मामेबहिणीच्या लग्नासाठी घेतलेली साडी, ईशाला
इतकी आवडली की त्या लग्नाच्या आधीच ईशाने तिच्या एका मित्राच्या लग्नात ती साडी
नेसून सुद्धा टाकली ! त्या लग्नात, ईशामुळे त्या साडीचं आणि साडीमुळे ईशाचं
सौंदर्य इतकं खुललं होतं की त्या साडीची खूपच चर्चा झाली ! ईशासाठी ती साडी म्हणजे
मुन्नारच्या आठवणींचा एक खास ठेवा आहे !
मडक्यावरचं ‘मटका सिल्क’
!
जगभरात लोकप्रिय असलेल्या ‘मलबेरी सिल्क’चं
बाय प्रॉडक्ट म्हणजे ‘मटका सिल्क’ ! मलबेरी सिल्कचे धागे कसे तयार होतात, याची
इत्यंभूत माहिती आपण मागच्या एका लेखात वाचली आहे.
पूर्ण वाढ झालेल्या ‘बॉम्बीक्स
मोरी’ नावाच्या रेशमाच्या आळ्या त्यांच्या लाळग्रंथीतून स्त्रवणाऱ्या प्रोटीनयुक्त
पदार्थापासून स्वतः भोवती कोश विणायला घेतात, त्या पदार्थात त्या आळ्यांच्या
तोंडात ‘सेरीसीन’ नावाचा चिकट पदार्थ मिसळला जातो. तीन दिवसांत तो कोश बनून तयार
होतो मग पुढे पंधरा-सोळा दिवस त्या आळ्या त्या कोशातच राहतात ! सोळाव्या दिवशी
आतील आळीचं पाकोळीत (मॉथमध्ये) रुपांतर होतं. या पाकोळीच्या तोंडातून अल्कली द्राव
स्त्रवतो आणि त्यामुळे कोशाला छिद्र पडते. या छिद्राच्या मदतीने पाकोळी, कोश तोडून
बाहेर येते. या तुटलेल्या कोशापासून रेशीम बनते आणि त्या आळ्यांच्या तोंडातून
स्त्रवलेल्या अल्कलीमुळे रेशमाचा रंगही बदलतो, परंतू व्यावसायिक दृष्ट्या अखंड
रेशीम मिळवण्यासाठी आळीचे पाकोळीत रुपांतर होण्याच्या आधीच हे रेशमाचे कोश गरम
पाण्यात टाकले जातात ! गरम पाण्यामुळे ‘सेरीसीन’ नावाचा चिकट पदार्थ धुतला जातो
आणि कोशातील धागे सुट्टे होतात आणि त्यातीलच एक सुट्टे टोक पकडून शुभ्र तकाकी
असलेला मऊसूत अखंड मलबेरी सिल्कचा धागा मिळवला जातो.
पण नैसर्गिकरित्या
पाकोळ्या जेव्हा बाहेर येतात तेव्हा ते कोश तुटतात आणि धाग्यातील ‘सेरिसिन’ नावाचा
चिकट पदार्थ बऱ्याच अंशी तसाच राहतो. त्यामुळे या धाग्यांना मलबेरीपेक्षा तकाकी
जरा कमी असते. तुटलेल्या कोशापासून अखंड रेशीम मिळत नाही, परंतु हाताने रेशमाचे
तंतू काढले जातात आणि एखाद्या मडक्याला गुंडाळून ठेवले जातात. म्हणूनच या सिल्कला ‘मटका
सिल्क’ असे नाव पडले. मग कापसापासून जसे सूत काढले जाते तशा पद्धतीने रेशमांच्या मडक्यावरच्या
तुटलेल्या या तंतूंना पीळ देऊन रेशमी सूत बनविले जाते. त्यामुळे या सूतांचा पोत
अखंड रेशमी सूताइतका मुलायम नसतो पण त्याला एक खास टेक्श्चर असते. मग पाच-सहा सूतांना
एकत्र पीळ देऊन रॉ-सिल्कचा धागा बनविला जातो तर दोन ते तीन सूतं पिळून मटका
सिल्कचे धागे तयार होतात. त्यामुळे मटका सिल्कचे धागे वजनाला हलके आणि खास टेक्श्चर
असलेले असतात आणि हीच त्या धाग्यांची खासियत आहे.
कर्नाटक, आणि गुजरात
मधून तुटलेले कोश आणून पश्चिम बंगालमध्ये त्या कोशांपासून मटका सिल्कचे धागे
बनविण्याचे आणि हे धागे वापरून हातमागावर मटका सिल्क साड्या विणण्याचे काम चालते. तुटलेल्या
कोशांपासून हे धागे बनत असल्यामुळे या साड्यांची किमंत मलबेरी सिल्कपेक्षा कमी असते
आणि या साड्या खूप टिकतात देखील. या साड्यांना विशिष्ट टेक्श्चर असल्यामुळे त्या सुळसुळीत
नसतात आणि त्यामुळे छान ड्रेप देखील होतात.
मटका सिल्कच्या
साड्यांवर ‘पेंटिंग’ किंवा ‘जामदानी वर्क’ फार सुरेख दिसते. ‘पद्मश्री’ पुरस्कार
प्राप्त आणि ‘संत कबीर ॲवॉर्ड’ विजेते प. बंगालचे विणकर बिरेन कुमार बसाक यांनी
मटका सिल्कच्या साडीला तलम मसलिनचा पदर विणून त्याच्यावर केलेल्या अप्रतिम
‘जामदानी वर्क’च्या साड्यांवर पौराणिक गोष्टी विणलेल्या आहेत. शिवाय बिरेन कुमार
यांची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस’मध्ये, जवळजवळ पावणेचार किलोमीटर लांब अशी जगातली
सर्वात लांब साडी विणल्याबद्दल सुद्धा नोंद झाली आहे !
रेशमाच्या आळ्यांना
हानी न पोहोचवता काढलेल्या मटका सिल्कच्या धाग्यांपासून हातमागावर विणलेल्या या पर्यावरणपूरक
साड्यांना, ‘अहिंसा सिल्क साड्या’ असं नक्कीच म्हणता येईल !
©रश्मी सातव
rashmisatav@gmail.com

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा