गुरुवार, १५ एप्रिल, २०२१

‘भाडीपा’ची आई म्हणते .......‘ओडिशा साडी हवीच’ ...... शास्त्र असतं ते !

 


‘ओडिशा साडी हवीच’ ...... शास्त्र असतं ते !

संपूर्ण महाराष्ट्रात, ‘भाडीपा’ची आई म्हणून माहित असलेली रेणुका दफ्तरदार खरं तर वयाने फार मोठी नसूनही आईची भूमिका तिने कमाल केली आहे ! ‘मन फकीरा’, ‘कैरी’, ‘हा भारत माझा’, ‘अरेबियन नाईट्स’, ‘१० वी फ’, ‘जिंदगी जिंदाबाद’, ‘दोघी’, ‘वास्तुपुरुष’, ‘गिरणी’, ‘वळू’ आणि ‘विहीर’ या सारख्या इतर चित्रपटांमधून पण तिचा कसदार अभिनय अफलातून झालाय. ‘भाडीपा’ मधली आई नेहमी जरी ‘सलवार-कुर्त्या’च्या ‘गेटअप’मध्ये असली तरी रेणुकाला सतत सुंदर साड्या विकत घ्यायला आणि नेसायला प्रचंड आवडतात. शुटींग निमित्त, ती ज्या ठिकाणी जाते, तिथली खासियत असलेली साडी ती आवर्जून घेत असते शिवाय ‘हॅन्डलूम’ साड्यांच्या प्रदर्शनात जाऊन, एखादी तरी साडी घेतच असते. रेणुका म्हणते, “प्रदर्शनात गेल्यावर सुंदर साडी घ्यायलाच पाहिजे......शास्त्र असतं ते !”   

 

एकदा ती आणि तिची मावशी – सुमित्राजी भावे, या दोघीजणी एका शुटींगमधून वेळ काढून पुण्यात ‘हॅन्डलूम’ साड्यांचं प्रदर्शन बघायला गेल्या होत्या. तिथे वेगवेगळ्या राज्यांमधील हॅन्डलूम’ साड्यांचे निरनिराळे स्टॉल्स होते. प्रदर्शनात फिरत फिरत त्या दोघी ओडिशा राज्याच्या स्टॉलपाशी थबकल्या. तिथे त्यांना ओडिशा राज्याची खासियत असलेल्या हॅन्डलूम’ साड्यांचा खजिना सापडला ! सगळ्याच साड्या एकसे-एक होत्या, ही घेऊ की ती घेऊ ? असं त्या दोघींना झालं ! इतक्यात दोघींची नजर एका सुंदर साडीवर पडली, दोघीही त्या साडीच्या प्रेमात पडल्या. पण सुंदर विणकाम केलेल्या त्या काल-काळ्या हॅन्डलूम’ संबलपुरी साडीची किंमत जरा जास्तच होती. सुमित्रा मावशी म्हणाली, “उगाचच कशाला काही कारण नसतांना एवढा खर्च करायचा ? सारख्याच तर आपण साड्या घेत असतो.” पण रेणुकाने तिला खूप आग्रह केला, ती मावशीला म्हणाली, “आक्कामावशी घे तू ही साडी, एवढा विचार नको करू. तुझ्या पुढच्या फिल्मला ॲवॉर्ड मिळाल्यावर ॲवॉर्ड फंक्शनला, तू हि साडी नेसून जा !”  सुमित्रा मावशी खुदकन हसली आणि ती साडी घेऊन दोघीजणी बाहेर पडल्या आणि खरचं ‘१० वी फ’ या सुमित्रा मावशीच्या फिल्मला ॲवॉर्ड मिळालं आणि सुमित्रा मावशीने त्या फंक्शनसाठी त्या साडीची घडी मोडली.   

रेणूका, सुमित्रा मावशीबरोबर अनेक प्रोजेक्ट्स मध्ये काम करते. पुढे सुमित्रा मावशींच्या ‘जिंदगी जिंदाबाद’ या हिंदी फिल्ममध्ये, मिता वशिष्ठ यांचा एक सीन होता. त्या सीनमध्ये मिताजी छानशी साडी नेसून, आवरून बाहेर निघालेल्या दाखवायचे होते, मग त्यांना ही प्रदर्शनात घेतलेली साडी देण्यात आली आणि त्या सीनमध्ये त्यांना त्यांचा सह-कलाकार विचारतो, ‘कहा जा रही हो, बन ठन के ?’.....मग त्या चित्रीकरणात त्या सीनला, ‘बन ठन के सीन’ आणि त्या साडीला ‘बन ठन के साडी’ असच नाव पडलं ! चित्रीकरणाच्या सेटवर ओडीशाच्या, त्या सुंदर ‘बन ठन के साडी’ची चर्चाही खूप झाली परंतु त्या चित्रीकरणाच्या सेटवर ती साडी गहाळ झाली ! रेणूकाला फार वाईट वाटलं कारण रेणूका लवकरच ती साडी सुमित्रा मावशीकडून नेसायला घेणार होती. रेणुका खट्टू झालेली बघून सुमित्रा मावशींनी रेणूकाच्या लग्नात स्वतःसाठी घेतलेली ओडिशाची बोमकाई साडी रेणूकाला देऊन टाकली आणि म्हणाली, “माझी आठवण म्हणून तू ही साडी तुझ्याकडे ठेव. तू ही साडी वापरलीस तर मला खूप बरं वाटेल !” फोटोतली हीच ती सुमित्रा मावशीने दिलेली ओडिशाची बोमकाई साडी पण एवढ्यावरच रेणुकाचे समाधान झाले नाही ! ती लवकरच हरवलेली ‘बन ठनके साडी’ पण प्रदर्शनात जाऊन घेऊन येणार आहे म्हणे ! रेणूका म्हणाली, “तशीच एखादी छानशी ओडीशा साडी आणायला हवी, आपल्याही कलेक्शनमध्ये अशी साडी हवीच हवी..... शास्त्र असतं ते !” 



पण ही बोमकाई साडी नक्की असते तरी कशी हे जाणून घेऊयात.....

ओडिशाची पारंपरिक ‘बोमकाई’ साडी !

ओडिशा राज्यातल्या निसर्गात आणि वस्त्र परंपरेत एक सुंदर वैविध्य आहे. ओडिशाच्या - संबलपुरी, बोमकाई, टसर, बेऱ्हमपुरी पट्टा, खन्दुआ पट्टा, कोटपाड, हबसपुरी, पासापल्ली, डोंगरीया, अशा अनेक हॅन्डलूम साड्यांना स्वतःची अशी खास ओळख आहे. रेणुका दफ्तरदारच्या निमित्ताने, आज आपण यातील बोमकाई साडीची ओळख करून घेऊ. ओडिशा राज्यातील, गंजाम जिल्ह्यात ‘बोमकाई’ नावाच्या गावात ही साडी खूप वर्षांपासून विणली जात आली आहे. पन्नास-साठ वर्षांपूर्वी बोमकाई गावातील ‘भूलिया’ समाजातील काही विणकर सुबर्नपूर जिल्ह्यातील सोनपूर गावी येऊन स्थायिक झाले आणि बोमकाई साडी विणू लागले. तेव्हापासून बोमकाई साडी सोनपुरी नावाने पण ओळखली जाऊ लागली.  

‘बोमकाई’ साडी जास्त करून सिल्क मध्ये विणली जाते, पण त्या साड्यांवरचे सुंदर नक्षीकाम बघून कोर्पोरेट जगताकडून कॉटन बोमकाई साड्यांची मागणी वाढू लागली आहे. कॉन्ट्रास्ट काठ-पदर असलेल्या कॉटन बोमकाई साड्या अतिशय सुंदर दिसतात. निसर्गातील सुंदर रंगसंगती या साड्यांमध्ये परावर्तीत झालेली दिसते. ओडिशातील राष्ट्रीय पुरस्कार विजेते - विणकर रामक्रिष्ण मेहेर यांनी बोमकाई साडीत आणि संबलपुरी साडीत खूप सुंदर प्रयोग केले आहेत. त्यांनी कॉटन बोमकाई साडीवर सिल्कच्या धाग्याने केलेले नक्षीकाम पण अप्रतिम दिसते. रुद्राक्ष बॉर्डर ही बोमकाई साडीची खासियत म्हणावी लागेल. रुद्राक्ष डिझाईन म्हणजे रुद्राक्षासारखी दिसणारी छोटी छोटी फुलं असतात. या साडीच्या पदरावरची आणि बुट्ट्यांची नक्षी पूर्वी हाताने एक एक धागा शटलने आडवा टाकून केली जात असे. कधी कधी ‘जाला’ पद्धत पण वापरली जायची. पण या पद्धतीने काम करतांना खूप वेळ जात असल्यामुळे आता ‘डॉबी’ किंवा 'जकार्ड'  पद्धतीने हे नक्षीकाम केले जाते. अगदी छोट्या बुट्ट्यांसाठी ‘डॉबी’ आणि भरजरी पदारांसाठी 'जकार्ड' पद्धत वापरली जाते. 'जकार्ड'च्या प्रक्रियेत ग्राफ पेपरवर आधी डिझाईन काढून घेतले जाते, मग त्या ग्राफ पेपर नुसार एका खास मशिनवर जाड कार्ड्सवर पंचिंग मशिनने छिद्र पाडली जातात. मग ते कार्ड्स हातमागावर अशा पद्धतीने लावले जातात की हव्या असलेल्या डिझाईनच्या पॅटर्नमध्ये धागे वर-खाली होतात आणि ग्राफ पेपरवरची नक्षी साडीवर उतरते. विणकर खूप निगुतीने हे काम करतात आणि बारीक कलाकुसर साडीवर उतरवतात. नक्षीसाठी वापरण्यात येणाऱ्या आडव्या धाग्यांमध्ये कधी कधी ‘जर’ पण टाकली जाते, त्यामुळे ‘जर’ असलेली नक्षी अजून उठून दिसते. असे हे भरतकाम केल्याप्रमाणे विणलेली डिझाईन ‘कॉन्ट्रास्ट’ काठा-पदरावर असते. बऱ्याचदा ही साडी मध्ये प्लेन असते किंवा कधीकधी अंतरावर छोटे बुट्टे असतात. पण पदर मात्र सुंदर बारीक नक्षीकामाने भरलेला असतो. बोमकाई साडीच्या नक्षीकामावर ओडिशाच्या निसर्गसौंदर्याचा, पौराणिक घटकांचा, नक्षीदार मासे, पक्षी, कासव व मोरांचा, गोपुरांचा आणि मंदिरातील सुंदर कोरीवकामाचा प्रभाव पडलेला दिसतो. या साडीच्या वैशिष्ठ्यांमुळे या साडीला शासनाकडून जीआय टॅग मिळाला आहे.  

कधी कधी या साडीत दोन कलाप्रकारांचा सुंदर मेळ असतो. बोमकाईच्या रुद्राक्ष बॉर्डरला ‘ईकत’ पद्धतीने टेम्पल बॉर्डरची किनार दिली जाते किंवा पदरावर पण ‘ईकत’ आणि बोमकाईची भरतकामासारखी नक्षी यांची गुंफण केलेली आढळते. या प्रकाराला ‘बांधा-बोमकाई’ असे म्हटले जाते. ओडीशातील काही विणकरांनी अशा काही डिझायनर ‘बांधा-बोमकाई’ साड्या विणल्या आहेत की ज्यात जगन्नाथ मंदिराची कलाकुसर आणि कृष्ण-जीवनावर आधारित घटनाक्रम उतरवला आहे ! या साड्या म्हणजे कलाकुसरीचा उत्तम नमुना मानल्या जातात आणि अशा साड्यांना देशात आणि परदेशात मोठी मागणी आहे. फक्त या कोरोनाच्या साथीमुळे या विणकरांचा थांबलेला रोजगार लवकर सुरु होऊन त्यांची कला जिवंत राहण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळायला हवे. 

- रश्मी विनोद सातव 

 rashmisatav@gmail.com




  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा