गुरुवार, २२ जुलै, २०२१

मधुराची ‘मेखला सादोर’ .....मधुर भेटवस्तूंची शिदोरी !


‘स्वतःतच नवे काहीतरी शोधायला हवे,.... कधीतरी वेड्यागत वागायला हवे....’ असं ठसक्यात म्हणणाऱ्या मधुरानं, ‘कधीतरी वेड्यागत...’ या काव्याभिनयाच्या एका वेगळ्याच धाटणीच्या कार्यक्रमातून जसं स्वतःमध्ये काहीतरी नवीन शोधलं, तिसं ती नेहमीच तिच्या वेगवेगळ्या भूमिकांमधून नवं काहीतरी शोधत राहते आणि त्या भूमिकांना नवा आयाम देत राहते. लहानपणीच वडिलांकडून अभिनयाचं बाळकडू मिळालेल्या मधुरा वेलणकरला लग्नानंतर पण, साटम कुटुंबात अभिनयाचा माहोल मिळाला ! नाटक, सिनेमा आणि मालिकेमधील तिच्या अभिनयाला अनेक पुरस्कार आणि बक्षीसही मिळाली.

या बक्षिसांप्रमाणेच जतन करून ठेवाव्यात अशा काही खास भेटवस्तूही तिला मिळाल्या आहेत आणि त्या भेटवस्तू म्हणजे चक्क चार साड्या आहेत ! गानसम्राज्ञी लता मंगेशकर, ‘सोनी-टीव्ही’वरील ‘सी.आय.डी.’ या मालिकेच्या जबरदस्त फॅन आहेत ! त्या खूप मनोभावे ‘सी.आय.डी.’चे जुने एपिसोड्सही बघत असतात ! एकदा लतादीदींनी ‘सी.आय.डी.’च्या कलाकारांचे कौतुक करण्यासाठी ‘सी.आय.डी.’च्या कलाकारांना आवर्जून घरी बोलावून, त्यांचे आदरतिथ्य करून त्यांच्या अभिनयाचे कौतुक म्हणून त्यांना आणि त्यांच्या घरच्यांसाठी काही भेटवस्तू दिल्या. ‘सी.आय.डी.’ फेम अभिनेते शिवाजी साटम यांच्याकडे त्यांच्या सुनेसाठी म्हणजे मधुरासाठी एक सुंदर निळीशार पैठणी पाठवली ! मधुराला मिळालेल्या खास भेटवस्तूंपैकी ही पहिली भेटवस्तू ! त्यानंतर गणपती उत्सवात लतादिदींनी साटम कुटुंबाला घरी दर्शनाला बोलावले होते. तेव्हा मधुरा, लतादिदींनी दिलेली तीच पैठणी नेसून गेली होती. खास ठिकाणीच ती साडी नेसायची म्हणून, तोपर्यंत मधुराने त्या साडीची घडीच मोडली नव्हती ! त्यांच्या घरी जातांना मधुराने आपल्या पाच महिन्याच्या बाळालाही बरोबर नेलं होतं आणि स्वतः लातादिदिंसाठी खास फळांचा हलवा करून नेला होता. त्यांच्या घरून परत निघतांना लतादिदींनी त्यांना निरोप देतांना मधुराच्या हातात एक बॉक्स ठेवला आणि बॉक्सवर लिहिलं होतं ‘प्रेमपूर्वक लता !’ बॉक्समध्ये ‘गार्डन’ची एक सुंदर झुळझुळीत साडी होती....मधुराला मिळालेली ही दुसरी खास भेटवस्तू ! मधुराने त्या दोन्ही साड्या लतादीदींचा आशीर्वाद म्हणून जीवापाड जपून ठेवल्या आहेत.

करियर बरोबरच, मधुरानं तिच्या कौटुंबिक गोतावळ्यातील नाती पण घट्ट सांभाळून ठेवली आहेत. मधुराप्रमाणेच करियर आणि कुटुंब सांभाळणारी, प्रीती चंडेल म्हणून तिची एक मावस नणंद आहे. मधुरा, प्रीतीच्या हुशारीचं, चोखंदळ राहणीमानाचं कायमच भारावून जाऊन कौतुक करत असते. एकदा भाऊबीजेच्या कार्यक्रमाला प्रीती खूप सुंदर वेशभूषा करून आली होती. मधुराला तो साडीचा प्रकार जाम आवडला आणि तेव्हा मधुराला प्रीतीकडून कळाले की ही आसामची पारंपरिक साडी असून तिला ‘मेखला सादोर’ असं म्हणतात !

तो साडी प्रकार मधुराला खूपच आवडला होता म्हणून आणि तिच्या कामाच्या व्यस्ततेत तिला पटकन घालता येणारी अशी ही, ग्रेसफुल वेशभूषा तिच्याकडेही हवी म्हणून प्रीतीनं ताबडतोब मधुरासाठी, चक्क दोन मेखला सादोर मागवल्या आणि तिला भेट दिल्या ! एक गुलबक्षी नक्षीची आकाशी मेखला सादोर आणि दुसरी वेगवेगळ्या ब्राईट रंगांनी काठ - पदर आणि बुट्ट्यांवर नक्षीकाम केलेली ब्राऊन रंगाची सुंदर मेखला सादोर. मधुराला ही भेट प्रचंड आवडली. या दोन साड्या मिळून मधुराकडे चार खास भेटवस्तू झाल्या ! विशेष म्हणजे सुंदर ‘टॅसल्स’ असलेल्या या साडीला फॉल पिको वगैरे काही करावे लागत नाही. 

अगदी पटकन नेसून होते आणि दिसतेही खूप छान म्हणून मधुराला त्या मेखला सादोर इतक्या आवडतात की बऱ्याचदा ती त्या मेखला सदोर कार्यक्रमांना नेसत असते. एकदा एका शुटींगवरून येऊन लगेच आवरून तिला ‘नाट्य परिषदेच्या पुरस्कार सोहळ्याला’ जायचं होतं, म्हणून तिने पटकन नेसून होणारी मेखला चादोर नेसली आणि त्या कार्यक्रमाला गेली. तिथे ‘शेखर खोसला कोण आहे ?’ या नाटकातील तिच्या अभिनयाला सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून पुरस्कार जाहीर झाला. पुरस्कार घ्यायला ती स्टेजवर गेली आणि सादोरचा ‘झिग-झॅग’ पॅटर्नमध्ये खोचलेला फलकारा, चालतांना एका लयीत खूप सुंदर हेलकावे घेत होता त्यामुळे सगळ्यांच्या नजरा तिच्या हटके वेशभूषेकडेच होत्या ! पुरस्कार घेऊन खाली उतरल्यावर तिच्या भोवती गराडा पडला आणि शुभेच्छांबरोबर ‘साडीचा हा काय प्रकार आहे’ याची अत्यंत कुतूहलाने चौकशी देखिल झाली ! जेव्हा जेव्हा मधुरा ती साडी नेसते तेव्हा प्रत्येक वेळेस, त्या आसामी साडीचं खूप कौतुक होतं आणि त्यामुळे मधुराला ती साडी नेसायला आणि मिरवायला फार आवडते !     

आसामची ‘मेखला सादोर’ !

ब्रह्मपुत्रा नदीमुळे ‘सुजलाम-सुफलाम’ झालेल्या आसाममधील सृष्टी सौंदर्याइतकीच तिथली संस्कृती आणि वस्त्रपरंपरा देखील अप्रतिम आहे. आसाम हे असे ठिकाण आहे जिथे एकाच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे सिल्कचे धागे तयार होतात. ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यात तयार होणाऱ्या आणि निसर्गतःच सोनेरी पिवळ्या रंगाच्या ‘मुगा’ सिल्कला ‘आसामचं सोनं’ म्हणतात. आसाममध्ये १३ व्या शतकातील ‘अहोम’ राजघराण्यातील पुरुष व स्त्रिया, मुगा सिल्क वापरत असल्याची नोंद आहे, कदाचित त्याच्याही आधीपासून आसाममध्ये मुगा सिल्कचे धागे बनत असतील ! ‘मुगा पोलू’ म्हणजे मुगाचे रेशमी किडे फक्त आसाममध्येच आढळतात आणि या किड्यांना फक्त ‘सोम’ आणि ‘सोलू’ झाडाचीच पानं खायला दिली जातात. केवळ ४०० गॅम मुगा सिल्कचा धागा मिळण्यासाठी शेतकऱ्याला एक एकर जागेवर ही झाडं लावावी लागतात आणि एक मुगा साडी विणायला कमीत कमी एक किलो मुगा सिल्कचा धागा लागतो ! जगभर मागणी असलेलं हे सिल्क फक्त आसाममध्येच तयार होत असल्यामुळे, दुर्मिळ असणारं आणि त्यासाठी येणाऱ्या खर्चामुळे हे सिल्क अत्यंत महाग असतं. सोनेरी रंगाचं हे सिल्क किंचित टसर सारखं दिसतं. विशेष म्हणजे प्रत्येक धुण्यात या सिल्कची चमक वाढत जाते ! शिवाय हे मुगा सिल्क खूप टिकाऊ देखील असतं, त्यामुळे महाग असल्या तरी मुगा सिल्कच्या साड्या पिढ्यांपिढ्या टिकतात. २००७ मध्ये या सिल्कसाठी शासनाकडून ‘भौगोलिक स्थानदर्शक प्रमाणपत्र’ देखील मिळाले आहे. मुगाबरोबरच आसामचं पांढरं शुभ्र टिकाऊ ‘पाट’ आणि मऊ ऊबदार ‘ईरी’ सिल्क सुद्धा प्रसिद्ध आहे. ब्रह्मपुत्रेच्या उत्तरेकडील किनाऱ्यावर वसलेल्या सुवलकुची या गावात आसाममधील पारंपरिक साड्या हातमागावर विणण्याचा मोठा उद्योग चालतो.  

आसामचं सिल्क जसं प्रसिद्ध आहे तशीच आसामची साडी सुद्धा, तिच्या वेगळ्याच नावामुळे लक्षात राहते. आसामची पारंपरिक साडी, ‘मेखला सादोर’ किंवा ‘मेखला चादोर’ किंवा ‘मेखला चादर’ नावाने ओळखली जाते. ही ‘मेखला सादोर’, ‘मुगा’, ‘पाट’, ‘ईरी’, ‘मलबेरी’ ‘टसर’ किंवा ‘कॉटन’मध्ये सुद्धा बनवली जाते. ही साडी अखंड नसून दोन तुकड्यात असते पण नेसल्यावर मात्र ती अखंड दिसते ! यातील खालच्या स्कर्ट सारख्या भागाला ‘मेखला’ म्हणतात आणि वरच्या पदराच्या भागाला ‘सादोर’ म्हणतात. ही साडी कसी नेसायची हे एकदा कळालं  की खूपच लवकर नेसून होते. लांबीला अडीच मीटर असलेली मेखला तिच्या उंचीच्या दोन्ही कडा एकमेकांना शिवून, फार घेर नसलेला सरळसोट स्कर्ट शिवला जातो. हा स्कर्टसारखा भाग, साडी पेटीकोटवर खोचून मध्यभागी फक्त दोन ते तीन निऱ्या घालून उजव्या बाजूला त्या निऱ्या खोचल्या जातात, इथेच निम्मी साडी नेसून होते. मग दुपट्ट्यासारख्या दिसणाऱ्या पावणेतीन मीटरचा ‘चादोर’चा भाग, आपल्या नेहमीच्या साडीच्या पदरासारखा डाव्या खांद्यावर आधी ‘पिनअप’ करून उरलेला भाग उजव्या हाताखालून घेऊन गोल फिरवून डाव्या कंबरेवरून घेऊन खोचला जातो. नेसण्याच्या या विशिष्ट पद्धतीमुळे ‘सादोर’च्या दोन्ही टोकांना असलेलं नक्षीकाम अतिशय उठून दिसतं. या डाव्या कंबरेवर खोचलेल्या सादोरचं शेवटचं एक टोक घेऊन त्याला ‘झिग-झॅग’च्या आकारात कमरेवर ‘पिनअप’ केले जाते. डाव्या खांद्यावरचा पदर कधीकधी गुंडाळून खोचलाही जातो.

आसाममध्ये वर्षातून तीनदा येणाऱ्या बिहू सणाला आसामी स्त्रियांनी ‘गोल्डन-पिवळ्या’ आणि लाल रंगसंगतीच्या, एकसारख्या मेखला सादोर नेसून केलेलं लयबद्ध ‘बिहू नृत्य’ आपण कधीतरी पाहिलं असेलच. कार्यक्रमांना आणि सणावारांना आसामी स्त्रिया, सिल्कच्या मेखला सादोर आणि इतर वेळेस कॉटनच्या मेखला सादोर नेसतात. आसामच्या निसर्गसौंदर्यातील आणि विशेष करून ‘काझीरंगा’ अभयारण्यातील अनेक नैसर्गिक घटक, फुलपाखरं, कोयऱ्या, भगवतगीता, भौमितिक आकार, ‘जापी’ नावाच्या आसामी टोप्या आणि आसामी अलंकार वगैरे या साडीवर ‘जकार्ड पद्धतीने’ किंवा शटलने आडवे धागे टाकून विणलेले दिसतात. ‘अहोम’ साम्राज्यातील कलाकुसरीचाही आसामच्या साड्यांवरील नक्षीकामावर सुंदर प्रभाव पडलेला दिसतो. मीनावर्क किंवा ब्राईट रंगात केलेलं नक्षीकाम ही आसामी साड्यांची खास ओळख आहे. सिल्कच्या साड्यांवर सिल्कनं आणि कॉटनच्या साड्यांवर सिल्क किवा लोकरीनं हे नक्षीकाम केलं जातं. मुगा सिल्कच्या मुळच्या गोल्डन रंगावर लाल रेशमाने विणलेलं सुंदर नक्षीकाम केलेली ‘मेखला सादोर’ म्हणजे आसामची पारंपरिक वेशभूषा. याच रंगसंगतीची मेखला सादोर आसामच्या नववधू स्वतःच्या लग्नात नेसतात.

आसामच्या या पारंपरिक वेशभूषेच्या नजाकतीची भुरळ, फॅशन प्रेमी जगतालाही पडली आणि आसामच्या सीमा पार करून देशातील मोठमोठ्या फॅशन शो च्या रॅमवर अतिशय सुंदर ड्रेप केलेली मेखला सादोर आणि त्यात केलेले आधुनिक बदल, मॉडेल्स मोठ्या ग्रेसफुली  मिरवतात दिसतात. तेव्हा अशी एखादी मेखला चादोर आपल्याही संग्रही हवी असं चोखंदळ स्त्रियांना नक्कीच वाटत असेल !



©रश्मी विनोद सातव

rashmisatav@gmail.com         


     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा