गुरुवार, ११ मार्च, २०२१

देखणी, सुंदर 'पूना साडी'

 

 पुणेरी पुना-साडी.

पद्मशाली समाजातील काही विणकर १९३० साली आंध्रप्रदेशातून पुण्यात येऊन स्थायिक झाले आणि त्यांनी हातमागावर खादीचे कापड विणायला सुरुवात केली. पुढे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खादीच्या कापडाची मागणी आणि हातमागावर काम करणारे कुशल कामगार कमी होत गेले. मग या समाजाने १९७० साली त्या हातमागांवर, सुंदर सुती पारंपरिक साड्या विणायला सुरुवात केली आणि त्या पारंपरिक साड्यांना नाव पडले ‘पुना साडी’. ही पुणेरी साडी बनवणारे पद्मशाली समाजाचे लोक हे हिंदी भाषिक असल्यामुळे आणि महाराष्ट्राबाहेर पण या साडीचे वितरण होत असल्यामुळे या पुणेरी साडीला, ‘पुना-साडी’ हेच नाव रूढ झाले.

पुण्यात भवानी पेठेत हातमागांवर सुंदर पुणेरी साड्या बनू लागल्या. अल्पावधीतच या साड्या खूप लोकप्रिय झाल्या आणि मग भवानीपेठेतील जागा आणि कुशल मनुष्यबळ दोन्ही कमी पडू लागले. मग भवानीपेठेतील पद्मशाली समाजातील कुन्देन कुटुंबाने १९९० मध्ये पुणे जिल्ह्यातील थेऊर गावी या पुणेरी साड्यांची मोठी ‘कुन्देन मिल’ उभी केली आणि मग या इथूनच संपूर्ण भारतभर या पुणेरी साड्या वितरीत होऊ लागल्या.  

या मऊसूत सुती साड्या, मध्ये प्लेन असतात किंवा संपूर्ण साडीभर वेगवेगळ्या आकाराच्या चौकड्या किंवा बारीक रेषा असून अतिशय सुंदर असे ‘कॉन्ट्रास्ट’ काठ असतात. या साड्यांमध्ये पारंपरिक काठामध्ये खूप वैविध्य असते. या मोहक काठांना, त्यावरील डिझाईनवरून रुद्राक्ष बॉर्डर, रुईफुल बॉर्डर, डायमंड बॉर्डर, पैठणी बॉर्डर, गोमी बॉर्डर, पुणेरी गोमी बॉर्डर, पुणेरी जरी बॉर्डर, सॅटीन पट्टी बॉर्डर अशी छानशी नावे पण आहेत. या बॉर्डर्स बघून पद्मशाली समाजाच्या कारागीरांच्या कारागिरीला मनापासून दाद द्यावीशी वाटते. या लोकांनी या बॉर्डर्स स्वतः डिझाईन केल्या आहेत आणि त्यात अनेक नवनवीन प्रयोग देखील केले आहेत. साडी आणि साड्यांचे ‘कॉन्ट्रास्ट’ काठ-पदर यांच्या रंगसंगतीत अमर्याद पर्याय या साडीत उपलब्ध असतात आणि शिवाय ते रंगही टिकावू असतात.

रंगीत दोऱ्यांपासून ते प्रत्यक्ष साडी तयार होण्यापर्यंतचा रंजक प्रवास बघण्यासाठी लोक खास थेऊरच्या मिलला भेट देतात आणि टप्प्याटप्प्याने तयार होणारी पुणेरी साडी बघून थक्क होतात. कोईमतूरहून मागवलेल्या मोहक रंगांच्या मोठ्या कोनांपासून छोटे कोन तयार केले जातात. मोठे कोन म्हणजे, रंगीत दोऱ्यांचे मोठे बॉबीन आणि छोटे कोन म्हणजे मध्यम आकाराचे बॉबीन. मग ‘वॉरपिंग’ केले जाते. वॉरपिंग म्हणजे, एका मोठ्या ड्रमवर सगळे उभे धागे (वॉर्प) ओळीने लावून घेतले जातात आणि तिथून ते एक मोठ्या रुळावर घेतले जातात. ही प्रक्रिया खूप क्लिष्ट असते. पुढच्या अनेक टप्प्यांमधून जात शेवटी पॉवरलूम वर साडी बनण्याची प्रक्रिया सुरु होते. आडव्या आणि उभ्या धाग्यांच्या त्या विणीतून तयार होत जाणारी सुंदर काठांची पुना-साडी तयार होतांना बघतांना असे वाटते की आपण नेहमी नेसतो ती साडी बनण्याच्या मागे कितीतरी कष्ट आहेत ! नंतर त्या साडीचे होणारे फिनिशिंग, रोल प्रेस आणि अतिशय सुंदर घातली जाणारी घडी – हा संपूर्ण प्रवास खूपच बघण्यासारखा आहे.

सुंदर रंगसंगतीच्या, वेगवेगळ्या काठाच्या, प्लेन किंवा चौकडीच्या या पुणेरी साड्या पॉवरलूमवर बनत असल्यामुळे खूपच माफत दरात उपलब्ध असतात. कधीही, कुठेही नेसता येणाऱ्या हलक्या-फुलक्या, माफक दराच्या या साड्या दिसायला मात्र खूपच उंची आहेत त्यामुळे अतिशय सुबक काठांच्या या पुणेरी साड्या आपल्या साडी-संग्रहात असायलाच हव्यात अशा आहेत.    

थेऊरच्या कुन्देन मिलला भेट देण्यासाठी खालील नंबर्स वर संपर्क साधू शकता :

Mr. Subhash Kunden 9970945554

Mr. Sunil Kunden   9970015405

 

 

    

 

1 टिप्पणी: