आवाजात आणि चेहऱ्यात कमालीचा गोडवा असलेली, मधाळ
डोळ्यांची मृण्मयी आपल्याला मराठी-हिंदी चित्रपटांमधून, नाटकांमधून, मालिकांमधून,
वेब सिरीज मधून भेटत आली आहे आणि त्यातील तिचा चोख अभिनय कायमच आपल्याला खास
लक्षात राहतो. तिच्या चोख अभिनयाबरोबरच तिचं चोख दिग्दर्शनही आपण ‘मन फकीरा’मध्ये
पाहिलं आहे आणि लवकरच ‘मनाचे श्लोक’ या आगामी चित्रपटामधून पण तिच्या दिग्दर्शनाची
ताकद आपल्याला पाहिला मिळणार आहे. कलेवर प्रामाणिक प्रेम करणाऱ्या या गुणी
अभिनेत्रीच्या करियरची सुरुवात २००७ मध्ये झाली आणि तेव्हापासून आत्तापर्यंतच्या
तिच्या कलाकृतींची यादी खूप मोठी आहे त्यातील काही - म्हणजे ‘एक कप चाय’, ‘मोकळा
श्वास’, ‘आंधळी कोशिंबीर’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘नटसम्राट’, ‘अनुराग’, ‘भाई – व्यक्ती
की वल्ली’, ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’ या आणि इतर अनेक कलाकृतींवर प्रेक्षकांनी
भरभरून प्रेम केलं. लहानपणापासूनच स्वावलंबनाची जाण असलेल्या मृण्मयीने वयाच्या १८
व्या वर्षीच काम करायला सुरुवात केली. तिच्यासाठी तिचे काम आणि तिची पहिली कमाई
खूप महत्त्वाची होती. मृण्मयीने तिच्या पहिल्या कमाईतून, आईसाठी एक छानशी पिवळ्या रंगाची ‘रॉ
सिल्क’ची साडी घेतली होती. तेव्हा चार हजार किंमत असलेली ती साडी घेऊन बिलाचे पैसे
देतांना, मृण्मयी भूतकाळात गेली.... कपड्यांवर इतके पैसे एकरकमी खर्च केलेले तिने
कधी पाहिलेच नव्हते.....!
आईच्या वाढदिवसानिमित्त मृण्मयीने, तेव्हा तिला
साड्यांविषयी फार माहिती नसतांनाही एकटीने जाऊन ती साडी घेतली आणि आईला एक गोड
सरप्राईझ दिले. आईलाही ते ‘सरप्राईझ’ आणि ती साडी फार आवडली. ‘पहिल्या कमाईच्या
पहिल्या साडीमुळे’ दोघीही खूप ‘इमोशनल’ झाल्या होत्या. पहिल्या कामातून आलेली ती
साडी पुढे मृण्मयीच्या यशाची साक्षीदार बनत गेली. ‘लाईम लाईटमध्ये एकदा घातलेला
पेहेराव परत घातला जाऊ नये...’ च्या जमान्यात कसलाही विचार न करता मृण्मयीनं ती
साडी अनेक वेळा अनेक ठिकाणी नेसली !
विशेष म्हणजे, दिगपाल लांजेकरच्या ‘फर्जंद’
आणि ‘फत्तेशिकस्त’ या दोन्ही चित्रपटात ‘केसर’ साकारणाऱ्या मृण्मयीचा अभिनय म्हणजे
‘मास्टर पीस’ होता. या दोन्ही ऐतिहासिक
चित्रपटांनी ‘बॉक्स-ऑफिस’वर इतिहास घडविला. याच ‘फर्जंद’च्या
प्रमोशनसाठी ‘चला हवा येऊ दे’च्या कार्यक्रमात मृण्मयीने तिची तीच ‘फेवरेट साडी’
नेसली होती. याच पिवळ्या ‘रॉ सिल्क’च्या साडीमुळे, ‘साडी’ प्रकाराच्या
प्रेमात पडलेल्या मृण्मयीने खास ‘फर्जंद’ आणि ‘फत्तेशिकस्त’ च्या प्रमोशनच्या सगळ्या
कार्यक्रमांना आवर्जून साड्याच नेसल्या !
पुढे २०१७ मध्ये मृण्मयीला लग्नात आईकडून
आलेल्या पाच मुहूर्ताच्या साड्यांबरोबर तिच्या करियरच्या मुहूर्ताची ही पिवळी साडी
पण तिच्याकडे आली आणि तिच्या कपाटात आणि मनात विराजमान झाली ती.... कायमची !
‘रॉ-टेक्श्चर'चं सौंदर्य !
आज आपण ‘रॉ सिल्क’ म्हणजे नक्की काय ते बघू. रेशमाच्या किड्यांच्या वेगवेगळ्या जाती अस्तित्त्वात आहेत, त्यातील ‘बॉम्बीक्स मोरी’ नावाच्या रेशमाच्या किड्यांनी बनवलेले सिल्क जगभरात उच्च दर्जाचे मानले जाते. रेशमाचे मादी किडे एका वेळेस अंदाजे ५०० अंडी घालतात आणि मग दहा दिवसांनी त्या अंड्यातून बारीक आळ्या बाहेर येतात, त्यांना ‘लार्व्हा’ म्हणतात. त्यानंतर त्या आळ्यांना मलबेरी झाडाची ताजी पानं खायला दिली जातात. मग त्या आळ्या लागोपाठ ३५ दिवस सतत पानं खातच राहतात आणि ३५ दिवसांनी पूर्ण वाढ झाल्यावर पानं खायचं थांबवतात, तेव्हा त्यांचे वजन चक्क १०००० पटीने वाढलेलं असते. त्यानंतर त्या स्वतः भोवती कोश विणायला घेतात. या आळ्यांच्या लाळग्रंथीतून प्रोटीनयुक्त पदार्थ स्त्रवत असतो, त्या पदार्थात त्या आळ्यांच्या तोंडात ‘सेरीसीन’ नावाचा चिकट पदार्थ मिसळला जातो आणि एक मिश्रण तयार होते. कोश बनवायला सुरुवात केल्यावर त्या आळ्यांच्या तोंडाच्या खालच्या बाजूला असलेल्या छिद्रातून हे मिश्रण तंतुसारखे बाहेर येऊ लागते आणि हवेतील ऑक्सिजनशी संपर्कात आल्यावर त्या मिश्रणाचा धागा बनतो. तीन दिवसांत तो कोश बनून तयार होतो मग पुढे पंधरा-सोळा दिवस त्या आळ्या त्या कोशातच राहतात ! सोळाव्या दिवशी आतील आळीचं पाकोळीत (मॉथमध्ये ) रुपांतर होतं. या पाकोळीच्या तोंडातून अल्कली द्राव स्त्रवतो आणि कोशाला छिद्र पडते. या छिद्राच्या मदतीने पाकोळी, कोश तोडून बाहेर येते. या तुटलेल्या कोशापासून रेशीम बनते परंतू व्यावसायिक दृष्ट्या अखंड रेशीम मिळवण्यासाठी आळीचे पाकोळीत रुपांतर होण्याच्या आधीच हे रेशमाचे कोश गरम पाण्यात टाकले जातात ! गरम पाण्यामुळे ‘सेरीसीन’ नावाचा चिकट पदार्थ धुतला जातो आणि कोशातील धागे सुट्टे होतात आणि त्यातीलच एक सुट्टे टोक पकडून तकाकी असलेला मऊसूत अखंड सिल्कचा धागा मिळवला जातो. पण अशा प्रकारे सिल्क मिळवतांना ‘सिल्क वर्म्स’ना हानी पोहोचते म्हणून 'ॲनिमल राईट्स’चा कट्टर पुरस्कार करणारे, अशा पद्धतीने बनवलेले सिल्क वापरत नाहीत. त्यामुळे नैसर्गिकरित्या पाकोळ्या जेव्हा बाहेर येतात तेव्हा त्या तुटलेल्या कोशांपासून सिल्क बनवण्याच्या प्रक्रियेत, आळ्या असलेले रेशमाचे कोश गरम पाण्यात टाकले जात नाहीत, तर नुसते धुवून घेतले जातात आणि त्यामुळे त्या रेशमी धाग्यातील ‘सेरिसिन’ नावाचा चिकट पदार्थ बऱ्याच अंशी तसाच राहतो. तुटलेल्या कोशापासून अखंड रेशीम मिळत नाही पण कापसापासून जसे सूत काढले जाते तशा पद्धतीने रेशमांच्या तुटलेल्या तंतूंना पीळ देऊन रेशमी सूत बनविले जाते. त्यामुळे या सूतांचा पोत अखंड रेशमी सूताइतका मुलायम नसतो. दोन ते पाच-सहा सूतांना एकत्र पीळ देऊन दोन प्लाय ते पाच-सहा प्लायचे रेशमी धागे बनविले जातात. अशा पद्धतीने मिळवलेल्या सिल्कला ‘अहिंसा सिल्क’ म्हणतात. कोश फुटायच्या आधी किंवा कोश फुटल्यावर त्यातून काढलेल्या सिल्कच्या धाग्यांवर जर कोणतीही मानव-निर्मित केमिकल प्रक्रिया केली नाही तर ते ‘रॉ सिल्क’चे धागे असतात आणि त्या धाग्यांमध्ये असलेल्या ‘सेरिसिन’मुळे आणि या धाग्यांच्या विशिष्ट पोतामुळे ‘रॉ-सिल्क’च्या साड्यांना एक विशिष्ट 'टेक्श्चर' असते. या ‘रॉ-टेक्श्चर'ला स्वतःचं एक खास सौंदर्य आहे आणि हे 'टेक्श्चर'च रॉ सिल्कच्या साड्यांची खासियत आहे ! ‘रॉ-सिल्क’च्या साड्यांना मोठी ऐतिहासिक परंपरा जरी नसली तरी ‘रॉ-सिल्क’मध्ये मोठ्या प्रमाणात डिझायनर साड्या बनत आहेत. प्लेन रॉ सिल्कच्या साडीवर कॉन्ट्रास्ट कलमकारी किंवा खणाचं ब्लाऊज एकदम ‘ट्रेंड’मध्ये आहे.
©रश्मी विनोद सातव
rashmisatav@gmail.com



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा