्या साडीची चमक वर्षानुवर्षे कमी होत नाही.  

पटकन नेसून होणारी आणि ‘कॉर्पोरेट लूक’ असलेली अशी ही अभिजात साडी नेसल्यावर तर फारच ग्रेसफुल दिसते.      

 

चौकटीत : सिल्कचा धागा कसा बनतो ?

·       ‘पतंग’ नावाच्या, पाकोळी सारख्या दिसणाऱ्या नर आणि मादी किटकाचे मिलन झाल्यावर, मादी पतंग ५ ते ६ दिवस, रोज थोडी थोडी करून एकूण ३०० ते ५०० छोटी छोटी अंडी घालते. ती अंडी उबदार वातावरणात ठेवली जातात आणि मग त्यातून ७ ते १४ दिवसांत छोट्या छोट्या सुरवंटासारख्या आळ्या बाहेर येतात. मग त्यांना मलबेरी झाडाची भरपूर ताजी पानं खायला दिली जातात. जवळ जवळ एक महिना या आळ्या फक्त खातच राहतात आणि जाडजुड होतात. त्यांची वाढ पूर्ण झाल्यावर त्या पान खाण्याचं थांबवतात आणि त्यांच्या तोंडात असलेल्या विशिष्ट ग्रंथींमधून एक प्रकारचा स्त्राव लांबच लांब तंतूच्या स्वरुपात स्त्रवू लागतो. या तंतूचा वापर करून या आळ्या स्वतःच्या भोवती कोष तयार करतात आणि या एका कोषापासूनच तब्बल एक किलोमीटर लांबीचा सिल्कचा तंतू मिळतो !

 ·       मलबेरीची पानं हा त्यांचा आहार असल्यामुळे त्यांच्यापासून मिळणाऱ्या तंतूंना मलबेरी सिल्क असे म्हणतात. असे हे काही तंतू एकत्र करून त्याला पीळ देऊन त्याचा सिल्कचा धागा बनतो आणि हे धागे विणून सिल्कचं कापड किंवा सिल्कच्या साड्या बनतात.    


रश्मी विनोद सातव

      rashmisatav@gmail.com

      #VirasatIndia

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा