गुरुवार, २९ जुलै, २०२१

किशोरीची डिझायनर साडी !


 लहानपणापासून शास्त्रीय नृत्यात पारंगत असणारी किशोरी शहाणे, ‘मिठीबाई कॉलेज’मध्ये असतांना एका स्पर्धेत जिंकल्यामुळे ‘मिस मिठीबाई’ म्हणून खूप लोकप्रिय झाली आणि त्यामुळे तेव्हा अकरावीत असतांनाच तिला ‘मोरूची मावशी’ आणि ‘हरी अप हरी’ या व्यावसायिक नाटकांच्या ऑफर्स आल्या ! या नाटकांचे प्रयोग चालू असतांनाच १९८६ मध्ये सुभाष घईंच्या ‘कर्मा’ या बॉलीवूड फिल्ममधून ती मोठ्या पडद्यावर आली. मग ‘प्रेम करूया खुल्लम खुल्ला’ या तिच्या पहिल्या मराठी सिनेमामुळे मराठी सिनेसृष्टीला एक ग्लॅमरस चेहरा मिळाला. अभिनयाबरोबरच नृत्यकलेत पारंगत असलेल्या किशोरीला एकामागून एक सिनेमाच्या ऑफर्स येतच राहिल्या ! मग ती आणि तिने केलेल्या फॅशन्स इतक्या लोकप्रिय झाल्या की, त्याकाळात मुलींसाठी ती एक ‘फॅशन आयकॉन’ बनली होती  !

हिंदी-मराठी चित्रपट, मालिका आणि वेब सिरीज मधील अभिनयाबरोबरच ती, तिचे यजमान हिंदी-चित्रपट-निर्माते दिपक बलराज विज यांच्याबरोबर दर्जेदार कलाकृतींची निर्मिती पण करत आहे. शिवाय २०१९ मध्ये कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या सिझनमध्ये भाग घेतलेल्या किशोरीनं केलेल्या ‘टास्क’मुळे सगळ्यांना जबरदस्त खिळवून ठेवलं होतं ! अशीच खिळवून ठेवणारी ‘भवानी काकू’ची ठसकेबाज भूमिका सध्या ती ‘स्टार-प्लस’ वरील ‘गुम है किसी के प्यार में !’ या मालिकेत करत आहे आणि त्यात ती नऊवारी साडीच्या गेटअप मध्ये आहे. किशोरी म्हणाली, “मी बऱ्याच चित्रपटांमधून नऊवारी साड्या नेसल्या आहेत. पूर्वी, ‘शिवलेल्या नऊवारी-साड्या’ नसत, तर त्या नेसाव्या लागत आणि त्या साड्या नेसून झाल्यानंतर, ‘कॉश्च्युम डिझायनर’ त्या साड्या चापून चोपून बसवण्यासाठी अंगावर सुई दोऱ्याने शिवून टाकत असत ! ” पुढे ती म्हणाली, “मी ‘टीनएज’मध्ये असल्यापासून साड्या नेसत आले आहे, मला तेव्हापासूनच साड्या खूप छान ‘ड्रेप’ करता येतात. अकरावी-बारावीत असतांनाच ‘मोरूची मावशी’ आणि ‘हरी अप हरी’ ह्या नाटकांमध्ये मी साड्याच नेसत असे. एकदा तर मी दहावीत असतांना ‘टीचर्स डे’च्या दिवशी माझ्या ‘डिव्हाईन चाईल्ड हायस्कूल’मध्ये शिक्षिका झाले होते. तेव्हा मी माझ्या आईची एक सुंदर सिल्कची साडी नेसून शाळेत गेले आणि तेव्हा साडी नेसून शिक्षिका म्हणून मिरवायला मला खूप भारी वाटत होतं !”

किशोरी पहिल्यापासूनच स्वतःच्या पेहेरावाबद्दल खूप चोखंदळ आहे. किशोरीचे यजमान दिपकजी आणि मुलगा बॉबी या दोघांनाही तिने साडी नेसलेली खूप आवडते ! त्यामुळे साडी प्रकारातही ती खूप वैविध्य आणत असते. एकदा तिला सोशल मिडियासाठी स्वतःचा ‘महाराष्ट्रीयन लूक’ मधला पण ‘हटके’ असा छान ‘सिग्नेचर फोटो’ काढायचा होता. मग तिने, खास त्या फोटोसाठी ‘महाराष्ट्रीयन टच’ असलेली एक फ्युजन साडी स्वतः डिझाईन करायचे ठरवले ! तिने ही कल्पना तिच्या कॉश्च्युम डिझायनरला सांगितली, तिलाही तिची ही कल्पना खूप आवडली, आणि दोघींच्या कल्पनेतून त्यांनी त्या साडीचं चित्र काढलं ! किशोरीकडे ओरिजिनल पैठणीचे विणकाम केलेला एक भरजरी नवाकोरा दुपट्टा होता, त्या दुपट्ट्याचा काही भाग पदराला आणि काही भाग अँटिक जरीबरोबर फ्युजन करून काठाला लावला ! साडीच्या मधल्या भागासाठी रॉ सिल्कचं ‘रेडीश-पिंक’ कलरचं बुट्ट्याचं कापड घेऊन त्याला ते डिझायनर काठ लावले आणि एक सुंदर ‘फ्युजन डिझायनर साडी’ तयार झाली !

      सिग्नेचर फोटोसाठी तयार केलेली ही डिझायनर साडी, किशोरी इतकीच ‘ग्लॅमरस’ आहे !   


     डिझायनर साडीच्या अनंत छटा !

आजच्या लेखातील साडीला कोणताही इतिहास किंवा परंपरा नसली तरी स्वतःचीच एक खास ओळख आहे. कुठल्याही ढाच्यात न बसणाऱ्या या साडीला कोणत्याही प्रांताच्या सीमा नाहीत ! निरनिराळ्या विणी - पोतांचा, कलांचा, परंपरांचा आणि आधुनिकतेचा एक सुरेख संगम म्हणजे ‘डिझायनर साडी !’

भारतात पारंपरिक साड्यांचे असंख्य प्रकार आहेत पण या सगळ्या प्रकारांत अलिकडच्या काळात डिझायनर साडीनं स्वतःचं एक स्थान निर्माण केलं आहे. अनेक फॅशन डिझायनर्स निरनिराळ्या फॅब्रिक्सचं फ्युजन करून डिझायनर साड्या बनवत आहेत. सगळे साडी-प्रकार घेऊन झाल्यानंतर स्त्रिया डिझायनर साड्यांकडे वळतात असं अजिबात नसून, खास प्रसंगासाठी काहीतरी वेगळा प्रकार घेऊन बघू म्हणूनही डिझायनर साड्यांकडे बघितले जाते. फॅशनची उत्तम जाण असलेल्या स्त्रिया तर, आपल्या घरातल्या - वापरून कंटाळा आलेल्या साड्यांमधले आवडलेले भाग एकत्र करून ‘टेलर’कडून सुंदर डिझायनर साड्या बनवून घेऊ लागल्या आहेत !

काही विणकरही स्वतः दोन-तीन कलाप्रकार एकत्र करून डिझायनर साड्या विणू लागले आहेत. त्यांच्या या अफाट कल्पना शक्तीला दाद द्यावीशी वाटते. वेगवेगळे कलाप्रकार एकत्र करून साड्यांचे अनंत प्रकार होऊ शकतात ! जामदानी साडीला कांथाचा पदर, मटका सिल्कला मलमलचा जामदानी पदर, कच्छच्या बांधणीला कांजीवरमचे काठ, बनारसी साडीला पैठणीचे काठ, लिनन साडीवरचं हॅन्ड पेंटिंग, प्लेन साडीला कलमकारी बॉर्डर, प्रिंटेड साडीवरचं कांथावर्क, कॉटनच्या साडीला सिल्कचा पदर, टिश्यूच्या साडीला कलमकारी पदर, टसरवर आरसे लावलेलं मधुबनी, रॉ सिल्कला खणाचा पदर, अजरखला अँटिक जरीचे काठ, सॉफ्ट सिल्कवरचं बंधेज बरोबरचं बाटिक, चंदेरीवरचं अजरख, ईकत पद्धतीने केलेल्या चित्रांवरचं कांथा, टिश्यूचे धागे टाकून केलेली प्रिंटेड महेश्वरी, पैठणीच्या काठांची गढवाल, मलबेरी सिल्कला लावलेला चिकनकारी पदर, बनारसी बुट्ट्यांची सिफॉन, जॉर्जेटवर केलेलं काश्मिरी किंवा कुंदनवर्क आणि बरचं काही ! जितक्या कल्पना तितके प्रकार, या फ्युजनला अंत नाही !  शिवाय चोखंदळ ग्राहक किंवा फॅशन डिझायनर्स अशा विणकरांकडून कार्यक्रमाच्या ‘थीम’नुसार डिझाईन सांगून ‘कस्टमाईझ्ड डिझायनर’ साड्या सुद्धा बनवून घेत आहेत.  

वर्षानुवर्षे बनत आलेल्या पारंपरिक साड्या, पुढेही कायम बनत राहतील, पण आता पारंपरिक साड्यांमध्येही डिझायनर साड्या सुद्धा बनू लागल्या आहेत ! जसं एकेक डिझायनर पैठणी म्हणजे कलेचा एकेक अप्रतिम नमुना असते ! अशा डिझायनर- पैठणी - साड्यांच्या पदरावर विणलेले अप्रतिम मोर, पोपट, नवरा-नवरीचे फोटो, गीतेतले श्लोक, राजा रविवार्म्यांची चित्रं किंवा लोभस नैसर्गिक देखावे वगैरे पाहून अचंबित व्हायला होतं. काही पैठण्यांमध्ये तर साडी विणतांना ‘इंटरलॉकिंग सिस्टिम’नं मौल्यवान खडेही बसवले जातात ! शिवाय सध्या, भरजरी पदराच्या कॉटन पैठण्यांचाही खूप ट्रेंड आलाय ! गढवाल, कांचीपुरम, संबळपुरी, पोचमपल्ली, महेश्वरी, चंदेरी, करवती, शांतीनिकेतन, मंगलगिरी आणि इतर बऱ्याच पारंपरिक साड्यांमध्ये सुद्धा डिझायनर साड्या बनू लागल्या आहेत  !            

आधुनिक ‘फॅशन जगता’तील डिझायनर साड्यांचं रंगरूप तर पूर्ण बदलून गेलं आहे. पूर्ण ‘सीक्वेन्स-वर्क’ केलेल्या साड्या, फ्रिलच्या रफल साड्या,  नेटच्या साड्या, पारदर्शक प्रिंटेड ऑरग्यॅन्झा साड्या, क्रेप साड्याडिजिटल प्रिंटेड साड्या वगैरे असंख्य ‘ग्लॅमरस डिझायनर साड्या’, सिनेतारका आणि ‘फॅशन शो’च्या मॉडेल्स परिधान करत असतात. ‘लाईम लाईट’च्या प्रकाशात या साड्या अधिकच खुलून दिसतात !    

सध्या हातमागावर साड्या विणणाऱ्या काही विणकरांनी एक नवीन प्रयोग केलेला बघायला मिळतो. हातमागावर साड्या विणताविणताच उभ्या-आडव्या धाग्यांमध्ये साडीच्या पदरावर किंवा बुट्ट्यांवर नक्षिकामात ‘इंटरलॉकिंग सिस्टीम’ने छोटे छोटे कप्पे करून त्यात शंख, शिपले, मणी, नाणी, किंवा जाड दोरे यापैकी काहीतरी ठेवून वरून साडीचे विणकाम केले जाते ! आत असलेल्या या गोष्टींमुळे साडीवरील नक्षीला सुंदर ‘थ्रीडी इफेक्ट’ येतो ! या अप्रतिम साड्या पाहिल्यावर विणकरांच्या कौशल्याची खूप कमाल वाटते.    

दोन-तीन कलांचं फ्युजन करून तयार केलेल्या डिझायनर साड्या पाहिल्या की वाटतं हे ‘साडी प्रकरण’ दिवसेंदिवस अधिकच मोहक व वेधक होत चालंलं आहे ! अशा डिझायनर साड्यांची खासियत म्हणजे एक साडी दुसरी सारखी नसते ! त्यामुळे ‘सगळ्यांपेक्षा वेगळं हवं’ म्हणणाऱ्या स्त्रियांसाठी या साड्या वरदान ठरत आहेत !

स्त्रियांसाठी, साडी ही कधीच फक्त एक वस्त्र नसतं, ते असतं आपल्या भावना व्यक्त करण्याचं एक प्रभावी माध्यम ! म्हणूनच उपलब्ध साधन सामुग्रीमधून, आपल्या भावना व्यक्त करणारी एखादी तरी डिझायनर साडी करून घ्यायला काहीच हरकत नाही ! शिवाय देशभर पसरलेल्या या विविध वस्त्रकला, राज्यांच्या सीमा ओलांडून, एकमेकांत अगदी बेमालूमपणे सरमिसळून गेलेल्या पाहिलं की संपूर्ण भारत विविधतेने नटलेला दिसतो ! 

©रश्मी सातव 

rashmisatav@gmail.com   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा