गुरुवार, १५ जुलै, २०२१

‘ऐश्वर्या’च्या दोन ‘पॅशन’ !

 

१९८८ मध्ये दूरदर्शनवरून ‘महाश्वेता’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली ऐश्वर्या नारकर, मनोरंजनक्षेत्रात, ‘न ठरवता’ सहजपणे आली ! डोंबिवलीच्या ‘स्वामी विवेकानंद विद्यामंदिर’मध्ये शिकणाऱ्या ऐश्वर्याला शाळेत असतांना ज्ञानेश्वरांच्या एका ऐतिहासिक नाटकात घेतलं होतं. त्यात ती सोपानदेवांच्या भूमिकेचा सराव करत असतांना तिचं आख्खं नाटक पाठ झालं होतं ! नाटकाची तारीख जवळ आली आणि ज्ञानेश्वरांची मुख्य भूमिका करणारी मुलगी आजारी पडली ! मग तिच्या नाटकाच्या पांडुरंगसरांनी ती भूमिका ऐश्वर्याला दिली आणि तिनं ती भूमिका अतिशय उत्तम केली. तिचं खूप कौतुक झालं आणि तिला अभिनय जाम आवडू लागला ! मग तिने काही बालनाट्यात भाग घेतला, पण शिक्षणात तितकाच रस घेणाऱ्या ऐश्वर्यानं शिक्षणाला प्राधान्य दिलं आणि तिचं नाटक बाजूला पडलं !  एफ. वाय.ला असतांना तिच्या शाळेतल्या त्याच पांडुरंगसरांनी तिची प्रभाकर पणशीकरांशी ओळख करून दिली, त्यावेळी पणशीकर त्यांच्या ‘गंध निशिगंधाचा’ या नाटकासाठी एका सोज्व्वळ चेहऱ्याच्या अभिनेत्रीच्या शोधात होते. त्यांनी तिला त्याचे नाटक वाचून दाखवायला सांगितलं आणि मराठीवर प्रभुत्त्व असणाऱ्या ऐश्वर्यानं ते नाटक इतकं अस्खलित वाचलं की पणशीकरांनी थेट तिला त्या नाटकातील मुख्य अभिनेत्रीची भूमिका दिली ! बालनाट्यानंतर मधले सगळे टप्पे वगळून ऐश्वर्या थेट व्यायसायिक नाटक करू लागली ! याच नाटकाच्या दरम्यान तिला अविनाश नारकर भेटले आणि ते दोघं प्रेमात पडले.  

अतिशय नैसर्गिक अभिनय करणारी ऐश्वर्या मग आपल्याला, अनेक नाटकं, जाहिरातीं, सिनेमां आणि मालिकांमधून वेगवेगळ्या भूमिकांमधून दिसू लागली. या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वावरणारी ऐश्वर्या बऱ्याचदा आपल्याला सुंदर साड्यांच्या पेहेरावात भेटत आली आहे. ‘अभिनय’ आणि ‘साडी’ या तिच्या दोन ‘पॅशन’ आहेत. साडी हा पेहेराव तिला प्रचंड आवडतो आणि ती साड्या अतिशय सुंदर ‘कॅरी’ करते. ती तिच्या साड्यांच्या संग्रहासाठी नेहमीच वेगवेगळ्या साड्या खरेदी करत असते. पण त्या साड्या ती कधी मुंबईत मोठ्या नावाजलेल्या दुकानांमधून न घेता, शुटींगसाठी ज्या ज्या ठिकाणी जात असते त्या त्या ठिकाणाची खासियत असलेली साडी खरेदी करत असते त्यामुळे तिथल्या स्थानिक कलेला प्रोत्साहन मिळतं, असं तिला मनापासून वाटतं. ऐश्वर्या म्हणाली, “मला साड्यांचे, सगळे प्रकार आवडतात. साड्यांच्या रंगसंगती बाबतीत मात्र मी अत्यंत चोखंदळ आहे. साडी या पारंपरिक वेशभूषेत स्त्रिया फारच ‘ग्रेसफुल’ दिसतात आणि त्यात कमनीय बांधा असेल तर अजूनच !”

पण ‘कुटुंब आणि करियर’ मधून तिला, तिच्या या ‘साडी खरेदी प्रेमासाठी’ बऱ्याचदा वेळ मिळत नाही. पण जेव्हा जेव्हा ती तिच्या आईकडे डोंबिवलीत जाते तेव्हा, तिची गाडी बघून ‘दीदी दीदी’ करत तिच्या आईच्या घराजवळ राहणारा मुळचा पश्चिम बंगालचा एक ‘छोटू’ म्हणून विणकर त्याचं साडीचं गाठोडं घेऊन लगेच तिच्या आईकडे येतो ! तिची आई आणि ती नेहमी त्याच्याकडून साड्या घेत असल्यामुळे तो त्यांच्या घरातलाच एक झालाय. बंगालच्या दुर्गम भागातील गरीब विणकरांकडून तो साड्या आणत असतो. एक दिवस असच दीदीला आलेलं बघून तो गाठोडं घेऊन घरी आला आणि म्हणाला, “दीदी आपके लिये एक बहुत सुंदर साडी लाया हूँ .... ”...... असं म्हणत त्यांनं गाठोड्यातून एक सुंदर ‘कांथावर्क’ केलेली सिल्कची साडी बाहेर काढली – मोतिया रंगाच्या सिल्कच्या साडीवर रंगीत धाग्यांनी पदरावरचे रेशमी मोर, काठावरची वेलबुट्टी आणि साडीतली बुट्टी सुद्धा कांथाने भरलेली होती !  ऐश्वर्याच्या संग्रहात कांथाची साडी नव्हतीच त्यामुळे साडीची किमत जास्त असून सुद्धा, हाताने केलेल्या त्या कलेचा मान राखत ऐश्वर्याने छोटू कडून ती साडी विकत घेतली आणि लगेच पुढच्या ॲवॉर्ड फंक्शनला नेसली सुद्धा !

विशेष म्हणजे ऐश्वर्या इतकेच तिचे यजमान - अभिनेते अविनाश नारकर सुद्धा ‘साडी-प्रेमी’ आहेत. ऐश्वर्याच्या, जवळ-जवळ सगळ्या साड्या त्यांनी त्यांच्या आवडीनुसार आणलेल्या असून त्यांना साड्यांची उत्तम जाण आहे ! सुंदर साड्यांचं सौंदर्य, ऐश्वर्यामुळे अजूनच खुलतं असं त्याचं ठाम मत आहे आणि ऐश्वर्यानं प्रत्येक नवीन साडी नेसल्यावर प्रत्येक वेळेस, कदाचित नव्यानं ते तिच्या प्रेमात पडत असतील !      










‘कांथा’ची रेशमी कलाकुसर !

‘कांथा साडी’ म्हणजे, कॉटन किंवा सिल्कच्या साडीवर हाताने काही विशिष्ट प्रकारचे भरतकामाचे टाके घालून, सुंदर नक्षीकामाने सजवलेली साडी. पश्मिम बंगालची खासियत असलेल्या या साडीला ‘कांथा साडी’ हे नाव का पडलं असावं ? खूप वर्षांपूर्वीपासून बंगालच्या स्त्रिया, जुन्या साड्या एकत्रितपणे शिवून, वरून पांढरे सिल्कचे किंवा कॉटनचे कापड किंवा साडी लावून त्यांची गोधडी बनवित असत आणि त्या संपूर्ण गोधडीवर पांढऱ्या दोऱ्याने ‘धावदोरा’ नावाची ‘टीप’ हाताने घालीत असत. ती ‘टीप’ वापरून हळूहळू त्या स्त्रिया वेगवेगळी नक्षीकाम पण करू लागल्या आणि या भरतकामात त्यांनी नवीन टाके विकसित करून खूप वैविध्य आणले. बंगालमध्ये या गोधडीला ‘कांथा’ म्हणतात, त्यावरून नंतर भरतकामाच्या या प्रकारालाच ‘कांथा स्टीच’ हे नाव पडले आणि मग ‘कांथा स्टीच’ने या स्त्रिया, साड्या देखील भरू लागल्या आणि या ‘कांथा वर्क’ केलेल्या अतिशय सुंदर साड्या जगभर लोकप्रिय झाल्या ! पुण्यात केळकर म्युझियममध्ये १९ व्या शतकातील प. बंगालमधील अशी एक गोधडी जतन करून ठेवली आहे, ज्याच्यावर वेलबुट्टीचे अतिशय सुंदर कांथावर्क हाताने केलेले आहे !

भारतातील खूप जुन्या पारंपरिक कलांपैकी ही एक कला असून इ.स.पूर्व १५०० च्या कालखंडात ही कला अस्तित्त्वात असल्याचे उल्लेख सापडले आहेत. ५०० वर्षांपूर्वीच्या कालखंडातील लेखक, श्रीयुत क्रिष्णदास कविराज यांच्या एका पुस्तकात उल्लेख केलेली ‘कांथा-गोधडी’ आजही ओडिशामध्ये ‘पुरी’ या गावी जतन करून ठेवली आहे ! त्या काळी अत्यंत काटकसरीत जगणाऱ्या स्त्रिया ‘कांथाचे धागे’ सुद्धा इतर जुन्या वस्त्रांपासून अलगद ओढून काढत असत ! खूप वर्षांपूर्वी बंगालमध्ये एक प्रथा होती की मुलगी जन्माला आल्यावर तिची आई नवीन साड्या वापरून कांथा-गोधडी शिवायला घेत असे आणि आपल्या मुलीचं लग्न ठरेपर्यंत ती त्या कांथा-गोधडीवर अत्यंत बारीक नक्षीकाम करत असे आणि मुलगी सासरी निघाली की तिला ती ‘कांथा-गोधडी’ भेट म्हणून देत असे. शिवाय ही शिवतांनाच या गोधडीच्या आत अडीअडचणीला लागतील म्हणून काही मौल्यवान गोष्टीही ती आपल्या मुलीसाठी ठेवत असे ! देदीप्यमान वारसा असलेल्या या कलेला, ब्रिटीश काळात उतरती कळा लागली होती परंतू १९४० च्या सुमारास ज्येष्ठ कवी गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या सुनेने म्हणजे प्रतिमाताई टागोरांनी बंगालमधील बिरभूम जिल्ह्यात शांतिनिकेतन येथे या कलेला पुनरुज्जीवन दिले.    

प.बंगाल बरोबरच आता ओडिशा, आंध्रप्रदेश, त्रिपुरा आणि आसाममध्ये सुद्धा उत्पन्नाचे एक साधन म्हणून ‘कांथा आर्टिस्ट स्त्रिया’ घरकाम सांभाळून साड्यांवर ‘कांथा वर्क’ करू लागल्या आहेत. बंगाल मध्ये विकसित झालेल्या कांथावर्कला ‘नक्षी कांथा’ असेही म्हणतात. बंगालला ‘नक्षी-कांथा’साठी २००८ मध्ये शासनाचे भौगोलिक स्थानदर्शक प्रमाणपत्रक मिळाले आहे.

या कांथा-वर्कच्या नक्षीत पानं-फुलं, वृक्ष-वेली, प्राणी-पक्षी, कमळं, मासे, मानवीय आकृत्या इत्यादी नैसर्गिक घटक, तसेच पौराणिक संदर्भ, भौमितिक आकार, कोयऱ्या, मंडाला आणि ‘कांथा वर्क’ करणाऱ्या स्त्रियांच्या स्वप्नातील गोष्टी सुद्धा चक्क साडीवर उतरलेल्या दिसतात ! या कामाचं वैशिष्ट्य म्हणजे, साडीवर वरच्या बाजूने पूर्ण भरलेलं काम असलं तरी साडीच्या उलट्या बाजूने फक्त बारीक धावदोरा दिसतो ! ‘कांथा-वर्क’ सुरु करण्यापूर्वी ट्रेसिंगपेपर वरील डिझाईन, साडीवर आधी छापून घेतले जाते मग डिझाईनची आऊटलाईन, ‘रनिंग स्टीच’ किंवा ‘स्टेम स्टीच’ ने करून घेतली जाते आणि मग त्याच्या आजूबाजूची बारीक नक्षी भरली जाते. पण खूप पूर्वी ट्रेसिंग पेपर नव्हता तेव्हा, काल्पनिक रेषेनुसार काम केले जात असे. मलबेरी सिल्क, टसर सिल्क किंवा कॉटनच्या साड्यांवर हे ‘कांथा-वर्क’ केलं जातं. साडीला लाकडी फ्रेम लावून सिल्कच्या धाग्याने हे काम केले जाते. या साड्यांच्या ‘बॉर्डर’मध्ये असंख्य प्रकार असून त्या काठांना ‘बांगला’ भाषेत वेगवेगळी नावे आहेत. कांथा डिझाईनच्या पॅटर्ननुसार कांथा-साडीचा लुक बदलत जातो. काही कांथा साड्या पूर्व भरलेल्या असतात तर काही फक्त काठा-पदरावर आणि बुट्टीवर भरलेल्या असतात. शिवाय पूर्ण भरलेल्या ‘रिव्हर्स कांथा’मध्ये साडीभर पसरलेली फुलं, पक्षी, मासे किंवा तस्तम घटक सोडून बाकीची साडी कांथा-स्टीचने पूर्व भरून टाकली जाते त्यामुळे रंगीबेरंगी साडीमध्ये ते रिकामे पक्षी उठून दिसतात ! ‘जाम-कांथा’ मध्ये जामदानी बुट्टीबरोबर केलेलं कांथावर्क म्हणजे दोन कलेचं एक अप्रतिम कोलाज म्हणता येईल. शिवाय टसर सिल्कवरच्या ‘हॅन्ड पेंटिंग’ किंवा ‘ब्लॉक प्रिंटीग’ मध्ये सरमिसळून गेलेलं ‘कांथावर्क’ म्हणजे एकेक सुंदर कलाकृतीच असते ! हे संपूर्ण काम हाताने होत असल्यामुळे एका संपूर्ण भरलेल्या साडीवरचं काम पूर्ण व्हायला काही महिने लागतात आणि त्यावरील कामानुसार या साड्यांची किंमत ठरते.   

 कांथा साडीवरील भरतकामामुळे साडीवर एक खास ‘टेक्श्चर’ आलेलं असतं आणि त्या अप्रतिम कलाकृतीवर हात फिरवतांना त्या ‘कांथा आर्टिस्ट’ स्त्रियांच्या कलेला अक्षरशः सलाम करावासा वाटतो !

©रश्मी विनोद सातव 

rashmisatav@gmail.com                                           


सुंदर कांथा साड्यांचे कलेक्शन उपलब्ध आहे. 
संपर्क : 
Weaving India 8010912177          

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा