गुरुवार, २० मे, २०२१

मंजूच्या साड्या ठरल्या साक्षीदार !

 

‘तुळशीच्या मंजिरी’मध्ये जसं नवनिर्मितीचं बी रुजलेलं असतं, अगदी तसच नवनिर्मितीचं बी, मंजिरी ओक मध्ये रुजलेलं दिसतं ! मंजिरीला सिनेसृष्टीत सगळे मंजूच म्हणतात. मंजू-प्रसादच्या यशस्वी प्रवासात आणि सहजीवनात मंजूचा वाटा भक्कम आहे. प्रसादच्या प्रत्येक कलाकृतीच्या निर्मिती प्रक्रियेत ती समर्थपणे उभी असते शिवाय ती एक उत्तम गृहिणी, सार्थक-मयंकची सक्षम आई, ‘क्रिएटिव्ह शेफ’, 'दागिना' हा ज्युलरी ब्रँड कल्पकतेने चालवणारी एक यशस्वी उद्योजिका, मित्र-मंडळींची जिगरबाज मैत्रीण आणि एक चोखंदळ सिने-निर्माती आणि एक सहाय्यक दिग्दर्शक आहे.     

१९९८ मध्ये प्रसाद ओक बरोबर लग्नबंधनात गुंफल्या गेलेल्या मंजिरीने प्रसादच्या सुरुवातीच्या ‘स्ट्रगल-काळात’ म्हणजे अगदी कॉलेजपासून त्याला खंबीर साथ दिली आहे. त्या दोघांची आजवर झालेली यशस्वी वाटचाल, त्याच्या कलाकृतींचा आलेख, स्वप्नांचे मनोरे, नात्यांचे कंगोरे आणि त्यांची रंजक सफर... सुरुवातीपासून पाहणाऱ्या दोन साक्षीदारांची गोष्ट आज आपण वाचणार आहोत. हे दोन साक्षीदार म्हणजे चक्क दोन साड्या आहेत !

मनोरंजन क्षेत्रात विसावण्यासाठी मंजू आणि प्रसाद लग्नानंतर मुंबईत स्थायिक झाले. महिन्याचा खर्च भागवण्यासाठी पंधराशे रुपयांची नोकरी करणारी मंजू आणि नाटकाच्या प्रयोगाचे दोनशे रुपये ‘नाईट’ घेणारा प्रसाद.... असा तो काळ होता ! लग्नात आईकडून मुहूर्ताच्या मिळालेल्या पाच साड्यांशिवाय मंजुकडे साड्याच नव्हत्या ! सणावारांना आणि कोणत्याही कार्यक्रमांना मंजू आलटून-पालटून त्याच पाच साड्या नेसत असे. एकदा मंजू तिच्या ऑफिसमधल्या मैत्रिणीने नेसलेल्या साडीच्या जाम प्रेमात पडली होती, मंजूने न रहावून मैत्रिणीला त्या साडीचे नावही विचारले होते. सुंदर कलाकृतींची जाण असलेल्या मंजूच्या मनाच्या खोल कप्प्यात ती साडी जाऊन बसली ! आयुष्यात कधीतरी तशी साडी घ्यायचीच अशी खुणगाठ बांधून, महिन्याकाठी गाठीला शिल्लक राहिलेले थोडे पैसे ती साठवू लागली. पुढे दोन-तीन वर्षांनी तिला वाटलं की आता साठलेल्या पैशात ती साडी घेता येईल, म्हणून ते पैसे घेऊन ती पुण्यात तिच्या नेहमीच्या दुकानात गेली. पण दुकानात गेल्यावर तिला त्या साडीचे नाव काही केल्या आठवेना ! अहमदाबाद, गढचिरोली.... आणि अशी बरीच काहीबाही नावं ती घेत राहिली.....तो दुकानदारही चक्रावून गेला ! त्याने दुकानातल्या तमाम साड्या तिला दाखवल्या....पण मंजूला ‘तशी’ साडी काही त्यात दिसेना ! शेवटी हिरमुसलेल्या मंजूने त्याच्या समोर त्या साडीचं ‘कॅरॅक्टर स्केच’ उभं केलं आणि त्या सेल्समनचे डोळे चमकले ! त्याने लगबगीने एक साडी आणली आणि म्हणाला, अशी असेल ती साडी, गढवाल म्हणायचंय का तुम्हाला ? मंजूने तर आनंदाने उडीच मारली, “हो हो बरोब्बर.... गढचिरोली नाही....गढवाल साडी हवी आहे मला !” 

दुकानदाराने आणलेल्या त्या गढवालच्या गठ्ठ्यातून मंजुनं एक सुंदर काळ्या काठ-पदराची लालबुंद गढवाल निवडली आणि किंमत विचारली. साडेतीन हजार किंमत ऐकून मंजूचा हिरमोड झाला कारण तितके पैसे तिच्याकडे नव्हते. दुकानदाराचा तासभर घेऊन खजील होऊन मंजू निघाली पण दुकानदारालाच वाईट वाटलं, तो म्हणाला, “ताई तुम्हाला इतकी आवडली आहे ना साडी, मग घेऊन जा, हप्त्याने पैसे द्या !” मंजू तर अवाकच झाली ! ती म्हणाली, “अहो, मला फक्त घर आणि गाडी हप्त्यावर मिळते, इतकच माहिती होतं, साडी पण हप्त्यावर मिळते ?” त्यावर दुकानदार म्हणाला, “खर तर आम्ही हप्त्यावर साड्या विकत नाही, पण तुम्ही खऱ्या वाटता, आम्ही माणसं ओळखतो, घेऊन जा, जमेल तसे पैसे दया.” तेव्हा मोबाईलही नव्हते आणि प्रसादही मुंबईत होता, मंजूला काय करावे ते कळेना पण शेवटी, मंजूला तो मोह आवरता आला नाही ! तिच्याकडे तेव्हा पर्समध्ये नेमके चेकबुक सुद्धा होते, मग पाचशे रुपये आणि ‘पोस्ट डेटेड चेक्स’ देऊन मंजूने चक्क हप्त्याने साडी घेतली ! पण घरी गेल्यावर प्रसाद मंजूवर खूप चिडला होता आणि आपण मंजूला तिच्या आवडीची साडी घेऊ शकत नाही म्हणून त्याला वाईटही वाटले होते. पुढे त्या साडीचे सगळे पैसे मंजूने फेडले आणि आजही त्यांच्या ‘स्ट्रगल-काळा’ची आठवण म्हणून तिने ती साडी जीवापाड जपून ठेवली आहे आणि काही खास कार्यक्रमांना ती ही साडी आवर्जून नेसत असते.    

     पुढे कालांतराने प्रसाद सिनेसृष्टीत स्थिरावला आणि अनेक उत्तमोत्तम कलाकृती निर्माण करू लागला. कामाची व्याप्ती वाढली मग मंजूही नोकरी सोडून मुलं आणि घर सांभाळून प्रसादला चित्रपट निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावर मदत करू लागली. प्रसादचे सिनेसृष्टीत अभिनेता म्हणून आणि एक प्रथितयश दिग्दर्शक म्हणून खूप मोठे नाव झाले. पुढे ‘हिरकणी’च्या शुटींगच्या वेळेस, ‘हिरकणी’ कोण आहे..... हे दाखवण्यासाठी एक खास सोहळा आयोजित केला होता. मंजिरी म्हणाली, “ज्या चित्रपटात स्त्रीत्त्वाचा सन्मान होणार आहे त्या चित्रपटाच्या त्या सोहळ्यासाठी, माझ्यासाठी अत्यंत मौल्यवान असणारी तीच गढवाल मी नेसून गेले होते आणि स्त्रीत्त्वाचा सन्मान करण्यासाठी साडीसारखे दुसरे वस्त्र नाही म्हणून आम्ही हिरकणीच्या शुटींगच्या सेटवर तो सोहळा सुरु होण्यापूर्वी तिथल्या एका छोटं बाळ असलेल्या माऊचीली साडी-चोळीने ओटी पण भरली होती ! ” शिवाय प्रसादच्या ताकदीच्या दिग्दर्शनाची कमाल चित्रपटात ठिकठिकाणी दिसली आहे  - चित्रपटात शिवाजी महाराज, हिरकणीने केलेल्या धाडसाचा सन्मान साडी-चोळी देऊनच करतात, आणि हिरकणीच्या धाडसाचं कौतुक म्हणून तिचा नवरा तिचे औक्षण करून तिचे स्वागत करतो. इतिहासात असे प्रसंग घडले असतील-नसतील पण ‘हिरकणी’ने मात्र इतिहास घडविला ! गंमत म्हणजे याच चित्रपटाच्या प्रमोशनच्या कार्यक्रमांसाठी साड्या ठरवत असतांना मंजिरी त्याच त्या ‘हप्त्याने घेतलेल्या गढवाल’शी गुजगोष्टी करत बसली होती, त्या गप्पांमध्ये मंजिरीने ठरवले की आपण ‘हिरकणी’च्या प्रमोशनच्या एका कार्यक्रमासाठी अजून एक गढवाल घ्यायची ! मग मंजिरी त्याच दुकानात जाऊन तिला हवी तशी - एक सुंदर पिवळ्या रंगाची वर लाल आणि खाली मोरपंखी काठ असलेली ‘युनिक’ अशी ‘डिझायनर गढवाल’ घेऊन आली आणि ‘हिरकणी’च्या त्या कार्यक्रमाला नेसली. चित्रपट प्रचंड यशस्वी झाला आणि ही दुसरी गढवाल त्या यशाची साक्षीदार झाली ! त्यामुळे या दोन्ही गढवालच्या घड्यांमध्ये मंजूनं यशाची अनेक मोरपिसं जपून ठेवली आहेत !  
©रश्मी विनोद सातव 
rashmisatav@gmail.com  

1 टिप्पणी:

  1. खुपच मस्त विरासत. साड्यांच्या दुनियेत फिरून आले तुझ्यामुळे. रश्मी मस्तच ग.

    उत्तर द्याहटवा