गुरुवार, २९ एप्रिल, २०२१

गिरिजाचं ‘हिमरू’ प्रेम !

 

वयाच्या १५ व्या वर्षीच मोठ्या पडद्यावर काम करणारी गिरीजा पुढे ‘गोष्ट छोटी डोंगरा एवढी’, ‘गुलमोहोर’, ‘मानिनी’, ‘अडगुळं मडगुळं’ इत्यादी चित्रपटांमधून, अनेक नाटकांमधून आणि झी मराठीच्या ‘लज्जा’ आणि सोनीच्या ‘लेडीज स्पेशल’ सारख्या मालिकेतून तिच्या कसदार अभिनयातून आपल्याला भेटत आली आहे. शिवाय ‘कान्स’ सारख्या अनेक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समधून ‘क्वार्टर’ या तिच्या शॉर्ट फिल्म मधील तिच्या उल्लेखनीय अभिनयाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील घेतली गेली. अभिनयाचं ‘पॅशन’ असणाऱ्या या गुणी अभिनेत्रीला अजून एका गोष्टीची जबरदस्त पॅशन आहे ! तिला वेगवेगळ्या प्रकारांच्या साड्यांचा संग्रह करायला आणि त्या साड्या प्रसंगी आवर्जून नेसायला जाम आवडतात. तिच्याकडे चक्क दोनशे साड्यांचा संग्रह आहे ! तिने तिच्या पणजीच्या, आज्जीच्या, नानी-आज्जीच्या आणि आईच्या काही खास साड्या जीवापाड जपल्या आहे. तिच्या पणजीची १९३० सालची एक पारंपरिक साडीही तिच्या संग्रहात आहे !

साड्यांचा संग्रह करतांना तिचा कल नेहमी नामशेष होत चाललेल्या विणीच्या साड्या, पारंपरिक वारसा असलेल्या साड्या घेण्याकडे असतो. अशा साड्यांबद्दल तिला नेहमीच कुतूहल वाटत आलं आहे. ‘एबीपी माझा’च्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गिरिजा, मृण्मयी अवचटला भेटली. मृण्मयी एक फॅशन डिझायनर असून पारंपरिक वारसा असलेल्या साड्या विणणाऱ्या विणकरांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्याकडच्या साड्या योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ती गेली दहा वर्षे करत आहे. सामाजिक बांधिलकीतून काम करणाऱ्या मृण्मयीची आणि ‘सामाजिक जाण’ असणाऱ्या गिरिजाची आवड एकदम जुळून आली. गिरिजाला मृण्मयीच्या हटके साड्या खूप आवडतात. वेगवेगळ्या इव्हेंटसाठी मृण्मयी गिरिजाला साड्या उपलब्ध करून देत असते.   

एक वर्षापूर्वी, लॉकडाऊनच्या काळात एका शॉर्ट फिल्मसाठी गिरिजाला आर्मी ऑफिसरच्या बायकोच्या भूमिकेसाठी, एक ‘जर’ नसलेली पण वेगळ्याच धाटणीची साडी हवी होती. अवनिश मिश्रा लिखित आणि दिग्दर्शित त्या शॉर्ट फिल्ममध्ये गिरिजा, शुभ्रज्योती बराट आणि कुमुद मिश्रा असे तीन दिग्गज कलाकार होते. त्या फिल्मसाठी मृण्मयीने गिरिजाला एक ‘हिमरू’ साडी दिली. अतिशय सुंदर विणकाम केलेली ती ‘हिमरू’ साडी गिरिजाने पहिल्यांदाच पाहिली होती. गिरिजाला ‘हिमरू शाली’ माहित होत्या पण ‘हिमरू’ विणीच्या साड्या पण असतात हे पहिल्यांदाच कळाले होते ! गिरिजाला ती साडी खूपच आवडली आणि गिरिजा ‘हिमरू’च्या प्रेमातच पडली ! त्या फिल्ममधले गिरिजाचे सगळे सिन्स त्याच साडीत शूट झाले. फिल्मच्या ‘सेट’वरील सगळ्यांना, अगदी पुरुष मंडळींना सुद्धा ती साडी जाम आवडली. विशेष म्हणजे त्या शुटींगच्या दिवशी गिरिजाचा वाढदिवस होता. सेटवर तिच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन झालं आणि त्या सुंदर साडीत सुंदर दिसणाऱ्या गिरिजाने केक कटिंग केलं !

हातमागावर विणल्या जाणाऱ्या आणि ऐतिहासिक वारसा असणाऱ्या या ‘हिमरू’ साड्या लोकांना माहित व्हाव्यात आणि लॉकडाऊनच्या काळात,  'हिमरू' विणकरांना प्रोत्साहन देणाऱ्या मृण्मयीच्या कामाला मदत म्हणून गिरिजाने कोणताही मोबदला न घेता अजून काही सुंदर 'हिमरू' साड्या नेसून त्याचे फोटोशूट केले आणि सोशल मिडीयाच्या माध्यमातून लोकांपर्यंत त्या साड्या पोहोचवल्या. त्यातून चोखंदळ ग्राहकांकडून ‘हिमरू’ विणकरांना उत्तम प्रतिसाद मिळाला. ही कला जिवंत ठेवण्यासाठी मदत करणाऱ्या गिरिजा ओक-गोडबोलेनं सामाजिक बांधिलकीचं वस्त्रही त्या निमित्तानं विणलं हे खरं !

      

ऐतिहासिक ‘हिमरू’ !

महाराष्ट्र म्हटलं की पैठणी साडी आठवते, पण अजून एक अशी साडी आहे जिचे धागेदोरे महाराष्ट्रातल्या इतिहासात विणले गेले आहेत. पण काळाच्या ओघात महाराष्ट्राला त्या साडीच्या विणीचा विसर पडला ! पण कुरेशी समाजातील काही विणकर औरंगाबादजवळ दौलताबाद येथे आणि हैद्राबादजवळ सुरैया बोस यांच्या हातमागांवर ही ऐतिहासिक ‘धरोहर’ टिकून ठेवण्यासाठी तिथले विणकर आजही ही साडी विणत आहेत ! उद्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आज आपण १४ व्या शतकापासून महाराष्ट्रात हातमागावर विणल्या जाणाऱ्या एका ऐतिहासिक विणीवर प्रकाश टाकूयात आणि जाणून घेऊयात ‘हिमरू साडी’ बद्दल !

१३२७ मध्ये मुघल साम्राज्याचा दिल्लीचा सुलतान मुहम्मद तुघलक याने आपली दिल्लीतली राजधानी, देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या दौलताबादला हलवली होती. त्याने त्याचे सैनिक, इतर लवाजमा आणि बारा बलुतेदारांसह काही विणकर पण बरोबर आणले होते. दौलताबादला जम बसेपर्यंत १३३५ मध्ये मुघल साम्राज्याच्या उत्तरेकडील सीमेच्या सुरक्षिततेसाठी त्याला आपली दौलताबादची राजधानी परत दिल्लीला हलवावी लागली आणि तो परत दिल्लीला निघून गेला, पण त्याच्या बरोबर आलेले विणकर आणि इतर कारागीर दौलताबाद मध्येच राहिले आणि त्यांनी हातमागावर विशिष्ट विणीचे कापड विणण्याचे काम तसेच पुढे चालू ठेवले. कोणती होती ती वीण ? तेव्हा मुघल साम्राज्याच्या प्रभावाखाली असलेल्या वाराणसीमध्ये ‘किनख्वाब’ म्हणून ओळखले जाणारे बनारस ब्रोकेड कापड खूप प्रसिद्ध होते. त्या ‘किनख्वाब’ ने प्रभावित होऊन, दौलताबादमध्ये मुहम्मद तुघलकच्या अधिपत्याखाली असणाऱ्या कुरेशी समाजाने ‘हिमरू’ वीण विकसित केली. तेव्हा उत्तर भारतात व्यापारामुळे पर्शियन भाषेचा बराच प्रभाव होता. ‘हिमरू’ हा शब्द पर्शियन असून ‘हम’ आणि ‘रूह’ या दोन शब्दांपासून तयार झालेला असून त्याचा अर्थ आहे ‘सारखा’, ‘किनख्वाब’ सारखी असणारी ही वीण - म्हणून ‘हिमरू’ !

मुघल काळात ‘हिमरू’ वीण वापरून भरजरी अंगरखे, शेले, शाली, राजवाड्यांचे पडदे आणि चादरी वगैरे, मुघल घराण्यांसाठी तयार होत असत. नंतर मुघलांचा प्रभाव जसा कमी होत गेला तसे ह्या विणीत ‘हिमरू’ साड्या बनू लागल्या. शिवाय दौलताबाद आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कापूस उपलब्ध असल्यामुळे ही ‘हिमरू साडी’ कॉटन आणि कॉटन-सिल्क मिक्स मध्ये पण बनू लागली. ब्रिटीशपूर्व काळापर्यंत या ‘हिमरू’ विणीसाठी खऱ्या सोन्याची जर वापरली जात असे. ब्रिटीशकाळात जेव्हा पॉवरलूम्स आल्या तेव्हा हातमागावरचा वस्त्रोद्योग डबघाईला आला आणि भारतात ‘हिमरू’ काम करणारे अंदाजे फक्त दिडशे कुटुंबं उरली आणि १९४७ मध्ये देशाच्या फाळणीनंतर बरेच कुरेशी विणकर पाकिस्तानात निघून गेले आणि मग हे काम करणारे फक्त दोन-तीन कुटुंबं उरली. हे बोटावर मोजता येणारे काही ‘हिमरू’ विणकर दौलताबादमध्ये राहिले आणि ही कला जिवंत ठेवण्यासाठी मोठे योगदान देत राहिले.

उभ्या-आडव्या सिल्कच्या धाग्यांबरोबर आडवे जरीचे धागे टाकून संपूर्ण साडीवर बारीक भरजरी नक्षीकाम केले जाते. काही डिझाईन्स मध्ये तर ते नक्षीकाम इतके बारीक असते की खालचे सिल्क दिसतही नाही. दौलताबादच्या जवळ असणाऱ्या अजंठा-वेरूळ लेण्यामधील कोरीवकाम, वाराणसीच्या मंदिरातील कोरीवकाम आणि मुघल वास्तुकलेतील नक्षीकाम यांचा अतिशय सुंदर गुंफण या हिमरू साड्यांमध्ये दिसते. प्रत्यक्ष हिमरू साडी विणायला सुरु करण्यापूर्वी हातमागावर डिझाईनप्रमाणे धागे लावून घेण्याच्या क्लिष्ट प्रक्रियेला एक ते दोन महिने सुद्धा लागू शकतात.

पुढे पॉवरलूम्सवर सुद्धा ही ‘हिमरू’ साडी बनू लागली पण हातमागावरच्या ‘हिमरू’ साड्यांची नजाकत आणि वैविध्य त्यात नाही. हातमागावरील हिमरू साडीला चोखंदळ ग्राहकांपर्यंत पोहोचवून ही कला जिवंत ठेवण्यासाठी फॅशन डिझायनर मृण्मयी अवचट गेली दहा वर्षे त्या विणकरांबरोबर काम करून त्यांना प्रोत्साहन देत आहे. मृण्मयी म्हणाली, “पॉवरलूम वर ज्या हिमरू साड्या आणि शाली बनतात त्यात पॉलिएस्टरचे धागे वापरलेले असतात आणि त्यामुळे त्या साड्या आणि शालींना जरा कडकपणा असतो.”

विरत चाललेली ही वीण बघून प्रेरित झालेल्या सुरैया बोस यांनी हैद्राबादजवळ १९८५ मध्ये एका हातमागावर, हिमरू कला येत असणाऱ्या दोन वयस्कर विणकरांना बरोबर घेऊन हिमरू साड्या विणायला सुरुवात केली होती. सुरैया बोस यांनी निझाम घराण्यातील हिमरू विणीत विणलेली वस्त्रे मिळवून त्यांचा अभ्यास केला आणि भारतीय वस्त्र परंपरेतील नामशेष होणाऱ्या काही वस्त्रनिर्मितीला पुनरुज्जीवन दिले. सुरैया बोस यांनी या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी खूप काम केले आणि पुढे अनेक विधवा महिलांना हिमरू कला शिकवून त्यांना हिमरू साड्या विणण्याचे काम दिले. त्यांच्या या ज्ञानाला आणि कामाला सलाम करत राधिका सिंग यांनी 'सुप्रिया हसन बोस - विव्हिंग अ लेगसी' हे इंग्रजीत पुस्तक लिहिले. उत्तर भारतातील एका कलेने प्रेरित होऊन महाराष्ट्रात विकसित झालेली आणि हैद्राबादमध्ये नव्या रंगरूपात पुनरुज्जीवित झालेल्या या हिमरू साडीने आपल्या ऐतिहासिक प्रवासात देशातील काही प्रांतही एकमेकात गुंफले !    















Rashmi Satav
  rashmisatav@gmail.com

Saree @nikayifashionstudio
Jewellery @siddhi_diamonds
makeup  @makeupartisthemal
photography @photo_vinayak




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा