गोष्ट एका ‘कमिटमेंट’ची .....!
भारतातल्या पहिल्या, ‘ब्रॉडवे म्युझिकल शो – मुगले-ए-आझम’, मध्ये अनारकलीची भूमिका
साकारातांना, ‘जब प्यार किया तो डरना क्या ?..’ हे गाणं जेव्हा प्रियांका बर्वेनं
सादर केलं, तेव्हा संपूर्ण बॉलीवूडनं तो ‘शो’ डोक्यावर घेतला ! फिरोझ अब्बास खान
दिग्दर्शित अत्यंत भव्य-दिव्य अशा या ‘म्युझिकल शो’चे देशभरात आणि जगभरात मिळून
आजवर दिडशे ‘शो’ झाले आहे. ‘मुगले-ए-आझम’च्या संधीचं प्रियांकानं सोनं केलं ! या
सादरीकरणासाठी तिला अनेक पुरस्कार मिळाले. संगीतविश्वात तिची खास ओळख निर्माण
झाली. ‘मुगले-ए-आझम’, मधल्या अनारकलीपासून ते अनेक मराठी, हिंदी चित्रपटांना
प्रियांकाने दिलेल्या पार्श्वसंगीताने, त्या चित्रपटांना खास सुरिली ओळख मिळाली ! प्रियांकाची
‘संगीत कलेला’ असलेली ‘कमिटमेंट’ जबरदस्त आहे. अशाच एका ‘कमिटमेंट’ची ही एक
गोष्ट.....
२०१९ च्या दिवाळीत, औरंगाबादमध्ये प्रियांकाचा
आणि नचिकेत लेलेचा ‘दिवाळी पहाटचा’ गाण्याचा कार्यक्रम होता आणि प्रियांका त्या ऐन
दिवाळीत खूप आजारी पडली ! अंगात प्रचंड ताप आणि अशक्तपणा होता. त्यावर्षी दिवाळीत
पाऊसही खूप पडत होता. प्रियांकाने ठरवले असते तर ती तो कार्यक्रम रद्दही करू शकली
असती, पण संगीतकलेसाठी असणारी तिची ‘कमिटमेंट’ तिला औरंगाबादला घेऊन गेली ! तिला
बरं नसल्यामुळे तिच्या सोबत तिची आई – संगीताताई बर्वे पण गेल्या होत्या.
दुसऱ्या दिवशी पहाटे ५:३० ला कार्यक्रम होता.
पण रात्रभर पाऊस पडल्यामुळे ऐनवेळेस ग्राउंडवर होणाऱ्या कार्यक्रमाचं ठिकाण बदललं
आणि ५:३० ला सुरु होणारा कार्यक्रम ८ वाजता सुरु झाला ! प्रियांकाच्या अंगात
रात्रभर ताप होता. तिला खूप अशक्तपणा आला होता. पण कार्यक्रमासाठी प्रियांका पहाटे
५ लाच तयार होती. नुकत्याच झालेल्या तिच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त ती आणि तिचा
नवरा – सारंग, ‘कुर्ग’ला फिरायला गेलेले असतांना, सारंगने प्रियांकाला तिथली स्पेशॅलिटी
असलेली सुंदर ‘बांबू सिल्कची’ साडी घेतली होती आणि तीच साडी तिने या गाण्याच्या
कार्यक्रमाला नेसली. त्यावर तिच्या आई-बाबांनी, ‘आजीची आठवण’ म्हणून दिलेला सोन्याचा
अँटिक नेकलेस गळ्यात घातला होता आणि त्याच गळ्यातून प्रियांकाचे त्या
कार्यक्रमासाठी जे सुर लागले ते स्वर्गीय होते ! तब्येत ठीक नसतांनाही
प्रियांकाच्या आवाज खूप छान लागला होता ! बाहेर पाऊस आणि आत प्रियांकाचे स्वर बरसत
होते.....लोक हरवून आणि हरखून गेले होते. प्रियांकाच्या गाण्यांना अभूतपूर्व दाद
मिळाली. प्रियांकासाठी ते अविस्मरणीय क्षण होते. ते क्षण, ती साडी, तो नेकलेस प्रियांकाने
तिथेच सगळं कॅमेरात टिपून ठेवलं...... अगदी कायमचं !
बांबूची पर्यावरणपूरक
साडी !
बांबूपासून कागद बनतो हे
वर्षानूवर्षे आपल्याला माहित आहे, पण बांबूपासून साड्याही बनतात, हे गेल्या काही वर्षांतच
जगाला अवगत झालेलं सत्य आहे. जगभरात मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या बांबूंपासून कापड
तयार करण्याचे प्रयोग अनेक वर्षांपासून चालू आहेत. १८८१ मध्ये लोकरमिश्रित बांबूचे
धागे बनवण्यात यश आलं. पण ते धागे, कपडे बनविण्यासाठी तितकेसे उपयोगी पडले नाहीत. मग
पुढे २० व्या शतकाच्या उत्तरार्धात बांबूपासून तलम धागे बनवण्यात यश आलं. खऱ्या
अर्थाने त्याचा वापर सुरु झाला तो २१ व्या शतकात.
बांबूचा आतला
भाग काढून त्याचे तुकडे करून त्यावर रासायनिक प्रक्रिया करून बनवलेल्या ‘बांबू
रेयॉन’च्या धाग्यांपासून इतर कपडे बनविले जातात. पण आता रसायनं न वापरता, मशिनवर पारंपरिक
पद्धतीने सुद्धा बांबूचे तंतू काढले जातात. त्या तंतुंपासून बनवलेल्या धाग्यांपासून
सुंदर साड्या बनवल्या जातात. या साड्यांना सिल्कसारखी थोडी चमक असून, पोत
लिननसारखा असतो. त्यामुळे 'ॲनिमल राईट्स’चा
कट्टर पुरस्कार करणाऱ्या स्त्रिया, ज्या सिल्कच्या साड्या वापरत नाहीत त्यांच्यासाठी
बांबू सिल्क किंवा बांबू लिनन हा एक उत्तम पर्याय आहे. शिवाय कोणतीही रासायनिक खतं
किंवा रासायनिक किटकनाशकं यांचा वापर न करता बांबू वाढवले जातात त्यामुळे
पर्यावरणपूरक गोष्टींमध्ये या साड्यांचा समावेश केला जातो.
सध्या फॅशन
जगतात बांबू फॅब्रिकचा वापर खूप कल्पकतेने केला जात आहे. बांबूपासून तंतू काढण्याची
प्रक्रिया गुंतागुंतीची असल्यामुळे त्यात जाणाऱ्या वेळेमुळे ‘बांबू-यार्न’ तुलनेने
महाग असते. त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने काढलेल्या ‘बांबू-यार्न’च्या साड्यांची
किंमत पण तशीच असते. पारंपरिक पद्धतीने काढलेल्या या नैसर्गिक धाग्यापासून
बनवलेल्या साड्या कोणत्याही ऋतूत वापरता येतात. उन्हाळ्यात या साडीत गरम होत नाही
आणि थंडीत या साडीत ऊबदार वाटते. बांबूचा नैसर्गिक गुणधर्म या धाग्यात सुद्धा
असल्यामुळे त्वचेसाठी पण हे कापड पर्यावरणपूरक असते. फक्त हा धागा तुलनेने नाजूक
असल्यामुळे, तो धागा टिकावू होण्यासाठी त्यात दुसरे तंतू मिक्स करून ‘बांबू-कॉटन’,
‘बांबू-लिनन’, ‘बांबू-सिल्क’ आणि ‘बांबू-वुल’ सारखे नवीन धागे सुद्धा बनवले
जातात.
बांबू-लिननच्या
किंमती, नेहमीच्या कॉटनच्या तुलनेत जास्त असल्यामुळे त्याच्या वापर कमी प्रमाणात होतो,
शिवाय भारतात कापूस खूप मोठ्या प्रमाणात पिकत असल्यामुळे कॉटनला पर्याय शोधण्याची फारशी
गरज कधी पडली नाही. कापसाला बांबूच्या तुलनेत पाणी मुबलक प्रमाणात लागते त्यामुळे
पाण्याची कमतरता असलेल्या ठिकाणी कापूस कमी प्रमाणात उपलब्ध असतो. त्यामुळे अशा ठिकाणी बांबूच्या धाग्यांचा पर्याय
उत्तम मानला जातो. बांबूची आणि तंत्रज्ञानाची उपलब्धता यांचा मेळ ज्या ठिकाणी बसविला
जातो त्या ठिकाणी या बांबूच्या साड्या तयार होतात, त्यामुळे ही साडी कोणत्याही
प्रदेशाची खासियत न ठरता भारतात वेगवेगळ्या राज्यांत, स्थानिक पातळीवर या साड्या
तयार होतात आणि त्यामुळे अशा भागात फिरायला गेल्यावर तिथल्या स्थानिक कारागिरांना
प्रोत्साहन म्हणून नैसर्गिक पद्धतीने बनवलेल्या बांबू-सिल्कची साडी घ्यायला काहीच
हरकत नाही.


Khup chan lihile ashes...tadak bhadak nasalelya bamboo silk sadya “graceful “disatat he matra 100% satya !
उत्तर द्याहटवाखूप छान लेख. बांबू सिल्कची साडी माहिती होती, पण या नव्या माहितीमुळे आणखी आवडायला लागली.
उत्तर द्याहटवा