गुरुवार, ६ मे, २०२१

सोनालीला गवसला एक ‘अमूल्य ठेवा’ !

 

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील एक ‘सो... कूल’ नाव म्हणजे सोनाली कुलकर्णी ! वयाच्या १८ व्या वर्षीच सोनालीने गिरीश कर्नाड दिग्दर्शित ‘चेलुवी’ या हिंदी चित्रपटापासून सिनेसृष्टीतील तिच्या करियरची सुरुवात केली, पण त्याही आधीपासून सोनालीच्या कसदार अभिनयाची आणि गायनाची चुणूक नाटकांमधून आणि कार्यक्रमांमधून, मनोरंजन क्षेत्राला आधीच लागली होती ! पुढे ‘फिल्म फेअर’चा 'सर्वोत्तम अभिनेत्री'चा अनेकदा पुरस्कार मिळालेल्या सोनालीला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर इतरही अनेक पुरस्कार मिळाले. शिवाय तिची शास्त्रीय नृत्यावरची पकड पण जबरदस्त आहे. संपूर्ण देशाने तिच्या नृत्याची झलक, सोनी टीव्हीवरील ‘झलक दिखला जा’च्या ‘सेलिब्रेटी शो’मध्ये पाहिली आहे. अभिनय, गायन आणि नृत्यावर प्रभुत्त्व असलेल्या सोनालीचा अजून एक खास पैलू आहे – ती उत्तम लिहिते सुद्धा ! कॉलेजमध्ये असतांना सोनालीला मराठी साहित्याच्या अभ्यासासाठी स्कॉलरशिप मिळाली होती. सामाजिक जाण असलेल्या या संवेदनशील अभिनेत्रीचे 'सो...कूल' हे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. फक्त मराठी मनोरंजन क्षेत्रातच नाही तर हिंदी, इंग्लिश, तेलगु, तमिळ, गुजराथी आणि इटालियन सिनेसृष्टीत सुद्धा तिच्या अभिनयाची उल्लेखनीय दखल घेतली गेली आहे. खरतर तिच्या उल्लेखनीय कलाकृतींची यादी इतकी मोठी आहे किंबहुना तिच्या संपूर्ण यशोगाथाची व्याप्तीच इतकी मोठी आहे की ‘साडीच्या’ या लेखात ती व्याप्ती मावणार नाही म्हणून थोडक्यात घेतलेला हा धांडोळा !   

‘रेड कार्पेट्स’वर, ‘प्रिमियर शोज’ला, पुरस्कार सोहळ्यांना, ‘फिल्म फेस्टिवल्स’ना आणि इतर कार्यक्रमांना सोनाली आवर्जून साडीच नेसून जाते. तिच्या अभिजात सौंदर्याला आणि तिच्या उत्तुंग कर्तृत्त्वाला त्या ‘ग्रेसफुल’ साड्यांनी अजूनच ‘साज’ चढतो ! सोनाली, ‘साडी प्रकारच्या’ लहानपणापासूनच प्रेमात होती. तिच्या करियरच्या सुरुवातीच्या काळामध्ये नाटकांच्या प्रयोगांना ती तिच्या आईच्या साड्या, त्यावर आईचेच ‘टाचलेले’ ब्लाऊज घालून मनसोक्त मिरवत असे. अगदी ११वीत असतांना दूरदर्शनवरील कार्यक्रमामध्ये तिच्या प्रिया वहिनीची साडी, ‘अरंगेत्रम’ला वृषाली वाहिनीची साडी, भारतातल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलला तिच्या बहिणीची – स्मिता दातेची साडी, तर कधी कधी पौर्णिमा गानूच्या आईच्या साड्या, ती अगदी आवडीने नेसत असे. शिवाय तिच्या करियरच्या पुढच्या टप्प्यात साड्यांच्या धाग्यांनी तिला अनेक व्यक्तिमत्त्वं जोडली गेली. अशाच एका मोठ्या व्यक्तिमत्त्वाच्या, अभिनयाचं जणू ‘उत्तरदायित्त्व’च साडीच्या घडीतून सोनालीकडे आलं,..... ते सृजनशील व्यक्तिमत्त्व म्हणजे – ‘स्मिता पाटील’ !

ऐकेकाळी आपल्या अभिनयाने सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या स्मिताजी यांचे वयाच्या केवळ ३१ व्या वर्षी निधन झाले. स्मिताजींची बहिण अनिता यांनाही भारतीय चित्रपट, नाटके आणि कलाकार यांच्याविषयी कमालीचा आदर आहे. अनिताजींनी, स्मिताजींच्या नंतर अनेक कलाकारांसोबत खास ऋणानुबंध जपले आहेत. सोनाली म्हणाली, “स्मिताजींच्या अनेक वस्तू अनिताजींनी अनेक कलाकारांना भेट म्हणून दिल्या आहेत आणि त्यातली मी एक भाग्यवान आहे !” सिनेसृष्टीतल्या उत्तमोत्तम कलाकृती अनिताजी आवर्जून बघत असतात. सोनालीचे काम, तिची नाटके त्या, आवर्जून तिकीट काढून बघायला जात असत. एक दिवस तिचा एक सिनेमा बघून त्या खूप भारावून गेल्या होत्या, त्यांना कदाचित सोनालीमध्ये स्मिताजी दिसल्या असाव्यात ! लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी सोनालीच्या अभिजात कलेचे कौतुक म्हणून सोनालीला शाही थाटात त्यांनी एक भेट पाठवली. फुलांचा एक सुंदर गुच्छ आणि त्या सोबत सुंदर पिवळ्या रंगाची - मऊसूत सिल्कची ‘बंगाल जकार्ड’ साडीची घडी ! साडीच्या घडीत, अनिताजींच्या हस्ताक्षरातील एक चिठ्ठी होती. स्मिताजींच्या अभिनयाचा वारसा साडीच्या रुपात सोनालीकडे रहावा.... असं त्यांना मनापासून वाटत होतं, त्यामुळे स्मिताजींनी नेसलेली साडी त्यांनी सोनालीला भेट म्हणून पाठवली होती ! स्मिताजींनी नेसलेली, त्यांचा स्पर्श झालेली ती साडी सोनालीच्या ध्यानीमनीही नसतांना त्या क्षणी तिच्या हातात होती ! स्मिताजींचा स्पर्श झालेल्या त्या साडीवर सोनाली कितीतरी वेळ हात फिरवत राहिली ! साडीच्या त्या धाग्यांनी एक ‘लेजंड’ दुसऱ्या ‘लेजंड’ला जोडला गेला ! स्मिताजींचा अभिनय बघत मोठ्या झालेल्या सोनालीला ती सगळी वर्ष त्या साडीच्या घडीत सापडली ! सोनालीसाठी ती जगातली मौल्यवान भेटवस्तू ठरली होती !

पुढे काही वर्षांनी, भारतातलं सिनेसृष्टीतील पहिलं 'कॉस्च्युम' आणि 'आर्ट डिपार्टमेंट'च प्रदर्शन भरविण्यात आले होते आणि त्या प्रदर्शनासाठी उद्घाटक म्हणून सोनालीला निमंत्रित केले होते. खूप वर्षांपूर्वी स्मिताजींनी ज्या साडीची घडी मोडली होती त्याच साडीची या प्रसंगी सोनालीने परत एकदा घडी मोडली ! खरतर सोनालीला, अशा वस्तूंबद्दल खूप ‘अप्रूप’ आहे, हे माहित असल्यामुळे सुमित्रा भावेंनी पण जाण्यापूर्वी त्यांची एक साडी सोनालीला भेट दिली होती, आणि अशीच एक साडी सोनालीच्या नृत्य-शिक्षिका गुरु माणिकताईंनी पण त्यांची आठवण म्हणून सोनालीला दिली आहे ! सोनालीला साडीबद्दल वाटणाऱ्या अशा आदरयुक्त भावनेमुळेच सोनाली, स्मिताजींचीच साडी नेसून 'कॉस्च्युम' प्रदर्शनाच्या उद्घाटनाला गेली. त्या प्रदर्शनात मधुबाला, संध्या, साधना, वैजयंतीमाला, वहिदा रहेमान आणि अशा कितीतरी कलाकारांचे 'कॉस्च्युम' ठेवण्यात आले होते. सोनाली म्हणाली, “त्या थोर कलाकारांना आम्ही स्पर्श केला आहे !....असं ती वस्त्रं त्या प्रदर्शनात मोठ्या अभिमानाने मला जणू सांगत होती !.... आणि त्यातून मी भारावून जाऊन तिथे भाषण केले !” सोनाली भाषणात म्हणाली, “मला इथे येण्यासाठी कोणी बळ दिलं असेल तर ते, मी नेसलेल्या या साडीनं !.... तुम्हाला माहित आहे... ही साडी कोणाची आहे ते ?... स्मिता पाटील यांची !” ते ऐकून तिथला प्रत्येकजण निशब्द झाला होता ! भाषण संपल्यावर सगळ्यांनी तिच्या भोवती गराडा घातला, त्यांना स्मिताजींचा स्पर्श झालेल्या त्या साडीच्या पदराला फक्त एक स्पर्श करायचा होता !

त्या प्रदर्शनाच्या इथूनच पुढे सोनाली एका कार्यक्रमानिमित्त स्मिताजींचा मुलगा प्रतिक आणि बहिण अनिताजी यांना भेटायला गेली होती. अर्थातच सोनालीच्या अंगावर  तीच साडी होती. सोनालीला त्या साडीत बघून त्या सगळ्यांना खूप गहिवरून आलं ! अनिताजींने सोनालीचा हात धरून त्या कार्यक्रमात नसरुद्दिन शहा, दीप्ती नवल आणि स्मिताजींच्या मित्रपरिवारापैकी प्रत्येकाला जाऊन सांगितले, ‘This is Smita’s Saree !’ तेव्हा सोनालीलाही अभिनयाचा एक दैदिप्यमान वारसा आपल्या अंगावर ल्यायल्याचा सार्थ अभिमान वाटला असावा ! प्रतिक तर खूप भावूक झाला होता..... त्याच्या आईची साडी नेसलेल्या सोनालीताईबरोबर त्याने आठवण म्हणून फोटो देखील काढला !

खरतर, सोनालीने तिच्या मनाच्या आणि कपाटाच्या खोल कप्प्यात जतन केलेली ती साडी म्हणजे..... ‘सोनालीकडे आलेला अमूल्य कलेचा एक वारसा आहे !’




‘जकार्ड साडी’चे तंत्र ! 

आज आपण साडीवरील नक्षी विणण्याचे एक असे तंत्रज्ञान पाहणार आहोत जे निरनिराळ्या साडी प्रकारांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाते. या तंत्रज्ञानामुळे साड्यांवर कोणतेही डिझाईन, साडी विणतांनाच विणले जाते आणि त्यामुळे अतिशय सुंदर नक्षीकाम असलेल्या साड्या तयार होऊ शकतात.

१८०४ साली फ्रान्समध्ये जोसेफ जकार्ड यांनी कापडावर नक्षी विणण्याचे खास तंत्रज्ञान विकसित केले आणि जकार्ड यांच्या नावावरून त्या तंत्रज्ञानाला ‘जकार्ड विव्हिंग’ असे नाव दिले गेले. या तंत्रज्ञानाने ‘टेक्सटाईल इंडस्ट्री’मध्ये खूप मोठ्या प्रमाणात क्रांती केली आहे. जकार्ड म्हणजे ‘जकार्ड लूम’वर कापडावर नक्षी विणण्याची एक खास पद्धत. या तंत्रज्ञानामुळे हातमागावर कापड विणताविणताच त्यावर सुंदर नक्षीकाम विणले जात असे. त्या काळात हातमागावर हे विणकाम करतांना दोन विणकर लागत असत, त्यातील एक विणकर हातमागावर वरच्या बाजूला असलेल्या ‘डेक’वर बसून, नक्षीकामानूसार ‘तान्याचे’ उभे धागे नियंत्रित करत असे. या कामाला बराच वेळ आणि मेहनत लागत असल्यामुळे तेव्हा ‘जकार्ड फॅब्रिक्स’च्या किंमत जास्त असे. पण नंतरच्या काळात हे तंत्रज्ञान खूप विकसित होत गेले, त्यामुळे लागणारा वेळ आणि मेहनत कमी झाली आणि त्यामुळे ‘जकार्ड फॅब्रिक्स’च्या किंमती पण आटोक्यात आल्या. 

‘जकार्ड लूम’ वरचे ‘जकार्ड’ तंत्रज्ञान काय आहे ते अगदी थोडक्यात बघुयात. पूर्वी ‘जकार्ड’ची साडी हातमागावर बनवितांना साडीवर जी डिझाईन हवी आहे ती डिझाईन, ‘डिझाईन आर्टिस्ट’ हाताने ग्राफ पेपरवर काढून ते सुंदर रंगसंगतीत रंगवत असत. मग ग्राफ पेपरवरील डिझाईननुसार हातानेच एका विशिष्ट प्रकारच्या ‘कार्ड पंचिंग’ मशीन द्वारे साडीच्या रुंदी इतक्या आयताकृती जाड कार्ड्सवर पंच करून एका विशिष्ट पॅटर्नमध्ये छिद्रे पाडली जात असत. साडीच्या लांबीनुसार त्यातील ठरलेले डिझाईन कितीवेळा रिपीट होणार आहे त्यानुसार तितके कार्ड्स पंच केले जात असत  आणि मग ते कार्ड्स एकमेकांना जोडले जाऊन ‘जकार्ड लूम’च्या आयताकृती सिलेंडरवर लावले जातात. त्या सिलेंडरच्या समोर आडव्या मोठ्या सुया अशा पद्धतीने बसवलेल्या असतात की जिथे कार्डवर छिद्र आहे त्याच्या समोरची सुई आरपार जाते आणि जिथे छिद्र नसते तिथली सुई आरपार न जाता मागे ढकलली जाते. सुयांच्या या हालचालीमुळे त्याला जोडलेले खालचे उभे धागे त्या पद्धतीत वरखाली होतात आणि आडव्या धाग्यांबरोबर नक्षीनुसार विणले जातात. ही संपूर्ण प्रक्रिया जरी गुंतागुंतीची असली तरी धागे मात्र एकमेकात अशा प्रकारे गुंततात की त्यातून एक सुंदर कलाकृती तयार होते. पूर्वी या प्रत्येक टप्प्यावरचे काम हाताने केले जायचे आता मात्र संगणक प्रणाली हे टप्पे नियंत्रित करते. संगणकामुळे अतिशय गुंतागुंतीची भरजरी नक्षी सुद्धा आता साडीवर उतरवणे शक्य झाले आहे. जकार्ड पद्धतीने साडी विणून झाल्यानंतर साडीच्या आतल्या बाजूने जे ‘फ्लोटिंग’ धागे म्हणजे नक्षीत वापरले न गेलेले सुट्टे धागे असतात ते एका खास पद्धतीने बेमालूमपणे कापले जातात. त्या मुळे जकार्डची नक्षी आतल्या बाजूने बारकाईने पाहिल्यास नक्षीच्या कडेने कापलेले धागे दिसतात. मागून जरी कापलेले धागे दिसत असले तरी ते निघून येत नाहीत कारण ते एका खास खुबीने आत विणले गेलेले असतात.

आता पश्चिम बंगालच्या जकार्ड साडीकडे वळू. पश्चिम बंगालमध्ये जकार्ड साडी सिल्क किंवा कॉटन मध्ये तयार होते. पश्चिम बंगालची किंवा देशातील कोणत्याही प्रकारची जकार्ड साडी वर सांगितल्या प्रकारे तयार होते. सोनाली कुलकर्णीने नेसलेल्या सुंदर पिवळ्या सिल्कच्या बंगाल जकार्ड साडीवर बंगाली नक्षीकामाचा प्रभाव दिसतो आहे. ‘जकार्ड’ साडी जितकी सुबक तितके त्या साडीसाठी वापरलेले तंत्र गुंतागुंतीचे आणि विलक्षण असते ! पण या विलक्षण तंत्रामुळेच सुंदर कलाकृती तयार होत आहेत.  

© रश्मी सातव

rashmisatav@gmail.com    


३ टिप्पण्या: