सावनीची ‘कॉपी-पेस्ट’ साडी !
६७ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात
‘बार्डो’ चित्रपटातील गाण्यासाठी सावनी रवींद्रला ‘सर्वोत्तम पार्श्वगायिका’
पुरस्कार मिळाला आणि सावनीच्या यशाच्या मुकुटात मानाचा तुरा खोवला गेला. शास्त्रीय
संगीत, चित्रपट संगीत आणि गझल प्रकारात हातखंडा असणाऱ्या सावनीला आजवर अनेक
पुरस्कार मिळाले आहेत. सावनीच्या सुरांची मोहिनी आपल्यावर वारंवार पडत आली आहे पण खुद्द सावनीवर मोहिनी
घालणारी एक गोष्ट आहे – ती म्हणजे साडी ! सावनीला साडी हा प्रकार प्रचंड आवडतो. गाण्याच्या
कार्यक्रमांना आणि ॲवॉड फंक्शन्सना सावनी सुंदर सुंदर साड्या नेसून जात असते. अशाच
एका साडीची ही गोष्ट......
काही महिन्यांपूर्वी,
सोनी मराठीवर ‘सिंगिंग स्टार’ हा ‘शो’ करत असतांना सावनी त्या ‘शो’च्या
प्रमोशनसाठी ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमात गेली होती. या
कार्यक्रमासाठी सावनीने खास इंदौरहून आणलेल्या सुंदर पिवळ्या रंगाच्या कॉटन महेश्वरी
साडीची घडी मोडली होती. सावनी, परफॉरमन्स सुरु होण्यापूर्वी 'हास्य
जत्रेच्या' टीमला भेटायला गेली आणि ती व सावनीची अत्यंत
लाडकी अभिनेत्री विशाखा सुभेदार या दोघीजणी कडकडून भेटल्या ! सावनीची साडी बघून
विशाखाने सावनीला खूप भरभरून कॉम्पलीमेंटस दिल्या, “अग काय सुंदर दिसते आहेस तू !
आणि साडी काय अप्रतिम आहे, मला खूपच आवडली साडी.”
सावनीला लहानपणापासूनच
एक आवड आणि सवय आहे, कोणालाही तिच्याकडची एखादी वस्तू खूप आवडली तर सावनी कोणताही
विचार न करता त्यांना म्हणते, “घेऊन टाका ही वस्तू तुम्हाला !” सावनीला आवडत्या
लोकांना गिफ्ट्स द्यायला खूप आवडतात. आवडती गोष्ट अचानक मिळाल्यावर त्यांच्या
चेहऱ्यावर पसरणारा आनंद बघून सावनीला मिळणारी उर्जा आणि समाधान तिच्या स्वरांमधून
डोकावते !....... त्यामुळे सावनी तिच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे विशाखाला म्हणाली, “अग तुला इतकी आवडली आहे ना ही
साडी मग घेऊन टाक तुला !” त्यावर विशाखा म्हणाली, “अग वेडी आहेस का तू ? मी सहजच
म्हणाले तुला ! ” दोघींच्या अशा ‘त्याग-पाण्याच्या’
गप्पा चालू असतांनाच ‘टेक’ची वेळ झाली. नेहमीप्रमाणेच सावनीचा परफॉरमन्स अप्रतिम
झाला. ‘पॅक-अप’ झालं, सावनीला घाईने
निघायचे होते, तिने
साडी बदलली आणि विशाखाला शोधलं, पण विशाखाची आणि तिची भेट होऊ शकली नाही.
सावनीला खूप मनापासून वाटत होतं की ही साडी विशाखाला खूप आवडली होती, आपण ही साडी माझी आठवण म्हणून तिला द्यायचीच.
मग सावनीने विशाखाच्या Vanity
Van मध्ये जाऊन गुपचूप ती साडी ठेऊन दिली !
थोड्याच वेळात
विशाखाचा फोन आला, “अग साऊ तू वेडी आहेस का ? बायका किती पझेसिव्ह असतात आपल्या
साड्यांबद्दल आणि तू मला चक्क ही साडी देऊन काय टाकलीस ! मला खूप कसतरी वाटतं आहे
ही साडी ठेऊन घ्यायला !” सावनी म्हणाली, “विशाखाताई मी तुझी खूप मोठी फॅन आहे, खास
जाऊन शॉपिंग करणं बऱ्याचदा जमत नाही, ही साडी नवीनच आहे, पहिल्यांदाच नेसले होते, नवीनकोरी
असल्यामुळे तुला दिली. तुझ्या अभिनय कलेसाठी माझ्याकडून हे छोटसं गिफ्ट. प्लीज घे
हे गिफ्ट. नाही म्हणू नकोस..... ”
शेवटी विशाखाने ते
गिफ्ट घेतले आणि सावनीला पुन्हा एकदा आनंदाची ऊर्जा मिळाली ! खरतर सावनीला पण ती
साडी प्रचंड आवडली होती पण तिने ती साडी तिच्या सवयीप्रमाणे देऊन टाकली होती. पुढे
एक महिन्याने सावनी कार्यक्रमासाठी परत इंदौरला गेली. तिथे कार्यक्रम झाल्यावर एअर-पोर्टवर ‘चेक इन’ करून
सावनी तिथल्या दुकानांमध्ये सहज फेरफटका मारत होती आणि चमत्कार म्हणजे एका दुकानात
सावनीला अगदी तशीच सुंदर पिवळ्या रंगाची महेश्वरी साडी दिसली. तोच रंग, तोच पॅटर्न,
तोच पोत, तीच ‘copy-paste साडी’ ! सावनीने झडप घालून ती साडी विकत घेतली आणि
विशाखाला मेसेज केला, “विशाखाताई, तुला आता वाईट वाटायचे बिलकुल कारण नाही. मला
अगदी तशीच ‘सेम टू सेम’ साडी मिळाली आहे, लवकरच आपण दोघींनी आपापल्या या सेम-टू-सेम
साड्या नेसू आणि एकत्र फोटो काढू !” तो योग लवकरच कधीतरी येईल.....
सावनी म्हणाली, “शिद्दत
से अगर आप किसीभी चीजको चाहों, तो पुरी कायनात तुम्हे उसे मिलानेमें जुड जाती है
.....! आणि तसचं झालं.... सावनीला
आवडणाऱ्या साडी सारखीच ‘copy-paste साडी’ परत तिच्याकडे आली ! ”
होळकर साम्राज्याचा ‘धागा’ असलेली महेश्वरी
साडी !
बॉलिवूडच्या बऱ्याच चित्रपटांमधून नदीच्या घाटावरचे सिन्स मध्यप्रदेशातील
इंदौरजवळ असलेल्या महेश्वरच्या घाटावरचे असतात. या महेश्वरच्या घाटावर होळकर
साम्राज्याचा अतिशय सुंदर राजवाडा आहे. महेश्वर म्हणजे १८१८ पर्यंतची मराठा होळकर
साम्राज्याची मालवा प्रांताची राजधानी. आधी इंदौरला असणारी ही राजधानी १७६५ मध्ये होळकर
साम्राज्यातील महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी महेश्वरमध्ये स्थापित केली. तेव्हा
तिथल्या हातमागावरील वस्त्रोद्योगाला अवकळा आली होती, पण अहिल्याबाई होळकरांनी
सूरतहून आणि मालवा प्रांतातून काही रेवा समाजाचे विणकर बोलावून त्यांना
महेश्वरमध्ये वसविले. देशातील सुती आणि सिल्कचे धागे पुरवणाऱ्या व्यापाऱ्यांना तिथल्या
विणकरांबरोबर जोडून दिले. शिवाय खुद्द अहिल्याबाई होळकरांनी स्वतः डिझाईन सांगून
या विणकरांकडून पहिली नऊवार साडी बनवून घेतली. राजमाता अहिल्याबाई होळकरांच्या
प्रोत्साहनाने मग खूप सुंदर सुंदर साड्या विणल्या जाऊ लागल्या. तेव्हा पानं, फुलं
आणि मुळांपासून बनवलेल्या नैसर्गिक रंगात धागे बुडवून-वाळवून मग ही साडी विणली जात
असे. राजघराण्यातील स्त्रिया आणि राजवाड्यात येणाऱ्या अतिथी स्त्रियांची ओटी याच
साड्यांनी भरली जात असे. लवकरच ही साडी लोकप्रिय होऊन त्या गावाच्या नावावरून त्या
साडीचे ‘महेश्वरी’ असे नाव पडले.
हलक्या-फुलक्या असणाऱ्या या साड्या, होळकर
साम्राज्यात फक्त सिल्कमध्ये विणल्या जात असत, नंतर ‘कॉटन-महेश्वरी’ आणि कॉटन-सिल्क धागे एकत्र करून ‘गर्भ-रेशमी महेश्वरी’ साड्या पण बनू लागल्या. या साड्यांमध्ये
तलम सिल्कचा धागा वापरल्यामुळे या साड्यांना सुंदर नैसर्गिक चमक असते. होळकर
साम्राज्यात या साड्या नऊ वार मध्ये बनत असत नंतर या साड्या सर्रास सहा वारमध्ये
बनू लागल्या. या साड्यांचे काठ कॉन्ट्रास्ट असून त्यात तलम 'जर' वापरलेली असते. या साड्या, मधे प्लेन किंवा बारीक चौकडीच्या
असतात. मधे प्लेन असणाऱ्या साड्यांवर अंतरा-अंतरावर सुंदर बुट्टी असते. अहिल्याबाई
होळकरांचा राजवाडा, आजूबाजूची मंदिरं आणि नर्मदा-परिसरातील निसर्ग यांचा महेश्वरी
साडीच्या नक्षीकामात खूप प्रभाव पडलेला दिसून येतो. होळकरांच्या राजवाड्याच्या
भिंतींवरील नक्षीकामावरून प्रेरित होऊन ‘चमेली का फुल’ नामक साडीवर विणलेली पारंपरिक
बुट्टी आणि साडीच्या काठावरची कर्णफुले नर्मदाकाठच्या सौंदर्याची साक्ष देतात. पूर्वी
पारंपरिक महेश्वरीचा पदर ठराविक धाटणीचा असे. पदरावर मोठे पट्टे विणलेले असत. आता
पदरावर वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये आणि अत्यंत आकर्षक रंगसंगतीमध्ये पट्टे विणलेले
असतात. या साडीसाठी बंगळूरहून तलम मलबेरी सिल्कचे धागे आणि कोईम्बतूरहून सुती धागे
मागविले जातात आणि त्या धाग्यांपासून कोणत्याही ऋतूत नेसता येणारी मऊसूत महेश्वरी
विणली जाते. सध्या महेश्वरचे विणकर, मागणी प्रमाणे ‘डिझायनर महेश्वरी साड्या’ पण बनवू
लागले आहेत, या डिझायनर साड्यांमध्ये पारंपरिक महेश्वरीचे ठोकताळे जरी नसले तरी
साडीचा पोत मात्र पारंपरिक महेश्वरीसारखाच तलम असते. फोटोत सावनी रवींद्रने
नेसलेली ‘डिझायनर महेश्वरी साडी’ आहे. सध्या डिझायनर महेश्वरी साड्यांमध्ये
खूप कल्पक प्रयोग होत आहेत, जसे की ‘हँडब्लॉक प्रिंटेड महेश्वरी’, ‘टिश्यू महेश्वरी’, ‘बाटिक आणि भगरु प्रिंट महेश्वरी’, ‘गंगा-जमुना
महेश्वरी’ वगैरे. या साड्यांमध्ये पारंपरिक महेश्वरीचा लहेजा तसाच ठेवून त्यात
साडीच्या इतर कलाप्रकारांचे सुंदर फ्युजन केलेले दिसते. अशा प्रकारच्या साड्यांना परदेशात
खूप मागणी आहे.
अहिल्याबाई होळकरांनी महेश्वरमधल्या
वस्त्रोद्योगाला पुनरुज्जीवन दिल्यामुळे आता महेश्वरमध्ये घरोघरी मिळून काही हजार हातमाग
आहेत. रेवा समाजातील अनेक स्त्रिया घरकाम सांभाळून हातमागावर काम करून घराला
हातभार लावत आहेत. महेश्वरच्या छोट्या छोट्या रस्त्यांवरून जातांना हातमागाचा
येणारा लयबद्ध आवाज महिला सक्षमीकरणाची साक्ष देतो !
©रश्मी विनोद सातव
rashmisatav@gmail.com


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा