गुरुवार, ८ जुलै, २०२१

चिन्मयीच्या आजीची सुगंधी ‘रास्ता साडी’ !

 











पूर्वाश्रमीची चिन्मयी सुर्वे ही मुळची औरंगाबादची, पण शिकायला पुण्यात एस. पी. कॉलेजमध्ये होती. कॉलेजमध्ये तिने जे पहिले पुरुषोत्तम केले त्यातच तिला त्या वर्षीचा, ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार’ मिळाला ! ‘उत्तम मराठी बोलणारी एक गुणी अभिनेत्री’ असा नावलौकिक लगेच मुंबईत चंद्रकांत कुलकर्णी यांच्यापर्यंत पोहोचला. तेव्हा ते, मोहन वाघांसाठी ‘ज्वालामुखी’ हे व्यावसायिक नाटक करत होते आणि त्यांनी लगेच चिन्मयीला त्या व्यावसायिक नाटकात घेतलं ! याच नाटकाच्या दरम्यान चिन्मयीची आणि सुमित राघवनची ओळख झाली आणि ते दोघे प्रेमात पडले आणि १९९६ मध्ये ‘चिन्मयी सुर्वे’ – ‘चिन्मयी सुमित’ झाली ! ‘ज्वालामुखी’तून सुरु झालेलं तिचं करियर पुढे अनेक दर्जेदार नाटकं, सिनेमे आणि मालिकांमधून यशस्वीपणे एका उंचीवर गेलं. तिच्या अभिनयामुळे तिचं आयुष्य खूप समृद्ध होत गेलं ! तिच्या समृद्ध जीवनात तिच्या कुटुंबाचा आणि तिच्या आजोळचाही खूप मोठा वाटा आहे !

चिन्मयीचं आजोळ म्हणजे कर्नाटकातील संस्थानिक – ‘जलालपूरकर-देशपांडे घराणं’ ! चिन्मयी लहानपणी सुट्ट्यांमध्ये नेहमी आजोळी जात असे. तिच्या आजोळचा दीडशे वर्षे जुना चौसोपी वाडा आजही अनेक आठवणी सांभाळत तिथे उभा आहे ! चिन्मयीला पाच मावश्या आणि दोन मामा. या मामा-मावश्यांची सगळी मुलं म्हणजे, चिन्मयीला एकूण बावीस भावंडं आहेत ! सुट्ट्यांमध्ये या वाड्यात या सगळ्या भावंडांचा मोठा धुडगूस चाले ! चिन्मयी आणि तिची एक मावस बहिण सर्वात लहान होत्या, त्यामुळे प्रमिलाआजीची म्हणजे ‘चिन्मयीच्या आईच्या आईची’ त्यांच्यावर विशेष माया होती ! प्रमिलाआजी म्हणजे देशपांडे घराण्याचं एक प्रेमळ आणि कणखर व्यक्तिमत्त्व ! या आजीनं तिचं सासरचं संस्थानिक देशपांडे घराणं जितकं सक्षमपणे सांभाळलं तितक्याच खंबीरपणे तिने तिच्या माहेरची शिकवण आणि संस्कारही जपले. या आजीचं आजोळ पण देशपांड्यांचच ! या आजीच्या आईचे वडील म्हणजे ‘कर्नाटक केसरी - श्रीयुत गंगाधरराव देशपांडे’, हे महात्मा गांधीजींचे कट्टर अनुयायी होते. प्रमिला आपल्या आजोबांसोबत नेहमी गांधीजींना भेटायला जात असे ! एकदा गांधीजी ‘स्वातंत्र्य लढ्यासाठी’ पैसा उभा करण्यासाठी स्वतः आपला पंचा झोळीसारखा पसरून जनतेकडे निधी मागत होते ! तेव्हा ही प्रमिला आपल्या आजोबांसोबत तिथेच होती. त्या ‘स्वातंत्र्य लढ्याच्या’ देशव्यापी चळवळीत आपलाही खारीचा वाटा द्यावा म्हणून भारावलेल्या प्रमिलेने आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या सर्रकन काढून महात्माजींच्या झोळीत टाकल्या होत्या ! तर अशी ही, कोणत्याही मोहात न अडकणारी प्रमिला, लग्न होऊन श्रीमंताघरची सून झाली, तरी भपकेबाज राहणीमानात कधी अडकली नाही ! सोज्वळ प्रमिलेच्या आवडीनिवडी पण सात्त्विक होत्या. ते संस्थानिक असल्यामुळे देशातील वेगवेगळ्या भागातून कापड-चोपड घेऊन व्यापारी त्यांच्या घरी येत असत. एकदा मध्यप्रदेशातून आलेल्या एका व्यापाऱ्याकडून चिन्मयीच्या आजोबांनी प्रमिलाआजीसाठी एक सुंदर आमसुली रंगाची, ‘दहा वार रास्ता साडी’ घेतली. त्या साडीच्या भरजरी पदरावर आणि संपूर्ण साडीवर खऱ्या जरीचे धागे विणलेले होते. टिश्यू सारख्या दिसणाऱ्या त्या अप्रतिम साडीच्या, प्रमिला मनापासून प्रेमात पडली !

प्रमिलाआजी ती साडी नेहमी सणावारांना नेसत असे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये चिन्मयी आजोळी असतांनाच चैत्रातील हळदी-कुंकूचा सण येत असे. आजीला गावातून हळदी-कुंकूवाची बरीच आमंत्रण येत असत आणि चिन्मयी व तिची बहिण नेहमी या मोठ्या आईबरोबर तिच्या मागेमागे सगळ्या हळदी-कुंकुवांना जात असत ! सगळी छोटी मुलं प्रमिलाआजीला ‘मोठी आई’ म्हणत असत. त्या हळदी-कुंकुवांना जातांना आजी, ती रास्ता नऊवार साडी नेसत असे, त्यावर टपोऱ्या मोत्यांची नथ, मंगळसुत्राबरोबर आठ पदरी कंठीची सोन्याची माळ आणि आंबाड्यात सोनचाफ्याची फुलं ! आजी, त्या नऊवार साडीचा घोळदार ओचाही काढत असे आणि त्या ओच्याला ती गंमतीने तिचा ‘खिसा’ म्हणत असे ! हळदी-कुंकुवाला मिळालेली ओटी, हरबरे, पान-सुपारी सगळं ती, तिच्या त्या ‘खिश्यात’ ठेवत असे ! रास्ता साडीतलं मोठ्याआईचं ते देखणं रूप पाहून चिन्मयी लहानपणीच त्या साडीच्या प्रेमात पडली होती !

आज आजीला जाऊन २५ वर्षे झाली, पण जायच्या काही दिवस आधी तिने तिच्या सगळ्या मुलांना बोलावून तिच्या वस्तू, एकेकाला भेट म्हणून दिल्या होत्या. तेव्हा ही रास्ता साडी आणि कंठीची माळ चिन्मयीच्या आईकडे आली होती. चिन्मयीच्या आईने पुढे त्या दहा वार साडीची सहावार साडी केली आणि उरलेल्या कापडात ब्लाऊज आणि चिन्मयीसाठी कुर्ता देखील शिवला ! जवळ जवळ सत्तर-ऐंशी वर्षांपूर्वीची, ‘आजीचे आशीर्वाद गुंफलेली ती साडी’ चिन्मयीकडे अजूनही जतन करून ठेवली आहे आणि विशेष म्हणजे तलम पोताची घट्ट विणीची ती साडी जरा सुद्धा विरली नाहीये ! चिन्मयी ती साडी बऱ्याचदा नेसते आणि विशेष म्हणजे या लेखाच्या निमित्ताने तिने ती साडी नेसून आणि आजीने दिलेली कंठीची माळ घालून खास फोटो काढले ! चिन्मयी म्हणाली, “खूप वर्षांपूर्वी माझ्या आईनं, आजीला तिच्या साड्यांमध्ये ठेवासाठी ‘सॅटीनच्या चंदनाच्या पुड्या’ दिल्या होत्या, त्या चंदनाचा सुगंध अजूनही त्या साडीला येतो आहे आणि जेव्हा जेव्हा मी ती रास्ता साडी नेसते तेव्हा तेव्हा मी माझ्या आजीची माया पांघरते आणि आजीच्या आठवणींचा सोहळा साजरा करते !










अद्भुत ‘रास्ता’ !

होळकर साम्राज्याच्या राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी, त्यांचे यजमान खंडेराव होळकर यांच्या निधनानंतर इंदौर संस्थानाच्या राज्यकारभाराची सूत्र हाती घेतली आणि त्यांची राजधानी १७६५ मध्ये इंदौरहून नर्मदेकाठी महेश्वरला विस्थापित केली. महेश्वरच्या सुंदर घाटावर होळकर साम्राज्याचा कलात्मक राजवाडा आजही उभा आहे. अहिल्याबाईंनी सूत्र हाती घेण्याच्या आधीपासून तिथल्या हातमागावरील छोट्याश्या वस्त्रोद्योगाला अवकळा आली होती, पण अहिल्याबाई होळकरांनी सूरतहून आणि आजूबाजूच्या मालवा प्रांतातून काही विणकर बोलावून त्यांना महेश्वरमध्ये वसविले. खुद्द अहिल्याबाईंनी जातीने लक्ष घालून विणकरांकडून हातमागावर वेगवेगळ्या साड्या विणून घेतल्या. त्यातील काही साड्या महेश्वरी नावाने ओळखल्या जाऊ लागल्या तर काही ‘इंदुरी साड्या’ म्हणून प्रचलित झाल्या. या साड्यांवरील नक्षीकामात होळकर राजवाड्याच्या दगडी भिंतींवरील कोरीवकामाचा खूप मोठा प्रभाव पडलेला दिसून येतो. त्या काळात विणल्या जाणाऱ्या त्या काही साड्यांमधली एक खास साडी आज आपण पाहणार आहोत...... त्या साडीचं नाव आहे – ‘रास्ता इंदुरी साडी !’

होळकर साम्राज्यात विणली जाणारी ‘रास्ता’ साडी अलिकडच्या काळात परत विणायला सुरुवात झाली आहे पण पूर्वीच्या ‘रास्ता’ साडीपेक्षा आताच्या ‘रास्ता’ साडीत बरेच बदल झाले आहे. त्या काळात या ‘रास्ता इंदुरी साड्या’ नऊ, दहा किंवा अकरा वारांमध्ये विणल्या जात असत आणि उंचीलाही भरपूर असत. त्या काळातील उच्चभ्रू घराण्यातील नऊवारी नेसणाऱ्या स्त्रिया, नऊवार साडी ऐसपैस नेसता यावी म्हणून दहा किंवा अकरा वार लुगडी घेत असत. ‘रास्ता इंदुरी लुगडं’ नावाने ओळखली जाणारी ही साडी उच्चभ्रू घराण्यातील स्त्रिया खऱ्या सोन्याच्या जरीत आवर्जून बनवून घेत असत. या संपूर्ण साडीवर आडव्या बारीक जरीच्या रेषा असतात आणि म्हणूनच कदाचित ही साडी ‘रास्ता’ या नावाने ओळखली जात असावी. हातमागावर ताणून लावलेले उभे धागे म्हणजे ‘ताना’. ही ‘रास्ता’ साडी विणतांना या ‘तान्या’मध्ये रेशमाच्या धाग्यांबरोबर खऱ्या जरीचे धागे, जवळजवळ अंतरावर लावून घेतले जात असत आणि ‘बान्या’त म्हणजे आडव्या धाग्यांमध्ये उच्च दर्जाचे तलम आणि टिकावू सूती धागे टाकून ही ‘गर्भरेशमी रास्ता साडी’ विणली जात असे. जरीच्या बारीक धाग्यांमुळे संपूर्ण साडीभर बारीक रेषा तयार होऊन एका खास ‘टेक्श्चर’चा भास होत असे. सिल्कच्या धाग्यांमधून डोकावणाऱ्या साडीभर पसरलेल्या बारीक जरीमुळे ती साडी अतिशय सुरेख दिसत असे. अलिकडच्या काळात बनविल्या जाणाऱ्या ‘टिश्यू’ साड्यांची कल्पना याच साडीवरून घेतली असावी असे वाटते !   

माळवा प्रांताची चोख व्यवस्था ठेवण्याची जबाबदारी पेशव्यांनी, होळकर घराण्याला दिली होती आणि त्यांना इंदौर येथे स्थायिक होण्यास सांगितले होते. परंतु होळकर हे मूळचे महाराष्ट्रातील असल्यामुळे इंदौर संस्थानात, ठिकठिकाणी महाराष्ट्रीयन कलेचा प्रभाव पडलेला दिसतो. होळकरांच्या राजवाड्यावरील कोरीवकाम महाराष्ट्रातील मंदिरांवरील कोरीवकामाशी मिळते जुळते आहे आणि याचा प्रभाव थेट तिथे विणल्या जाणाऱ्या साड्यांवर दिसून येतो. तेव्हाच्या ‘रास्ता’ साडीचे काठ सुद्धा महाराष्ट्रातील पैठणीशी मिळते जुळते होते. पैठणीच्या पारंपरिक ‘नारळी बॉर्डर’ सारखेच ‘रास्ता साड्यांचे’ काठ असून रुंदीला पैठणीच्या काठांपेक्षा जरासे कमी होते. शिवाय या रास्ता साडीचा पदर पूर्ण भरजरी असून पदराचे उभे आणि आडवे दोन्ही धागे जरीचे असत. अलिकडच्या काळात विणल्या जाणाऱ्या ‘रास्ता’ साडीच्या काठा-पदरामध्ये वेगवेगळे प्रयोग केलेले दिसून येतात. परंतू काही अभ्यासू विणकरांचे, ‘ओरिजिनल रास्ता साडी’ला त्याच रंगरूपात पुनरुज्जीवन देण्याचे प्रयत्न चालू आहे !  

तलम पोताच्या या गर्भरेशमी नऊवारी ‘रास्ता साड्या’ खूप सुंदर ‘ड्रेप’ होत असत. लांबी रुंदीला मोठ्या असलेल्या या साड्यांचा पदर डोक्यावरून घेऊन पुढे खांद्यावरून खाली लांबलचक उरत असे, त्यामुळे या साड्या म्हणजे एक ‘खानदानी सौंदर्य’ होतं ! ऐंशी ते शंभर वर्षांपूर्वीच्या काही ‘रास्ता साड्या’ आजही काही घराण्यांमध्ये जतन करून ठेवलेल्या आढळतात आणि आश्चर्य म्हणजे इतक्या वर्षांत त्या साड्या जराही विरल्या नाहीत...... विरल्या आहेत त्या फक्त, त्या साडीच्या आठवणी !


©रश्मी विनोद सातव 

rashmisatav@gmail.com   

 

७ टिप्पण्या:

  1. अप्रतिम,मी स्वतः ने अहिल्याबाईंचे आताचे साम्राच पाहून आले त्यामूळे हा लेख वाचल्यावर त्या काळात गेल्या सारखे वाटले ,रश्मी तुझे खरच कौतुक आहे

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. Thank you.
      आपले नाव इथे दिसत नसल्यामुळे ही comment कोणी लिहिली आहे ते कळत नाहीये.
      आपले नाव कळेल का ?

      हटवा
  2. सुरेख लेख, रास्ता साडीचा इतिहास आणि चिन्मयी सुमित च्या आजीची साडी ..👌👌

    उत्तर द्याहटवा