‘फिल्म फेअर ॲवॉर्डस मराठी २०२०’ मध्ये, ‘आनंदी
गोपाळ’ या चित्रपटामधील ‘आनंदी जोशी’च्या भूमिकेसाठी ‘क्रिटीक्स ॲवॉर्ड - सर्वोत्कृष्ट
अभिनेत्री’ने सन्मानित झालेली भाग्यश्री मिलिंद म्हणजे एक अतिशय गुणी अभिनेत्री. मुंबईतील
‘डहाणूकर कॉलेज’मध्ये अकरावीत असतांनाच तिने कॉलेजतर्फे एका नामांकित एकांकिका
स्पर्धेत भाग घेतला होता. त्यात ‘बीपी’ या त्यांच्या एकांकिकेला आणि भाग्यश्रीला अभिनयाचे
पहिले बक्षीस मिळाले होते. याच नाटकावरून पुढे रितेश देशमुख आणि रवी जाधव यांच्या ‘बालक
पालक’ या चित्रपटाची निर्मिती झाली. ऑडीशनमधून, भाग्यश्रीची या चित्रपटासाठी सुद्द्धा
निवड झाली आणि तिच्या सिनेक्षेत्रातील करियरला सुरुवात झाली. कसदार अभिनयामुळे तिच्या
सगळ्याच भूमिका उल्लेखनीय ठरल्या.
भाग्यश्रीला,
दर्जेदार चित्रपट बघण्याची, नृत्याची आणि भटकंतीची खूप आवड आहे. भटकंतीची आवड
असल्यामुळे मनसोक्त फिरण्यासाठी आणि मामला भेटण्यासाठी ती तिच्या गुजरातमध्ये वापीत
राहणाऱ्या मामांकडे नेहमी जात असते. दरवर्षी हिवाळ्यात वापीला एक मोठं प्रदर्शन भरतं.
त्यात आजूबाजूच्या गावांमधून हातमागावरच्या साड्या, भरतकाम केलेले गरब्याचे ड्रेस,
दुपट्टे, बटवे, हस्तकलेच्या वस्तू आणि बऱ्याच कलाकुसरीच्या वस्तू विक्रीसाठी
आलेल्या असतात. ते प्रदर्शन बघणं म्हणजे एक सोहळा असतो. तीन वर्षांपूर्वी,
भाग्यश्री आणि तिची आई मामाकडे गेलेल्या असतांनाच ते प्रदर्शन तिथे वापीला भरलं
होतं. मग भाग्यश्री, तिची आई, तिच्या माम्या आणि इतर बराच मोठा गोतावळा, ते
प्रदर्शन बघायला गेला होता. तिच्या आईला आणि तिच्या माम्यांना साड्यांची खूप आवड
असल्यामुळे, तिथे फिरता फिरता हातामागावरच्या साड्यांच्या स्टॉलवर तिची आई आणि
माम्या रेंगाळल्या ! फार साड्या न नेसणाऱ्या भाग्यश्रीने, साड्या विकत घेऊन त्यांचा
संग्रह वगैरे करणं असं कधीच केलं नव्हतं. आनंदीबाई जोशींच्या भूमिकेसाठी आणि फक्त ॲवॉर्ड
फंक्शन्सला तिने आत्तापर्यंत साड्या नेसल्या होता ! फार साडी नेसत नसल्यामुळे
भाग्यश्री तिथे अजिबात साडी विकत घेणार नव्हती. आई आणि माम्यांची ‘साडी-खरेदी’ बघत
ती फक्त तिथे उभी होती ! तिला बघून दुकानदार म्हणाला, “बहेनजी आप भी लेलो ना साडी,
देखो यह पाटन की पटोला बहुत सुंदर है, बहुत खिलेगी आपपर, खरीदो मत, बस ड्रेप करके
देखो ! ” त्याच्यातला एक मुरलेला विक्रेता प्रभावीपणे बोलत होता, आणि मग
भाग्यश्रीला सुद्धा ती साडी ड्रेप करून बघण्याचा मोह आवरला नाही ! त्या
दुकानदाराने भाग्यश्रीला ती पाटण-पटोला साडी खूप छान ड्रेप केली. सुंदर जरीच्या
काठ-पदराची ती गुलबक्षी-पिंक रंगाची साडी आरशात बघून भाग्यश्री हरखूनच गेली ! भाग्यश्री म्हणाली, “मी फार साड्या नेसत नसले
तरी, मला ती हातामागावरची साडी इतकी आवडली की दोन चारदा नेसल्यानंतर या साडीचा, पटोलाचं
विणकाम केलेला डिझायनर घोळदार स्कर्ट शिवून घेता येईल म्हणून मी ताबडतोब ती साडी
विकत घेतली !”
ती पटोला साडी घेऊन आता तीन वर्षे होऊन गेली तरी, ती साडी नेसायचा भाग्यश्रीचा योग काही आला नव्हता पण या लेखाच्या निमित्ताने तिने ती साडी आवर्जून नेसून खास फोटो शुट केले !
भारतीय अभिजात कला – ‘पाटण पटोला’ !
गुजरातमधील पाटण म्हणजे, मध्ययुगीन काळातील चालुक्य साम्राज्याची
राजधानी. मोठी ऐतिहासिक धरोहर असलेल्या पाटणमध्ये आजही स्थापत्यशैलीचे अप्रतिम
नमुने पहायला मिळतात. यातील ‘रानी की बाव’ या विहीरीची, ‘युनेस्कोच्या जागतिक
वारसा’ यादीत नोंद करण्यात आली आहे ! २७ मीटर खोल असलेली ही विहीर म्हणजे स्थापत्यशैलीचा एक अद्वितीय नमुना आहे. पाटण, ‘रानी की बाव’साठी जसं प्रसिद्ध आहे तसचं
पाटणच्या पटोला साडीसाठी सुद्धा जगभर प्रसिद्ध आहे !
पटोला साडीला ‘पटोला-ईकत’ साडी असेही म्हणतात. ‘पटोला-ईकत’ वस्त्रांचे
धागेदोरे इतिहासात देखील सापडतात. १२ व्या शतकातील चालुक्य साम्राज्यातील सोळंकी
घराण्यातील कुमारपाल राजाला ईकतची वस्त्रं खूप आवडत असत. तो रोज पूजा करतांना
ईकतचीच वस्त्रं वापरत असे ! त्याकाळात महाराष्ट्रातील जालना येथे, साळवी समाजाचे विणकर, ईकतची वस्त्रं हातमागावर विणत असत. कुमारपाल राजा
ती ईकतची वस्त्रं जालन्यातील त्या विणकरांकडून मागवीत असे. अशी वस्त्रं पाटणमध्ये
सुद्धा विणली जावीत म्हणून त्याने त्याकाळात महाराष्ट्रातील ७०० विणकरांना
त्यांच्या कुटुंबासकट पाटणला स्थलांतरित केले आणि ‘पटोला-ईकत’ वस्त्राला राजाश्रय
दिला ! तेव्हापासून
ती वस्त्रं पाटण-पटोला नावाने ओळखली जाऊ लागली.
पाटण-पटोला साडीच्या विणकामाला ‘ईकत’ म्हणतात. ‘इकत’ म्हणजे साडीवरील नक्षीकाम
विणण्याची एक खास पद्धत. ‘ईकत’ हा प्रकार पाटणच्या पटोला साडीत, ओरिसाच्या संबलपुरी
साडीत आणि तेलंगणच्या पोचमपल्ली साडीत सुद्धा असतो. परंतु पाटणची पटोला साडीच फक्त
‘डबल इकत’ पद्धतीत विणली जाते. आज आपण ‘डबल इकत पाटण पटोला’ साडी कशी बनते ते पाहणार आहोत. ‘पाटण-पटोला’
साडीला नुसते ‘पटोला’ साडी असेही म्हणतात.
‘पटोला’ साडी, विणतानांच ‘इकत’ डिझाईन’ साडीवर उतरवलं जातं आणि ती एक
अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. ‘डबल इकत’ म्हणजे उभे आणि
आडवे दोन्ही धागे ‘रेझिस्ट’
पद्धतीने आधी ‘डाय’ करून घेतले
जातात. साडीचे उभे-आडवे धागे हातमागावर लावण्यापूर्वी एका स्टॅन्डवर लावून घेतले जातात. मग सगळ्या
धाग्यांवर साडीच्या ठरवलेल्या डिझाईनप्रमाणे खुणा करून घेतल्या जातात. ते धागे नैसर्गिक
रंगात बुडवण्यापूर्वी, डिझाईनप्रमाणे जिथे रंग नको असेल तिथे ‘रेझिस्ट’ पद्धतीने दुसरे
दोरे घट्ट बांधून घेतले जातात आणि मग ते सगळे धागे रंगात बुडवले जातात. याला ‘रेझिस्ट
डाईंग’ असं म्हणतात. सगळे धागे वाळले की मग पहिले बांधलेले दोरे सोडून,
डिझाईनप्रमाणे परत खुणा करून दुसरीकडे, जिथे दुसरा रंग नको असेल तिथे पुन्हा दुसरे
दोरे बांधून दुसऱ्या रंगात धागे बुडविले जातात. हिच क्रिया साडीच्या डिझाईनमध्ये
जितके रंग आहेत, तितक्या वेळा केली जाते. म्हणजे साडीवरचे संपूर्ण डिझाईन, विणकाम
सुरु करण्यापूर्वीच धाग्यांवर उतरवून घेतले जाते आणि मग विणकामाला सुरुवात होते. मग
ते उभे-आडवे धागे हातमागावर मोजमाप करून अशा पद्धतीने लावून घेतले जातात की
धाग्यांवरचे ते ठरलेले डिझाईन साडीवर विणले जाते. हे काम खूप काटेकोरपणे मोजमाप
करून करावे लागते. या प्रक्रियेला खूप कुशल विणकर लागतात. एखाद्या टप्प्यावर
मोजमापात एक जरी चूक झाली तरी साडीवरचे सगळे डिझाईन चुकू शकते ! अत्यंत क्लिष्ट
प्रक्रियेमुळे एक पटोला साडी पूर्ण तयार व्हायला डिझाईननुसार सहा महिने ते एक
वर्षही लागू शकते ! कुशल कारागिरांच्या एका साडीसाठी लागणाऱ्या वेळेनुसार या
साडीची किंमत ठरते. या साड्या महाग असल्यामुळे सिल्कमध्येच विणल्या जातात.
सोळंकी घराण्यातील कुमारपाल राजाने या कलेला राजाश्रय दिल्याने, त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ ब्रिटीशपूर्व काळात पाटणमध्ये खास दोन पटोला साड्या विणण्यात आल्या होत्या. कुमारपाल राजाने, त्यांच्या गुरुनी लिहिलेल्या संस्कृत-व्याकरणाच्या पुस्तकाची हत्तीवर सुंदर अंबारीत ठेऊन शोभायात्रा काढली होती. या शोभायात्रेत त्यांच्या गुरूंचे भक्त, अनेक हत्ती, घोडे, मोर इत्यादी प्राणी देखील सहभागी झाले होते. १२ व्या शतकातील या शोभायात्रेचा प्रसंग त्या दोन साड्यांवर ‘डबल इकत’ पद्धतीने विणण्यात आला होता ! अत्यंत ‘अँटिक पीस’ असलेल्या त्या साड्यांपैकी एक साडी सध्या नेदरलँड मधील म्युझियममध्ये असून एक साडी स्विझर्लंड मधील म्युझियममध्ये आहे ! या साड्यांवर भारतात विणला गेलेला हा प्रसंग पाटण मधील ‘पाटण पटोला हेरीटेज’ या म्युझियममध्ये जतन करून ठेवण्यासाठी पाटणमधील साळवी कुटुंबाने तसाच अँटिक पीस, पुन्हा बनविला आहे ! शिल्पगुरु रोहित साळवी, भरत साळवी, विनायक साळवी, राहुल साळवी, सावन साळवी आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी मिळून भारत सरकारसाठी एक पीस आणि म्युझियममध्ये ठेवण्यासाठी दोन पीस तीन वर्षे काम करून २००३ मध्ये पूर्ण केले ! ही अत्यंत किचकट कला अवगत असलेल्या विणकरांची कमाल वाटते. ‘पटोला कले’चे ते अप्रतिम नमुने म्हणजे भारतीय वस्त्रपरंपरेची शान आहे ! विशेष म्हणजे या कलेचा सन्मान करत जागतिक स्तरावर पण ‘युनेस्को’ने ‘इकत’ विणकामाची ‘अभिजात कला’ म्हणून दखल घेतली आहे.
पटोला साडीविषयी आणखी काही :
· भारताबरोबरच, इंडोनेशिया, कंबोडिया, म्यानमार,
फिलिपिन्स, थायलंड, इराण, लॅटिन अमेरिका, बाली आणि जपानमध्येही
असे कापड विणायची हि कला अवगत आहे. परंतु ‘डबल-ईकत’ पद्धतीचा जन्म भारतात झाला
असल्याचे पुरावे आहेत. अजंठामधील लेण्यांमधील चित्रात ‘डबल-ईकत’ पद्धतीची वस्त्रं
दिसतात !
· पटोला साडीवरील नक्षीकामात भौमितिक आकार, हत्ती, पोपट, नृत्य करणाऱ्या मुली, पानं-फुलं विणली जातात. पण या ‘मोटीफ्स’ना भौमितीय आकार दिलेला असतो. ‘इकत’ ओळखण्याची खुण म्हणजे डिझाईनच्या कडा कधीच गोलाकार नसतात.
· ‘राणी की बाव’मधील कोरीवकामाचा पटोला साडीवरील नक्षीवर मोठा प्रभाव पडलेला दिसतो.
· चालुक्य साम्राज्यातील फक्त उच्चभ्रू घराणीच ‘पटोला-ईकत’ वापरत असत. ते लोक ‘पटोला-ईकत’ला पवित्र वस्त्राचा दर्जा देत असत.
· पटोला साडीची खासियत म्हणजे त्यावरील ‘इकत’ डिझाईन विणायच्या आधीच धागे ‘डाय’ केलेले असल्यामुळे, पटोला साडीवरची कोणतीही डिझाईन सुलट आणि उलट बाजूने सारखीच दिसते.
©रश्मी सातव
rashmisatav@gmail.com


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा