गुरुवार, २६ ऑगस्ट, २०२१

चोखंदळ प्रिया बेर्डेंची ‘कलमकारी’ !

 


१९८८ मध्ये ‘अशीही बनवाबनवी’ या सुपरहिट चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलेल्या प्रिया अरुणला, लहानपणीच आपल्या आईकडून – लता अरुण यांच्याकडून अभिनयाचं बाळकडू मिळाले होते. पुढे अनेक चित्रपटांमधून एकत्र काम करतांना प्रिया अरुण आणि लक्ष्मीकांत बेर्डे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि १९९७ मध्ये प्रिया अरुण, ‘प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे’ झाल्या. गहिऱ्या डोळ्यांच्या आणि मोहक खळ्यांच्या प्रिया बेर्डे यांच्या मराठी चित्रपटांमधील बऱ्याच भूमिका त्यांच्या सहज सुंदर अभिनयामुळे खास लक्षात राहिल्या. त्यांच्या अभिनयाबरोबरच त्यांची अजून एक गोष्ट लक्षात राहते, आणि ती म्हणजे त्यांच्या ‘हटके साड्या’ !

त्यांच्याकडे खूप सुंदर साड्यांचा संग्रह आहे. त्यांना साड्यांचे सगळेच प्रकार आवडतात. त्या म्हणाल्या, “मला सिल्क, कॉटन आणि लिननच्या साड्या जास्त आवडतात. पारदर्शक साड्या मी फार नेसत नाही, मला त्यात बिलकुल कम्फर्टेबल वाटत नाही. शिवाय मी मुंबईत कधीच साड्या घेत नाही. पुण्यातून किंवा कोल्हापूरमधून मी खूप साड्या घेत असते. अगदी बेळगाव, किंवा निपाणीला पण छान साड्या मिळतात म्हणून मी तिथेही जाऊन घेत असते ! मी साड्या खूप निवडून घेते, माझ्या साड्या हटके असाव्यात असं मला आवर्जून वाटतं”  साडीचा वेगळा प्रकार नेसता यावा म्हणून काही साड्या तर त्या स्वतः तयार करतात ! चेन्नईला जाऊन तिथल्या मलबेरी सिल्कचे तागे आणून त्याला आईच्या आणि स्वतःच्या जुन्या साड्यांचे भरजरी काठ-पदर लावून, काही साड्यांवर स्वतः भरतकाम किंवा सिक्वेंसवर्क करून त्याला स्वतः बनवलेले रेशमी गोंडे वगैरे लावून त्यांनी स्वतःसाठी साड्यांचे काही नवीन प्रकार तयार केले आहेत. कधीकधी हटके साड्या घेण्यासाठी, त्या हॅन्डलूम साड्यांची प्रदर्शनं भरतात तिथे जाऊन साड्या घेत असतात.   

अशाच एका पुण्यात भरलेल्या हॅन्डलूम साड्यांच्या प्रदर्शनात त्यांना, प्लेन मस्टर्ड रंगाच्या कॉटन साडीच्या पदरावर हाताने कलमकारी केलेली, पदराला रेडीश-पिंक रंगाचे टॅसल्स असलेली डिझायनर कलमकारी साडी खूप आवडली आणि ताबडतोब त्यांनी ती साडी विकत घेऊन टाकली. नंतर लवकरच त्यांनी ती एका ॲवॉर्ड फंक्शनला नेसली आणि त्यावर ॲन्टीक ज्युलरी घातली. तेव्हा त्या कार्यक्रमात, नजरेत भरणाऱ्या त्या साडीमुळे सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या. त्या कार्यक्रमात त्यांना आणि त्यांच्या साडीला सुद्धा खूप ‘कॉम्प्लीमेंटस’ मिळाल्या होत्या.  

‘माझ्यासारखी साडी दुसरीकडे कुठे दिसू नये’, असा आग्रह धरणाऱ्या प्रिया बेर्डे यांना कलमकारी साडी आवडली यात नवल नाही, कारण हाताने चित्र काढून रंगवलेली प्रत्येक कलमकारी वेगवेगळी असते !    

 

गोष्ट सांगणारी ‘श्रीकलाहस्ती’ कलमकारी साडी !

 ‘कलमकारी’ हा शब्द ‘कलम’ आणि ‘कारी’ या दोन पर्शियन शब्दांपासून तयार झाला असून ‘कलम’ म्हणजे पेन आणि ‘कारी’ म्हणजे कारागिरी ! खूप वर्षांपूर्वी पर्शिया आणि भारत या दोन देशातील व्यापारातून या पर्शियन शब्दांची देवाणघेवाण झाली असावी. भारतात कलमकारी शैलीचे दोन उप-प्रकार बघायला मिळतात. आंध्रप्रदेशमध्ये चित्तूर जिल्ह्यात सुवर्णमुखी नदीवर वसलेलं ‘श्रीकलाहस्ती’ या गावी उदयाला आलेली ‘श्रीकलाहस्ती शैलीतील कलमकारी’ आणि आंध्रप्रदेशमधील कृष्णा जिल्ह्यात पूर्वेकडील समुद्रकिनाऱ्यावर वसलेलं ‘मछलीपटनम’ या गावी उदयाला आलेली ‘मछलीपटनम शैलीतील कलमकारी’ अशा दोन ढंगात कलमकारी केली जाते. यातील ‘श्रीकलाहस्ती शैली’, १४ व्या शतकात विजयनगर साम्राज्यात उदयाला आली होती. गोष्टी सांगण्यासाठी या कलेचा तेव्हा उपयोग केला जात असे. ‘चित्रकथी’ समाजातील कलाकार गावोगावी फिरून ऐतिहासिक आणि पौराणिक गोष्टीतील प्रसंगांची चित्रं कापडावर काढून लोकांना गोष्टी सांगून आपली उपजीविका करत असत. मग त्यांनी रंगवलेली चित्रं देवळांच्या अंतर्गत सुभोभिकरणासाठी लावली जात. पुढे हे कलाकार ही शैली वापरून वस्त्रांवर सुद्धा चित्रं काढू लागले आणि त्यातूनच ‘श्रीकलाहस्ती शैली’तील कलमकारी साडीचा जन्म झाला ! ‘श्रीकलाहस्ती शैली’त रंगवलेल्या साडीवर रामायण – महाभारतातील प्रसंग, पौराणिक गोष्टी, देव-देवतांची चित्रं, प्राणी-पक्षी बघायला मिळतात. तर ‘मछलीपटनम शैलीतील कलमकारी’, मुघल आणि कुतुबशाही साम्राज्यात उदययाला आली होती. या शैलीत पानं-फुलं, झाडं-वेली, मोर, पक्षी, कोयऱ्या, कमळं किंवा नैसर्गिक देखावे वगैरेंची चित्रं काढली जात असत. पुढे ब्रिटीशांच्या काळात या दोन्ही शैली डबघाईला आल्या होत्या. मग स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सरोजिनी नायडू यांच्या वहिनी श्रीमती कमलादेवी चटोपाध्याय यांनी या कलेला पुनरुज्जीवीत केले.

‘श्रीकलाहस्ती शैलीत’ हाताने ‘फ्री-हॅन्ड’ चित्रं काढली जातात म्हणून त्याला ‘पेन कलमकारी’ असेही म्हणतात, तर ‘मछलीपटनम शैलीत’ हाताने ब्लॉक प्रिंटींग केले जाते. आज आपण ‘श्रीकलाहस्ती शैली’तील साडी कशी बनते ते पाहणार आहोत. कॉटन किंवा सिल्कच्या कापडावर, हाताने या शैलीतली चित्रे काढून नैसर्गिक रंगाने रंगविली जातात. अनेक टप्प्यांतून जात ही कलमकारी साडी ३० ते ४५ दिवसात तयार होते ! सर्वात आधी साडीच्या लांबीरुंदीचे पांढरे कापड घेऊन ते पूर्ण एक दिवस पाण्यात भिजवून ठेवले जाते. हे कापड भिजेपर्यंत हिरडा कुटुन त्याची पावडर पाण्यात मिसळून घट्ट पेस्ट करून घेतली जाते. मग एका साडीसाठी अंदाजे तीन लिटर म्हशीचे दुध घेऊन त्यात हि पेस्ट कालवली जाते त्यामुळे त्या दुधाला हलका पिवळसर रंग येतो. नंतर दुधाच्या या मिश्रणात साडीचे कापड पूर्ण एक दिवस भिजत ठेवले जाते ! या मिश्रणासाठी म्हशीचे दुध वापरले जाते, कारण म्हशीच्या दुधात उच्च दर्जाचा स्निग्धांश असतो, तो स्निग्धांश या संपूर्ण कापडावर पसरतो. त्यामुळे कापडावर सहजपणे चित्रातील ओघवत्या रेषा काढता येतात ! या मिश्रणात भिजवलेले हे कापड दुसऱ्या दिवशी घट्ट पिळून वाळवले जाते. हलक्या पिवळसर रंगाच्या मिश्रणामुळे कापडालाही ‘ऑफ व्हाईट’ रंग येतो. या शेडवर कलमकारीचे रंग उठून दिसतात शिवाय या प्रक्रियेमुळे ते रंग कापडावर व्यवस्थित बसतात. मग हे कापड टेबलवर व्यवस्थित पसरवून घेतले जाते आणि सुरु होते कलमकारीची चित्रकारी. ‘श्रीकलाहस्ती शैली’तील कुशल कलाकार, हाताने भराभर या कापडावर चित्रांची आऊटलाईन काढून घेतात. या साठी ते विशिष्ट प्रकारचे पेन वापरतात. हे पेन ते स्वतः तयार करतात ! आजूबाजूला सहज उपलब्ध असलेल्या हळदीच्या झाडाच्या बारीक – जाड वाळलेल्या काड्या आणून त्या कोळशाच्या निखाऱ्यांवर थोडा वेळ ठेवून मग त्यावर वाळू टाकतात आणि अर्धा तास झाकून ठेवतात ! त्यामुळे या काड्यांची पूर्ण राख न होता बारीक कोळसे तयार होतात ! या बारीक कोळशाच्या काड्या म्हणजेच त्यांची पेनं ! ते कारागीर अशी खूप पेन्स तयार करून ठेवतात आणि लागेल तसे वापरतात. दुसऱ्या झाडांच्या काड्या, चित्र काढतांना तुटतात म्हणून हळदीच्याच झाडांच्या काड्यांचा उपयोग केला जातो. कॅनव्हासवर चित्रकार जसे चित्र काढतो तसंच हे कारागीर पूर्ण साडीवर हाताने अतिशय सुंदर ‘स्केच’ काढून घेतात ! या चित्रांमधील त्यांच्या कल्पनाशक्तीला दाद द्यावीशी वाटते. संपूर्ण चित्राची आऊटलाईन काढून झाल्यानंतर ही आऊटलाईन काळ्या शाईने डार्क केली जाते. या आऊटलाईनसाठी लागणारे पेन सुद्धा ते स्वतः तयार करतात. बांबूच्या बारीक काड्या घेऊन त्यांना हवे तसे टोक केले जाते, मग हे पेन बोटांमध्ये जिथे धरतो तिथे सुती कापडाची पट्टी, सुती दोऱ्याने बांधली जाते. हे पेन, बांधलेले कापड बुडेल इतके काळ्या शाईत बुडविले जाते, जेणे करून त्या कापडात पण ही शाई शोषली जाते आणि आऊटलाईन करतांना त्या कापडातून शाईचा सलग ‘फ्लो’ मिळेल. ही विशिष्ट प्रकारची काळी शाई सुद्धा नैसर्गिक घटक वापरून खास पद्धतीने बनवली जाते. लोखंडाचे तुकडे, तुरटी आणि गुळ पंधरा दिवस पाण्यात बुडवून ठेवतात आणि सगळ्या घटकांची एकत्रित प्रक्रिया होऊन डार्क काळ्या रंगाचा द्रव तयार होतो. हाच द्रव ते शाई म्हणून वापरतात. आऊटलाईन झाल्यानंतर आतील रंग भरायला घेतले जातात. वेगवेगळ्या नैसर्गिक घटकांपासूनच इंद्रधनुष्यातील सात रंग तयार करून ठेवलेले असतात. टोक नसलेल्या बांबूच्या पेननेच हे रंग सुंदर रंगसंगतीत अगदी निगुतीने भरले जातात. हे रंग पूर्ण वाळल्यानंतर वाहत्या पाण्यात ही साडी धुवून घेतली जाते. मग साडीवरचे रंग अजून पक्के करून घेण्यासाठी अर्धा तास पाण्यात उकळून घेतली जाते. साडी उकळून झाल्यावर परत थंड पाण्यात टाकून शेवटी वाळवली जाते.

‘श्रीकलाहस्ती शैली’तील साडीवरची कलमकारी म्हणजे कॅनव्हासवर चितारलेली अप्रतिम कलाकृती वाटते आणि या चित्रांमधून प्रत्येक कलमकारी साडी आपल्याला एकेक गोष्ट सांगते ! अत्यंत किचकट प्रक्रियेतून तयार झालेली ही साडी योग्य किंमतीत विकली जाऊन या कलाकारांना योग्य तो मोबदला मिळायला हवा असं मनापासून वाटतं.    

©रश्मी सातव 

rashmisatav@gmail.com   

         


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा