गुरुवार, १० जून, २०२१

विशाखाची दोन रेशमी गाठोडी !

 



‘टेन्शन वरची मात्रा, हास्य जत्रा !’ असं जेव्हा कानावर पडतं तेव्हा पहिलं स्किट आठवतं ते विशाखा सुभेदार आणि समीर चौगुले यांचं ! विशाखा म्हणजे विनोदाचं एक असं अजब रसायन आहे की लॉकडाऊन सारख्या अत्यंत कठीण काळात तिनं आपल्याला मनमुराद हसत ठेवलं ! लहानपणी ‘भरतनाट्यम’चं प्रशिक्षण घेतलेल्या विशाखाला खरतर अभिनयाची सुद्धा लहानपणापासूनच प्रचंड आवड होती परंतु मनोरंजन क्षेत्रात तिचा प्रवेश लग्नानंतर झाला. तिचे यजमान महेशजी स्वतः डबिंग आर्टिस्ट, अभिनेता आणि दिग्दर्शक असल्यामुळे विशाखाला आपली आवड जोपासायला पूरक वातावरण मिळालं आणि ती या क्षेत्रात आली आणि अफाट लोकप्रिय झाली. सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी दिग्दर्शित ‘एक डाव भटाचा’ या नाटकाने सुरु झालेला तिचा प्रवास – काही चित्रपट, ‘फू बाई फू’ची चार पर्व, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, हिंदीतली ‘कॉमेडी सर्कस’ करत सोनी टीव्हीच्या 'हास्य जत्रा'च्या स्किट्सच्या पॉवरफूल विनोदातून महाराष्ट्रातील घराघरात जाऊन पोहोचला !

दर्जेदार विनोदी अभिनय हा सर्वात कठीण अभिनय समजला जातो, ज्याच्यावर विशाखाचं जबरदस्त प्रभुत्त्व आहे. या तिच्या अभिनयावर फिदा होऊन हिंदी सिनेअभिनेत्री आणि सौंदर्यसम्राज्ञी रेखाजींनी तिला एक सुंदर कांजीवरम भेट दिली ! ‘सुपरनानी’ या चित्रपटात विशाखा, रेखाजींबरोबर काम करत होती आणि विशाखाच्या कामाच्या आणि स्वभावाच्या रेखाजी चक्क प्रेमात पडल्या होत्या ! शुटींगच्या शेवटच्या दिवशी रेखाजींनी विशाखाला आपल्या ‘व्हॅनिटी व्हॅन’मध्ये बोलावून घेतलं आणि प्रेमाखातर एक सुंदर रेशमी गाठोडं विशाखाच्या हातात ठेवलं ! मंत्रमुग्ध झालेल्या विशाखाने नकळत ते गाठोडं उघडलं तर आतून एक सुंदर रेशमी कांजीवरम तिच्याकडे डोकावून पाहत होती ! रेखाजींनी आपल्या ‘कांजीवरम’च्या खजिन्यातली एक खास कांजीवरम विशाखाला भेट दिली होती आणि त्या सोबत रेखाजींचा एक जुना दुर्मिळ फोटो आणि त्या फोटोच्या मागे स्वतःच्या हस्ताक्षरात विशाखाच्या कामाचे कौतुक करणारा एक खास मेसेज होता ! विशेष म्हणजे त्या भेटीत रेखाजींनी विशाखाशी मराठीतून खूप गप्पा मारल्या. विशाखासाठी हे सगळं स्वप्नवत होतं ! संकोच व्यक्त करण्याचं भानही विशाखाकडे राहिलं नव्हतं आणि ती ते रेशमी मौल्यवान गाठोडं घेऊन, ‘ही साडी कोणत्या खास प्रसंगाला नेसू...’ असा विचार करतच घरी परतली. गंमत म्हणजे आजतागायत खास प्रसंगाची वाट बघत ती साडी अजूनही त्या रेशमी गाठोड्यातच आहे ! अशीच एक रेशमी भेट तिला नंतरही मिळाली.......   


विशाखाच्या यशाचं रहस्य म्हणजे – आत्मपरिक्षण ! विशाखा म्हणते, “भाकरी सतत फिरवत ठेवावी लागते, नाहीतर करपते ! माझ्या अभिनयात सतत नवीन काहीतरी देण्यासाठी मी सतत आत्मपरिक्षण करत असते. सतत नव्याचा शोध घेत राहते.... ” हे तिचे सतत नवीन काहीतरी करण्याचे प्रयोग कायमच आपल्याला ‘हास्यजत्रा’मध्ये पहायला मिळतात. विशाखाचे आणि ‘हास्यजत्रा’मधील इतर कलाकारांचे हे असे अफलातून प्रयोग बघायला एकदा ‘सेलिब्रेटी गेस्ट’ म्हणून दिग्गज अभिनेत्री भारतीताई आचरेकर आल्या होत्या आणि येतांना त्यांनी ‘हास्यजत्रा’मधील सर्व कलाकारांसाठी खाऊ आणि गिफ्ट्स आणले होते. त्यांनी आणलेले मस्त उकडीचे मोदक आणि डोसे संपवल्यावर भारतीताईंनी सगळ्यांना गिफ्ट्स दिले. त्यात विशाखाला एक सुंदर ‘पिच कलर’ची बांधणी सिल्कची साडी भेट म्हणून दिली आणि त्या म्हणाल्या, “विशाखा कमाल काम करते, आज जर मी विशाखाच्या वयाची असते तर विशाखासारखंच काम करतांना तुम्हाला मी दिसले असते !” विशाखासाठी हे खूप मोठं प्रशस्तीपत्रक होतं ! विशाखाला त्या साडीतून जणू भारतीताईंचे आशीर्वादच मिळाले होते. 

 

मुळात साडी प्रकार आवडणाऱ्या विशाखासाठी या दोन्ही साड्या खूप खास आहेत. रेखाजींनी दिलेली साडी नेसायचा प्रसंग अजून यायचाय, पण भारतीताईंनी दिलेल्या साडीवर विशाखाने लगेच एक वेगळ्याच धाटणीचे ब्लाऊज शिवलं. विशाखाची स्टायलिस्ट अर्चना ठावरेनं तिच्यासाठी वेगवेगळ्या साड्यांवर घालता येईल असं मल्टिशेडेड लांब पॅटर्नचं ब्लाऊज शिवून आणलं. साडी ड्रेप करण्यात वाकबगार असलेली विशाखा एका कार्यक्रमात ती साडी नेसून गेली. त्या खास ब्लाऊजवर ती बांधणी साडी तिने वेगळ्याच स्टाईलनं नेसली होती आणि नेहमी प्रमाणेच त्या कार्यक्रमात, तिच्या साडी ड्रेपिंगचं खूप कौतुकही झालं. त्या कार्यक्रमाहून घरी गेल्यावर विशाखानं भारतीताईंनी दिलेली ही साडी पण एका रेशमी गाठोड्यात जपून ठेवली. तिच्या कामाला मनापासून मिळालेली दाद म्हणजे ही ‘दोन रेशमी गाठोडी’ विशाखासाठी खूप मोठा मौल्यवान ठेवा आहे, जो तिनं जतन करून ठेवलाय.....कायमचा !   


©रश्मी विनोद सातव 

rashmisatav@gmail.com   



२ टिप्पण्या: